Skip to main content

मृत्युंजय

 




काही वर्षांपूर्वी रणजित देसाईंच "राधेय" वाचलं होतं.  महाभारतातल्या कर्णाची बाजू त्यात प्रकर्षाने मांडली होती.  त्यावेळीच कुणीतरी शिवाजी सावंत यांचं "मृत्युंजय" वाच असं सुचवलं.  आमच्या सुनयना गायकवाड ताईने राबवलेल्या पुस्तक प्रदर्शनात मी ते दोनेक वर्षांपूर्वी घेतलं आणि पुस्तकाची लहान अक्षरात छापलेली ७२७ पाने बघून ते "एवढं कधी वाचून व्हायचं?" म्हणून कायम पुढे जात राहिलं.  पण दर दिवशी पाच असे २३९ धडे वाचायचे हा निर्धार करून गेल्या दीडेक महिन्यात पुस्तक पूर्ण वाचून काढलं.  

प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात.  जे तुम्हाला दिसतं ते खरं असतंच असं नाही.  असंच काहीसं या दोन्ही पुस्तकातून तुम्हाला कर्णाबद्दल वाचताना वाटतं.  पांडवांची अयोग्य बाजू बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने दिसून येते.  महाभारत म्हटलं कि सहसा पाच पांडव, श्रीकृष्ण, दुर्योधन, धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, द्रौपदी आणि शकुनी मामा हेच डोळ्यासमोर येतात.  कर्णाची त्यातली महत्वाची भूमिका ही या दोन्ही पुस्तकांमुळे समोर येते.  

सूर्याच्या दिव्य शक्तीतून जन्मलेला कुंतीचा पुत्र म्हणून कौंतेय, पण कौमार्य अवस्थेत बाळाला जन्म दिला म्हणून गंगेच्या पात्रात तिने त्याला लाकडाच्या पेटीत सोडलं. क्षत्रिय म्हणून जन्माला येऊन सुद्धा एका सारथ्याने व त्याच्या पत्नीने राधामातेने त्याला वाढवले (म्हणूनच राधेय) यासाठी आयुष्यभर "सूतपुत्र" म्हणून हिणवला गेलेला व पदोपदी अपमान झालेला हा कर्ण.  दुर्योधनाने प्रत्येक वेळी पडत्या क्षणी हात धरून त्याचा मानमरातब कायम राखण्याचा प्रयत्न केला म्हणून युद्धाच्या आधी  आपण जेष्ठ पांडव आहोत हे माहित असताना सुद्धा दुर्योधनासोबत राहून आपल्या सख्ख्या  भावांशी निकराने लढलेला असा विश्वसनीय कर्ण.   कुंतीने अगदी युद्धाच्या क्षणी आपल्या मातृत्वाची जाणीव करून दिल्यावर तिच्या शब्दासाठी आपल्या जीवाला धोका असताना पाच भावांपैकी ४ भावांना ठार करणार नाही असं वचन देऊन  घनघोर युद्धात ते पाळणारा असा तत्वनिष्ठ कर्ण.  आपल्या दिव्यपुत्र अर्जुनाला वाचवण्यासाठी  दान मागायला येणाऱ्या इंद्रदेवाला सगळ्यांचा विरोध असतानाही हसतमुखाने कवचकुंडलाच दान देणारा दानशूर कर्ण.   शेवटच्या क्षणी निःशस्त्र असताना युद्धधर्माच्या विरोधात जाऊन अर्जुनाला बाण चालविण्याचा  आदेश देणाऱ्या कृष्णाला मरण्याआधी भक्तीभावनेने हसत मुखाने नमस्कार करणारा भक्त कर्ण. 

महाभारताची कथा काल्पनिक असेल तरीही भगवतगीतेतून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो तसेच या पुस्तकातून एक व्यक्ती म्हणून उलगडलेला कर्ण आणि त्याच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला  अनुभवायला मिळतात.  "राधेय" वाचताना हरवून जायला होतंच पण मृत्युंजय वाचताना तुम्ही पूर्णपणे कर्णमय होऊन जाता. 

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री 

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...