"पानिपत" "तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" या वाक्यावर "विश्वास पानिपतच्या लढाईतच मेला" हे वाक्य कित्येक वर्षे कानावर पडलेलं. हे ऐकायला बोलायला जितकं सहज तितका सहज पानिपतचा संघर्ष किंवा विश्वासरावांच बलिदान नक्कीच नव्हतं. कित्येक वर्षे राहून गेलेलं पानिपतच पुस्तक गेल्या काही दिवसांत वाचून काढलं. परकीय आक्रमणे हा विषय इतिहासात नवा नाही. एखादी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थावर उठली की ती किती नुकसान घडवून आणू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पानिपत. एक सामान्य प्यादा म्हणून मोगलांकडे काम करणारा नजीब स्वतःच्या कुटनीतीने जवळपास दिल्ली हस्तगत करून बसला. त्याला मराठे डोईजड व्हायला लागले तेव्हा कंदाहारच्या अब्दाली बादशहाला इस्लामला होणारा धोका पटवून देऊन मोठ्या सैन्यानिशी त्याने हिंदुस्तानात पाचारण केले. नजीबला संपवण्याची संधी बऱ्याच वेळेला याआधी आली होती. मराठ्यांचे प्रमुख सरदार मल्हारराव होळकर यांनी या नजीबलाच मानसपुत्र बनवून ठेवला होता. जेव्हा रघुनाथराव पेशवे त्यांना मारण्यासाठी गेले तेव्हा मल्हारराव आपल्या मराठ्यांना आडवे आले आणि त...