Skip to main content

रिकनेक्शन


 

काही दिवसांपूर्वी चौधरी बाईंनी फोन न करण्यावरून माझी कानउघडणी केल्यापासून केव्हा एकदा त्यांना भेटतो असं मला झालं होतं आणि शेवटी तो योग आला.  घाटकोपरला "नन्ही कली" उपक्रमाचा सेशन संपवून बाईंच्या घरी जायचं ठरलं.  बाईंना आदल्यादिवशी तशी कल्पना देऊन ठेवली होती.  "मी कुठे जातेय.  मी मोकळीच आहे.  केव्हाही ये", बाईंच्या या उत्तराने आमची भेट पक्की झाली.  बाईंना फोन केला तेव्हा बाई चेंबुरलाच शाळेसमोरच्या त्यांच्या जुन्या घरी मोठ्या मुलाच्या घरी होत्या.  तिथूनच त्यांच्यासोबत देवनारच्या घरी जायचं ठरलं.  त्यांना घेण्यासाठी गाडी घेऊन शाळेसमोर आलो.  त्यांच्यासमोर हाफ पॅन्टवर फिरणारी आम्ही मुलं.  मी गाडी घेऊन आलोय बघून त्या खूपच खुश झाल्या.  त्या गाडीत बसणार म्हणून मलाही आनंद होताच.  दरवाजा उघडून त्यांना गाडीत बसवलं.  मागे प्रतिभा आणि त्या, पुढे मी आणि सार्थक.  

सातवीला चौधरीबाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या.  शाळेसमोरच त्यांचं घर.  एकदा बाई आजारी म्हणून शाळेत आल्या नाहीत.  आम्ही तिघे-चौघे हिम्मत करून त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो.  बाईंनी आमचं स्वागत केलं.  आम्ही त्यांना भेटायला गेलो याचं कौतुक त्यांना होतं.  खायला प्यायला मिळालं.  आम्ही कुठे राहतो वैगेरे चौकशी झाली.  आम्ही चाळीत राहतो ट्युशनला जात नाही वैगेरे ऐकून बाईंना वाईट वाटलं.  त्यावर्षी मला गणित बरच जड जात होतं.  "तुम्ही रोज संध्याकाळी शाळा सुटल्यावर सात वाजता घरी येत जा.  सकाळच्या शाळेची पण काही मुलं असतात.", बाईंनी हे सांगतानाच आमच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह ताडलं.  "मी काही ट्युशन फीज वैगेरे घेत नाही बाळा.  तुम्ही येत जा", बाईंनी हसून आम्हाला सांगितलं.  वार्षिक परीक्षेला १-२ महिने होते.  मग किरण आणि मी रोज बाईंच्या घरी जायला लागलो.  त्यांनी सगळ्याच विषयाची तयारी आमच्याकडून करून घेतली.  बऱ्याच वेळा उजळणी झाली.  त्यावर्षी वर्गात सहावा आलो.  बऱ्याच हुशार मुलांच्या भुवया उंचावल्या होत्या.  आठवीला इंग्रजी कठीण म्हणून माझ्या वाढदिवसाला त्यांनी तेव्हा बऱ्यापैकी महाग असणारं इंग्रजीच गाईड गिफ्ट म्हणून दिलं होतं.  आठवीलाही त्यांनी आमची अशीच मोफत ट्युशन्स घेतली होती.  त्यावेळी बाई चाळीतल्या घरीही येऊन गेल्या होत्या.  माझ्या मोठ्या मामीला त्यांच्या घरी काम दिलं होतं.  त्यामुळे बाईंबद्दलचा जिव्हाळा तेव्हापासूनच होता. 

धरणात पाण्याचा प्रवाह अडवून ठेवलेला असतो आणि धरणाचं दार उघडल्यावर जसा तो प्रवाह मार्ग काढत प्रचंड वेगाने वाहायला लागतो तसंच बाईंचं आता झालं होतं.  २०१७ मध्ये त्यांच्या रिटायरमेंटनंतर ही माझी पहिलीच भेट.  त्यावेळीसुद्धा शाळेत त्यांच्या निरोप समारंभाला माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मांडण्यासाठी चव्हाण सरांनी बोलावलं होतं.  तीसुद्धा गर्दीगर्दीतली धावती भेट.  त्यांनी खूप वेळा देवनारच्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं पण कधी मुहूर्त सापडला नव्हता.  मधल्या काळात त्यांना पॅरालिसिसचा अटॅक येऊन गेला, त्यांचे आई बाबा आजारी होऊन देवाघरी गेले, त्यांचा सख्खा भाऊ वारला या प्रवासात मी कुठे होतो हे मला आठवत नाही.  म्हणजे माझा संवाद बाईंशी खूपच कमी झाला होता.  पुढे ४ तास आम्ही एकत्र होतो.  बाईंना मनमोकळं करण्यासाठी तो वेळही कमीच होता.  

घरी गेल्यावर सुद्धा गप्पा सुरूच. पप्पांना घाटल्यात सकाळीच सोडलं होतं.  त्यांचं दुपारपर्यंत घाटल्यात फिरून झालं होतं.  देवनारला जाताना तासाभरात तिथून निघू असं त्यांना सांगितलं होतं.  घाटल्यातही बऱ्याच नातेवाईकांकडे आम्हाला सुद्धा जायचं होत. लेट झाला म्हणून पप्पांचे सतत फोन चालू होते पण बाईंकडून निघण्याची ईच्छा होत नव्हती.  आईजवळ असल्यासारखंच तिथे वाटत होतं.  खाण्याचे बरेच पदार्थ समोर आणून ठेवले होते पण त्यात त्यांनी पुन्हा नको म्हणत असतानासुद्धा भजी केले.  "ही पोरं अशीच लाजरी.  लहानपणी पण घरी यायचे तेव्हा भूक लागली तरी सांगायचे नाहीत.  खेळण्या-फिरण्याचं वय.  पोरांची भूक आईलाच समजते.  मला त्यांच्या तोंडावरूनच समजायचं.  मग काहीतरी खायला बनवून दिलं की खायचे.  सोशिक वृत्ती लहानपणापासूनच यांची", बाई प्रतिभाला सांगत होत्या.  "माझ्या लेकाचं नाव काढ रे बाळा.  तू पण शिकून मोठा हो.  तुझ्या आईपप्पांनी मेहनत घेऊन इथपर्यंत आले.  अजून बरेच मोठे होतील.  आता तू त्यांना अजून चांगलं जपत जा", बाई सार्थकला सांगत होत्या.  थोड्या वेळाने  जेवून जाण्याचा आग्रह व्हायला लागला.  "पुढच्या वेळी नक्की", या तत्वावर बाई तयार झाल्या.  

निघण्याच्या वेळी त्यांना गोवंडीला एका ठिकाणी कामासाठी जायचं होतं.  पुन्हा आम्हीच त्यांना सोडतो असा आग्रह धरला.  गोवंडीला जाईपर्यंतसुद्धा सुखदुःखाच्या गोष्टी चालूच होत्या.  त्यांना जे भेटायला येणार होते त्यांना लेट झाला म्हणून तिथेही तासभर गप्पा झाल्या.  "तू मला भेटायला आलास पण मला माहेरचंच कुणीतरी आल्यासारखं वाटलं.  मीच फक्त बडबड करतेय.  तुला पप्पा आता ओरडतील माझ्यामुळे लेट झाला तुम्हाला.  मी काय आता मोकळीच बसलीय.  तुम्ही सगळे बीजी असता.  पण एकदा मी येईन तुझ्याकडे राहायला.  सुनेकडून सेवा करून घेतली पाहिजे.  सून म्हणजे काय तुझ्याकडून सून आणि माझीच स्टुडन्ट म्हणून मुलगीसुद्धा.  दोन्ही नाती लागतात.  मग तर हक्काने येऊ शकते.  पण माझ्यामुळे तुम्हाला त्रास.  तुमची कामं खोळंबतील."  असं कितीतरी वेळा त्या बोलल्या असतील.  त्यांनी बोलावं आणि आम्ही ऐकत राहावं.  "अहो बाई, असं तुम्ही बोलू नका.  तुमच्यासाठी करू ते कमीच.  मनातलं शब्दात नाही मांडता येणार.", मी त्यांना सांगितलं.  "अरे अजून किती चांगलं बोलायचं तुला.  मस्तच बोलतोस की.  लहानपणी एवढं वाटलं पण नव्हतं.  पण खूप केलंस बाळा.  आईबाबांच नाव मोठं केलंस", प्रत्येक शब्दातून प्रेमाचा झराच वाहत होता. 

शेवटी त्या ज्यांना भेटायला आल्या होत्या ते त्यांचे माजी विद्यार्थी आले.  "चल रे बाळा! सावकाश जा.  फोन करत जा.  आणि घरी कधीही ये.  राहायला आलात तरी चालेल.", निघताना त्या सांगत होत्या.  

"येईन बाई अधून मधून", काही निरोप जड असतात पण त्यांना पर्यायदेखील नसतो.  गाडीने घाटल्याचा रस्ता धरला. 


- सुबोध अनंत मेस्त्री 

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...