Skip to main content

दादास पत्र


दादास पत्र
- सुबोध अनंत मेस्त्री
=====================================================
तस तर तुमच्यातले बरेच जण विनोदला पर्सनली ओळखता.  तो व्यक्ति म्हणून कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.  अस म्हणतात की देवाला प्रत्येक माणसावर लक्ष देता येणार नाही म्हणून त्याने आई बनवली.  माझ्यासाठी देव बर्‍याच व्यक्तिच्या रूपाने माझ्याबरोबर असतो आणि त्यातलाच माझा दादा आहे.  माझ्या आयुष्यात माझ्या भावाच जे योगदान आहे त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय.   आभार ही खूप छोटी संकल्पना आहे त्यांच्यासाठी ज्यांनी तुमचं आयुष्य घडवलय पण या गोष्टी जगासमोर सुद्धा यायला हव्यात.  या पत्रातून मी काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे.

====================================================

प्रिय दादू,

वाढदिवस हा फक्त निमित्त आहे या सगळ्या गोष्टी कागदावर उतरवण्यासाठी. पण आज जी प्रत्येक गोष्ट मी मांडेन ती मी खूप वेळा आणि खूप लोकांसमोर बोललो आहे. हल्ली स्मरणशक्ती एवढी कमजोर झाली आहे की कालच कुणाला आठवत नाही. पण आठवणी कागदावर उतरल्या की त्या चिरतरुण राहतात. भाऊ नक्की कसा असावा याच जिवंत उदाहरण तू आहेस आणि ते जगासमोर कायम राहायला हवं. खरं तर हे पत्र मी तुला माझ्या वाढदिवसाला तू दिलेल्या पत्राच उत्तर म्हणून लिहायचं होत पण मी जाणूनबुजून ते तुझ्या वाढदिवसासाठी ठेवलं. पत्र कदाचित खूप लांबेल पण माझ्या मनावर तू ठसवलेली प्रत्येक घटना कुठेतरी मांडावी असं मला कायम वाटत होत आणि आता हे निमित्त आहे.

सुरुवात लहानपणापासून करतो. हे खरं होत की मी मम्मा बॉय होतो आणि प्रत्येक गोष्टीसाठी आई पप्पाबरोबर असायचो. तू आणि अण्णा तुमची एक जोडी होती. म्हणजे मी एकदम दहावीला असेपर्यंत आपण एकत्र खेळलो वैगेरे असू पण मी जास्त माझ्या मित्रांमध्ये आणि तू तुझ्या मित्रांमध्ये असायचास. तुला लिखाणाची आवड खूप होती. विशेषतः हॉरर स्टोरीज. तू कोणतीही स्टोरी कधी पूर्ण लिहिली होतीस हे मला आठवत नाही.  सुरुवात करण्याआधी तू एवढा एक्साइटेड होऊन आम्हाला स्टोरी सांगायचास की अस वाटायच आता एका जबरदस्त कादंबरीचा जन्म होणार आहे.  तुझ्या स्टोरीज दमदार सुरु व्हायच्या आणि 2-3 पानात संपून जायच्या. हीच 2-3 पानाची काय ती तुझी कादंबरी. लिखाणाचा कंटाळा असूनसुद्धा तू तुझ्या त्या विक पॉईंट वर मात केलीस आणि आज एक उत्कृष्ट लेखक झालास. दोन पुस्तक आज तुझ्या नावावर आहेत आणि अजून खूप कितीतरी येतील याची मला खात्री आहे.

पप्पांच काम अधून मधून बंद असल्याने घरात पैशांची थोडीफार आबाळ होतीच म्हणून तू तुझी शाळा संपल्यावर पार्टटाईम कॉलेजला ऍडमिशन घेतलंस. दिवसभर कुठे ना कुठे काम करून तू संध्याकाळी कॉलेजला जात राहिलास. कधी दिवसभर जड ओझ्याच्या डिक्शनरी घेऊन फिरणं, कधी टायपिंगची काम असं काही ना काही करून तू घराला हातभार लावत होतास. छंद तुलाही बरेच होते. कॉलेजमध्ये मिमिक्रि करून तू बरेच अवॉर्ड हि आणले होतेस पण तुला कोणत्याही गोष्टीत किंवा मजा करण्यात वेळ घालवायचा नव्हता कारण तुझे छोटे भाऊ अजून शिकत होते. 

माझी शाळा संपता संपता आपण एकत्र येत गेलो. माझ्या गर्लफ्रेंड किंवा इतर सिक्रेट मी तुला शेअर करायला लागलो. तू कधी मोठा भाऊ म्हणून मला आडवा आला नाहीस.  सगळं मित्रासारखं ऐकुन घेऊ लागलास. मी कॉलेजला जाताना पहिल्या काही दिवसातच तू मला गुरुमंत्र दिला होतास, "कॉलेज ला दरवर्षी 5000 तरी मुलं असतात. कायम कॉलेज मध्ये ये जा करणारी आणि बऱ्यापैकी सामान्य मुलं. त्यापैकी हुशार मुलं त्या वर्गापूरती किंवा त्या स्ट्रीम पूरती मर्यादित असतात. पण जे काहीतरी वेगळं करतात त्यांना अख्ख कॉलेज ओळखत. तू सामान्य राहावंस असं मला वाटत नाही.  मिळेल त्या गोष्टीत पार्टीसीपेट कर. तू कॉलेज मधून बाहेर गेल्यावर सुद्धा तुला लोकांनी ओळखलं पाहिजे. जे आयुष्य मला जगता आलं नाही ते तू जगावस अशी माझी इच्छा आहे".   माझं अकरावीच अँन्युअल फंक्शन आठवत.  मी पार्टीसिपेट कराव म्हणून तू माझ्या मागे लागला होतास.  डान्सचा आणि माझा दूर दूर पर्यंत संबंध नव्हता.  सिंगिंग एवढ्या लोकांसमोर करू शकेन एवढा कॉन्फिडन्स नव्हता. शेवटी मी आणि माझ्या मित्रांनी "ऑल द बेस्ट" हे त्या वेळच नाटक करण्याचं ठरवलं. तो माझा दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून पहिला अनुभव होता.  तू आणि कृष्णा दादाने जमेल तेव्हा येऊन मला मदत केली. आम्हाला मोटिवेट केलं. आमच्या एलिमीनेशन राऊंडला ही तुम्ही तिथे होतात आमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी.  आम्ही तिथे सिलेक्ट झालो आणि नाटक गाजवून पहिला नंबरही मिळवला.  माझ्यातला कलाकार आणि दिग्दर्शक मला पहिल्यांदा दाखवून देणारा तू होतास.  त्यानंतर आता 15 वर्षात मी कितीवेळा स्टेज परफॉर्मन्स केले याची गिणती नाही. जेव्हा जेव्हा मी स्टेजवर असतो तुझा माझ्यावरचा अभिमान मला नेहमी जाणवत राहतो. कदाचित तू नसतास तर ते रंगमंचाच वेगळं जग बघण्याच आणि दुर्मिळ क्षण जगण्याची हिंमत मी स्वतःहून कधी केली नसती.

मला सॉरी बोलायला आवडायचं नाही. मी थोडा रागीटच होतो आणि थोडा गर्विष्ठ.  चूक माझी असेल तरी मीच रुसून राहायचो.  तू कोणत्याही गोष्टीत कमीपणा घ्यायला मागेपुढे बघत नव्हतास. सॉरी बोलून पटकन मोकळा व्हायचास.  आय.टी. ला अॅडमिशन घेतल्यावर मला प्रॅक्टिससाठी कम्प्युटर घेण गरजेचं होत. तू इकडून तिकडून पैसे जमा करून तो घेतलास.  एकदा पप्पा मला कॉम्प्युटरवर अभ्यास सोडून गेम खेळन्याबद्दल बोलले तर मी कितीतरी दिवस कुणाशी बोलत नव्हतो. पण तू मध्यस्थी करून माझी समजून काढलीस आणि मी कुठे चुकतोय हे मला नकळतपणे साफ दाखवून दिलंस.  "हा कॉम्प्युटर घेताना आपण काय केलय हे तुला खूप चांगलं माहित आहे. पप्पा त्यावेळी नकोच बोलत होते. तू यावर प्रॅक्टिस करावीस यासाठी तो घेतला होता. आता त्यावर तू त्यांना सारखा गेम खेळताना दिसलास तर ते वैतागण साहजिक आहे. तू गेम खेळ पण प्रॅक्टिस सुद्धा तेवढीच कर. पप्पा काही बोलणार नाहीत".  माझं गेम्स खेळण्याच व्यसनही तेव्हाच सुटलं.

मला एक प्रसंग ठळक आठवतो. एकत्र असताना आपण एकमेकांचे कपडे सर्रास वापरायचो. तुझी एम कॉमची फायनल एक्झाम होती.  सकाळी मी तुझा शर्ट घालून बाहेर गेलो. खिशातल्या गोष्टीही मी बाहेर काढून ठेवल्या नाहीत. त्यात तुझं हॉलतिकीट सुद्धा होत. त्यावेळी मोबाईल वैगेरे नसल्याने मी नेमका कुठे आहे हे पण तुला माहित नव्हतं. तू सगळं शोधून दमलास, त्यावेळी तू माझ्यावर चिडलाही होतास पण तू एक्झाम ला जाऊन टीचर ना रिक्वेस्ट केलीस आणि त्यांनी तुला बसायला दिल. घरी परत आल्यावर तू माझ्यावर राग काढलास.  मला अपराधी वाटतच होत पण पुन्हा सॉरी हा शब्द त्यावेळी सहज बाहेर पडत नव्हता.  सवयीप्रमाणे माझी चूक असूनसुद्धा मी रुसलो आणि तू पुढच्या 10 मिनिटातच माझ्याशी नॉर्मल वागायला लागलास आणि मला हॉटेलमध्ये घेऊन गेलास.  माणसं महत्वाची असतात गर्व नाही हे मी तुझ्याकडून शिकलो. 

मी डॉक्टर व्हावं अशी तुझी इच्छा होती पण आपली आर्थिक परिस्थिती ती नव्हती. माझी बारावी झाल्यावर प्लेन ग्रॅजुएशन तू मला करून देणार नव्हतास म्हणून मला करिअर काऊंसेलिंग साठी एका ठिकाणी पाठवलस आणि माझं सॉफ्टवेअर इंजिनीरिंग करण्याचं निश्चित झालं. पण त्यावेळी वर्षाला 15000 भरणं हा सुद्धा आपल्यासाठी प्रश्नच होता. माझ्यासमोर तू आणि आई तीच गंथन गहाण ठेवायचात आणि वर्षभर पुन्हा थोडे थोडे पैसे करून ते सोडवायचात जेणेकरून पुढच्या वर्षाच्या फीचा प्रश्न मिटायचा. माझी तीनही वर्ष अशीच गेली. हे सगळं मी पाहत होतो आणि म्हणून मजा मस्तीबरोबरच माझा अभ्यासही चालूच असायचा.  पैशाची किंमत काय असते हे त्यावेळी मला तुझ्यामुळे समजलं.

माझ ग्रॅजुएशन झालं.  मी पुढे अजून शिकावं ही तुझी आणि माझीही इच्छा होती पण परिस्थितीला ते मान्य नव्हतं. जॉब करता करता पार्ट टाईम शिकेन असा विचार केला आणि मी पुढचे 4-5 महिने जॉबच बघत होतो. जवळपास तीस इंटरव्यूह मी फेल झालो. मी एकदम फ्रस्ट्रेट झालो होतो. पण तू नेहमी माझ्यामागे खंबीर उभा होतास.  “प्रयत्न करत राहा, मी आहे तू टेन्शन घेऊ नको” हे एकच वाक्य तुझं असायचं आणि शेवटी फक्त 2500 रुपयांवर माझा पहिला जॉब निश्चित झाला आणि माझ्या करिअरला सुरुवात झाली. 

तो प्रश्न सुटतो ना सुटतो तोच प्रतिभाच्या घरी तिच्या लग्नाबद्दल बोलणी सुरू झाली. मी फक्त साडे एकवीस वर्षांचा होतो. मला काय करावं हे सुचत नव्हतं. पुन्हा एकदा तूच माझा आधार होतास. तू मला विचारलेलंस की तुला काय हवंय आणि मी रडलो होतो.  तुला तुझ्या प्रश्नाच उत्तर मिळालं आणि तू तुझ्या कामाला लागलास.  आई पप्पांना समजावण्यापासून प्रत्येक गोष्टीत तू पुढाकार घेतलास. मी लहान असूनसुद्धा दोन मोठ्या भावांच्याआधी लग्न करतोय म्हणून सगळ्यांनी आपल्याला खूप नाव ठेवली, पण आपल्यासाठी जग हे कधीच महत्वाचं नव्हतं. जेव्हा प्रतिभाच्या घरामधून पॉजिटीव्ह रिस्पॉन्स येत नव्हता तेव्हा तू कोर्ट मॅरीजचा निर्णय घेतलास. त्यावेळी तू पथिकचा कोर्स करत होतास आणि त्याच बॅच मध्ये आपले संजय गोविलकर दादा तुला भेटले. त्यांच्या मदतीने सगळी तयारी करून माझं लग्न लावूनही दिलंस. तो 14 फेब्रुवारी 2007 चा दिवस मी कसा विसरू.  माझ्या प्रेमाचं आयुष्यभरच्या साथीत रूपांतर करून देणाराही तूच होतास.

जॉब व्यवस्थित चालू होता. आता मी कम्पनीमध्ये टीम लीडर च्या पोजिशनला होतो. पण बिजनेस करण्याची खुमखुमी मला आली आणि मी तो प्रस्ताव 2009 च्या जूनमध्ये तुझ्यासमोर मांडला. त्यासाठी जॉब सोडणं गरजेचं आहे हेसुद्धा तुला माहित होत.  चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा शून्यावर येण म्हणजे घरातला एक इन्कम सोर्स डायरेक्ट बंद होणार होता.  पुन्हा एकदा तू पाठी उभा राहिलास. "मी आहे तू बिनधास्त बिजनेस चालू कर” असं तू मला सांगितलंस.  सुरुवातीला बिजनेसला लागणारा 50000 च कॅपिटल पण तू मला क्लासमधून विनाव्याज उपलब्ध करून दिलास. बिजनेसमधून सुरुवातीला तितका पैसा येणं शक्य नव्हतं.  आई नेहमी बडबड करायची आणि तू आईला समजावत होतास की एकदा धंद्यात जम बसला की मिळेल पैसा. मी जूनमध्ये जॉब सोडला आणि नोव्हेंम्बर मध्ये तुझं लग्न ठरलं आणि तुझी पैशासाठी जमवाजमव सुरु झाली. हे सगळं मी बघत होतो. कदाचित मी जॉबला असतो तर तुला ही चणचण भासली नसती. मी जोशात जॉब सोडून बिजनेस चालू केला पण तुला पुढे येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची कल्पना होती.  मी ही गोष्ट जेव्हा तुझ्यासमोर मांडली तेव्हा तू पुन्हा एकदा तुझ्या मनाचं मोठेपण दाखवून दिलंस. "माझं लग्न नोव्हेंम्बर मध्ये ठरणार हे मला माहित होत. तू जॉब सोडल्यावर लग्नात पैशाची गरज मोठी होईल हे पण माहित होत. पण त्यावेळी तुझ्या डोळ्यात ठिणगी होती. जर माझ्या लग्नासाठी तुला मी आणखी काही महिने जॉब करायला सांगितला असता आणि तुझी ती ठिणगी तोपर्यंत विझली असती तर मी स्वतःला कधीच माफ नसत केलं. माझ्या स्वार्थासाठी मी तुझ्या स्वप्नाना का मारू?". मी जेव्हा जेव्हा बिजनेस मध्ये खचलो तू मला आधार देत राहिलास. माझा काहीच पैसा घरी येत नसताना आपली एवढी मोठी फॅमिली सांभाळायची जबाबदारी तू आणि वहिनीने घेतली. मी बिजनेस मध्ये टिकून राहावं म्हणून तू आणि वाहिनीने किती खस्ता खाल्ल्यात हे मी कसं विसरेन? आज तू आहेस म्हणून मी बिजनेस मध्ये आहे.

तुझं पथिक संपल्यावर तू, संजय दादा, अरुण सर सगळ्यांनी मिळून जीवनरंगची सुरुवात केली आणि त्यात सुरुवातीलाच तू मला संस्थेचा भाग करून घेतलंस. आज जीवनरंग मार्फत आपण किती जणांच्या आयुष्यात योगदान केलय याच मोजमाप नाही.  इव्हेंट मॅनेज करण्यापासून निवेदन करण्यापासून मुलाखत घेण्यापर्यंत कितीतरी वेगवेगळ्या संधी मला जीवनरंग मधून मिळाल्या आणि मी लोकांपर्यंत पोहचलो. तू जेव्हा वरळी नेहरू सेंटरमध्ये पहिल्यांदाच "मला शिवाजी व्हायचंय" चा सेशन घेतला होतास तेव्हा पूर्ण 3 तास तुझ्यावरची माझी नजर हटत नव्हती. तुझ्यातला इतक्या वर्षातला बदल तुझी मेहनत त्यास 3 तासांमध्ये ओसंडून बाहेर पडत होती. तुझ्यासारखा जबरदस्त आणि मनात हात घालणारा वक्ता मी अजून पहिला नाही. तू मला माझ्या प्रत्येक सेशन मध्ये मदत करत राहिलास. जेव्हा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच ट्रेनिंग सेशन केलं त्याची पूर्ण स्क्रिपटींग करून माझी प्रॅक्टिस घेण्यात तूच पुढे होतास. मला असे ट्रैनिंग सेशन जमणार नाहीत हा माझा न्यूनगंड तूच तर खोडून काढलास.  "तू बिनधास्त कर. मस्त करतोस. आणि असही काही राहीलच तर लोकांना कुठे माहितेय तू काय तयार केलं होतंस ते. जे नाटकात करतोस तेच इकडं करायचं. फक्त पद्धत वेगळी." हे तुझं त्यावेळी वाक्य होत. सेशन हिट झाला आणि पूर्ण सेशन अटेंड करून मला मिठी मारून तू नंतर निघून गेलास. तस जवळपास माझ्या प्रत्येक परफॉर्मन्सला तू समोर होतासच. पोलीस ट्रेनिंग मध्ये सुद्धा तू मला भाग करून घेतलंस आणि जवळपास 8500 पोलिसांपर्यत पूर्ण महाराष्ट्रभर फिरण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी माहिती गोळा करण्यापासून जास्तीत जास्त मेहनत तुझीच होती आणि पैसे तुला सगळ्यांएवढेच मिळायचे पण तू कधी त्या गोष्टीचा बाऊ केला नाहीस. तुझ्यालेखी पैसा माणसापेक्षा कधी महत्वाचा नव्हताच. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात अतिष दादा, राजेश सर असे जिवलग पोलीस ट्रैनिंग दरम्यान भेटले. समीर त्या निमित्ताने अजून जवळ आला. जीवनरंगमुळे संजयदादा, अरुण सर, सुनायना अशी सगळी रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठी नाती आयुष्यात आली. तू नसतास तर कदाचित जीवनरंग माझ्या आयुष्यात नसत, ते प्रतिष्ठेचे क्षण नसते आणि अशी लाखमोलाची माणसही नसती.

आपण सगळ्यांनी एकत्र राहावं म्हणून तू आणि वाहिनीने मिळून कामोठयातल घर घेतल.  त्यावेळीही बिझनेस व्यवस्थित चालत नसल्याने माझा पैशाचा हातभार लागत नव्हता.  मध्येच अण्णाच मोठ अॅक्सिडेंट झाल आणि आपण अजून आर्थिक परिस्थितीत ढासळलो.  पण त्यावेळीही तू कितीतरी खंबीर होतास.  त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित व्हावी म्हणून तू कुठून न कुठून पैसा जमवून आणलास.  पण तशा परिस्थितीतही तुझ्या चेहर्याववरची स्माइल कधी नाहीशी झाली नाही.  

आई पप्पा रागावलेले असताना त्यांना जवळ घेऊन त्यांची समजूत काढणं हे मी तुझ्याकडून शिकलो. अपेक्षांचा त्रास होतो म्हणून मुळात अपेक्षाच न ठेवणं हे मी तुझ्याकडून शिकलो. कुणाशी वाद न घालता, सगळ्यांचे 134 वेगळे म्हणून परिस्थिती निभावून नेणं मी तुझ्याकडून शिकलो. परिस्थिती कितीही कठीण असेल तरी टेन्शन न घेता हसत हसत लढत राहणं मी तुझ्याकडून शिकलो. एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने करण्याची कला तुझ्याकडून शिकलो.  अजून तुझ्याइतका प्रसंगवधानपणा माझ्याकडे स्टेजवर नाही किंवा तुझ्याइतक जबरदस्त निवेदन सुद्धा मला जमत नाही पण मी तुला फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. कारण तू जे बोलतोस तोच तू असतोस.

आज माझ्या आयुष्यातील प्रत्येक यशाच्या मुळाशी तू आहेस. मला सॉफ्टवेअर इंजिनिअर तू बनवलंस. कलाकार आणि दिग्दर्शक तू बनवलंस. बिजनेस मी तुझ्यामुळे चालू करू शकलो. तुझा पथिकचा कोर्स पूर्ण झाल्यावर तू माझे पैसे भरून मला तिकडे ऍडमिशन घेऊन दिलंस. पथिकमुळे मला पथिक बिजनेस क्लब मिळाला आणि त्यामुळेच आता मी मराठी बिजनेस क्लब च्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. तुझ्यामुळेच मी जीवनरंग मध्ये आलो आणि महाराष्ट्रातील इतक्या लोकांपर्यंत सहज पोहचू शकलो. माझं लग्न होऊन प्रतिभासारखी समजूतदार बायको माझ्या आयुष्यात आणण्यामागे पण तुझाच हात.  मला शिकवण्याची आवड आहे म्हणून क्लासमध्ये मला टीचरची पोस्ट देण्यामागे पण तूच आणि तुला जितकं जमेल तितक तू नेहमी करतोच आहेस.  जेव्हा सार्थक मला बोलतो, “पप्पा, तू पनवेलला मोठ्या पप्पांच्या घरी राहायला जा आणि मोठे पप्पांना इकडे राहायला येऊ द्या. मला मोठे पप्पा जास्त आवडतात.”  मी खर सांगतो मला तेव्हा वाईट वाटत नाही.  कारण तू असाच आहेस की कुणालाही हवाहवासा वाटशील.  तू जिकडे जातोस तिकडे रंगत आणतोस.  ती एक वेगळीच खुबी तुझ्यामध्ये आहे आणि ती माझ्यामध्ये असावी अस मला कायम वाटत.  
तू खर म्हणतोस, आपण तिघे एकत्र असलो तर आपल्याला काहीच अशक्य नाही.  आणि तू असशील तर कधीच नाही.  लिहिण्यासारख खूप आहे.  मला फक्त एवढाच जाणवून द्यायचं होत की तू माझ आयुष्य व्यापून टाकल आहेस. मी लिहिलेल्यापैकी बर्यााच गोष्टी तू विसरला ही असशील पण त्या माझ्या मनात तितक्याच ताज्या आहेत. सध्या एडलवाईज च्या प्रोजेक्ट मध्ये बिझी असल्यामुळे हे पत्र पण प्रवासात जसा वेळ मिळेल तसा काढून पूर्ण केलय. आपण आयुष्यात खूप सारे चढ उतार पाहिलेत.  तेच आपले सगळे प्रसंग वेळ काढून मी नक्की सविस्तर ब्लॉगवर मांडेन.  एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्याशीवाय मी नेहमीच अपूर्ण राहीन.

तुझाच,
सुब्बू

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी