Skip to main content

हॅप्पी बर्थडे मनोज सर!

 


प्रिय मनोज सर,

असं म्हणतात कि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी नियतीने आधीच लिहून ठेवलेल्या असतात.  योग्य माणसं योग्य वेळी तुमच्या आयुष्यात येतात.  काही जण तात्पुरते येऊन जातात तर काही तुमच्या आयुष्याचा भाग होऊन जातात.   काही जणांशी नातं जुळायला महिने वर्ष निघून जातात आणि काहीजण एका भेटीतच आपले होऊन जातात. ३ वर्षांपूर्वी आपली भेटसुद्धा एम.बी.सी. च्या मीटिंगमध्ये तशीच झाली आणि आपलं नातं बहरत गेलं. 


एम.बी.सी. मध्ये आल्या दिवसापासून तुमची देण्याची वृत्ती आणि इतरांच्या आयुष्यात योगदान करण्याची तळमळ दिसून आली.  रिलायन्समधून जी.एम. पोस्टवरून स्वतः राजीनामा देऊन तुम्ही बिजनेस चालू केलाय हे समजलं तेव्हा थोडाफार अँटीट्युड असावा असा अंदाज मी बांधला होता कारण कोर्पोरेटमध्ये एवढ्या पुढे गेलेल्या लोकांची स्वतःची एक स्पेस असते.  पण तुम्ही वेगळे होतात.  आपल्या एम.बी.सी. कुटुंबात सहभागी झाल्यापासून तुम्हाला कोणतं काम लहान मोठं वाटलं नाही.  इव्हेन्ट मध्ये बॅनर लावण्यापासून तुम्ही सगळी कामं आवडीने केलीत.  ना कोणत्या गोष्टीचा दिखावा ना अतिशयोक्ती.  तुम्ही आहात तसेच राहिलात म्हणून सगळ्यांना आपलेसे वाटलात. 

योगायोगाने एम.बी.सी. मिटिंगला जाण्यासाठी आपला रूट एकच असल्याने तुमच्याशी अजून संवाद साधण्याची संधी मिळाली.  त्यात तुमचं व्यक्तिमत्व अजून उलगडत गेलं.  आपल्यामध्ये एकमेकांच्या कुटुंबापर्यंत शेअरिंग झाली.  पर्सनल गोष्टी डिस्कस झाल्या आणि मग तुम्ही मला माझ्या घरातल्या व्यक्तीपैकी एक वाटायला लागलात.  घरातली व्यक्ती म्हटली कि आपण हक्क गाजवतो.  तसंच तुमच्या बाबतीतही मी खूप वेळा केलं असेल.  तुमच्या कंपनीतून घरी लागणारी औषधं घरपोच मिळतात हे समजल्यावर आई आणि पप्पांची औषधं मी महिन्याला तुमच्याकडून घेत राहिलो.  औषधं संपायला लागलीत हे माझ्या लक्षात  नसताना तुम्ही समोरून मला फोन करून आठवण करून देत राहिलात.  या कामासाठी तुमचा स्टाफ होता पण हे कॉल्स तुमच्याकडून यायचे तेव्हा जास्त आपुलकी वाटायची.   आई सिरीयस असताना दादानंतर पहिला कॉल मी तुम्हाला केला.  सगळी कामं सोडून तुम्हीसुद्धा कोव्हिडच्या एवढ्या विचित्र परिस्थितीमध्ये घरी धावत आलात.  आम्हा तिघांपेक्षाही जास्त आईला ट्रीटमेंट मिळवून देण्यासाठी धावपळ केलीत.  दोन दिवस सलग आमच्यासोबत राहिलात.  तेव्हा आम्ही तिघे आहोत असं मला वाटलं नाही.  आम्ही ४ भाऊ आहोत असंच वाटत राहिलं. 

पिकनिकमध्ये तुमचं वेगळं रूप दिसतं.  तेव्हा अगदी तुम्ही लहान मुलासारखे होऊन जाता.  पण तेच तुम्ही मीटिंग्समध्ये असताना तुमचा वावर अगदी वेगळा असतो.  माणसाला त्याचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळं करता यायला हवं हे तुमच्याकडून शिकता येतं.  गेल्या काही महिन्यात वाशी ब्रँचसाठी तुमच्यासोबत काम करताना बऱ्याच गोष्टी शिकता आल्या.  तुमचं माझ्यासारखंच एम.बी.सी. मधल्या कित्येक लोकांच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात योगदान आहे.  मला एम.बी.सी. मधल्या गोष्टी आपल्या सदस्यांकडून कळतात म्हणून माहित आहे.  एम.बी.सी. व्यतिरिक्त बाहेर हि खूप सारं असेल पण तुम्ही करून मोकळे होता.  केलेलं योगदान लक्षात ठेवून ते सांगत बसायला किंवा परतफेडीची अपेक्षा करायला तुम्हाला वेळ नसतो.  फक्त १८० रुपयाचं औषध लॉकडाऊन मध्ये वरळीला डिलिव्हरी करण्यासाठी तुम्ही स्वतः कारने गेला होतात.  तेव्हा माझ्या मनात विचार आला होता कि, "याना डिझेलच १००-२०० रुपयांचं लागलं असेल मग त्यांना हे परवडणार कसं?".  पण आपल्या नफ्यापेक्षा पेशंटला औषध मिळणं या तत्वाचे तुम्ही.  "कमवायचं तिकडे कमवू सर; पण जिकडे गरज आहे तिकडे कमावण्याचा विचार नाही करायचा", हे वाक्य तुमच्यातली माणुसकी दाखवतं. 

कित्येक साऱ्या गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत.  मेडिसिन इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे तुमचा रोल प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळा आणि महत्वाचा होतो आणि तुम्ही तो उत्तम निभावून नेता.  तुम्ही निस्वार्थी मनाने देत जाता त्यामुळे तुम्हाला नक्कीच भरभरून मिळत जाईल याबाबतीत शंका नाही.  तुमच्या आयुष्यात आलेल्या चढउतारांवर मात करून पुढे जाण्याची ताकद तुमच्यात आहे.  ज्या पद्धतीने लोक तुमच्यावर आता प्रेम करतात, ते आणि तसंच कायम तुमच्यावर ते करत राहतील.  तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट भरभरून मिळेल.  नमिता वहिनी आणि मृण्मयीची साथ तर तुम्हाला आहेच.  एक सर्वोत्कृष्ट उद्योजक, उत्तम नवरा, कर्तव्यदक्ष बाबा, प्रेमळ भाऊ, खट्याळ मित्र या प्रत्येक भूमिकेला तुम्ही कायम न्याय देत राहाल आणि तुमचं व्यक्तिमत्व दिवसेंदिवस असंच खुलत राहील.   आपलंही नातं असंच बहरत जाईल.  माझ्या आयुष्यात गेल्या काही वर्षात घडलेल्या चांगल्या घटनांपैकी तुमची आणि माझी भेट आहे. 

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मनोज सर!

तुमच्यासाठी या आयुष्यात जे काही करण्याची संधी मिळेल त्याचं नक्कीच सोनं करेन!

तुमचाच,
सुबोध


Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी