Skip to main content

आमच्या अप्पांची "साठी"

 



आप्पा!  कोणत्याही मराठी कुटुंबामध्ये आदराने वापरला जाणारा शब्द.  काही लोक बाबांना आप्पा म्हणतात, काही आजोबांना काही काकांना.  आमच्या कुटुंबात असणाऱ्या आप्पानी या सगळ्याच भूमिका बखुबी निभावल्यात.  

काही माणसे या पृथ्वीतलावर जन्म घेतात आणि जन्म आणि मृत्युमधला प्रवास एक औपचारिकता म्हणून करतात, पाट्या टाकत आयुष्य जगतात. तर काही माणसे आपण ज्या साठी जन्म घेतला त्या हेतूचा शोध घेतात, तो पूर्ण होईल यावर दृढ निष्ठा ठेवतात, स्वतःला लायक बनवतात, हेतू साध्य करण्यासाठी जिवाचं रान करतात आणि एकाच आयुष्यात असं काही घडवतात जे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतं

आमचे आप्पा त्यापैकीच एक!

आप्पांचा जन्म १२ डिसेम्बर १९६२ रोजी डिंगणीत झाला.  घराची परिस्थिती बेताची होती.  आमच्या आजोबांचं हातावर पोट आणि घरात खाणारे १३ जण.  चिकन-मटण फक्त वर्षातून एक दोन वेळाच सणावारीच असायचं.   कधी भाकरी नाही म्हणून फक्त भाजीवरच पोट भरायचं तर कधी कोंद्याची भाकरी करून दिवस काढायचे. ती पण प्रत्येकाच्या वाट्याला एक चौथ भर आली तरी भाग्यच. अशी बिकट परिस्थिती.  पण आमच्या आप्पाना हे सगळं बदलायचं होतं.

आपण कुठे आणि कोणत्या परिस्थितीत जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसतं परंतु कर्तुत्वाने आपली परिस्थिती बदलणं हे मात्र आपल्या हाती असतं हे सिद्ध करण्यासाठी  त्यांनी शिक्षणाची वाट धरली.  जमेल तितकं शिकायचं आणि मोठं व्हायचं हाच त्यांचा ध्यास. 

१२ वी पर्यंत शिक्षण गावी करून ते आमच्या पप्पांबरोबर म्हणजेच त्यांच्या दादासोबत राहायला मुंबईला आले.  

आचार्य कॉलेजमध्ये तेरावी सायन्सला प्रवेश घेतला. खेड्यातून आलेल्या आप्पांना सुनील काका, विजय काका, किसन काका, किरण काका, जितू काका, प्रवीण काका, राज काका, शरद काका सारख्या जीवा भावाच्या मित्रांची साथ लाभली.  

गावातून आलेला तरुण. हिंदी आणि इंग्रजीची मर्यादा होती. तरीही जिद्दीने आणि मेहनतीने त्यांनी कॉलेजच शिक्षण पूर्ण केलं आणि आमच्या घरातलाच नाही तर गावातला पहिला Bsc ग्रॅजुएट पदवी घेऊन बाहेर निघाला. मेस्त्री कुटुंबीयांसाठी ७ पिढ्यांमधला पहिला अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस...तो देखील आप्पांनीच दाखवला. 

ही खरतर एका इतिहासाची नांदीच म्हणावी लागेल. 

त्यांच्याबरोबर लहानपणी घालवलेले कित्येक क्षण अजूनही आठवतात.  आप्पा तेव्हा रोह्याला ७०० रुपये पगारावर काम करायचे. तिथे गायकवाड सारख्या मित्राची साथ लाभली. काम आणि राहणं रोह्यालाच. आठवड्यातून एकदा ते घरी यायचे.  येताना आवर्जून आम्हाला कॅडबरीज घेऊन यायचे.  त्यांच्यासोबत कायम केलेला अस्वल डान्स, मासळी डान्स अजूनही आठवतो. आमच्याबरोबर ते धमाल ही तितकेच करायचे. म्हणून आम्हाला फार आवडायचे. त्यांच्याकडे बघून नेहमी वाटायचं. व्हायचं तर आप्पांसारखच!

पप्पांनी मोठ्या भावाचं कर्तव्य पार पाडलच आणि आईने देखील त्यांना सख्ख्या भावासारखा जीव लावला.

आमच्या चाळीच्या सुरुवातीला असलेल्या सोनाराने एकदा विचारलं होतं. ते तुमच्या आईचे भाऊ कुठे दिसत नाहीत. त्यांना ते भाऊ नाहीत दिर आहेत हे सांगितल्यावर विश्वासच बसला नव्हता. पोटच्या मुलासारखी माया आईने त्यांच्यावर केली. कोणतीही नवी गोष्ट पप्पांनी स्वतःसाठी आणली कि ती "तुम्हाला काय करायचीय, आप्पांना द्या" म्हणून त्यांना दिली जायची.  

जेव्हा आप्पांचं लग्न ठरलं, तेव्हा घरातला गडबड गोंधळ,  रात्री जागून घरीच स्क्रीन प्रिंटिंगने छापलेल्या पत्रिका,  प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्यांमध्ये भरलेले पेढे सुभाषनगरच्या हॉलमधलं लग्न.  सगळ्या गोष्टी एकदम एखाद-दोन वर्षांपूर्वी घडल्यासारख्या लक्ख आठवताहेत.  

कुर्ल्याच्या घरी, नंतर आर. सी. एफ., दिवा-ऐरोली आणि नंतर जुईनगर प्रत्येक घरामध्ये सुट्टीत आप्पा-काकींकडे हक्काने राहिलो.  काकीकडून खाण्यापिण्याचे जमेल तितके लाड करून घेतले.  पण आप्पा सुरुवातीपासून आमच्या वाट्याला जास्त आले नाहीत.  एखाद्या माणसाने झपाटून परिस्थिती बदलण्याचा निश्चय घ्यावा आणि त्यासाठी स्वतःला वाहून द्यावं असे ते कायम काम करत राहिले.   शून्यातून सुरुवात करून आज एखाद्या कम्पनीमध्ये 'नेक्स्ट टू बॉस' पोजिशन मिळवणं ही कित्येक वर्षांची तपश्चर्या आहे...खडतर प्रवास आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.   त्यातही ज्यावेळी कुटुंबाला वेळ देण्याची जबाबदारी यायची तेव्हा आप्पांनी प्रत्येकासाठी क्वालिटी टाईमच दिला.  प्रत्येकाच्या गरजेला, आजारपणात आप्पा कायमच उभे राहिले.  नावातच 'राम' असणाऱ्या आप्पांची वागणूक कायम देवासारखीच राहिली.  त्यांच्यामध्ये इतकी ऊर्जा येते कुठून याचं आम्हाला कायमच नवल वाटलं.  लग्नातले आप्पा आणि आताचे आप्पा यांच्यात काही जास्त फरक आम्हाला दिसत नाही.  ते आमच्यासाठी आमचे प्रशांत दामलेच आहेत.  एव्हरग्रीन.  कायम हसतमुख. 


आयुष्याचा कितीतरी वर्षांचा प्रवास आप्पा-काकींनी खडतर काढला.  काकीच्या मोठ्या ऑपेरेशननंतरचा काळ काकी आणि आप्पानी कसा काढला असेल याची कल्पना करणं देखील कठीण आहे. "आर सी एफ ला असताना एकदा साऊचा बर्थडे होता आणि खिशात पैसे नाहीत म्हणून मी त्याच विचारात बसलो होतो.  तेव्हा विजयने माझ्या खिशात पैसे टाकले होते आणि सायलीचा वाढदिवस करता आला.",  हे तुम्ही हल्लीच कधीतरी सहज गप्पांमध्ये सांगितलेलं.  या दोन तीन वाक्यामध्ये  तेव्हाचा स्ट्रगल आणि तुमची मित्राबद्दलची इतक्या वर्षांनंतरही कृतज्ञता स्पष्ट दिसते.  

या बिकट परिस्थितीमध्ये काकीच्या माहेरच्या मंडळींची देखील तितकीच खंबीर साथ लाभली.  

विचारांमध्ये मोठेपणा हवा, मोठी स्वप्न हवीत आणि देण्याची वृत्ती हवी यासाठी या आमच्या राम आणि सीता कायमच प्रेरणा राहिल्या आहेत.  संघर्ष असूनसुद्धा आयुष्य किती सुंदर जगता येऊ शकत याच जिवंत उदाहरण तुम्ही आमच्यासमोर आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर उभं केलं आहे.   

आपली साऊ म्हणजे मेस्त्री घराण्याला पडलेलं सुंदर स्वप्नच म्हणावं लागेल. ती डॉक्टर व्हावी ही ईच्छा ती खूप लहान असताना आम्ही तुमच्या तोंडून ऐकली होती आणि तेव्हापासून तिला डॉक्टर साऊ म्हणायला लागलो. एका गुणी मुलीसारखं साऊने देखील तुमचे स्वप्न स्वतःचे बनवले. प्रत्येक परीक्षेत अव्वल राहून साऊने तुमच्या स्वप्नाला आकार द्यायला सुरुवात केली आणि साऊची डॉ. सायली अनिता रामचंद्र मेस्त्री झाली.  मेस्त्री घरातल्या पहिल्या बी. एस. सी. ग्रॅज्युएटने आपल्या घरातल्या पहिल्या डॉक्टरसाठी प्रचंड मेहनत घेऊन, 'स्वप्न खरी होतात' हे सिद्ध करून दाखवलं.  साऊची सध्याची मेहनत व कामाप्रती ओढ हे तुमच्या दोघांचे तिच्यावर झालेले कृतीबद्ध संस्कारच, नाही का?


तुम्ही आम्हा सगळ्या भावंडांसाठी व त्यांच्या उत्कर्षासाठी केलेली धडपड,  तुमची घरातल्या प्रत्येकाबद्दलची तळमळ, जेव्हा आपल्या हातात काही नसतं व आपल्या माणसांचं दुःख सहनहि होत नाही तेव्हा तुमच्या डोळ्यातील हतबलपणा,  आपल्या मुलांनी कोणतीही विशेष गोष्ट केली की त्याबद्दल दुसर्यांना सांगताना तुमच्या डोळ्यातलं कौतुक आणि अभिमान या प्रत्येक गोष्टीची आम्हाला जाणीव आहे आणि त्याचमुळे आप्पा थेट आमच्या हृदयाला भिडतात.  

आप्पा तुमच्यात एक जबरदस्त पॉझिटीव्ह एनर्जी आहे आणि तुम्ही जिथेही जाता स्वतःची एक छाप सोडून जाता.  तुमच्या येण्याने, तुमच्या वावरण्याने, तुमच्या सहवासाने वातावरण प्रसन्न होऊन जातं.  

वयाची साठी जरी असेल तरी इथून तुमच्या आयुष्याची खरी सुरुवात आहे.  काकी आणि तुम्ही तारुण्यात जे अनुभवू शकला नाहीत ते सगळं पूर्ण करण्याची वेळ आता आहे.   तुमचं तारुण्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहेच पण उतारवयसुद्धा किती आनंदाने आणि समाधानाने जगता येऊ शकतं हे आम्ही तुमच्याकडेच बघून शिकणार आहोत. 

काकीनेच कधीतरी गायलेल्या गाण्याच्या ४ ओळी बोलाव्याशा वाटताहेत,

राम आठवा 

थोडं पुण्य आठवा

पुण्याईचा चेक घ्या 

खुशाल वठवा....

अशा या रामाला, म्हणजेच आमच्या प्रिय आप्पांना पाहून आम्ही सतत प्रेरित होत आलोय आणि यापुढेही तुमच्याकडून प्रेरणा घेत राहू.

आपल्याला आई भवानी उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, भरघोस यश, सुख समाधान देवो या प्रार्थनेसह आमच्या प्रिय आप्पांना ६० व्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!


धन्यवाद,

विनोद अनंत मेस्त्री 
सुबोध अनंत मेस्त्री


Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी