Skip to main content

माणुसकीची भिंत



माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो.

माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं. 
एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असलेल्या गोष्टी टांगता येतील आणि ज्यांना गरज आहे ते त्यातल्या काही गोष्टी स्वतःच्या वापरासाठी काढून नेतील.  मला संकल्पना भन्नाट वाटली.  त्याने काही दिवसात ते प्रत्यक्षात उतरवलंसुद्धा.  मी आणि दादा आवर्जून भेटायला गेलो.  लोअर परेलला पेनिनसुला कॉम्प्लेक्सच्या मागे भिंत उभारली होती ज्यावर "माणुसकीची भिंत" मोठ्या शब्दात लिहिलं होतं.  खाली टेबल मांडून त्यावर जुने कपडे ठेवण्यात आले होते.  काही गरीब घरातली माणसं त्यातले कपडे एक एक वेचून घेत होती.  मी तो प्रसंग पाहून भरून पावलो. 

"लोकांना फायदा होतो काय रे?" मी विचारलं. 

"गैरफायदा घेतात", त्याने हसत सांगितलं, "काही लोक रोज येऊन काही ना काही कपडे घेऊन जातात आणि बाहेर विकतात."
गरजेपोटी असेल किंवा लालसेपोटी असेल पण माणसाच्या स्वभावाची कीव आली.  'प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण होतील एवढं या समाजात नक्कीच आहे पण प्रत्येक व्यक्तीची हाव पूर्ण होईल एवढं नक्कीच नाही', गांधीजींचा विचार आठवला. 

"ही पहिलीच वेळ होती.  पुढच्या वेळी नक्कीच अजून तयारीनिशी करू", हे वाक्य त्याने त्यावेळी घेतलं.  आपण ज्या विभागात राहतो तिथल्या लोकांचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून स्वतःचा व्यवसाय काही दिवस बाजूला ठेवून पुंडलिक, रागिणी वहिनी आणि त्यांचे सहकारी महेश चव्हाण सर आणि सुधीर पाटील सर त्यावेळी दिवस रात्र काम करत होते. 

काही दिवसांपूर्वी पुंडलिकची "माणुसकीची भिंत"ची पोस्ट फेसबुकवर पाहीली आणि मग व्हाट्सअपवरसुद्धा आली.  यावेळी सुनील शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  आज तिकडे आवर्जून हजेरी लावली. डोळ्याचं पारणं  फिटलं.  मागच्या वेळेपेक्षा खूपच सुंदर पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.  मी माझे कपडे जसे दिले तसं माझं नाव नोंदवून घेण्यात आलं नि माझ्याकडून किती कपडे आले याचा अंदाज नोंदवून घेण्यात आला.   सगळे टेबल कपड्यांनी खचाखच भरले होते.  एका बाजूला जुन्या सायकल व खेळणी ठेवली होती. २०-२५ स्वयंसेवक पुरुष व महिला तिकडे काम करत होत्या.  त्यांच्या दिवसभराचा खाण्यापिण्याचा खर्च सोडला तर बाकी काही मानधन वैगेरे घेत नाहीत असं महेश सरांनी सांगितलं.  काही लोक जुनेच नाही तर नवे कपडेसुद्धा आणून देतात हे त्यांच्याकडून कळालं.  या मांडलेल्या गोष्टी घेणाऱ्यांची संख्यासुद्धा मोठी होती.  या जुन्या गोष्टी घेणाऱ्यांकडूनसुद्धा त्या गोष्टींची नोंद घेतली जात होती.  पुंडलिकची दोन मुलं काउंटरला तर रागिणी वहिनी कपडे व्यवस्थित मांडण्याच्या कामात व्यस्त होत्या.  एका ठिकाणी बोर्डवर किती कपडे आले आणि किती गेले याची दिवसागणिक मांडणीही केली होती.  "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे" हे ब्रीदवाक्य.  म्हणजे फक्त गरीबच नाही तर कुणीही वस्तू घेऊन जाऊ शकत होतं.  दिवाळी जवळ आली असल्याने बऱ्याच जणांनी साफसफाई केली असणार आणि त्यात नको असलेल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी इथे दान केल्या असणार.  पब्लिकचा रिस्पॉन्स बघून त्याने अजून एक दिवस वाढवला होता. 





"किती कपडे आले यावर्षी?", मी सहज पुंडलिकला प्रश्न केला.

"पन्नास हजारापेक्षा जास्त असतील.  मागच्या वेळी चाळीस हजार च्या आसपास आले होते", त्याने सांगितलं.

"अरे मग एवढे कपडे जातील का?", मी उत्सुकतेने विचारलं.

"नाही गेले तरी आपण ते व्यवस्थित पॅक करून जिथे स्लम एरिया आहे तिथे किंवा आदिवासी पाड्यात स्टॉल लावतो आणि तिथे वाटप करतो", त्याने फक्त माझ्या शंकेच निरसनच केलं नाही तर माझ्या मनात त्याच्याबद्दल अजून कौतुक निर्माण केलं.  म्हणजे फक्त तीन चार दिवसाची मेहनत नाही तर पुढेही अजून होणारच आहे.  मी कौतुकाने जमतील तेवढे फोटो क्लिक करून घेतले आणि त्याचा आणि महेश सरांचा फोटो काढण्यासाठी त्याला भिंतीसमोर उभं राहण्याची विनंती केली.   



"कशाला?", त्याचा अपेक्षित प्रश्न.

"एवढं मोठं काम करतोयस.  तुझ्यासाठी काहितरी लिहीन म्हणतो", माझ्या या उत्तरावर तो हसला.  तिथे सामनाचे पत्रकार आले.  त्याला व्यत्यय नको म्हणून आम्ही तिथून निघालो.  जगात चांगल्या व्यक्ती आणि चांगल्या प्रवृत्ती आपल्या आजूबाजूला असतील तर आपल्याकडून काहीतरी चांगलं घडण्याची उर्मी आपोआप निर्माण होते.  माझ्या आयुष्यात असे बरेच पुंडलिक सारखे मित्र आहेत ही देवाचीच देणगी.

- सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

Comments

  1. Dada kharach khup changli goshat aahe ani yatun jo milnara aanand ani samadhan aahe he aaple jeevan sarthaki laglyacha janiv karun det.

    Thank you dada ani Mala hi yat sahbhag ghenyas awadel jar Konala objection nasel tar

    ReplyDelete
  2. सुबोध सर, नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख.
    आपल्याकडे जे आहे किंवा नको असेल ती वस्तू जर समाजोपयोगी असेल तर त्यासाठी "माणुसकीची भिंत" हा उपक्रम आयोजित करणं खूप मोठं काम आहे.

    "माणुसकीची भिंत" हे नावचं खूप काही सांगून जाते. समाज कार्य करण्याचा हा खूप चांगला उपक्रम आहे.
    पुंडलीक सर आणि त्यांचे सहकारी यांना या महत्वपूर्ण कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी