Skip to main content

श्यामची "आई"



 

आईच्या घटनेनंतर काही दिवस पुस्तक वाचता आलं नाही आणि जेव्हा पुस्तक वाचण्याचा विचार केला तेव्हा नेमक्या "श्यामची आई" याच पुस्तकावर कपाटात पहिल्यांदा लक्ष गेलं. पुस्तक चांगलं आहे याबाबतीत शंका नव्हती पण इतकी वर्ष कपाटात असून पुस्तकांच्या गर्दीत नजरेत आलं नाही. जी गोष्ट सतत विचारात तीच नजरेसमोर पटकन येते असंच काहीस झालं. आईच्या आठवणीत असतानाच हे पुस्तक समोर आलं आणि पूर्ण वाचून काढलं. 

सानेगुरुजींचे बाबा गावात खोत होते त्यामुळे घरात प्रचंड श्रीमंती. भावाभावांमधल्या प्रॉपर्टीमधल्या वादातून त्यांना घर सोडावं लागलं आणि बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना सानेगुरुजींच्या आई बाबांना करावा लागला. आयुष्यातली काही वर्ष वैभवात घालवून पुन्हा अगदी शून्यावर येणं म्हणजे कसोटीच होती. अपमानाच्या कित्येक प्रसंगातून पूर्ण कुटुंबाला जावं लागलं. पोटची दोन मुले त्यांना आयुष्याच्या प्रवासात गमवावी लागली. कित्येक अडचणी समोर आल्या पण त्यांनी आपली तत्वे सोडली नाहीत. मुलांवर संस्कार करताना त्यांनी कोणतीच तडजोड केली नाही. 

पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी स्वतःच्या आयुष्यातल्या घटना शोधत होतो आणि मला तशा त्या सापडतही गेल्या. अगदीच बिकट परिस्थिती अनुभवली नसली तरी बेताबेताच्या आर्थिक परिस्थितीत जेवणाची आबाळ झाली नाही. आईने सगळी परिस्थिती सांभाळून गरजेला स्वतःच मंगळसूत्र गहाण ठेवून आमचं शिक्षण पूर्ण केलं. मुंबईसारख्या ठिकाणीसुद्धा आम्ही खूप लहान असताना पाणी २-४ किलोमीटरच्या अंतरावर जाऊन आणावं लागायचं. घरात बाबा आणि सगळे काका मिळून फक्त पुरुषच त्यामुळे सगळ्या कामाची जबाबदारी तिच्यावर होती आणि त्यावेळी तिने ती निभावून नेली. अशातच आम्हा तिघा भावंडाचा जन्म आणि त्यातून तिचे झालेले २-३ ऑपरेशन्स...कामामुळे तिला आराम मिळाला नाही आणि ती खचत गेली. शारीरिक व मानसिक त्रासाची सुरुवात झाली. 

या सगळ्यातून मार्ग काढत तिने संसाराचा गाडा सुरळीत चालवला. बऱ्याच वाईट मुलांच्या संगतीत राहूनसुद्धा आम्ही बिघडलो नाही ते तिचेच यश. चांगल्या वाईटाची जाणीव तिने आम्हाला वेळोवेळी करून दिली. प्रसंगी कठोर होऊन मार दिला कधी प्रेमाने जवळ घेऊन समजवलं. पैशाचे लाड सुरुवातीपासूनच होऊ दिले नाहीत. माझे मित्र ट्युशनला जायचे म्हणून मी बऱ्याच वेळेला हट्ट करायचो पण तिने मला ट्युशन्स जॉईन करू दिले नाहीत. स्वतः अभ्यास करावा यावरच तिचा भर. मी हल्ली तिच्याकडे तो विषय काढला तर "तेव्हा कुठे रे तेवढे आपल्याकडे पैसे? तुमच्या तिघांचा वर्षभराचा खर्च जेमतेम निघायचा", असं तिने सांगितलं. मी शेंडेफळ असल्याने तिचा पदर कधी सोडलाच नाही. त्यात दादा, अण्णा दोघांची टीम असायची आणि मी वयाने लहान असल्याने एकटा पडायचो त्यामुळे आईचा सहवास मला खूप जास्त लाभला. चोरी-लबाडी करू नका, मिळेल ते जपून वापरा एकदाच संपवू नका किंवा आपल्या गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर करा, मुक्या प्राण्यांवर प्रेम करा, मनाला धुळ लागू देऊ नका असे श्यामच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार, आई आमच्यावर करत राहिली. आमच्या घरी कायम एका माणसाचं जेवण जास्तच बनलेलं असायचं त्यामुळे कुणी अचानक जरी आलं तरी तो उपाशी जात नसे. कुठेही भेटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी हसून गोड बोलून चौकशी करणं त्यांची ओळख काढणं हा तिचा खास स्वभाव आतापर्यंत होता. तशी तिने बरीच माणसं जोडली. ती सगळ्यांची "मेस्त्रीन ताई" होती. 

आता आपल्या घरी कुणी वेळी अवेळी आलं तर आपला शेड्युल बिघडतो. शेजारीही एक दुसऱ्याकडे जायला कचरतात कारण फ्लॅट संस्कृतीमध्ये घराचे दरवाजे कायम बंद. चाळीत त्यावेळी सकाळी दरवाजा उघडला की रात्री झोपताना बंद व्हायचा. मग ज्याला जेव्हा वाटेल कोणत्याही घरी घुसावं. आई गेल्यानंतर आमच्या चाळीत राहणारा बंड्या दादा सांत्वनासाठी आम्हाला भेटायला आला होता. "आम्ही त्यावेळी केव्हाही घरी येऊन तुमच्या माळ्यावर झोपायचो. स्वतः घरात प्लेटमध्ये घेऊन हाताने खायचो. वहीनी आम्हाला कधीच काही बोलली नाही. तिने आम्हालाही मुलांसारखंच जपलं", बंड्या दादाला वाटलेला आमच्या घरातला हा आपलेपणा सगळ्यांनाच तिच्यामुळे वाटायचा. माझे मित्रही घरी आले तर काही ना काही खाऊनच जायचे. चाळीत फिरणाऱ्या मांजरीही जेवणाच्या वेळेला बरोबर समोर येऊन बसायच्या. कारण त्यांना ईथे आवर्जून खायला मिळायचंच. काही उरलेलं नसेल तर स्वतःच्या ताटातली अर्धी चपाती आई द्यायची.

बिनधास्तपणा तिने आमच्यात लहानपणीच जबाबदारीने भिनवला होता. त्यामुळे आम्ही दिवसभर कुठेही फिरलो तरी जेवणाच्या वेळेत घरीच असायचो. अति काळजी मुलांच्या पायात बेड्या घालते हे तिला पूर्वीच समजलं होतं. बाहेर काहीही करा पण प्रकरण घरापर्यंत नाही आलं पाहिजे ही समज अप्रत्यक्षपणे आम्हाला असल्याने मोठे मोठे प्रॉब्लेम्स स्वताने सोडवण्याची ताकद लहानपणीच मिळाली. कणखर आणि स्पष्ट आवाज ही पण तिचीच देणगी. 

प्रतिभाच्या आईला जाऊन ६ वर्ष झाली. तिनेही हे पुस्तक वाचलं होतं आणि तिला प्रत्येक गोष्टीत रडू आवरत नव्हतं. पुस्तकातली शेवटची गोष्ट ज्यामध्ये श्यामची आई हे जग सोडून जाते, ती वाचताना प्रतिभाने मला पाहिलं आणि विचारलं, "तुला रडू कसं येत नाही रे? की फक्त माझ्यासमोर स्ट्रॉंग आहे असं दाखवतोस?". मी आता एक्सेप्ट केलं आहे असं तिला सांगितलं आणि पुन्हा पुस्तक वाचायला लागलो. खरं तर पुढच्या काही महिन्यात माझी आई बेडरिडन होण्याच्या मार्गावर आहे हे मला व्यवस्थित कळालं होतं. तिचा टापटीपणा अजूनही टिकून होता. स्वतः अंथरुणाला खिळल्यावर तिची अवस्था आम्हा कुणालाच बघवली नसती. त्यात ती स्वतःच सगळं करत असताना, थोडीफार चालती फिरती असताना तिने जगाचा निरोप घेतला हे तिच्या दृष्टीने योग्य झालं. तिला कुणावर अवलंबुन राहणं पूर्वीपासूनच आवडत नव्हतं. कधी ना कधी प्रत्येकालाच या जगाचा निरोप घ्यायचा आहे पण मरण असं यावं की ते कळू नये. आईच अगदी तसंच झालं. तिची ती जन्मभराची पुण्याई! आपली माणसं आपल्याला कायम हवीच असतात पण त्यांना होणारा त्रास हा फक्त त्यांनाच माहित असतो. त्यांच्या आठवणी कायम आपल्या मनात घर करून असतातच. असाही मी आईचाच अंश आहे. ती माझ्यातच आहे...कायम! 

 - सुबोध अनंत मेस्त्री

Comments

  1. Awesome , todays generation are missing "Shamchi Aai " becouse every have online mom.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...