Skip to main content

“ आई" सोडून जाताना





वयाची पस्तिशी ओलांडली....या पूर्ण प्रवासात दिवसातून बराच वेळ समोर दिसणारी माझी आई त्या सोफ्यावर नाही हे सहन होत नाही...वॉश बेसिन मध्ये हात धुताना समोरच्या आरशातून ती सोफ्यावर दिसायची...तसे भासही गेल्या 3-4 दिवसात होऊन गेले...पहिल्या रात्री तर सतत सोफ्यावर हात जात होता.


हे सगळं असं पटापट घडून गेलं...मागच्याच आठवड्यात मी घराची साफसफाई करायची म्हणून अट्टाहासाने घरातलं सगळं सामान 4-5 दिवस सलग आवरत बसलो होतो.  त्यात कितीतरी जुन्या अनावश्यक गोष्टी निघाल्या.  गेली कित्येक वर्ष मी हे सामान काढण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या बाहेर काढायचं म्हटल्यावर "आता तुला आमची पण अडचण व्हायला लागेल, आम्हालाही बाहेर काढशील", असे इमोशनल अत्याचार करून माझी ती नेहमी अडवणूक करायची.  जुन्या आठवणीच सामान म्हणावं तर तसंही नाही.  पण काहीसुद्धा उरलंसुरलेलं कधीतरी भविष्यात उपयोगी होईल म्हणून ठेवून दिलेलं.  बाहेरून आलेला बॉक्स टाकायचा नाही की पिशवी टाकायची नाही.  अगदी पूर्वीपासून काटकसरीत आयुष्य काढलेलं.  बाटलीची झाकण जमवून त्यावर चाळीमध्ये असताना ती खारी टोस्ट घ्यायची.  तिची तीच सवय तिने अजूनपर्यंत ठेवली होती.  "अगं, बिल्डिंगमध्ये चाळीसारखी वागू नकोस", असे पप्पा तिला कितीतरी वेळा म्हणाले होते.  ते या वागण्यामुळेच तिला लाडात "भीकी" हाक मारायचे.


1995 ला आमच्याकडे चाळीतल्या घरात सत्यनारायणाची पूजा झाली होती त्याच्या प्रसादाच्या पिशव्या मला आता साफसफाई करताना सापडल्या.  विशेष म्हणजे मला मुद्दाम अशा पिशव्यांची गरज आहे असं भासवून तिला विचारलं तर नेमकं त्या कोणत्या कपाटात असतील हे सुद्धा तिने अचूक सांगितलं.  पण त्यातली एकही पिशवी सध्या कामाची नव्हती.  प्लास्टीकच्या त्या पिशव्या जळालेल्या कागदासारख्या फक्त स्पर्शाने फाटत होत्या.  असं कित्येक वर्षाचं सामान 2-3 घरांच्या शिफ्टिंग मध्ये आम्ही फिरवलं होतं.  काही दिवसांपूर्वी एक गुरु आमच्या घरी येऊन त्यांनी सामान काढून टाकण्याचा  सल्ला आम्हाला दिला म्हणून ती तयार झालं.  तब्बल 56 किलो भंगार विकून त्यातून आलेले पैसे तिला दिले.  तिच्या अपेक्षेपेक्षा ते जास्तच होते.  गावाला द्यायच्या काही गोष्टी गोणीमध्ये भरून ठेवल्या आणि जेव्हा गावाला जाऊ तेव्हा त्याच्या वाटण्या करू असं ठरलं.  त्यालाही ती तयार झाली.


बुधवारी सकाळी जेव्हा उठलो तेव्हा पप्पा तिला नाश्ता भरवत होते.  तिचं जेवण हल्ली कमी झालं होतं.  असा त्रास तिला प्रत्येक उन्हाळ्यात व्हायचा.  ती थोडी रेस्टलेस वाटत होती.  मी दादाला फोन करून कळवलं आणि लवकर यायला सांगितलं.  वजनामुळे तिला दम लागायचा त्यामुळे तीच हे वागणं काही वेळा व्हायचं पण आज थोड वेगळं वाटत होतं.  गोळ्या चुकीच्या खाल्ल्या किंवा झोप झाली नाही काही कळत नव्हतं.  आदल्या रात्री मलाही झोप लागत नव्हती त्यामुळे मी 3 वाजता जेव्हा टॉयलेटला उठलो तेव्हा तीसुद्धा टॉयलेटसाठी उठली होती.  रात्रीपर्यंत सगळं नेहमीसारखच असताना सकाळी अचानक काय इश्यू झाला ते कळायला मार्ग नव्हता.  मी आमच्याइथल्या डॉक्टरकडे जाऊन त्याला घरी येऊन आईला बघण्याची विनंती केली.  पण त्याने हात जोडले..."आप हॉस्पिटल मे लेके जाओ".  कोविडमुळे परिस्थितीही इतकी विचित्र की त्याला दोष देऊन काही फायदा नव्हता.  


तिची रेग्युलर चेकअपची डॉक्टर कोविडमध्ये बीजी असल्यामुळे रिचेबल नव्हती आणि क्लिनिकवर अव्हेलेबल नव्हती.  तिला यायला उशीर होता....आम्हाला कळायला मार्गच उरला नाही...तशी ती टॉयलेटला जाण्यासाठी आम्हाला सांगायची...स्वतः उठून बसायची...मग तिला आम्ही तिघे धरून टॉयलेटला न्यायचो...पण तिची शुद्ध हळूहळू कमी होत चालली होती...काही खाल्ल नाही म्हणून तिच्या आवडीचं क्लिअर सूप मागवलं...आम्ही चमच्याने तिला ते द्यायचो त्यातलं काही ती प्यायली...कायम बडबड करणारी आई पण तिचे शब्द आज फुटत नव्हते.


आमचे मित्र मनोज राणे फार्मा इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे त्यांना कॉल केला आणि घरी अर्जंटली बोलावून घेतला.   त्यांचे डॉक्टर आणि हॉस्पिटल्समध्ये ओळखी असल्याने बरेच होप्स होते.  एम. बी. सी. मुळे बरीच जिवाभावाची माणसं जोडली गेली त्यातले ते एक.  ज्या परिस्थितीमध्ये माणसं एकमेकांना हात लावायला घाबरतात तिथे त्यांनी आवर्जून आईच्या जवळ जाऊन चौकशी केली.  त्यांनी त्यांच्या ओळखीतल्या डॉक्टरला घरी येऊन पाहण्यास विनंती करण्यासाठी फोन केला पण तेही कोव्हीड पॉजिटीव्ह असल्यामुळे येऊ शकणार नव्हते.  आम्ही ऍम्ब्युलन्स साठी प्रयत्न केला पण तीसुद्धा कोविडमुळे मिळायला मागत नव्हती.  एक ऍम्ब्युलन्स पेशंटला घेऊन हॉस्पिटलबाहेर वेटिंगमध्ये होती...हॉस्पिटलमध्ये बेड नसल्याने त्या पेशंटला ऍडमिट करून घेत नव्हते.  शेवटी तिला धरून नेण्याचा प्लॅन आम्ही चौघांनी केला पण ती चालत नसल्यामुळे ते शक्य नव्हतं...कशीबशी ती दरवाजापर्यंत आली आणि तिने अंग टाकलं.  तिच्या वजनामुळे तिला उचलून नेणं शक्य नव्हतं.  


नशिबाने ऍम्ब्युलन्सवाल्याचा फोन आला.  त्याला यायला तरीही अर्धा तास लागला.  आम्ही तोपर्यंत आईला दरवाजात पुस्तकाने वारा घालत बसलो होतो.  ऍम्ब्युलन्स आल्यावर स्ट्रेचरने आम्ही तिला गाडीतून तिच्या रेगुलर फिजिशियनकडे घेऊन गेलो.  त्यांनी तिला ऍम्ब्युलन्समध्येच तपासली.  थोडी ब्रेथलेस असल्याने आणि अंग गरम असल्याने  "कोव्हीडची लक्षण आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा" असं सांगण्यात आलं.  कोणत्याच हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध नव्हते.  यावेळीही मनोज सरांनी आपल्या ओळखीवर डी. वाय. पाटील मध्ये बेडची व्यवस्था केली.  आधी नॉन कोविड मध्ये ऍडमिट करून ट्रीटमेंट चालू व्हावी अशी आमची ईच्छा होती.  पण नॉन-कोविड वार्ड मध्ये ओळख असूनही घेण्यात आलं नाही.  आधी टेस्ट करून नंतर त्यावर ठरवण्यात येणार होतं.  आम्ही फिव्हर  ओ.पी.डी. जवळ आलो.  डॉक्टरने येऊन चेक करायलाही वेळ जात होता.  मी ऍम्ब्युलन्सच्या काचेतून सारखा तिच्याकडे पाहत होतो आणि ती धाप लागल्यासारखी एकटक माझ्याकडे बघत होती.  डॉक्टरने चेक केल्यावर सिटीस्कॅनच्या रिपोर्टबद्दल सुचवलं ज्यात कोविडबद्दल इनिशिअल माहिती कळाली असती.  पण टेस्टला न्यायालाही थोडा उशीर लागला.  ती बराच वेळ पाणी प्यायली नाही म्हणून माझ्या भावाने, अण्णाने आणि मी बाटलीच्या झाकणातून तिला पाणी पाजलं.  तेही बऱ्यापैकी बाहेरच येत होतं.  तिला हाक मारल्यावर ती इकडे तिकडे बघत होती पण तिला बोलता येत नव्हते.  एका पोजिशनमध्ये ती इतक्या वर्षात कधीच पाच मिनिटाच्यावर थांबली नव्हती पण आता जवळपास दीड दोन तास ती तशीच होती.  शून्यात बघितल्यासारखं माझ्याकडे बघत होती.  तिची ही अवस्था मला सतत पाहवत नव्हती.


तिला टेस्टला घेऊन गेले आणि मी त्या गेटवर पुढे तासभर उभा होतो.  त्या तासाभरात माझ्यासमोरून एका पारदर्शक ऍम्ब्युलन्स मध्ये प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत, गाडीत मधोमध असणाऱ्या बेडवर बांधून एकापाठोपाठ एक अशा तीन डेड बॉडीज घेऊन गेले.  माझी अस्वस्थता आता वाढायला लागली होती.  टेस्ट केल्यावर तिला प्री-कोव्हीड वार्ड मध्ये हलवण्यात आलं.  तेव्हा तिला स्ट्रेचरवर ठेऊन त्यावरच तिला ऑक्सिजन लावण्यात आला.  मी आणि दादा तिच्यासोबत होतो.  मनोज सरांची रिपोर्ट लवकर मिळण्यासाठी धावपळ चालू होती.  आत्ताही तीचे हात थरथरत वर उठत होते.  ते स्ट्रेचर खाली जाऊन दुखू नयेत म्हणून मी आणि दादाने ते एका बाजूला धरून ठेवले होते...एवढ्यातही तिच आमच्या दोघांकडे बघणं चालूच होतं.  "आता आलियस हॉस्पिटलमध्ये तर तुझी सगळी ट्रीटमेंट करून घेऊ", मी तिला बरं वाटावं म्हणून म्हटलं.  तिने फक्त माझ्याकडे पाहिलं.  तीच अंग अजून थरथरतच होतं.  


थोड्या वेळाने रिपोर्ट आला व त्यात फुफुसाला थोडाफार इन्फेक्शन आहे असं समजलं.  त्यामुळे कोविड सस्पेक्ट स्ट्रॉंग झालं.  तिला नंतर एका बेडवर हलवलं गेलं आणि आम्हाला बाहेर काढलं गेलं.  थोड्या वेळाने मनोज सरानी प्रायव्हेट सेक्शन मध्ये बेड अरेंज केलं आणि तिला तिथे हलवण्याच सुचवलं.  तिला जेव्हा त्या वार्डमधून प्रायव्हेट वॉर्डमध्ये नेत होते, तेव्हा त्या स्ट्रेचरबेडवरुन ती माझ्याकडेच पाहत होती.  "आता तेरा दिवस येण्याची गरज नाही.  खायची व्यवस्था इथे आहे.  त्याव्यतिरिक्त तुम्हाला काही द्यायचं असेल तर खाली सेक्युरिटीकडे द्या.  ते वर तिला आणून देतील", असं हॉस्पिटलमधून सुचवण्यात आलं.   ट्रीटमेंट चालू झाली आहे यामुळे थोडा रिलीफ आम्हाला वाटत होता.  पण कोविडमुळे भीती होती.  ती जरी व्यवस्थित झाली तरी कोव्हीडमुळे घाबरणार हे आम्हाला माहित होतं.  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वाआठ ला फोन आला आणि अर्जेंटली हॉस्पिटलमध्ये बोलावलं तेव्हाच आम्हाला संशय आला होता.  हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आई गेल्याच कळालं आणि तिला कोव्हीड नव्हता हेसुद्धा समजलं.  तिला खरतर कार्डियाक अरेस्ट आला होता पण कोव्हीडच्या गोंधळामुळे तिची ट्रीटमेंट उशिरा सुरु झाली.


कोव्हीड नसता तर आमच्या बिल्डिंगजवळचा डॉक्टर घरी आला असता, त्याने चेक करून निदान केलं असतं आणि हॉस्पिटलायजेशन सांगितलं असतं तरी ऍम्ब्युलन्स लगेच मिळाली असती आणि हॉस्पिटल मध्ये ऍडमिशन लवकर होऊन तिला कार्डियाक अरेस्टची ट्रीटमेंट लवकर मिळाली असती आणि ती वाचली असती.  आता या सगळ्या जरतरच्या गोष्टी झाल्या.  पण एक मात्र खरं की कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेत कोव्हीड नसतानासुद्धा माझी आई वाहून गेली. 


मृत्यू दिनांक : 15 एप्रिल 2021

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी