Skip to main content

लॉस्ट कनेक्शन्स


"हॅलो, कशा आहात बाई?", नुकत्याच आलेल्या चौधरी बाईंच्या मिसकॉलवर मी रिटर्न कॉल केला होता.  बाई म्हणजे माझ्या सातवीच्या वर्गशिक्षिका.  माझ्या सगळ्यात आवडत्या.  एकदमच.  आमच्या वेळी टीचर आणि मॅडमच फॅड आमच्या शाळेत नव्हतं आणि अजूनही सगळ्या शाळेतल्या शिक्षिकांना आम्ही बाई म्हणूनच बोलवतो.  कॉलेजपासून मॅडम सुरू झालं.  पण बाई शब्दातला आपलेपणा मॅडम मध्ये नाही.  बाई बोलताना कायम "आई" बोलतोय असं वाटायचं.

"मी, बरी आहे बेटा! तू आहेस कुठे? मी किती वेळा फोन केला.  तू माझा फोन उचलत नाहीस.  अगोदर अधून मधून फोन करत होतास.  मी प्रविणला (आमचे मेस्त्री सर) फोन केला होता.  त्याला पण सांगितलं, माझा सुबोध मला असा कसा विसरला?  मी फोन करून कंटाळले बाबा.  आता त्या भगवंतांचीच इच्छा असेल म्हणून फोन लागला बघ इतक्या दिवसांनी.",  राग प्रेम सगळं त्यांनी एकदाच व्यक्त केलं.

बाईंचा फोन आला हे मला आठवत नव्हतं पण हेसुद्धा खरं होतं की मी त्यांना समोरून गेल्या वर्षभरात फोन केला नव्हता.  पूर्वी अधूनमधून त्यांना माझा सतत फोन असायचा.  आई गेली त्या काळात बरेच फोन माझ्याकडून मिस झाले असतील.  त्यात बाईंचाही असू शकेल. बाईंना तेच कारण सांगून त्यांची समजूत घातली.  माझ्या सांत्वनासाठीच त्यांनी मला फोन केला होता.  आईची बातमी ऐकून त्यांना वाईट वाटलं होतं.  "अगोदर बिचारीने मेहनत केली आणि आता पोराबाळांकडून खायचे आणि आराम करायचे दिवस आले आणि परमेश्वराने नेलं बघ तिला", बाई माझी समजूत काढत होत्या.  त्याकाळी बाई आमच्या चाळीतल्या घरी येऊन गेल्या होत्या.  त्यावेळी त्यांना आई भेटली होती.  अधूनमधून अशीही भेट व्हायचीच.  बाईंची तब्येत हल्ली ठीक नसते.  मागे फोन करायच्या तेव्हाही त्यांनी मला ते सांगितलं होतच.  मी भेटायला येईन असं त्यांना कबुलही केलं होतं.  पण सततच्या कामांनी आणि नंतरच्या सततच्या लॉकडाऊनमूळे गोष्टी जुळून येत नव्हत्या.  आणि शेवटी राहायचं ते राहूनच गेलं.   मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो होतो त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात.  त्याला ३-४ वर्ष उलटून गेली असतील.  त्यानंतर फक्त फोनवरच बोलणं व्हायचं.

"खूप मोठा हो.  अजून बरंच काही तुला करायचं आहे.  यश तुझ्या वाटेत नक्की आहे बाळा.  तुझी मेहनत कमी पडू देऊ नको.  माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहतील.  सुनेची आणि नातवाची काळजी घे.  त्यांना पण खूप आशीर्वाद.  या दिवसात भेटणं शक्य होत नाही पण फोन करत राहा बेटा.  तुझ्याशी इतक्या दिवसांनी बोलून बरं वाटलं बघ.",  सतत शुभेच्छांचा वर्षाव होत राहिला.

"काळजी घ्या बाई.  मी येईन भेटायला नक्की", काही संभाषणामध्ये आपण निशब्द होऊन जातो.  माझं तसं काहीसं झालं.  फोन कट झाला.  "तुम्हाला कसा विसरेन बाई?  सातवीत घरची परिस्थिती बेताची आणि क्लास लावू शकत नाही म्हणून मी नऊमाई परीक्षा मी नापास झालो होतो तेव्हा तुम्ही हात देऊन मला अगदी मोफत सगळं शिकवून वार्षिक साठी तयार केलं होतं.  त्या वर्षी मी वर्गात सातवा आलो.  गणिताची एवढी भीती होती की मी आठवी गाठेन असं वाटत नव्हतं.  आठवीला इंग्रजी कठीण म्हणून तुम्ही माझ्या वाढदिवसाला दिलेलं इंग्रजी विषयाचं गाईड मला कामी आलं.  तुम्ही त्यावेळी माझ्या आयुष्यात केलेलं योगदान तुमच्यासाठी लहान असेल पण माझ्यासाठी प्रचंड मोठं होतं", फोन ठेवल्यावर मी स्वतःशीच विचार करायला लागलो.  नंतर बाईंशी संपर्क काही ना काही निमित्ताने होत राहिला पण गेल्या वर्ष दीड वर्षात माझ्याकडून काहीच संपर्क झाला नाही.

"कधी कधी आपण आपल्यात आणि आपल्या प्रॉब्लेम्स मध्ये एवढे हरवून जातो की आजूबाजूच्या आपल्या जगाचा आणि आपल्या माणसांचा कॉन्टॅक्ट कमी होत जातो.  सुरुवातीपासून आपल्या आयुष्यात असे कित्येक जण येऊन गेले असतील ज्यांनी आपल्या आयुष्याला स्पर्श केला, आपल्यासोबत चांगले मोमेंट्स शेअर केले, आपल्या बाबतीत कायम चांगला विचार केला.  पण हळूहळू काही ना काही निमित्ताने आपला संपर्क कमी होत गेला.  आपल्या कळत नकळत आपण त्यांच्यापासून लांब गेलो.  एक फोन करायला आणि विचारपूस करायला कितीसा वेळ लागतो?  काहींना फक्त आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे हे आपल्याकडूनच कळावं अशी माफक अपेक्षा असते.", बाजूला बसलेल्या अजाला फोन ठेवल्याठेवल्या मी असं बरंच काही सांगायला लागलो आणि पुढच्याच क्षणी पुन्हा एकदा माझ्या कामात गढून गेलो.

"रिकामी घरं नेहमीच तुम्हाला हरवलेली नाती दाखवतात.  प्रेमाच्या अभावाची जाणीव करून देतात.  सत्य तर हे आहे, की नेहमीच पैसा सर्व काही नसतो. -  अज्ञात

-सुबोध अनंत मेस्त्री

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी