Skip to main content

डिसिजन


-सुबोध अनंत मेस्त्री

============================================================

आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात ज्यात आपण पूर्णपणे हतबल होतो.  त्यावेळी ती परिस्थिती देवावर किंवा नशिबावर सोडण्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहत नाही.  असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला.  हा प्रसंग प्रत्यक्ष माझ्या घरातला नसेल तरी मनावर ठसा उमटवून जाणारा होता.  ज्या व्यक्तींनी हॉस्पिटल आणि विशेषतः आय. सी. यु. जवळून पहिला असेल त्यांना हा प्रसंग नक्कीच स्पर्शून जाईल

===========================================================


"सुबू, अरे मनीषाला ब्रेन हॅमरेजचा अटॅक आला आठ दिवसापूर्वी. आता आय सी यु मध्ये आहे. डॉक्टरने फक्त 24 तासाची मुदत दिली आहे. तू आणि विनू जाऊन भेटून ये एकदा.", पप्पा मला सांगत होते आणि मी एकदम स्तब्ध होऊन ऐकत होतो. मनीषा म्हणजे माझी मावशी. काकीची सख्खी बहीण. जेमतेम 35-40 वर्षांची. या वयात हे अस कस होऊ शकत हाच प्रश्न माझ्या डोक्यात सतत फिरत होता. तिच्याबरोबर घालवलेले सगळे क्षण डोळ्यासमोरून तरळून गेले. तसे आम्ही फार काळ एकत्र नव्हतो पण जितका वेळ आम्ही एकत्र घालवलेला तो मस्तच होता. मी जेमतेम 7-8 वर्षाचा असताना माझ्या अप्पांचं(काका) आणि काकीच लग्न झालं होत. तेव्हापासूनची हीची ओळख. ती आमच्याशी कधी मावशी या नात्याने वागलीच नाही. एक मस्त मैत्रीण म्हणून राहिली. आम्ही केव्हाही कुर्लाला तिच्या घरी गेलो की आम्हाला फिरवण, खाऊ पिऊ घालणे हेच तीच काम असायचं. तेव्हा ती 18-19 वर्षाची असेल आणि घरातली परिस्थितीही तशी जेमतेमच होती पण त्यातही जेव्हा आम्ही तिकडे जायचो आमच्यासाठी ती सख्खीच मावशी असायची. ती आमच्याबरोबर एकदा आमच्या गावाला सुद्धा आली होती आणि माझी मे मधली बरीच सुट्टी आम्ही तिकडे एकत्र घालवली होती. ती जिकडे जाईल तिकडची होऊन जायची ही तिची खासियत होती. नंतर तीच लग्न झाल्यावर ती सुद्धा संसारात गुंतून गेली आणि आम्हीही आमच्या कामात असल्यामुळे हळूहळू संपर्क कमी झाला. आता 2-3 वर्षातून कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदा भेट व्हायची आणि जुन्या आठवणींना परत उजाळा मिळायचा. तिला जाऊन एकदा बघून यायला हवं म्हणून मी दादाला फोन केला आणि आमचं जाण्याचं ठरलं. मी, दादा आणि वाहिनी जाण्यासाठी निघालो. प्रवासात दादा आणि माझा मावशीबद्दल विषय चालू होता. आम्ही विक्रोळीला गोदरेज हॉस्पिटलमध्ये पोहचलो. काकीच्या माहेरचं बऱ्यापैकी कुटुंब तिकडेच होत. तळमजल्यावरच काका (मावशीचा नवरा) भेटले. दाढी-मिशी वाढलेली, चेहरा उतरल्यासारखा पण तरीही चेहऱ्यावर हास्य तसच होत. मावशीकडूनच हा वसा त्यांनी घेतला असणार. तिला अॅडमिट केल्यापासून ते घरी गेले नसावेत. अशा वेळेला काय बोलयच हा प्रश्न असतोच. "कोणत्या वॉर्डला आहे मावशी?" दादाने विचारलं. "फर्स्ट फ्लोर. काकी पण वरच आहे" त्यांनी आम्हाला वर जाण्याचा रस्ता दाखवला. एन्ट्री करतानाच सेक्युरिटी गार्ड ने आम्हाला अडवलं. एका वेळी एकच जाऊ शकतो अशी अट. मी दादाला म्हटलं, "तू पुढे हो. मी मागून येतो". तो एक मजला चढतो न चढतो तोच मी सेक्युरिटी गार्ड ची नजर चुकवून आत गेलो. काकी आय सी यु च्या बाहेर बसली होती. ती कुर्ल्याला एका शाळेत मुख्याध्यापिका आहे. ती सुद्धा मावशीला हॉस्पिटल मध्ये आणल्यापासून शाळा सोडून ईकडेच असायची. तिचा चेहरा खूपच उतरल्यासारखा झाला होता. त्या पाचही बहिणी नेहमी मैत्रिणीसारख्याच वावरल्या होत्या त्यामुळे जेव्हा आपली लहान बहीण या अवस्थेत दिसते तेव्हा मनाची काय घालमेल होत असेल हे कुणी वेगळं सांगायला नको. "तिला अगोदरपासून त्रास होत होता का?" दादाने काकीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. "नाही रे. आताच आठ दिवसापूर्वी तिला चक्कर आली म्हणून ऍडमिट केला तिला आणि ब्रेन हॅमरेज सांगितलं. एमर्जन्सी ऑपरेशन केलं. त्यानंतर तिला शुद्ध आली होती पण पुन्हा 3 दिवसांनी तिला अटॅक आला आणि ती कोमात गेली. खूप मेहनत करायची रे ती. 6 महिन्यापुर्वीच फ्लॅट घेतला तिने डोंबिवलीला. अगोदर भाडयाने राहत होती. काही वर्षांपूर्वी डोकं दुखायच तीच पण तिने खर्च नको म्हणून जास्त सांगितलं नाही कुणाला." काकी रडवेली झाली. मग मुद्दाम विषय बदलावा आणि ती नॉर्मल व्हावी म्हणून आम्ही इकडच तिकडच बोलत राहिलो. दादा तोपर्यंत आय सी यु मध्ये जाऊन तिला बघून आला नंतर वहिनी आणि मग माझी जाण्याची वेळ होती." मी आत जातच होतो की काकीने पुन्हा मला बोलावून घेतलं. "तिच्या उशीजवळ लाल रंगाचा धागा आहे का बघ जरा. आणि जरा हाक मारून बघ." बहिणीच्या मनातली घालमेल तिच्या शब्दातून प्रकर्षाने जाणवत होती. दादाकडून बेड नंबर घेऊन मी आत गेलो. आय सी यु म्हणजे एक भयाण जागा. सगळेच निपचित पडलेले असतात. अधून मधून दिसणारी नर्स म्हणजेच काहीतरी जीवंतपणाच उदाहरण बाकी फक्त मशीन्सच्या टिक टिक. कितीतरी वेड्या भाबड्या आशांचं ओझं त्या जागेवर असत. एकामागोमाग एक पेशंटच्या बेड नंतर एका कोपऱ्यात मावशीचा बेड मला दिसला. मी अगोदर तिला ओळखलं नाही. कारण तिचा पूर्ण चेहरा पट्टीने झाकला होता. नाकातोंडात ट्यूब होती. थोडं निरखून पाहिलं आणि खात्री झाली. तिला असं शांत पाहून कसतरीच झालं. मी थोडया हलक्या आवाजात हाक मारण्याचा प्रयत्न केला. मला धागाही काही दिसत नव्हता. तिला डोळेभरून पाहिलं आणि बाहेर निघालो. निघताना मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की ती लवकर या सगळ्यातून बाहेर पडावी. काकीने आल्या आल्या विचारलं, "होता का धागा?". मी नकारार्थी मान हलवली. तिचा चेहरा पुन्हा पडला. थोडा वेळ आम्ही थोडं इकडच तिकडच बोलून निघालो. उतरताना खाली त्यांच्या नातेवाईकांपैकी एक भेटले. ते सुद्धा बरेच दिवस इकडेच होते अस वाटत होत. "काय म्हणताय काका? कसे आहात?" दादाने समोरून हात दाखवला. ते पुढे आले. "डॉक्टर काय म्हणतायत नक्की?" दादाने त्यांना विचारलं. "डॉक्टरानी आधीच डीक्लेयर केलय रे. नाही वाचणार. व्हेंटिलेटर वर आहे. ह्यांना डिसीजन विचारलं होत पण हे म्हणतात वाट बघू. डिसीजन देऊन मोकळं व्हायला हवं होतं. सगळेच अडकून बसतात यामध्ये". कुठेतरी काळजात चरर्र झालं. म्हणजे एकंदरीत ती वाचणार नाही हे कन्फर्म होत. आम्ही निघताना पुन्हा एकदा मावशीच्या नवऱ्याला भेटलो. मी विचारलं, "मोठा कुठे आहे?". "त्याची शाळेची परीक्षा चालू आहे. नववीला आहे आता. आणि छोटी घरी असते आईजवळ. अडीज वर्षाची आहे. रमते तिच्याकडे. मम्मी कधी येणार विचारते". त्यांच्या चेहऱ्यावरच कोरड हसू सांगताना कायम होत. काय बोलावं या संभ्रमात राहून, "काळजी घ्या." असं सांगून आम्ही निघालो.

नंतरचा पूर्ण प्रवासभर माझ्या डोक्यात विचारांची चक्री चालू झाली. जेव्हा आपल्या घरातली इतकी जवळची व्यक्ती जीच्याबरोबर आपण आयुष्यातली बरीचशी वर्ष घालवली आहेत, अशा अवस्थेत असेल तेव्हा डीसीजन देणं खरच सोप्प आहे का? मी त्या जागी असतो किंवा कुणीही असतं तरी त्यांनी काकांचाच निर्णय कदाचित घेतला असता. या प्रसंगात ना ते नातेवाईक चुकीचे होते ना काका. माणूस फक्त आशेवर जगत असतो की नक्कीच काहीतरी चांगलं होईल. मग ती काकीच्या त्या लाल धाग्यात असेल किंवा काकांच्या कोरड्या स्माईलमध्ये.

==================================================================

- सुबोध अनंत मेस्त्री
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656 

Comments

  1. Really Heart Touching.... I feel it when I was in ICU... When I was thinking about my Hospitalisation its so dangerous......

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…