Skip to main content

संदेश दादास पत्र
संदेश दादा,

ज्याच्या नावातच मेसेज आहे असा तू.  मला आठवत मी नववीला असेन तेव्हा तुझी आणि माझी भेट झाली.  लिखाणाची सवय मला त्यावेळी तुझ्यामुळे लागली (मध्ये खूप मोठा गॅप झाला पण गेल्या एक दोन वर्षांपासून पुन्हा सुरुवात केलीच).  तुझे आर्टिकल्स त्यावेळी वाचायचो आणि त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करायचो.  ते जेव्हा तुला वाचायला दिलं त्यावेळी "स्वतःच अस काहीतरी लिही" असं समजावणार पत्र तू मला लिहिलंस.  पण त्यावेळी शाळेच्या पुस्तकाबाहेर वाचनच नव्हतं तर काय लिहिणार?  थोडे प्रयत्न केले पण नंतर बंद झालं.  आता जेव्हा ब्लॉग लिहायला लागलो तेव्हा अगोदर मेसेज तुला पाठवायचो.  तुझा रिप्लाय पण अगदी सविस्तर आणि थेट शब्दात असायचा.  तुझ्याकडे पूर्वीपासून मी समीक्षक म्हणूनच बघायचो आणि ती भूमिका तू व्यवस्थित पार पाडतोस.  माझं पुस्तक यावं अशी तुझी इच्छा आहे.  आता लिखाणाची आवड पुन्हा लागलीय तर नक्कीच येईल.  याची बीज तूच तर पेरलीस माझ्या कुमारभारती वयात ☺

मला नाटकाची सवय पण तूच लावलीस.  पाहिलं तिकीट काढून आणलेलंस "तू तू मी मी" चं.  त्यानंतर मी स्वतः जाऊन नाटकं बघायला लागलो.  मला "तू तू मी मी" ची गाणी अजून पाठ आहेत 😎  तुझ्याबरोबर एका एकांकिका स्पर्धेत भाग घेण्याचं भाग्य चालून आलं होतं पण माझा भोळसटपणा आडवा आला आणि आपली ती संधी हुकली.  तू गावाला असे प्रयोग करतोस मला माहित होतं.  तू, दादा आणि कृष्णा दादाने मला कलाकार होण्यास उस्फुर्त केलंत.  अकरावीला पहिला प्रयत्न केला आणि तो जोरदार हिट झाला.  त्यानंतर अभिनयाची गोडी लागली ती आजपर्यंत आहे.  अल्फा महाकरंडकला माझा आवाज थिएटर माईकवर कसा प्रोफेशनल आहे हे तू मला सविस्तर वर्णन करून सांगितलं होतंस.  स्वतः स्वप्नील जोशीला जाऊन "हा विनोद आणि सुबोध जर या इंडस्ट्री मध्ये आला असता तर तुझं मार्केट डाउन होत" हे बोलण्याइतपत तुझा आमच्यावर प्रेम आणि विश्वास आहे. 

आपल्या फ़ंक्शनला तू यावास हा माझा नेहमीच अट्टाहास असतो आणि तू येतोस.  तुझ्यालेखी मी एक कलाकार आहे आणि ते क्षण मी जगत असताना मी कलाकार म्हणूनच जगावं अशी प्रबळ ईच्छा असणारी व्यक्ती म्हणून तू मला समोर हवा असतोस.  तुझ्यासाठी लिहिण्यासारखं खूप आहे.  पण आता इथेच थांबतो.  काही नाती रक्ताची नसतात पण त्याच महत्व त्यापेक्षा खूप जास्त असत.  मी दादा तू आणि कृष्णा दादा यात कधी भेदभाव केला नाही.  माझ्या मोठ्या भावांपैकीच तुम्ही 😘 तुझ्यासाठी माझं एखाद पुस्तक आणि नाटक नक्कीच येईल ये वादा रहा 😁

तुझाच,
सुबू

Comments

Popular posts from this blog

दूरदर्शन आणि मी

संध्याकाळी माझ्या एका कामानिमित्त बेलापूर स्टेशनजवळ गेलो होतो इतक्यात एका अनोळखी नंबरवरून फोन वाजला.  संध्याकाळी ७ किंवा ७.३० ची वेळ असेल.  आजूबाजूला बराच गोंधळ असल्याने मला नीट ऐकू येत नव्हतं.  मी थोड्या वेळात कॉल करतो सांगून व समोरून "ठीक आहे" असं पुसटस ऐकू आल्यावर फोन कट केला.  नेमका फोन कुठून आलाय हे मला कळालं नव्हतं. माझं काम झाल्यावर मी परतीच्या वाटेवर असताना पुन्हा त्याच नंबर वर कॉल लावला. 
"नमस्कार, थोड्या वेळापूर्वी आपला कॉल आला होता.  सॉरी तुमचा आवाज आला नाही म्हणून कट करावा लागला", मी फोन लागल्याबरोबर सांगण्यास सुरुवात केली. 
"नाही काहीच हरकत नाही.  मी निखिलेश चित्रे बोलतोय.  दूरदर्शनमधून", समोरून आवाज आला.  आता आवाज बऱ्यापैकी क्लीअर होता.
"नमस्कार निखिलेशजी बोला", मी त्यांच्या बोलण्यास दुजोरा दिला
"मी तुमचा ब्लॉग वाचला.  आम्हाला टेक्नॉलॉजी व सोशल मीडियासंदर्भात न्यूजमध्ये बोलण्यासाठी एका तज्ज्ञाची आवश्यकता होती.  तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये जे काही मांडलय ते तुम्ही न्यूज मध्ये सांगू शकाल का?", निखिलेशजींनी विचारलं
&quo…

आठवणीतला गारवा

आठवणीतला "गारवा" - सुबोध अनंत मेस्त्री
आमच्या घरातला दीड दिवसाचा गणपती निघायला तसा अजून तासभर वेळ बाकी होता.  घराच्या मोठ्या खिडकीला लागून प्लास्टिकच्या आराम खुर्चीवर मी बाहेरचा पाऊस पाहत रेलून बसलो होतो.  रात्रीच बऱ्याच वेळेचं जागरण असल्याने सगळे बेडरूममध्ये आराम करत होते.  आमच्या करंजाडेच्या  घराच्या खिडकीसमोरूनच डोंगर सुरू होतो. बिल्डिंग आणि डोंगरामध्ये फक्त एक छोटा  रस्ता.  डोंगर सुरू होतानाच पायथ्याशी एक झोपडी.  कदाचित बाजूला बिल्डिंगच काम चालू असणाऱ्या कामगाराची असेल.  गावाच्या घराला शोभेल अस विटांच घर.  घरासमोर बांधलेल्या बकऱ्या पावसात भिजत होत्या.  घराच्या मागे चढणीवर झुडपं साफ करून त्यांनी काही भाज्यांची लागवड केली आहे.  तिथून थोडं चढण गेल्यावर एक खड्डा आहे ज्यातून उरणवरून माल वाहून नेणाऱ्या मालगाडीचा ट्रॅक जातो. पुढे पुन्हा थोडा डोंगर नंतर पनवेल पासून उरण ला जाणारा एक्सप्रेसवे आणि तो रस्ता क्रॉस केल्यावर खऱ्या डोंगराची सुरुवात.  हे इतकं काही मध्ये आहे हे खिडकीतून जाणवतच नाही.  अस वाटत की खिडकीसमोरच्या रस्त्यासमोरूनच डोंगर सुरू होत असेल.  या डोंगराच्यामागे थोडा लांब …

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…