Skip to main content

बाबा मला कळलेच नाही...."यावर्षी कोणतं गाणं गाणार आहेस?", रोशन आणि संदीपने नाटकाच्या रिहर्सल ब्रेकमध्ये विचारलं.  "ठरवतोय अजून", मी सांगितलं. तसं अजून काही कन्फर्म नव्हतंच.

सप्टेंबर पासूनच सगळ्या ग्रुप आणि घरामध्ये आमच्या श्रीच्या वार्षिक स्नेहमेळाव्याची चाहूल लागायला सुरुवात होते.  सोहळा डिसेंम्बरमध्ये असतो पण त्याच्या रिहर्सल सुरू दोन महिने आधीच होतात.  घरात मी कोणतंही गाणं गुणगुणायला लागलो की आई लगेच म्हणायची, "यावर्षी हे गाणं घेणार आहेस?  एवढा जास्त वेळेचा कार्यक्रम करता मग निदान अर्धा तास तरी तू गायला पाहिजेस स्टेजवर."

"माझी आई आहेस म्हणून तू सहन करशील अर्धा तास.  बाकीचे लोक उठून जातील त्याच काय?", मी गमतीने म्हणायचो.

सहज डोक्यात विचार आला की आईसाठी डेडिकेटेड गाणं घ्यायचं पण कोणतं ते नक्की नव्हतं. मध्ये अजाने कारवान नावाच्या एका प्रोड्क्ट प्रमोशनल व्हिडीओ व्हाट्सएपवर पाठवला.  त्या व्हिडीओमधली नायिका सतत "लग जा गले" हे गाणं गुणगुणत असते अस दाखवलं होत.  यापूर्वी इतक्या सिरियसली ते गाणं मी कधी ऐकलं नव्हतं.  गाण्याच्या लिरिक्समधून जवळच्या व्यक्तीकडे कसं व्यक्त व्हावं हे मस्त मांडलं होत.  मला ते इतकं आवडलं की हेच गाणं घ्यावं हा विचार पक्का झाला.  युट्युबवर कॅराओके ट्रॅक शोधताना सनम पुरीच सेम गाण्याचं अनप्लग व्हर्जन सापडलं.  जुन्या गाण्यापेक्षा क्लासच्या पब्लिकसाठी  हे नवीन व्हर्जन जरा बेटर वाटलं.  एक गाणं आता ठरलं होतं. पण आईसाठी स्पेशल काहीतरी गाव अस वाटत होतं.  विचार करताना "तारे जमी पर" चित्रपटातलं माँ हे गाणं पटकन स्ट्राईक झालं.  खरतर पाच वर्षांपूर्वी आमच्या  सोसायटी फ़ंक्शनमध्ये मी हे गाणं घेतलं होतं आणि ते सपशेल आपटलं होत.  पण यावेळी आईसाठी रिस्क घेण्याचा विचार केला.  डोक्यात मस्त कल्पना चालू होती. घरातले सगळे जुने अलबम काढले आणि त्यातले आम्हा तिघांचे आणि आईचे फोटो सेपरेट काढून त्या फोटोचे मोबाईल कॅमेराने फोटो घेतले.  हे सगळं घरात आई पप्पासमोरच चालू होत पण मी नेहमीच काही न काही उचापती करत असतो म्हणून त्यांनी लक्ष दिलं नाही.  सगळे फोटो क्लब करून माँ गाण्याच्या कॅराओके ट्रॅकवर एक मस्त व्हिडीओ क्लिप बनवली.  ही क्लिप मी सरप्राईज म्हणून डायरेक्ट फ़ंक्शनमध्ये प्ले करणार होतो.  गाण्याचा रात्री जमेल तसा आणि वेळ मिळेल तसा सराव चालू केला.  "हे घेतोयस का रे गाणं?", आई विचारायची.  मी तिला त्यावेळी  सांगितलं नाही.  पण राहून राहून मनात येत होतं आईसाठी घेतलं एक गाणं पण पप्पांसाठी काहीच नाही.  पण जर मी 3 गाणी घेतोय सांगितलं असत तर दादाने वेळेचं कारण पुढे केलं असत.  या कार्यक्रमात कुणालाच सोलो परफॉर्मन्स जास्त घेऊ देत नाहीत.  पुढच्या वर्षी करेन काहीतरी पप्पांसाठी असा विचार मी केला होता.

पण शेवटी भावांची नाळ कुठे ना कुठे जोडलेली असते.  दादाने एका रात्री कॉल केला.  "सुब्या, मी यावर्षी बाबाचा पॅच आहे ना तो 5 मिनीटचा तो घ्यायचा विचार करतोय.  त्याला लागून तू व्हेंटिलेटर मधलं 'बाबा' किंवा शिक्षणाच्या आयचा घो मधलं 'समजून घे बापाला' गाणं घे".  आपण एखाद्या गोष्टीचा ईच्छा धरावी आणि ती स्वतःहून समोर यावी अशी माझी अवस्था झाली.  दादाच ऐकून माझ्या भावना उफाळून आल्या आणि सगळं सरप्राईज मी त्याच्यासमोर घडाघडा बोलून दाखवलं.  आईसाठी बनवलेली क्लिप त्याला सेंड केली.  "घे तिसरं गाणंपण बिनधास्त", असा दादाकडून ग्रीन सिग्नल आल्यावर मला रान मोकळं झाल.  दोन्ही गाणी ऐकली पण त्यातल्या त्यात व्हेंटिलेटर चित्रपटातलं 'बाबा' गाणं जास्त सूट होणार वाटत होतं.  पण ते गाणं माझ्या मानाने भलतंच कठीण होत.  दादा क्लिप बनवेल म्हणाला.  माझी रिहर्सल जोरदार सुरू झाली.  मी पहिल्यांदाच 3 सलग गाणी घेणार होतो.  स्वानंद त्याच्या पप्पांना तीन महिन्यांपूर्वी देवाज्ञा झाली म्हणून त्यांना डेडीकेट करून 'ए दिल है मुश्किल' गाणार होता.  मग त्या गाण्याला लागून मी 'लग जा गले' घेणार होतो.  त्यातून व्यक्त होण का गरजेचं  आहे हे लोकांना समजावून देऊन नंतर माँ गाणं घ्यायच होत. यानंतर दादा बाबाचा पॅच घेणार होता.  त्यानंतर व्हेंटिलेटर चित्रपटातला बाबांशी निगडित एक सिन आणि मग त्याला लागून मी लगेच बाबा गाणं घेणार होतो.  उद्देश दोन होते.  एकतर आई-पप्पांना त्याचं आमच्या लेखी असणारं महत्व समजावून द्यायचं होत आणि जी मुलं आईबाबाचा राग करतात त्यांनाही ते पटवून द्यायचं होत.

कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी शेड्युल आलं आणि कार्यक्रम खूप लेट होतोय अस दिसलं.  दादा मला एक गाणं कमी करायला सांगत होता पण आता मी ते करणार नव्हतो.  "होऊ दे लेट, बघू आपण काय करायचं", अस ठरवून मी तो विषय टाळला. गाणं म्हणायचं असेल तर घसा बसू नये म्हणून मी सहसा जास्त कुणाशी बोलत नव्हतो.  खूप कमी शब्दात मी  कार्यक्रमाच्या दिवशी कलाकारांना त्यांच्या स्टेजवरल्या जागा समजावून दिल्या.  खडीसाखर खाल्ल्यावर गळा खुलतो अस आमच्या नाटकाच्या डायरेक्टरने खूप वर्षांपूर्वी सांगितलं होतं म्हणून विंगेत उभा राहून कार्यक्रम अगदी सुरु झाल्यापासून खडीसाखर खात होतो.  स्टेजच्या मागेही थंड पाणी न आणता साधंच पाणी असेल अशी व्यवस्था आवर्जून केली होती. माझ्याआधी स्वानंदचा परफॉर्मन्स दणक्यात झाला.  मी स्टेजवर आलो.

"आपल्या आसपास असणारी व्यक्ती ही कायम तुमच्याबरोबर नसते.  म्हणून तुम्हाला जे त्या व्यक्तीला सांगायचं आहे ते आताच.  तुमचं प्रेम ही आताच व्यक्त करा.  नंतर कितीही प्रयत्न केला तरी त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या भावना सांगता येत नाहीत.", असं सांगून मी गाण्याला सुरुवात केली.  'लग जा गले' चांगलं झालं.  गाणं चालू असताना मागे बरीचशी मुलं मोबाईलच्या बॅटरी ऑन करून हात हलवत असताना दिसले.  ते मस्ती करत होते की गाणं एन्जॉय करत होते हे मला समजलं नाही.  पण मला माझा फोकस डायव्हर्ट करायचा नव्हता.  यानंतर आईबद्दल बोलायला सुरुवात केली.  पण तिच्याबद्दल बोलताना का कोण जाणे कंठ दाटून येतो.  एकदमच अनावर झालं तर गाणं बिघडेल म्हणून मी आवरत घेतल.  गाण्यांनातर जे असेल ते बोलेन असा विचार केला व गाणं चालू केलं. माँ गाणंपण माझ्या अपेक्षेपेक्षा चांगलं झालं.  पण मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करायचो मला सारखी आईच समोर दिसायची.  स्वतःला पूर्ण गाण्यात खूप आवर घातला.  गाणं संपल्यावर शेवटी काही बोलणं शक्य नव्हतंच.  फक्त "थॅंक यु" बोलून विंगेत गेलो.  दादा नेहमीच त्याच्या बोलण्यातून लोकांच्या काळजाला हात घालतो.  यावेळीही त्याने तेच केलं.  बाबांच आपल्या आयुष्यातील महत्व त्याने खूप सुंदर शब्दात पटवून दिलं.  व्हेंटिलेटर चित्रपटाची क्लिप लागली.  त्याच्यानंतर आता माझा पुन्हा टर्न होता.  मी मुद्दाम ती क्लिप बघणं टाळत होतो.  कारण गाण्याआधी मला इमोशनल व्हायचं नव्हतं. क्लिप संपून गाणं सुरू झालं.  प्रेक्षकामधली शांतता माझ्या गाण्याचा प्रतिसाद दाखवून देत होती.  मध्येमध्ये ओरडणाऱ्या मुलांचा आवाज शांत झाला होता.  मध्येच अंतऱ्यानंतर टाळ्या पडल्या.  मी डोळे मिटुनच पूर्ण गाणं घेतलं.  कारण समोर बघण्याची हिम्मत नव्हती.    बाबासारखं टफ गाणं मी निभावून नेलं.  गाणं संपता संपता डोळ्यात पाणी होतच.  पप्पाबद्दल खूप काही  बोलायचं होत पण ते शब्दाऐवजी डोळ्यातलं पाणी बोलून गेलं असेल.  काहीस अर्धवट बोलून मी माईक दादाच्या हातात दिला.

"आयुष्यातलं सर्वात कठीण काम याने मला दिलंय.  स्वता रडतोय आणि माईक माझ्या हातात दिलाय.  आम्ही आयुष्यात आता जे कुणी आहोत आणि ज्यांच्यामुळे आहोत त्या आमच्या आई बाबाचा आम्ही इथे सत्कार करतोय.  पण हा सत्कार समस्त पालकांचा आहे", अस बोलून दादाने आमचे आई पप्पा आणि सुनील दादाच्या आई पप्पाना स्टेजवर बोलावलं.  आई तर खुर्चीत रडतच होती.  आई पप्पा दोघे स्टेजवर आले.  दादाने आईला कडकडून मिठी मारली. पप्पानी आम्हा दोघांना.  अक्खा हॉल उभा राहून टाळ्या वाजवत आमचं कौतुक करत होता.  "जर तुम्ही अजून कधी तुमच्या आईबाबाकडे प्रेम व्यक्त केलं नसेल तर ते आता करा",  अस दादाने सांगितल्यावर ज्यांचे पालक तिथे होते त्या मुलांनी त्यांना मिठी मारून आभार व्यक्त केले.  आमचा हेतू सफल झाला होता.  आई पप्पाना विंगेत बसवलं.  थोड्या वेळाने विंगेत आमचे तेजस पाध्ये सर आले.  त्यांनी मला कडकडून मिठी मारली आणि रडायला लागले.  "प्राउड ऑफ यु", अस खूप वेळा ते म्हणत होते.  आमच्या बिजनेस ग्रुपमधल्या मित्रांचा फ़ंक्शन नंतर 31 डिसेंम्बरसाठी गोव्याला जाण्याचा प्लॅन होता.  पण त्यातल्या अर्जुन सरांची आई आजारी होती.  आमच्या परफॉरमन्स नंतर दादाने तिथे उपस्थित मुलांना आपल्या आई बाबांना धन्यवाद बोलायला सांगितल होत.  अर्जुन सरांचा मुलगा त्यांना ते बोललाच पण त्याने त्यांना कडकडून मिठी मारली आणि जाऊ नका म्हणाला.  आमच्या परफॉर्मन्सनंतर  त्यांनी गोव्याचा प्लॅन कॅन्सल करून आईकडे घरी जाणं जास्त महत्वाचं मानलं.  आमचा प्रयत्न बऱ्याच अंशी सफल झाला होता.

पुढचा कार्यक्रम उत्तम पार पडला पण हा आई बाबांचा पॅच लोकांच्या मनावर घर करून राहीला.  शेवटी कोणत्याही आई बाबांची काय अपेक्षा असते?  आपल्या मुलांनी सुखी राहावं व त्यांनी मुलांसाठी आयुष्यभर जे काही केलंय याची मुलांना जाणीव असावी एवढंच.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…