Skip to main content

सायकल, संज्या आणि गटारी


"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली.

त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी माझ्यासाठी एक छोटी वेगळी सायकल घ्या म्हणून घरात सायकलचा विषय चालू झाल्यापासून हटून बसलो होतो. पप्पा मात्र एकच सायकल तिघांमध्ये अशा हिशोबातच आले होते. तसही दोन सायकल पप्पांच्या बजेटमध्ये बसणाऱ्या नव्हत्या आणि असंही घर लहान असल्यामुळे ही एक सायकल ठेवण्याच्या जागेची मारामार होती मग अजून दुसरी कुठे ठेवणार होतो. हे सगळं आता त्यांच्या रोलमध्ये आल्यावर आपोआप कळायला लागलंय. पॅडलपर्यंत माझा पाय पुरणार नाही वगैरे बरीच कारणं सांगून मी हट्ट करून पाहिला पण काही फायदा झाला नाही. शेवटी ही सायकल फायनल झाली व सीट वगैरे ऍडजस्ट झाल्यावर पप्पांनी मला आणि दादाला निघायला सांगितलं. ते कुठेतरी दुसरीकडे जाणार होते. दादा मला पुढच्या दांड्यावर बसवून डबलसीट घेऊन घरापर्यंत आलेला. मी फुगलो असल्याने घरी पुढचे 3-4 दिवस कुणाशी बोललो नाही. पण शेवटी पर्याय नाही म्हणाल्यावर हीच सायकल शिकावी लागेल हे पक्क केलं.

आमच्या समोरच्या घरात वरच्या माळ्यावर संजादादा भाड्याने राहायचा. तेव्हा तो पस्तीशीतला असेल. सिल्की केस त्यामुळे मधून भांग पाडणारा, सावळा वर्ण. नेहमीच फिकी ब्ल्यू जीन्स व त्यावर हात फोल्ड करून ढगळा शर्ट. लग्न होऊन त्याच्या बायकोने आत्महत्या केली होती आणि तेव्हापासून याने परत लग्न केलं नाही असं त्याने आईला सांगितलेलं मी ऐकलं होतं. तो ऑर्डर घेऊन थर्माकोलचे डिजाईन वगैरे बनवायचा आणि मी त्याला मदत करायला जायचो. मी त्याचा एकदम खास झालो होतो. त्याने मला सुभाषनगरच्या मैदानात नेऊन सायकल शिकवण्याच कबूल केलं होत. तशी ही सायकल आता मला दादा आणि अण्णाबरोबर राहून बऱ्यापैकी जमायला लागली होती. संजादादा संध्याकाळी डबलसीट सुभाषनगरच्या मैदानावर घेऊन जायचा. तिथे गेल्यावर मैदानाच्या बाजूने जॉगिंग ट्रॅकला लागून असणाऱ्या बाकड्यावर तो बसून राहायचा आणि मी पूर्ण मैदानभर सायकल फिरवत राहायचो. मैदान मोठं असल्यामुळे फिरायला मोठी जागा होती. चांगली प्रॅक्टिस होत होती.

असच एकदा संध्याकाळी सायकल फिरवायला आम्ही गेलो असताना त्याचा भूतकाळ जाणून घ्यायची मला ईच्छा झाली. "अरे माझ्या स्टोरीवर बॉलिवूडचा एखादा पिक्चर बनेल", अस तो मला नेहमी सांगायचा आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली होती. मी आज ऐकूनच जाणार अस पाहिल्यावर त्याने जॉगिंग ट्रॅकवरून चालणाऱ्या माणसाला वेळ विचारला, "पावणे आठ" अस सांगून तो माणूस चालत राहिला. संजादादाची परिस्थिती जेमतेम त्यामुळे त्याच्याकडे घड्याळ नव्हतं आणि मी तर अजून कच्चा लिंबू त्यामुळे माझ्याकडे असण्याची शक्यताच नव्हती. त्याने त्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि एखादा चित्रपट पहावा अस सगळं डोळ्यासमोर तरळायला लागलं. त्याच आयुष्य कसं मस्त होत आणि ते त्याच्या बायकोमुळे कस बदललं त्याने सगळं सविस्तर सांगितलं. त्याला घरात सध्या काहीच किंमत नाहीये आणि त्याचे आई बाबा भाऊ त्याला मारतात हे मी स्वतः पाहिलं होतं. ती परिस्थिती त्याच्यावर कशी आली हे सगळं तो रंगवून सांगत होता. यातलं काय खोटं आणि काय खरं हा प्रश्न त्यावेळी माझ्या बाळबोध मनाला शिवणारा नव्हता. नाइनटीजमध्ये सुनील शेट्टी आणि अक्षय कुमारचे सिनेमे बघताना जसे पुढचे काही दिवस आम्ही तेच हिरो होऊन जगायचो तसा मी सध्या काही काळापुरता संजादादा झालो होतो. त्याची दयाही येत होती आणि देव एखादयाशी कसा विचित्र वागतो म्हणून देवाचा राग. खूप वेळाने स्टोरी संपली. "बोअर नाही झालास ना?", त्याने विचारलं. "नाय रे दादा. मजा आली", अशी इमोशनल स्टोरी ऐकल्यावर 'मजा आली' ही प्रतिक्रिया थोडी विचित्रच असेल पण तेव्हा शब्दापेक्षा बॉडी लँग्वेजमधून समोरच्याला काय बोलायचंय हे जास्त कळायचं. आम्ही निघालो. खरं तर गजबजलेल्या मेन रोडवरची वर्दळ कमी बघूनच लेट झालेल्याचा अंदाज आलेला आणि आमच्या बाजारातल्या रोडपासून भेटणाऱ्या चाळीतल्या व्यक्तींनी तो अजून दाट करून दिला.

चाळीत शिरल्यावर सात आठ घरं आधीच मला दरवाज्यात पप्पा उभे असलेले दिसले. त्याचे लाल झालेले डोळे मला एवढ्या लांबून पण स्पष्ट दिसत होते. माझे पाय थरथरायला लागले. चाळीतली पोर मजा बघायला आली होतीच मागून. संजादादापण मध्ये पडेल अस दिसत नव्हतं. मागे वळून पाहिलं तर तो कुठेतरी गायब झाला होता. मी पुढे आलो आणि आमच्या घरापासून एक घर सोडून तिथेच उभा राहिलो. आई घरी नव्हती याचा अंदाज आला. ती मला शोधायलाच बाहेर पडली होती. "आत चल", पप्पांची गर्जना ऐकली. आता तर मला घाम फुटायला लागला होता. मी मानेनेच नाही म्हटलं. "येतोस काय आता?", पुन्हा आवाज आल्यावर मी उडालोच. हळूहळू पुढे पाऊल टाकताना कुठूनतरी आई येईल आणि मी वाचेन अस वाटत होतं पण ते दहा पावलांच अंतर खूप वेळ कापुनसुद्धा आईची चिन्ह दिसत नव्हती. दाराजवळ पोहचल्यावर एका हाताने पप्पानी सायकल पकडून दुसऱ्या हाताने गालावर अशी वाजवली की मी सरळ आतच गेलो. ही स्किल जुन्या बऱ्याच पालकांकडे एकदम परफेकट होती आणि अशी मार खायची वेळ आली की अव्वाच्या सव्वा भोकाड पसरून लोकांना जमा करून पुढचा मार कसा वाचवायचा याची स्किल आमच्यासारख्या मुलांकडे. मी तोच पैतरा वापरला. तरी पप्पांनी घरात सायकल उभी करून आत येऊन मला अजून एक एक्सट्रा फटका ओढलाच होता. तेवढ्यात दादा आला.

"कुठे होतास तू?", पप्पांनी विचारलं.

"यालाच शोधत होतो", दादाने हे उत्तर दिल्याबरोबर दुसऱ्याच क्षणी त्याच्या गालावर पण एक बसली, "कृष्णाकडे झी हॉरर शो बघायला गेलेलो", त्याने गाल चोळत सांगितलं. खर तर मी हरवलोय वैगेरे हे त्याला माहीतच नव्हतं. येताना चाळीतल्या पोरांनी सांगितलं असेल आणि मग तो लेट आल्यामुळे त्यालाही पडेल म्हणून त्याने माझं कारण पुढे केलं होत. आम्ही खोटं बोलतोय हे पप्पा आम्ही लहान असल्यापासून अचूक ओळखतात. अशीही प्रत्येक गोष्ट लहानपणापासून आम्ही वाटून खात आलो होतो तसाच कधीकधी मारही. त्यानंतर आई आली आणि प्रकरण निवळलं. गटारी असल्यामुळे घरी चिकन वडे केले होते. पण आता मला माझे चिकन-वडे आधीच मिळाले म्हणून पप्पाच त्यांचा राग उतरल्यावर मला चिडवायला लागले होते.

हा मी पप्पांचा खाल्लेला शेवटचा मार. त्यानंतर वेळेवर घरी या अस कधी कुणी सांगावं लागलं नाही. घरी यायला लेट होणार असेल तर आधीच सांगून निघायचं किंवा जेवणाच्या वेळेत घरी पोहोचायचं हा रूल आपोआप आम्हा तिघा भावांसाठी ठरला होता. त्यावेळी हातात मोबाईल नव्हते किंवा वेळ पाळायला घडयाळ नव्हतं पण त्यानंतर आमच्यात कधी मिसकम्युनिकेशन झालेलं मला आठवत नाही. त्या माराचा दराराच तसा होता.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…