Skip to main content

खाकीमागचा माणूस
========================================

परवा सहज माझ्या रुपेश नावाच्या मित्राबरोबर चर्चा करताना पोलीसांचा विषय निघाला.  त्याच्या कारमधला ऑडिओ सिस्टम चोरीला गेल्यानंतर त्याला ठाण्यातल्या वर्तक नगर पोलीस स्टेशनमधील "श्री. ज्ञानेश्वर आव्हाड" नावाच्या पोलीस अधिकारी साहेबांनी कशी मदत केली हे तो सांगत होता.  त्यावेळी बेदरे सरांची आठवण आली.  बेदरेसर हे माझ्या आयुष्यातले पहिले पोलीस ऑफिसर ज्यांच्याशी मी समोरासमोर भेटलो आणि बोललो.  त्याअगोदर पोलिसांबद्दल माझं मत काही खास चांगलं नव्हतं.  त्यानंतर एखाद वर्षांनी संजय गोविलकर दादा भेटले आणि खाकीमागच्या खऱ्या प्रेमळ माणसांची भेट झाली.

========================================

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट.  मी जॉबला लागल्यानंतर मामाचा मुलगा श्याम पहिल्यांदाच मुंबईमध्ये आला होता.  घरात पार्टी व्हावी म्हणून पावभाजी घेण्यासाठी आम्ही बाईकवर दोघेही चेंबूरला सदगुरू रेस्टोरंटमध्ये गेलो होतो.  सदगुरुची पावभाजी खूपच फेमस आहे.  चेंबूरला पार्किंगचा नेहमीचाच इश्यू.  त्यात सदगुरु एकदम स्टेशनबाहेरच नाक्यावर असल्याने तिथे तर गाडी लावायला चान्सच नव्हता.   हॉटेलपासून थोड्या अंतरावर आम्ही जाऊन बाईक लावली आणि हॉटेलमध्ये पार्सल घेण्यासाठी गेलो.  पार्सल येण्यासाठी बराच उशीर लागला.  पार्सल रेडी होतंय पाहिल्यावर बिलिंग होईपर्यंत मी श्यामला बाईक हॉटेलसमोर आणायला बाईकची चावी दिली.  मी पार्सल घेऊन निघेपर्यंतच शाम धावत माझ्याकडे आला.

"अरे पोलिसांनी गाडी पकडली.  चावी घेतलान माझ्याकडून",  श्यामू घाबरला होता.  मला कळायला काही मार्ग नव्हता.  हॉटेलसमोरच एक पोलीस चौकी आहे.  तिथेच पकडली असणार याचा अंदाज होता.  आम्ही पार्सल घेऊन लगेच बाहेर गेलो.  हवालदारसाहेब रस्त्यापलीकडे समोरच होते आणि बाईक त्यांच्या बाजूला लावली होती.  आम्ही रस्ता क्रॉस करून त्यांच्याकडे गेलो.  त्यावेळी पोलिसांशी संबंध यापूर्वी केव्हाच नव्हता आणि पोलीस त्रास देतात ही नकारात्मक भावना इकडून तिकडून ऐकून तयार झाली होतीच.

"साहेब, काय झालं?", मी विचारलं.

"कोण तू?", माझ्या बाजूला श्यामला बघून त्यांनी चढ्या आवाजात विचारलं.

"मी भाऊ याचा.  गाडी माझी आहे", मी शांतपणे उत्तर दिलं.

"लायसन्स आहे का याच्याकडे? वाकडी तिकडी गाडी चालवत होता.  ठोकला असता कुणाला म्हणजे?", त्यांनी पुन्हा त्याच सुरात मला दरडावणी सुरु केली.  मला बाईक चालवायला श्यामूने शिकवली.  तो वाकडीतिकडी गाडी चालवेल यावर माझा विश्वास बसला नाही.  पण तो होता शॉर्टवर.  त्याच्याकडे लायसन्स नसावं हे त्या हवालदारांनी हेरलं असावं. 

"साहेब,  माझ्याकडे आहे लायसन्स. गाडी मीच आणली होती आणि मीच नेणार होतो.  हॉटेलमधून पार्सल मिळायला लेट झालं म्हणून त्याला इथून हॉटेलपर्यंत आणायला सांगितलं होतं", मी लायसन्स आणि नंतर हातातलं पार्सल त्यांना दाखवत समजावण्याचा प्रयत्न केला.  पण ते काही ऐकायला तयार नव्हते.  मी फाईन भरायला तयार होतो पण त्यांनी फाईन सुद्धा 2000 सांगितला.  इतका फाईन नसावा याचा मला अंदाज होताच.  मी मधल्यामध्ये तोडगा काढून त्याना काहीतरी द्यावं अशा सुरात त्यांची बोलणी सुरु झाली पण त्यासाठी मी तयार नव्हतो.  शेवटी हवालदार वैतागले.  त्यांनी एक शेवटचा बाण माझ्यावर मारून बघितला, "फाईन नसेल भरायचा तर साहेबांसमोर उभा करीन.  नंतर केस झाली तर निस्तार मग".  मी फाईन भरायला तयार असताना केस का होईल या आत्मविश्वासाने मीसुद्धा तयार झालो.   हे त्यांना अनपेक्षित होतं.  रागातच आम्हाला आतमध्ये घेऊन गेले.  लोक पोलिसांना नाव का ठेवतात याचा अनुभव आता मला स्वतःला मिळत होता.

चौकी फारच लहान होती.  पुढे एक नऊ बाय नऊचा रूम आणि मागे एक छोटा रूम.  तो त्यांना कपडे बदलण्यासाठी असावा.  टेबलवर साहेब बसले होते.  बसल्यानंतरही त्यांची उंची कळत होती.  गोरा वर्ण, कुरळे केस पण उजव्या बाजूला पाडलेला भांग, दाट मिशा, नाकावर आलेला चौकोनी चष्मा.  एका इन्स्पेक्टरला शोभावा असाच तो रुबाब.  नेमप्लेटवर "बेदरे" हे नाव चटकन डोळ्यात भरलं.  ते टेबलवर असणाऱ्या फाईलवर काहीतरी लिहीत होते.  आत गेल्या गेल्या हवालदार साहेबांनी सगळी कहाणी साहेबाना रंगवून सांगितली.  मी आवाज चढवून बोलतो असही सांगितलं.  साहेबानी काम चालू ठेवून मध्येमध्ये हुंकार भरत सगळं ऐकून घेतलं.  हवालदारांचं सांगून झाल्यावर साहेबानी त्यांना बाहेर जायला सांगितलं.  अतिशयोक्ती त्यांच्या लक्षात आली असावी. 

"नाव काय तुमचं?", साहेबांनी पुन्हा फाईलमध्ये लिहिता लिहिता विचारलं.  मी माझं नाव सांगितलं. 

"काय करता तुम्ही सुबोधजी?", एवढ्या मोठ्या पोस्टवर असताना आणि वयानेही माझ्यापेक्षा मोठे असतानासुद्धा ते मला एकेरी हाक मारत नाहीत याचं कौतुक वाटलं.

"सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे सर", मी सांगितलं.

"आय.टी. वाले ग्राहकांना लुटून एवढे पैसे कमावतात आणि मग चुका केल्यावर गव्हर्नमेंटला फाईन भरायला काय हरकत असते तुमची?", त्यांनी उपहासात्मक स्वरात मला विचारल.  मी त्यांना सगळी घटना समजावून सांगितली आणि मी फाईन भरायला तयार आहे पण जास्त फाईन सांगितला हे त्यांना सविस्तर सांगितलं.  त्यांना परिस्थिती लक्षात आली.

"ठीक आहे.  जा तुम्ही.  यापुढे असं करू नका.  विदाउट लायसन्स गाडी चालवणे गुन्हा आहे", बेदरे सर हसून म्हणाले.  इतक्या सहज हे निपटेल याची मला कल्पना नव्हती.  मी पुढे काही बोलणार इतक्यात दोन माणसे भांडण करीत आत आली.   साहेबांनी मला स्माईल देऊन निघण्याच खुणावलं.  आम्ही निघालो.  त्यांना धन्यवाद बोलायचं राहून गेलं होतं.

असाच एकदा चेंबूरला गेलो असताना बेदरे साहेब आत बसलेले मी पाहिले.  मी त्यांची परवानगी घेऊन आत गेलो.  सरांनी मला ओळखले नाही.  मी त्यांना त्यादिवशीची आठवण करून दिली. 
"आठवलं.  बसा सुबोधजी.  ए शिंदे, सदगुरुमधून मोसंबी ज्यूस घे एक इकडे.  मोसंबी चालेल ना?", त्यांनी मला विचारलं.  मी नको म्हणत असताना त्यांनी ऑर्डर केलीच.  "बोला सुबोधजी, कसं येणं केलंत?"

"सर तुम्ही त्यादिवशी आय. टी. बद्दल म्हणत होतात.  पण सगळीच लोकं तशी नसतात सर", मी विषयाला हात घातला.

"होय सगळेच पोलिसही तसे नसतात", त्या धीरगंभीर चेहऱ्यावरचं हास्य खूप डॅशिंग असायचं.

"होय सर.  म्हणूनच आवर्जून तुम्हाला भेटायला आलो.  यापुढे आय. टी. रिलेटेड काही मदत लागली तर आवर्जून कॉल करा सर.  मला आवडेल जर माझी काही मदत तुम्हाला झाली तर",  असं म्हणून खिशातल्या एका कागदावर मी त्यांना माझा नंबर लिहून दिला.  त्यांनीही त्यांचं कार्ड मला लगेच शेअर केलं.  इकडच्या तिकडच्या गप्पा करून ज्युस घेऊन मी निघालो.   त्यापुढे जास्त वेळा स्टेशनला जाणं झालं नाहीं आणि गेलो तेव्हा सर दिसले नाहीत.

एकदा अचानक रात्री त्यांचा फोन माझ्या मोबाईलवर आला.  "सुबोधजी, आपली मदत हवी आहे.  कुठून एखादा प्रिंटर अरेंज होईल का?  उद्या कोर्टात सुनावणी आहे आणि आता मार्केट बंद झालं आहे.  चौकीतला प्रिंटर बंद पडला आहे",  त्यांनी सविस्तर मला सिच्युएशन समजावून सांगितली.  सुदैवाने माझ्या घरीच प्रिंटर होता.  मी घेऊन येतो सांगितल्यावर त्यांनी ऍड्रेस विचारला आणि सरळ आमच्या चाळीबाहेर पोलिसांची गाडी पाठवून दिली.  तेव्हा तो प्रिंटर घेऊन गाडीत चढताना चाळीतल्या लोकांसमोर माझा रुबाब काही औरच होता.  मी चौकीत जाऊन सरांना सगळं सेट करून दिलं आणि निघून आलो.  दुसऱ्या दिवशी दुपारी सरांचा "थँक यु फॉर युअर हेल्प" असा मेसेज आला आणि संध्याकाळी प्रिंटर माझ्या घरी.  नंतर अधून मधून सहज कॉल होत राहिले.  एकदा माझा मोबाईल हरवला असताना सर स्वतः मला मुख्य चौकीत त्यांच्या स्वतःच्या कारमध्ये बसवून घेऊन गेले होते आणि माझं काम करून दिलं होतं.
हळूहळू संपर्क खूप कमी झाला.  मीही माझ्या रुटीन लाईफमध्ये गेलो आणि सरांचीही बदली झाली.  दोन वर्षांपूर्वी पोलीस ट्रैनिंग चालू झाल्यावर मी आवर्जून सरांना फोन केला आणि सर नेमके दौंड पोलीस ट्रैनिंग सेंटरला फॅकलटी आहेत असं समजलं.  तिकडे गेल्यानंतर आवर्जून त्यांना भेटलो.  त्यांचा पाहुणचार अजूनही तसाच होता आणि पर्सनॅलिटीसुद्धा.

माणूस लक्षात राहतो तो त्याच्या कर्तृत्वामुळे किंवा स्वभावामुळे.  पुढे पोलीस ट्रैनिंगमध्ये बेदरे सरांसारखी बरीच खाकी वर्दीमागची माणसं भेटली.  पण बेदरे सरांची छाप मनावर कायम आहे.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
9221250656

#sahajsaral

Comments

 1. खूप सुंदर लेख लिहिला आहे. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. मला आठवतय आपण चेंबूर स्टेशन ला एकदा गेल्यावर असच आपण त्या चौकीत सरांना भेटायला गेलो होतो पण सर न्हवते.
  मागे हे सगळं घडून गेलं होतं आता ते पुन्हा आठवलं आणि तू ते शब्दात खूप सुंदररित्या उतरवलं आहेस.
  खरंच माणसे ही त्यांच्या स्वभामुळे आणि कर्तृत्वामुळे.

  ReplyDelete
 2. खूप सुंदर लेख लिहिला आहे. प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. मला आठवतय आपण चेंबूर स्टेशन ला एकदा गेल्यावर असच आपण त्या चौकीत सरांना भेटायला गेलो होतो पण सर न्हवते.
  मागे हे सगळं घडून गेलं होतं आता ते पुन्हा आठवलं आणि तू ते शब्दात खूप सुंदररित्या उतरवलं आहेस.
  खरंच माणसे ही त्यांच्या स्वभामुळे आणि कर्तृत्वामुळे.

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…