Skip to main content

दहा रुपये


“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घाबरल्यावर समोरचा अजून घाबरवण्याचा प्रयत्न करतो.  त्याला सांग तू त्रास दिलास मला तर मी माझ्या मम्मी-पप्पाना घेऊन येईन शाळेत", मी त्याला समजावत होतो.  त्यानेही काहीतरी समजल्यासारखं केलं.

तसा त्याने आतापर्यंत आम्हाला न विचारता कधी पैशाला हातही लावला नाही.  साधा दुकानात कधी कोणती वस्तू आणायला गेला तरी उरलेले सुट्टे पैसे तो हातात आणून देतो.  एकदा त्याने असेच उरलेल्या पैशातून चॉकलेट्स आणले होते पण त्याला त्याविषयावर मी नाराजी दाखवली म्हणून पुन्हा त्याने कधीच तसं काही आणलं नाही.  मग या दुसरीच्या मुलाचा चौथीच्या मुलाशी काय संबंध?  आणि एवढ्या मुलांमध्ये तो सार्थक कडेच का पैसे मागेल हे कळत नव्हतं.  मी सहसा त्याच्या प्रॉब्लेममध्ये कधी पडत नाही.  त्याचे प्रॉब्लेम्स त्यानेच सॉल्व्ह करावेत ही ईच्छा असते.  "आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट" ही मानसिकता तर अजिबात नसते आणि घरातही ती निर्माण होऊ देत नाही.

मी त्याला एकदा असाच पुन्हा विषय काढून त्या मुलाशी ओळख कशी झाली हे समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा समजलं की तो मुलगा सार्थकला कधी शाळेच्या लाईनमध्ये घ्यायचा सार्थक पहिलीला असताना.  मी पुन्हा एकदा पैसे सार्थकने घेतलेत का हे कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला पण प्रतिसाद "नाही" असाच होता.  पुढे एक दोन वेळा त्याने तक्रार केली तेव्हा स्कुल व्हॅनच्या ड्राइवरला नक्की कुणी त्याच्याकडे असे पैसे मागतं का ते चेक करायला सांगितलं.  पण तो मुलगा रोज पैसे मागत नव्हता त्यामुळे ड्राइवरच्यासुद्धा नजरेत कधी आलं नाही.

वार्षिक परीक्षा सुरु होण्याआधी शाळेची तयारी चालू असताना त्याने मला पुन्हा तोच विषय बोलून दाखवला. 

"पप्पा मी खोटं बोललो तुमच्याशी", त्याचा त्याच्या शर्टाशी चाळा चालू होता, "मी घेतलेले पैसे त्याच्याकडून".  माझ्यासाठी थोडं शॉकिंग होतं पण मी तसं दाखवलं नाही. 

"कशासाठी घेतले होते?", मी विचारलं.

"बाईंनी फोटोसाठी मागितले होते फ़ंक्शनच्या मागच्यावर्षी", त्याने सांगितलं.

"मग माझ्याकडून का नाही घेतले? मी तुला दिले नाही असं कधी झालं का?", मी थोडी नाराजी दाखवत म्हटलं.

"तसं नाही पप्पा.  मी विसरलेलो.  बाई म्हणाल्या होत्या काहीही करून घेऊन या.  मी घाबरून त्याच्याकडून घेतले", तो माझ्या जवळ येऊन सांगायला लागला.

"मग मी तुला इतक्या वेळा विचारलं तू सांगितलं का नाहीस?  आपण त्याच वेळी दिले असते ना.  त्याचे पैसे घेऊन तू मलाच त्याच्याशी बोलायला नेत होतास", माझ्या स्वरात नाराजी कायम ठेवली.

"मला भीती वाटत होती.  मला माराल म्हणून मी नाही सांगितलं", तो थोडा नरमल्यासारखा झाला.

"तू खरं बोलतोस तेव्हा कधी मी तुला ओरडतो तरी का?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.  त्याने नकारार्थी मान हलवली.

"सॉरी पप्पा", त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मी खिशातला दहाचा डॉलर काढला. 

"त्याला दे आज.  आवर्जून सॉरी बोलायचं लेट झालं म्हणून.  आणि नंतर थँक्यूसुद्धा म्हणायचं त्याने मदत केली म्हणून", मी त्याच्या हातात डॉलर देत म्हटलं.  त्याने एकसाईटमेन्टमध्ये होकारार्थी मान हलवली.  डॉलर खिशात ठेवला "थँक यू पप्पा" म्हणत माझ्या गळ्यात हात घालून माझ्या गालाचा मुका घेतला आणि शूज घालायला बसला.

त्यादिवशी त्याचं हे दहा रुपयाचं प्रकरण संपलं होत.  एका गोष्टीच वाईट वाटत होतं की ओरडण्याचा किंवा माराच्या भीतीने त्याने हि गोष्ट माझ्यापासून इतके दिवस लपवली आणि एका गोष्टीचा आनंदही होता कि त्याला अजूनही माझ्याशी खरं बोलण्यास वेळ लागला तरी अडथळा वाटत नव्हता.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री


#sahajsaral

Comments

 1. वा....
  खूप छान सर...

  ReplyDelete
 2. खूप सुंदररित्या घडलेला प्रसंग उतरवला आहेस. सार्थक ने तुला जेव्हा सांगितलं त्या नंतर तू मला लगेच सांगितलं होतंस आपण बघतच होतो की कोण आहे नक्की के झाला ते. थोड्या दिवसांनी त्याने स्वतः कबुल केलं हे मात्र नक्की तो घाबरत होता सांगायला पण त्याने शेवटी सांगितलं आणि यात खरचं खूप मोठा आनंद आहे की तो खरं बोलला. तू ते अगदी सहजपणे सांगितले आहेस आपलं पिल्लू आपल्याला सगळं share करतो हे खरंच कौतुकास्पद आहे आणि तू पप्पा म्हणून खूप चांगले संस्कार करतो आहेस, ग्रेट आहेस तू.💐 👍

  ReplyDelete
 3. तुम्ही नक्कीच उत्तम वडिल आहात

  ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

दूरदर्शन आणि मी

संध्याकाळी माझ्या एका कामानिमित्त बेलापूर स्टेशनजवळ गेलो होतो इतक्यात एका अनोळखी नंबरवरून फोन वाजला.  संध्याकाळी ७ किंवा ७.३० ची वेळ असेल.  आजूबाजूला बराच गोंधळ असल्याने मला नीट ऐकू येत नव्हतं.  मी थोड्या वेळात कॉल करतो सांगून व समोरून "ठीक आहे" असं पुसटस ऐकू आल्यावर फोन कट केला.  नेमका फोन कुठून आलाय हे मला कळालं नव्हतं. माझं काम झाल्यावर मी परतीच्या वाटेवर असताना पुन्हा त्याच नंबर वर कॉल लावला. 
"नमस्कार, थोड्या वेळापूर्वी आपला कॉल आला होता.  सॉरी तुमचा आवाज आला नाही म्हणून कट करावा लागला", मी फोन लागल्याबरोबर सांगण्यास सुरुवात केली. 
"नाही काहीच हरकत नाही.  मी निखिलेश चित्रे बोलतोय.  दूरदर्शनमधून", समोरून आवाज आला.  आता आवाज बऱ्यापैकी क्लीअर होता.
"नमस्कार निखिलेशजी बोला", मी त्यांच्या बोलण्यास दुजोरा दिला
"मी तुमचा ब्लॉग वाचला.  आम्हाला टेक्नॉलॉजी व सोशल मीडियासंदर्भात न्यूजमध्ये बोलण्यासाठी एका तज्ज्ञाची आवश्यकता होती.  तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये जे काही मांडलय ते तुम्ही न्यूज मध्ये सांगू शकाल का?", निखिलेशजींनी विचारलं
&quo…

आठवणीतला गारवा

आठवणीतला "गारवा" - सुबोध अनंत मेस्त्री
आमच्या घरातला दीड दिवसाचा गणपती निघायला तसा अजून तासभर वेळ बाकी होता.  घराच्या मोठ्या खिडकीला लागून प्लास्टिकच्या आराम खुर्चीवर मी बाहेरचा पाऊस पाहत रेलून बसलो होतो.  रात्रीच बऱ्याच वेळेचं जागरण असल्याने सगळे बेडरूममध्ये आराम करत होते.  आमच्या करंजाडेच्या  घराच्या खिडकीसमोरूनच डोंगर सुरू होतो. बिल्डिंग आणि डोंगरामध्ये फक्त एक छोटा  रस्ता.  डोंगर सुरू होतानाच पायथ्याशी एक झोपडी.  कदाचित बाजूला बिल्डिंगच काम चालू असणाऱ्या कामगाराची असेल.  गावाच्या घराला शोभेल अस विटांच घर.  घरासमोर बांधलेल्या बकऱ्या पावसात भिजत होत्या.  घराच्या मागे चढणीवर झुडपं साफ करून त्यांनी काही भाज्यांची लागवड केली आहे.  तिथून थोडं चढण गेल्यावर एक खड्डा आहे ज्यातून उरणवरून माल वाहून नेणाऱ्या मालगाडीचा ट्रॅक जातो. पुढे पुन्हा थोडा डोंगर नंतर पनवेल पासून उरण ला जाणारा एक्सप्रेसवे आणि तो रस्ता क्रॉस केल्यावर खऱ्या डोंगराची सुरुवात.  हे इतकं काही मध्ये आहे हे खिडकीतून जाणवतच नाही.  अस वाटत की खिडकीसमोरच्या रस्त्यासमोरूनच डोंगर सुरू होत असेल.  या डोंगराच्यामागे थोडा लांब …

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…