Skip to main content

गिफ्ट


*गिफ्ट*
- सुबोध अनंत मेस्त्री

======================================
माझा मुलगा सार्थक साडे पाच वर्षांचा आहे.  या वयात मुलांना चॉकलेट्स, कॅडबरी, आईस्क्रीम अशा गोष्टी आवडतात.  सध्या किंडर जॉयची क्रेझ मुलांना आहे.  त्यातलं चॉकलेट खाण्यापेक्षा खेळणी कोणती मिळतात यात त्यांना इंटरेस्ट जास्त असतो.   सार्थक सुद्धा किंडर जॉय पहिल्यांदा दोन वर्षांपूर्वी खाल्ल्यापासून दुसऱ्या चॉकलेट बद्दल बोलतच नाही.  आता एखाद्या चॉकलेटच्या तुलनेत ही किंमत कमीत कमी दुप्पट आहे.  त्याला पैशाची किंमत आतापासून कळावी म्हणून काहीतरी करावं अशी ईच्छा होती.  तेवढ्यात माझा फायनॅनशीअल ऍडवायजर मित्र महेश चव्हाण याची पोस्ट मी फेसबुकवर पाहिली.  त्याचा मुलगा स्पर्श सार्थकपेक्षा एक दोन वर्षे लहान आहे.  स्पर्शने त्याच्या गल्ल्यातल्या सेविंग मधून स्वतःसाठी सायकल घेतली अशी ती पोस्ट होती.  मला कल्पना सुचली.  सार्थकची जुनी वॉटरबॅग आम्ही गल्ला म्हणून वापरायला लागलो.  काम केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत हे समीकरण.  मग ते अंथरून घालणं असू दे किंवा कचरा काढणं असू दे.  त्याची दिवसाला 2 रुपये कमाई  व्हायला लागली.  त्यात आमच्या आईने एकदा पिन मारली, "2 रुपयात काय होतंय रे.  लहान पोराला काम करायला लावतोस.  कमीत कमी दहा रुपये दे."  शेवटी आजी ती आज्जीच.  आम्ही लहानपणी 10 पैसे मागितले की आमच्यावर चिडायची.  नातवाला दहा रुपये दे बोलताना तिला काहीच वाटत नाही.  बस्स.  हा आता दहा रुपयाशिवाय ऐकायचा नाही.  बरं, पैसे साठवून तो काही खायला आणतोय वैगेरे म्हणावं तर ते पण नाही.  तो रोजच्या रोज पैसे मोजायचा.  एकदा त्याच्या साठवलेल्या पैशातून  आम्ही त्याच्यासाठी एक गेम घेऊन आलो होतो.  त्यानंतर पुन्हा गल्ला रिकामी झाला आणि नव्याने सुरुवात.  नंतर नंतर असं व्हायला लागलं की मी घरी आलो की हा लगेच पैसे मागायचा.  मला थोडं इरिटेशन व्हायला लागलं होतं.  पण कामाशिवाय पैसे नाहीत हे समीकरण कायम.   या 8 ऑक्टोबर ला माझ्या दादाचा म्हणजे सार्थकच्या मोठया पप्पाचा वाढदिवस होता.  सार्थकचा  मोठ्या पप्पावर भरपूर जीव.  दादा आला की सार्थकशी खेळतो त्याला मोबाईलवर गेम खेळायला देतो म्हणून दोघांचं जबरदस्त जमत.  दादाच्या बर्थडे साठी माझं आणि प्रतिभाच गिफ्ट काय घ्यायचं म्हणून सहज डिस्कशन चालू होत.  प्रतिभा पेन घेण्याबद्दल बोलत होती.  सार्थक तिथेच होता.  तो पटकन बाहेर गेला.  त्याच्या गल्ल्यात आतापर्यंत साठलेले 80 रुपये घेऊन तो पटकन आला आणि म्हणाला, "मम्मी, माझ्याकडून मोठ्या पप्पांना पेन घे".  मी एकदम स्तब्ध झालो.  या वयात एवढ्या मेहनतीने जमा केलेले पैसे स्वतःसाठी खर्च न करता एका झटक्यात तो द्यायला तयार झाला हे माझ्यासाठी थोडं अनएक्सपेक्टेड होत.  मी प्रतिभाला मुद्दाम ते पैसे घ्यायला सांगितले कारण मला वाटलं की तो परत मागेल पण त्याने तसं केलं नाही.  मी प्रतिभाला त्याच पैशात थोड़े पैसे टाकून गिफ्ट घ्यायला सांगितलं कारण त्यापेक्षा मोठं गिफ्ट दादासाठी काही होऊच शकत नव्हतं.  गिफ्ट आल्यावर त्यावर त्याने पेनाने, "मोठे पप्पा हे ला बू (त्याच्या भाषेतल आय लव्ह यु)" लिहिलं.  ते गिफ्ट दादाला देताना मी तिथे नव्हतो पण त्यालाही नक्कीच भारी वाटलं असणार.  एवढ्या लहान वयात जिथे मुलांना स्वतःकडची गोष्ट सोडण्यात इंटरेस्ट नसतो तिकडे शून्यावर येऊन पुन्हा सुरुवात करण्याची  तयारी दाखवणाऱ्या मुलाबद्दल बापाला काय फिलिंग असेल आय कान्ट एक्सप्लेंन!!!

=========================================

- सुबोध अनंत मेस्त्री
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656

Comments

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…