Skip to main content

रायगड

 


काही क्षण आयुष्यात खास असतात. त्या क्षणात आयुष्य पलटून देण्याची ताकद असते. माझ्या आयुष्यात तो क्षण जानेवारी २००९ मध्ये आला होता जेव्हा मी शाळेतल्या मित्रांसोबत पहिल्यांदा रायगडावर गेलो होतो आणि स्वतःची कंपनी चालू करण्याबाबत त्यांच्यासमोर विचार मांडला होता. जुलै २००९ मध्ये स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करणारी "स्वराज्य इन्फोटेक" आम्ही ५ मित्रांनी मिळून स्थापन केली होती. आज पुन्हा एकदा १२ वर्षांनी तोच क्षण जगण्याची आणि रायगड पुन्हा एकदा नव्याने अनुभवण्याची संधी मिळाली.


प्रोजेक्टच्या निमित्ताने दादाने रायगडावर जाऊ अशी कल्पना तीनेक दिवस आधी मला दिली. आम्हा दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला आवडतो त्यामुळे त्याला सहसा नाही म्हणणं मला जमत नाही आणि त्यात रायगड म्हटल्यावर नकाराची शक्यता नव्हतीच. सुनील दादा, समीर, मोहित ही सोबत होतेच. अख्खी रात्र गडावर काढायची या कल्पनेने आम्ही सगळेच हुरळून गेलो होतो. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जगदीश्वराच्या मंदिरात ध्यानसाधना करण्याचा भक्कम प्लॅनसुद्धा झाला होता. आम्ही दुपारी तीन-साडे तीन दरम्यान पोहचलो पण गडावर पोहचल्यापासूनच हिरमोड व्हायला सुरुवात झाली. कोव्हीडमुळे संध्याकाळी ५ नंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ पर्यंत गडावर जायला बंदी होती. पूर्वीसारखं गडावर रात्री राहताही येणार नव्हतं. आमचे सगळेच शेड्युल बिघडणार होते.





रोप-वेच्या बाजूलाच गडावर राहण्याची सोय होती. एका खोलीत दोघे-तिघे झोपतील अशी व्यवस्था होती. आम्ही २ रूम बुक केले. पण पुढे काय हा प्रश्न होताच. फ्रेश होऊन तिथल्या गार्डची थोडा जास्त वेळ गडावर थांबू देण्यासाठी परवानगी मागितली. गडावर दुसरं कुणीच नसल्याने लवकर परत येण्याच्या कबूलीवर त्यांनी आम्हाला जाऊ दिलं. आम्ही आनंदाने त्यांना धन्यवाद बोलून तिथून निघालो. गडावर राहणारी गावातली माणसं अधूनमधून भेटत होती. जेवणाची आणि नाश्त्याची विचारपूस सगळ्यांकडूनच होत होती. त्यांच्या उत्पन्नाचं हे एक साधन असावं. कोव्हीडमध्ये त्यांची काय अवस्था झाली असेल याचा अंदाज येत होताच. ही अधूनमधून भेटणारी माणसं सोडली तर कायम गजबजलेल्या या गडावर फक्त आम्हीच होतो.



राणीवसाच्या बाजूने चालत आम्ही दरबाराकडे आलो. बरीच पडझड झालेली असतानासुद्धा रायगडाची श्रीमंती अजूनही लपून राहत नाही. या सगळ्या वाटेवर महाराज आणि जिजाऊ येऊन गेले असतील किंवा काही जागांना त्यांचा स्पर्श झाला असेल या विचारानेच भारल्यासारखं होत होतं. इथेच महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला असेल याचं चित्र विचारांमध्ये उभं राहात होतं. आम्ही गडावर येईपर्यंत हलका हलका पाऊस येत होता. पण आता तो पूर्ण थांबला होता. मध्येच हलक्या धुक्यामध्ये गडावरचे पडझड झालेले वाडे झाकले जात होते. काहीवेळा ढग आमच्या आजूबाजूला फिरत आहेत अशीच फिलिंग येत होती. दरबारात महाराजांच्या सिंहासनाजवळ नतमस्तक होऊन थोडा वेळ थांबलो. "रोज ठाण्यावरून महाराजांच्या गळ्यातला हा हार न चुकता येतो", तिथे ड्युटीवर असणाऱ्या सेक्युरिटी गार्डने आम्हाला माहिती दिली. महाराजांच्या गळ्यातला तो मोठा फुलांचा हार बघून मला या गोष्टीच प्रचंड कौतुक वाटलं आणि त्यासोबतच जे कुणी हे करत असेल त्याला या गोष्टीचा किती अभिमान वाटत असेल याची कल्पना आली. राजदरबाराच्या बाहेर नगारखान्याच्या दरवाजावर उभं राहिल्यावर जगदीश्वराचे मंदिर समोरच्या टेकडीवर दिसत होतं. सकाळी लवकर मेडिटेशनसाठी मंदिरात जाता येणार नाही यांचं दुःख होतं. तिथून चालत जाऊन बाजारपेठ पालथी घातली. गायी म्हशी पुन्हा त्यांच्या गोठ्याकडे निघाल्या होत्या. दोन्ही बाजूला बाजारपेठेची तुटलेली काळ्या दगडांची दुकाने आणि मधून धुक्यात चालत येणारी ती जनावरं हे दृश्य मनाला विसावा देणारं होतं. कोणत्याच ठिकाणावरून पाय निघत नव्हता. जिथे जाऊ तिकडे शांत आणि प्रसन्न वाटत होतं. पण काळोख व्हायला लागला होता. गारठाही प्रचंड जाणवत होता. सकाळी पाऊस पडायला लागला तर काहीच करता येणार नाही अशी चर्चा होत असतानाच 'महाराजांनीच इकडे आणलं आहे तर तेच मार्ग दाखवतील', या विश्वासाने आम्ही पुन्हा रूमकडे आलो.


सकाळी सात वाजता जेव्हा आम्ही पुन्हा एकदा गडाकडे निघालो तेव्हा आम्ही ढगांच्याही खूप वर आहोत असं दृश्य आम्हाला दिसलं. रायगडाच्या आजूबाजूला दाट ढगांमध्ये कुठे कुठे सह्याद्रीच्या डोंगरांची टोकं वर दिसत होती. एकदम कुणीतरी कापूस पिंजून ठेवावा असंच ते दृश्य. यापूर्वी फ्लाईटमध्ये बसलो तेव्हा असं पाहिलं होतं पण हे दृश्य अगदीच वेगळं होतं. रायगड किती उंच आहे याची प्रचिती आजूबाजूच्या पर्वतांना पाहिल्यावर सहज येत होती. रायगडासोबतच तेसुद्धा संपूर्ण इतिहासाचे साक्षीदार. डोळ्यात जितकं साठवता येईल तितकं साठवून आम्ही जगदीश्वराच्या मंदिराकडे निघालो. बरीच नवीन लोकं गडावर आली होती. ती तिथे पोहचण्याआधी आम्हाला मंदिरात मेडिटेशन पुर्ण करण्याची ईच्छा होती. मंदिरात कुणीही नव्हतं. काही पक्ष्यांचे अधूनमधून आवाज सोडले तर प्रचंड शांतता होती. मंदिराच्या गाभाऱ्यात सगळीकडे पाणी पसरलं होतं. तिथे बसणं मुश्किल असल्याने महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून आम्ही समोरच असणाऱ्या महाराजांच्या समाधीकडे आलो. तिथल्या संपूर्ण वातावरणात प्रचंड पोजिटिव्ह व्हायब्रेशन्स जाणवत होते. महाराजांच्या समाधीला नतमस्तक होऊन आम्ही तिथेच बैठक घेतली आणि मेडिटेशनला सुरुवात केली. एरवी बऱ्याच वेळाने लागणारी धुंदी त्या वातावरणात काही क्षणातच लागली. पुढचा कितीतरी वेळ त्या वातावरणाचा आनंद आम्ही ध्यानसाधनेतून घेतला. महाराजांच्या सानिध्यात असल्याची भावना सकारात्मक ऊर्जा देणारी होती.


रायगड फिरताना निसर्गाची किमया, अगदी चित्रात रंगवल्यासारखे वाटणारे आणि कुणीतरी चिनी हातोडी घेऊन कोरल्यासारखे आर्टिफिशिअल वाटणारे पर्वत, टकमक टोकावरून ती इवलीशी दिसणारी घरं-झाडं-नद्या, रायगडासमोर माना झुकवून उभे असल्याप्रमाणे दिसणारे छोटाले डोंगर, मधूनच धुक्याच्या ढगांमध्ये हरवून जाणारी संपूर्ण जमीन या सगळ्यांसमोर आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव होत होती. १२व्या शतकात विजयनगर साम्राज्यात असणारा रायगड, निजामशाहीत जाऊन १६४८ साली स्वराज्यात आला. हिरोजी इंदुलकरांनी त्या किल्ल्याचा केलेला कायापालट व त्याची संपन्नता त्या वास्तूमध्ये आजही जाणवते. १८१८ मध्ये इंग्रजांनी गडाचा ताबा मिळवून रायगड उध्वस्त केला आणि प्रचंड तोडफोड केली. १७ दिवस रायगड जळत होता. 'शरीर मरतं, पण विचार नाहीत' असंच काहीसं रायगडाचं झालं. रायगडची भव्यता आजही तीच आहे. रायगड आपल्या महाराजांचा इतिहास आपल्यासमोर जिवंत करतो. मावळ्यांची एकनिष्ठता, तेव्हाची लोकं आजही आपल्या नजरेसमोर उभी राहतात. महाराजांनी ३४ वर्षात उभारलेल्या अशक्यप्राय स्वराज्याची ग्वाही आजही रायगड आपल्याला तितक्याच तन्मयतेने देतो.
भरल्या डोळ्यांनी आणि निढळ निश्चयाने नव्याने काहीतरी करण्याचा निर्णय घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

- सुबोध अनंत मेस्त्री

छायाचित्रे : Sameer Padwal Vinod Mestry

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...