Skip to main content

पानिपत

 




"पानिपत"

"तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" या वाक्यावर "विश्वास पानिपतच्या लढाईतच मेला" हे वाक्य कित्येक वर्षे कानावर पडलेलं.  हे ऐकायला बोलायला जितकं सहज तितका सहज पानिपतचा संघर्ष किंवा विश्वासरावांच बलिदान नक्कीच नव्हतं.  

कित्येक वर्षे राहून गेलेलं पानिपतच पुस्तक गेल्या काही दिवसांत वाचून काढलं.  परकीय आक्रमणे हा विषय इतिहासात नवा नाही.  एखादी व्यक्ती स्वतःच्या स्वार्थावर उठली की ती किती नुकसान घडवून आणू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पानिपत.

एक सामान्य प्यादा म्हणून मोगलांकडे काम करणारा नजीब स्वतःच्या कुटनीतीने जवळपास दिल्ली हस्तगत करून बसला.  त्याला मराठे डोईजड व्हायला लागले तेव्हा कंदाहारच्या अब्दाली बादशहाला इस्लामला होणारा धोका पटवून देऊन मोठ्या सैन्यानिशी त्याने हिंदुस्तानात पाचारण केले.   नजीबला संपवण्याची संधी बऱ्याच वेळेला याआधी आली होती.  मराठ्यांचे प्रमुख सरदार मल्हारराव होळकर यांनी या नजीबलाच मानसपुत्र बनवून ठेवला होता.  जेव्हा रघुनाथराव पेशवे त्यांना मारण्यासाठी गेले तेव्हा मल्हारराव आपल्या मराठ्यांना आडवे आले आणि तो प्रयत्न फसला.  एकदा जनकोजीने नजीबाचा काटा काढण्याचा विषय काढल्यावर "नजीबमुळेच मराठा सरदारांना माज नाही.  नजीब संपला की हे पेशवे शिंदे-होळकरांना धोतर बडवायला सुद्धा ठेवणार नाहीत", असा विचार मल्हाररावांनी बोलून दाखवला. त्या एका घटनेमुळे पुढे पानिपत घडलं.

जेव्हा दत्ताजी शिंदेला नजीबने संपवला तेव्हा मराठयांनी उत्तरेतून नजीबाचा काटा पूर्णपणे काढण्याचे ठरवले.  पहिल्या बाजीरावांचे पुत्र नानासाहेब पेशवे तेव्हा गादीवर होते.  त्यांनी उत्तरेच्या या कठीण मोहिमेसाठी भाऊ (सदाशिवराव) पेशव्यांची निवड केली.  त्यातही मराठ्यांचे प्रचंड मतभेद होते.  भाऊंना एकटं पाठवलं आणि त्यांनी मोहीम फत्ते केली तर पेशव्यांची गादी त्यांच्याकडे जाईल या भीतीने नानासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई यांनी त्यांचे जेष्ठ पुत्र विश्वासराव यांना या मोहिमेत सामील करण्यासाठी दबाव आणला व संपूर्ण मोहीम जरी भाऊसाहेब सांभाळत असतील तरी ती विश्वासरावांच्या नावे असावी असा अट्टाहास धरला.  मनसदीची मनोभावे सेवा करणाऱ्या भाऊंनी सगळं मान्य केलं.

गोष्टी इथवरच थांबल्या नाहीत.  उत्तरेकडे जात असल्यामुळे देवदर्शन करत निघायचं म्हणून जवळभर लाखभर माणसे आणि सरदारांची कुटुंबे या मोहिमेत सामील होणार यासाठी नानासाहेबांवर दबाव आणला गेला ज्यावर भाऊंचा प्रखर आक्षेप होता.  त्याला कारणही तसंच होतं.  त्यावेळी मराठा साम्राज्य प्रचंड कर्जाखाली होतं.  भाऊ स्वतः इतकी वर्षे पेशवाईचा व्यवहार स्वतः बघत असल्याने मोहिमेच्या खर्चाचा अंदाज त्यांना होता.  ही मोहीम लवकरात लवकर संपवून लवकर मागे यावं असा त्यांचा कल होता.  एवढी बिनलढाऊ माणसे सोबत घेऊन जायची म्हणजे वेळ जास्त लागणार  आणि त्यात त्यांच्या खाण्यापिण्यावर जास्त खर्च होणार.  त्यांच्या संरक्षणाचा ताप वेगळा.  त्यांनी सगळ्या प्रकारे विरोध करून पाहिला पण त्यांना शेवटी माघार घ्यावी लागली.  निघताना त्यांना मोहिमेचा खर्चही पुरेसा मिळाला नाही.

प्रत्येक ठिकाणी पैशाच्या कमतरतेमुळे भाऊसाहेबांना बराच त्रास सहन करावा लागला.  त्यांच्या ठरल्या योजनेप्रमाणे गोष्टी घडत नव्हत्या.  दऱ्याखोऱ्यातून प्रवास करताना तोफ ओढणाऱ्या एका बैलाचा पाय घसरला तर एका वेळी तोफेसकट पन्नापन्नास बैल दरीत कोसळत होते.  एवढ्या लोकांना सांभाळून घेऊन जाण्याचा त्रास वेगळाच.  प्रवास आधीच संथ चालु होता आणि त्यात एखाद्या तिर्थस्थानाच्या आसपास आल्यावर सगळी मंडळी देवदर्शनच्या अट्टहासास पेटायची.  अब्दाली दक्षिणेत उतरण्याआधी नजीबला संपवून सगळी व्यवस्था लावायची आणि परतीला असताना आपण सगळी देवदर्शन आटपू इतकीच भाऊंची भावना होती.  "तीर्थस्थान चुकवून गेलात, धर्म बुडवलात तर राज्य बुडेल.  पानीपतामध्ये आपली मोठी हार होईल", असे भावनिक अत्याचार भाऊसाहेबांवर जोशीशास्त्री बुवा मंडळींकडून व्हायला लागली आणि पुन्हा भाऊंना स्वतःला आवरतं घ्यावं लागलं.  मराठ्यांची लढाई ही पानीपतावरची तिसरी लढाई होती.  या आधी दोन वेळा हिंदुस्थानी राजे या मैदानावर परकीय शत्रूसोबत हरले होते.  इथे हिंदुस्थानातली लोकं जिंकत नाही अशी वावडी सुद्धा याच यात्रेकरूंनी लष्करात उठवली होती.

दिल्लीवर राज्य प्रस्थापित केले तर अब्दालीवर दबाव येईल म्हणून भाऊंनी दिल्ली आधी ताब्यात घेतली.  पण दिल्लीची परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती.   मोठी लढाई होणार व त्यात लुटालूटसुद्धा होऊ शकते म्हणून दिल्लीतले लोक आधीच घर सोडून लांब निघून गेले होते.  दिल्लीमध्ये आल्यावर काही दिवसांनी पैशाचा अन्नधान्याचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला.   दक्षिणेत जेव्हा पैशाची मागणी करण्यासाठी निरोप धाडले तेव्हा "दिल्लीसारख्या सुखवस्तू ठिकाणी असताना पैशाची काय गरज?" असा अविश्वास भाऊंवर दाखवला गेला. त्यावरही वेगवेगळ्या उपाययोजना करून भाऊसाहेबांनी परिस्थिती सांभाळून नेली.  भाऊंनी त्यानंतर कुंजपुराचा किल्ला काबीज करून बरीच लूट आणली.  लष्कराच्या दाण्यापाण्याची सोय केली.  अब्दालीच्या आधी पानिपतचा किल्ला मारून खूप चांगली व्यवस्था त्यांनी लढाईच्या आधी लावली होती.  सगळ्या गोष्टी प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा मराठी लष्करासाठी उजव्या झाल्या होत्या.  लष्करसाठी कालव्यातलं आणि विहिरींमधल पाणी आणि अधूनमधून मिळणारी रसद या जोरावर अब्दालीच्या सैन्याला मराठ्यांनी जेरीस आणलं.

पण शेवटी चक्र फिरली.  अब्दालीने आणि नजीबाने हळूहळू गोलाकार वेढा मराठा सैन्याला घातला.  येणारी रसद बंद केली.  कालवा फोडला त्यामुळे मराठ्यांना फक्त विहिरींच्या पाण्याचा आधार राहिला.  त्यात एवढ्या लोकांसाठी पाणी पुरवताना विहिरीसुद्धा आटू लागल्या.  जनावरांना आणि सैन्याला घासदाना पुरेंनासा झाला.  जनावरे आणि माणसे उपाशी पोटी जीव सोडू लागली.  माणसे झाडांची पाने ओरबाडून खाऊ लागली.  जी खाण्याच्या शोधात बाहेर फिरत होती त्यांना अब्दालीची माणसे मारू लागली.  मेलेल्या प्राण्यांची आणि माणसांची योग्य ती व्यवस्था लावण्याचीही परिस्थितीही उरली नाही.  परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जास्त वेळ न दवडता अब्दालीच्या सैन्याची भिंत फोडून पुन्हा एकदा दिल्ली गाठायची असं मसलतीमध्ये ठरलं.  

इब्राहिम गारदी हा गारद्यांचा प्रमुख आपल्या आठ हजारांच्या सैन्यासोबत भाऊंच्या मदतीला होता.  आतापर्यंतच्या प्रवासात इब्राहिमच्या तोफांनी कमाल केली होती.  त्यामुळे भाऊसाहेबांची विशेष मर्जी इब्राहिमवर होती आणि तो तितकाच एकनिष्ठ होता.  पण मराठा सरदारांना ही बांधिलकी पटत नव्हती.  आपल्याला डावलून परक्याला जवळ केलं जातंय अशी त्यांची धारणा होती.  अब्दालीच्या सैन्यावर एक विशेष गोलाकार रचना करून मधोमध सगळे यात्रेकरू व कुटुंब घेऊन चालून जायचं असा मनसुबा इब्राहिमने मांडला.  यात बिनलढावू लोकांचं संरक्षण आणि त्यासोबतच इब्राहिमच्या तोफांनी गनिमांची भिंत फोडून काढण्याची योजना होती.  होळकर-विंचूरकर सरदार आपण गनिमी कावाच वापरायचा यावर अडून बसले.  इब्राहिमला वरचढ होऊ देऊ नये हीच या मागची धारणा.  गनिमी कावा उघड्या मैदानावर वापरणे गैर ठरेल हे भाऊसाहेबांना ठाऊक असल्याने त्यांनी इब्राहिमला दुजोरा दिला.  यावर लढाई अर्धवट सोडून जाण्यापर्यंत मराठा सरदारांनी वार्ता केल्या.  पुन्हा भाऊंना त्यांची मनधरणी करावी लागली.

१४ जानेवारी १७६१.  मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकरच तळ सोडून सैन्याने चाल करायला सुरुवात केली.  चार दिवस उपाशी पोटी  असूनसुद्धा मराठे प्राणपणाने लढले. पहिल्या प्रहरामध्ये खूप चांगला विजय त्यानी संपादन केला.  इब्राहिमच्या तोफांनी पुन्हा एकदा कमाल केली पण ते विंचूरकर आणि गायकवाडाना सहन झालं नाही.  गोलाकार रचना तोडून नको म्हणत असताना ते पुढे येऊन अब्दालीच्या लष्करावर तुटून पडले.  त्यामुळे ठरलेली योजना मोडकळीस येऊ लागली.  इब्राहिम ने तोपर्यंत अब्दालीच्या लष्करात खिंडार पाडून ठेवलं होतं.  भाऊसाहेबांना निघायला पूर्ण संधी होती पण आपल्या यात्रेकरू आणि कुटुंबाना सोडून निघणं त्यांच्या जीवावर आलं.  त्यांनी संघर्ष चालूच ठेवला.  सुरुवातीपासून विश्वासराव आणि जनकोजी यांचा भाऊंना संपूर्ण पाठिंबा होता.  जेव्हा रणांगणावरची परिस्थिती फिरायला लागली तेव्हा एकत्र लढण्याच्या आणाभाका घेतलेले सगळे सरदार मैदान सोडून पळून जाऊ लागले.  यामध्ये होळकर विंचूरकर सुद्धा होते.  

लढता लढता विश्वासराव आणि भाऊंना वीरमरण आले.  इब्राहिम आणि जनकोजी जायबंदी झाले.  बरेचसे मराठा सरदार दुपारच्या आधीच रण सोडून पळून गेले होते.  पानिपतच्या लढाईआधी विंचूरकरांनी एक लढाई जिंकून काही अफगाणी सैनिक आश्रयाला ठेवले होते.  त्यांनासुद्धा नकार असताना "लढाईवेळी उपयोगी येतील" म्हणून विंचूरकरांनी त्यांना ठेऊन घेतलं.  ऐन लढाईत पलट खाऊन त्या अफगाण सैनिकांनी यात्रेकरू आणि कुटुंबाना लुटायला सुरुवात केली.  त्यामुळे सैन्यात पुन्हा एकदा हुल्लड माजली.  गनिमानी सरळ सरळ कत्तली करायला सुरुवात केली.  स्त्रियांची अब्रू लुटली गेली.  म्हातारे लहान मुले मारली जाऊ लागली.  पुढचे दोन दिवस गनिमांनी पाठलाग करून पाळणाऱ्या लोकांना सैनिकांना पकडले आणि कापून काढले.  मराठे हरले ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि वाटेत गावागावांमध्येसुद्धा दक्षिणेत जाणाऱ्या मराठ्यांना लुटले जाऊ लागले.  पन्नास हजाराची फौज घेऊन नानासाहेब दसऱ्यालाच शनिवारवाड्यातून उत्तरेकडे निघाले होते.  गोपिकाबाईना कंटाळलेले ते दुसऱ्या लग्नाची स्वप्ने पाहत होते.  उत्तरेकडे सरकताना मुलगी बघत आणि जमल्यास लग्न करून निघावं अशी त्यांची ईच्छा होती.  शेवटी चाळीशीत असणाऱ्या नानासाहेबांनी नऊ वर्षाच्या मुलीशी लग्न केले.  त्यांनी लष्कराचं वऱ्हाड केलं.  जेव्हा त्यांचा स्वतःचा मुलगा आणि भाऊ उपासमारीशी लढत होते तेव्हा इकडे लग्नाच्या पंगती उठत होत्या.  मधल्या काळात भाऊसाहेबांचे खलिते गनीम मध्येच मारत असल्यामुळे ते नानासाहेबांपर्यंत पोहचले नाहीत.  जर ते वेळेतच पानिपतावर पोहचले असते तर कदाचित परिस्थिती वेगळी झाली असती.  मराठा साम्राज्याची सगळ्यात मोठा पराभव पानिपतावर घडला.

बऱ्याच गोष्टी शेवटी जरतर वर येऊन थांबतात.  पानिपत किंवा इतिहास वाचताना प्रकर्षाने एकच गोष्ट जाणवते की बऱ्याचदा आपल्या  राज्यकर्त्यांना स्वतःच्या व्यक्तींशी लढावं लागलं.   अंतर्गत लढाईतून वेळ काढून त्यांना गनिमांशी दोन हात करावे लागत होते.  ही परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांची, संभाजी महाराजांची, माधवराव पेशव्यांची आणि तीच शेवटी भाऊसाहेबांची.  महाभारत आणि रामायणात काय वेगळं झालं? इतिहासात आपल्या लोकांना वेळीच स्वतःच्या लोकांची सोबत विनाशर्त लाभली असती तर आपला इतिहास नक्कीच वेगळा असता.

- सुबोध अनंत मेस्त्री

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...