Skip to main content

चालता बोलता नकाशा


"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्टेशन येत?", त्याने एकदा मला घरी विचारलं.

"टिळक नगर", मी सांगितलं.

"आणि त्यापुढे", आता त्याचा इंटरेस्ट वाढायला लागला होता.

"कुर्ला", मी सांगितलं. तो खुश झाला.  पुढे कुणालाही सांगताना बेलापूर ते कुर्लापर्यंत स्टेशन तो बोलून दाखवायला लागला.  सगळ्यांना नवल वाटायचं.

एकदा सहज त्याला विचारलं, "तुला मी पनवेल पासून कुर्ला शिकवू स्टेशन सगळे?" प्रश्न ऐकून त्याचा चेहरा चमकला. त्याला सेपरेट वेळ काढून शिकवण थोडं अवघड होतं.  पण तो अंघोळीला रोज माझ्या सोबत असायचा.  मग अंघोळीच्या 5 ते 10 मिनिटामध्ये मी त्याला स्टेशन शिकवायला सुरुवात केली.  पनवेल ते कुर्ला स्टेशन्स तो सहज शिकला.   मग त्याला पनवेल-ठाणे लाईन शिकवली कारण त्यामध्ये बरेच स्टेशन्स सारखे होते.  आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता.

मग पनवेल-सी एस टी, पनवेल-अंधेरी,सी एस टी-अंधेरी, वाशी-ठाणे या लाईन्स त्याला शिकवल्या.  हळू हळू तो सगळं व्यवस्थित ग्रास्प करत गेला.  कुणी आलं की मी त्याला त्या रेल्वे लाईन्स बोलून दाखवायला उत्साहित करायचो.  खूप आढे वेढे घेऊन लाजून मुरडून  झाल्यावर तो बोलून दाखवायचा.  त्यामागे हेतू एवढाच की त्याला परक्या व्यक्तीसमोर बोलण्याची डेअरिंग आली पाहिजे.  ती त्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला लागली होती.

"हे नको ते कशाला शिकवतो काय माहीत? त्याला स्पेलिंग शिकवायच्या, अभ्यासाचं विचारायच ते नाही",  आईने अस खूप वेळा बोललेलं आठवत.

"अग मम्मे, स्पेल्लिंग आणि सगळं शिकवतात शाळेत.  मी कशाला वेगळं शिकवायला पाहिजे.  त्याला इंटरेस्ट आहे यात", मी समजवायचो आईला.

"पण याच काय करणार आहे तो.  शिकून काय फायदा? परीक्षेला हे विचारणार आहेत काय?",  आमची आई अजूनही तशीच.  फायदा विचारात घेऊन कोणतीही गोष्ट करण्यात मला किंवा आम्हा भावांना कधी इंटरेस्ट नव्हताच आणि सार्थकही आमच्यासारखाच झालाय.  जे आवडत ते करायचं आणि ते एन्जॉय करायचं.

"आई तू थांब, पप्पाला शिकवू दे.  मला आवडतात स्टेशन्स शिकायला", कधी कधी सार्थकही बाथरूम मधूनच आईवर वैतागायचा.  आम्ही ऐकत नाही बघून आईने नंतर नंतर बोलणं सोडून दिलं.  मी जेव्हा कधी सकाळी घरी असेन तेव्हा मी त्याला पुढच्या लाईन्स सांगण्यास सुरुवात केली.  आमची हार्बर, ट्रान्स हार्बर आधीच झाली होती.  मग मेन लाईन (सी एस टी-कसारा, सी एस टी-खोपोली), वेस्टर्न लाईन (चर्चगेट विरार, मग डहाणू रोड), पनवेल-दिवा, पनवेल-वसई रोड-डहाणू रोड, बेलापूर-उरण, मेट्रो, मोनो सगळ्या लाईन्स शिकवल्या.  खरं तर यातले सगळे स्टेशन्स मला सुद्धा येत नव्हते.  पण मी अंघोळीला जाताना एम इंडिकेटर मधून 5-6 स्टेशन हातावर लिहून न्यायचो आणि त्याला शिकवायचो.  थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीवर रोज थोडं थोडं करता करता तो सगळ्या लोकल लाईन्स बघता बघता शिकला.  मध्ये मध्ये ब्रेक ही व्हायचाच.  कारण मी नेहमी सकाळी नसायचोच.  आणि आमचा शिकण्याचा वेळ ठरलेलाच - अंघोळीचा.  तो मला मध्ये मध्ये बरेच प्रश्न विचारायचा पण त्याचा कोणता प्रश्न मी कधी टाळला नाही.  ठाणे ट्रेन जुईनगर वरून कशी वळते? सानपाडावरून कशी वळते? हार्बर आणि सेन्ट्रलच कुर्ला स्टेशन सेमच का? मग अंधेरी पण सेम का? असे एक ना अनेक.  तो प्रश्न विचारताना कधीच थकला नाही.  पण त्याची उत्सुकता मी कधी दाबली नाही.  जमेल तसं जमेल तेव्हा त्याला उत्तर दिली.  कधी ट्रेन मधून जाताना त्याला बदलणारे रूटही  दाखवले.

तो लोकल लाईन्स संपवून थांबणार नाही हे माहीत होतं.  मग तो  गावाच्या लाईनकडे वळाला.  पनवेल ते संगमेश्वर, मग दिवा ते सावंतवाडी आणि मग सी एस टी ते मडगाव अशी त्याची भूक नेहमी वाढत राहिली.  पुढे सी एस टी-कोल्हापूर ही त्याने पूर्ण केलं आणि सी एस टी-गोंदिया सुद्धा.  तो इंडियाच्या सगळ्या लाईन्स शिकण्याच म्हणतोय.  जमेल तसं त्याला पुढे शिकवण चालूच आहे.  सध्या महाराष्ट्रातल्या रेल्वे लाईन्स टार्गेट आहेत आणि नंतर भारतातल्या.  खरं तर या लोकल लाईन्स पाठ करणं पण त्याच्या वयासाठी अवघडच होत पण त्याने ते उत्कृष्टरित्या पूर्ण केलं.

या वर्षीच्या क्लासच्या अँन्युअल फ़ंक्शनला त्याने त्याची ही आगळी वेगळी स्किल हजारो लोकांसमोर न चुकता मांडली आणि त्यासाठी लोकांची शाबासकीही मिळवली.  यापुढेही जिथे संधी मिळेल ती घेण्यास तो नक्कीच तयार असेल.  तेवढा आत्मविश्वास नक्कीच त्याच्यात आलाय. 

तो सध्या आमच्या घरातला चालता फिरता मुंबईचा नकाशा झाला आहे 😊


धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…