Skip to main content

टेक्नियम

 


तुम्हाला तुमचे कपडे इस्त्री करावे लागणार नाहीत किंवा मुळात तुमचे कपडे कधी खराबच होणार नाहीत.  त्यावर कोणतेही डाग पडणार नाहीत.  इस्त्री जर का फिरलीच तर तुमच्या कपड्यांचा रंग बदलण्यासाठी फिरेल.  म्हणजे एकच शर्ट तुम्ही वेगवेगळ्या रंगामध्ये वापरू शकाल.  नॅनोटेक्नॉलॉजी बद्दल अच्युत गोडबोलेजींच्या "नॅनोदय" पुस्तकात असं बरंच काही वाचलं होतं.  त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आता मार्केटमध्ये येऊ घातल्या आहेत.  जेव्हा एखाद्या सुपरफिशिअल सिनेमामध्ये पाहिलेल्या गोष्टी अशा पुस्तकात वाचायला मिळतात आणि ते खरं होऊ शकत हे पटवून देतात तेव्हा एक वेगळीच मजा असते. 

असं काहीतरी वेगळं वाचायला मिळेल या अनुषंगाने अजाने दिलेलं निळू दामले यांचं "टेक्नियम" हे पुस्तक वाचायला घेतलं.  त्यात टेकनॉलॉजीचा तसा मागोवा सुरुवातीपासून दिसला नाही.  अख्ख पुस्तक टीव्हीबद्दल च्या सर्वेवरच मांडलेलं होतं.  म्हणायला तसा हिरमोड तर झाला नाही कारण हा प्रवास बघणार्यांपैकी मीसुद्धा एकच.  पण हाच प्रवास भारतातील वेगवेगळ्या खेडेगावात जाऊन त्यांनी १९९८ आणि २००८ साली केला आणि त्याचं उत्तम वर्णन या पुस्तकातुन मांडलं आहे.  

पूर्वीच्या काळी टी.व्ही. म्हणजे श्रीमंताचं लक्षण पण तो हळूहळू पाहूणा म्हणून खेड्याखेड्यात शहरात प्रत्येक घरात घुसला आणि प्रत्येक घराचा सदस्य होऊन बसला.  ज्या घरात पूर्वी मातीने अंघोळ केली जायची ती जागा हळूहळू साबणाने घेतली.  टीव्हीवरील जाहिराती बघून शॅम्पू घरात यायला लागले.  कंपन्यांनी खेडेगावातील वाढतं मार्केट लक्षात घेऊन सॅचेट फॉरमॅट मध्ये गोष्टी विकायला सुरुवात केली आणि ते सामान्य माणसांच्या बजेट मध्ये आल्यामुळे त्यांचा खप प्रचंड वाढला.  हळूहळू डेली सोप्स टीव्हीवर सुरु झाले आणि मग त्यात नटनट्यांनी वापरलेले कपडे, त्यांची हेअरस्टाइल, त्यांचे दागिने या प्रत्येक गोष्टीचा ट्रेंड सुरु झाला.  दुकानांमध्ये फेमस सिरियल्सच्या नटनट्यांचे कपडे, चपला दागिने येऊ लागले.  दुकानात जाऊन फक्त अमुक अमुक सिरियलच्या या पात्राचे कपडे पाहिजे सांगितलं कि ते हव्या त्या साईझ मध्ये मिळायला लागले.  ब्युटी पार्लर्स गल्लोगल्ली चालू झाली आणि त्यांचीही चालती चालू झाली.  माणूस एकमेकांना बघून तसं वागण्याचा प्रयत्न करतो.  पूर्वी गावागावातल्याच सीमा असल्याने आणि प्रवास तितका सोपा नसल्याने माणसं आपल्या समाजाप्रमाणे किंवा आजूबाजूंच्या लोकांप्रमाणे वावरत होती.  पण टीव्हीने जग घरामध्ये आणून ठेवलं.  आणि खेडीपाडी मॉडर्न व्हायला सुरुवात झाली.  ज्यांच्या घरी जेवणाची आबाळ असेल पण घरात शॅम्पू सॅचेट नक्की असणार असा किस्साही त्यांनी यात मांडला आहे.  

टीव्हीमुळे समाज बिघडतोय किंवा टीव्हीमुळे नको त्या गोष्टी घरातल्या सगळ्यांसमोर येतात वैगेरे अशी बरीच आरडाओरड सुरुवातीला झाली आणि हीच आरडाओरड गेल्या काही वर्षांपासून मोबाईलच्या बाबतीतही आहेच.  प्रत्येक नव्या गोष्टीच्या आहारी आपण जातो.  एखाद्या नव्या गोष्टीवर प्रचंड शंका कुशंका काढायच्या व नंतर बाकीचे वापरत आहेत म्हणून हळूहळू स्वतः वापरायला सुरुवात करायची ही जुनी भारतीयांची सवय. त्यामुळे तंत्रज्ञानातल्या नवनवीन गोष्टींचे  इनोव्हेशन बऱ्यापैकी बाहेरच्या देशातच झाले आहेत.  त्यामुळे आपल्या देशाला फक्त कन्ज्युमर मार्केट म्हणूनच पाहिलं जात.  हे त्यांचं मत काही अंशी पटलं. टीव्हीमध्ये आता नावीन्य राहिल नाही.  पण टीव्ही आणि मोबाईलला इंटरनेट जोडलं गेलं आणि पुन्हा एकदा जग आपल्या बोटांशी आलं.  ओ. टी. टी. किंवा टिकटॉक रिल्स सारखे नवनवीन प्रयोग आता व्हायला लागले आहेत.  त्यामुळे बऱ्याच अंशी माणसं सध्या मोबाईल बाबतीत व्यसनाधीन आहेतच.  पुढील काही वर्षात मोबाईल जरी नसेल तरी ती जागा दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीने नक्कीच घेतली असेल.  

पुस्तकाच्या शेवटी त्यांनी जे मांडलं होतं ते भन्नाटच.  नॅनोटेक्नॉलॉजीबद्दल बरेच आर्टिकल्स व्हिडीओज पहिले असल्याने त्याबद्दल माहिती होतीच.  पण मेडिकल क्षेत्रात नॅनोटेकनॉलॉजीमुळे होणारेबदल विचार करायला लावण्याजोगे होते.  जसं की, त्यांनी नॅनोबॉट्स बद्दल एक माहिती सांगितली.  नॅनोबॉट्स म्हणजे सुईच्या टोकावर हजारोंच्या संख्येने मावतील असे सूक्ष्म रोबोट्स.  हे रोबोट्स माणसाच्या शरीरामध्ये सोडले की ते पूर्ण सेक्युरिटीचं आणि डॉक्टरांचं काम करतील.  जसं कि, हृदयाच्या झडपेमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते स्वतः दुरुस्त करतील किंवा नजीकच्या हॉस्पिटल्सही संपर्क साधून योग्य ती प्रक्रिया लगेच अजमावून पाहतील.  कॅन्सरच्या पेशी तयार होण्याआधीच हे बॉट्स त्यांना संपवून टाकतील.  शरीरात कुठेही काही गडबड दिसली की हे नॅनोबॉट्स त्याची काळजी आधीच घेतील त्यामुळे माणसाचं आयुर्मान वाढू शकतं.  २१व्या शतकाच्या शेवटाला माणसाचं आयुर्मान २५०-५०० वर्ष सुद्धा होऊ शकेल.  हा सगळा निसर्गाशी खेळ नक्कीच आहे.  याचे परिणाम-दुष्परिणाम हि नंतरची गोष्ट.  पण असं काहीतरी होऊ शकतं हेच कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे.  काही गोष्टी अगदी न पटण्यासारख्या असल्या तरी तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं आहे की यातली कोणतीही गोष्ट पुढील काही वर्षात अशक्य नाही. 

शेवटी, "तंत्रज्ञान श्राप कि वरदान" हे त्याचा आपण कसा वापर करू यावर अवलंबून आहे. 

- सुबोध अनंत मेस्त्री
 

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी