Skip to main content

चाळभेट

-सुबोध अनंत मेस्त्री

=====================================================================

बरेच दिवस आमच्या चाळीत जाण्याचा विचार मनात घोळत होता. रविवारी रात्री समीरच्या साखरपुड्याच्या निमित्ताने तो योग जुळून आला. आम्ही चेंबूर सोडल्यापासून चाळीत जाण्याचा प्रश्न सहसा उद्भवत नव्हता आणि चेंबूरला गेल्यावर चाळीच्या दिशेने जाणं झालंच तरी चाळीला वळसा मारूनच जायचो कारण नेहमीचीच घाई. कुणी भेटलं तर वेळ जाईल आणि नंतर तोंडावर टाळता येत नाही म्हणून आधीच घेतलेली ही काळजी. दादा आणि मी अगदी ठरवून तासभर वेळ काढूनच मागच्या गल्लीतून आमच्या चाळीत शिरलो. माणूस सुखावतो तो जुन्या आठवणींमध्ये हे कुठेतरी वाचलं होतं. ह्या चाळीत मी वयाची पहिली 24 वर्ष काढली होती. बालपण इकडेच काढल्यामुळे घाटल्यातल्या गल्ल्या न गल्ल्या पाठ होत्या. सुरुवातच एकदम जिगरी बालमित्रपासून करण्याचं ठरलं होतं. त्याला दोन चार कॉल लावून झाले होते पण त्याने काही फोन उचलला नाही. डायरेक्ट घरीच जाऊ अशा विचाराने त्याच्या घरी शिरलो. चाळीत एक बर असत, सकाळी उघडलेले दरवाजे सरळ रात्री झोपतानाच कडी लावून बंद होतात. लहानपणी त्यामुळेच आम्ही कोणत्याही मित्राच्या घरी बिनधास्त शिरायचो. माझ्या आईला या गोष्टीची खूप वर्षांची सवय. त्यामुळे बंद फ्लॅट संस्कृतीत तीच मन काही एकटीने रमत नाही.

"येऊ काय?" अशी पहिलीच हाक दारावर दादाने दिल्यावर "अरे या या या." असा ओळखीचा चंदयाच्या पप्पांचा आवाज आतून आला. ते एकटेच घरात होते. अगदी आनंदाने मनापासून त्यांनी आमचं स्वागत केलं.
"चंदयाला फोन केला. उचलत नाही". मी थोडा तक्रारवजा सुरात म्हणालो.
"होय अरे त्याच्या मेव्हण्याचं लग्न आहे. बस्ता बांधायला सगळेच गेलेत. मला पण नेत होते पण मीच नको सांगितलं. तेवढाच घरी आराम होईल. चहा करू काय?" त्यांनी एका सुरात सगळं सांगून विचारणी पण केली आणि नंतर आग्रह सुद्धा. आम्ही नकार दिला कारण पुढे जाऊन काही ठिकाणी घ्यावा लागणारच होता. मला समजायला लागण्याअगोदर पासून चंदयाचे पप्पा माझ्या आयुष्यात होते. चंद्याची आई आजाराने गेल्यानंतर चंदया पोरकाच झाला होता. म्हणजे अगदी मी मोठा शिशु आणि तो पहिलीला असेल. त्याची आई वारली तेव्हा सगळे का रडतायत हे सुद्धा त्याला कळत नव्हतं असं आई सांगायची. त्यानंतर चंदयासाठीच त्याच्या पप्पांनी दुसरं लग्न केलं. दुसऱ्या मम्मीला एका पाठोपाठ एक तीन मुली झाल्या. त्या तिघीही माझ्या खूप जवळच्या. त्यांना लहानपणी खूप खेळवल होत मी आणि चंदयाने. खर तर शाळेनंतरचा माझा अर्धाअधिक दिवस चंदयाकडेच जायचा. त्यातल्या मोठीच 3 वर्षांपूर्वीच अपघाताने निधन झालं आणि अजून एक धक्का त्यांच्या कुटुंबाला बसला. छोटी काही ना काही निमिताने अजूनही आजारी असते. आयुष्यात बऱ्याच कठीण प्रसंगातून जाऊन सुद्धा चंदयाच्या पप्पानी त्यांची तीच स्माईल अजून जपून ठेवली आहे. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आम्ही निघालो. दरवाजात चप्पल घालत असतानाच, "चंदयाची पण गुड न्यूज आहे रे", त्यांनी सांगितलं. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज होत. कदाचित आजोबा होण्याच्या आनंदात बाकीच्या गोष्टी विरून गेल्या असतील. त्यांचं अभिनंदन करून आम्ही निघालो.

त्याच्या बाजूलाच वीरकर मामीचं घर होत. त्यांचा छोटा मुलगा रवी माझा मित्र आणि मोठा मुलगा कृष्णा दादाचा. आम्ही दारातूनच हाक मारली. मामी बेडवर झोपली होती. तिने आम्हाला ओळखलं नाही. तिची नजर थोडी कमजोर झाली होती. जवळ गेल्यानंतर तिने जेव्हा आम्हाला ओळखलं ती भलतीच खुश झाली. तिने दादाला बाजूला बसवून घेतलं. रवीचे पप्पा काही वर्षांपूर्वी वारले. कृष्णाच लग्न झालं होतं पण रवीच अजून बाकी होतं. त्या छोट्या घरात ते सगळे एकत्र होते. मामीचा खणखणीत आवाज बऱ्यापैकी नरमला होता. थोडा वेळ गप्पा झाल्यावर तिला नमस्कार करून आम्ही निघालो.

आम्ही बाजूच्या सुर्वे मावशीकडे गेलो. ती लहानपणापासूनच मला गरीब गाय वाटायची. खालचा रूम बंद होता आणि वरच्या रूम ची लाईट चालू होती. आम्ही तसेच बाहेरच्या जिन्याने वर गेलो. दरवाजासमोरच मामा बसला होता. मामा म्हणजे मावशीचा भाऊ. तोसुद्धा कित्येक वर्षे तिच्याबरोबरच होता. खांद्याभोवती पदर गुंडाळून ती टीव्ही बघत बसली होती. तिला कित्येक वर्ष पाहतोय तशीच ती होती. तिने आम्हाला बघून कोरडीच स्माईल दिली. तिला पूर्वीपासूनच स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही. ती थोडी थकल्यासारखीच वाटत होती. आम्ही गेल्या गेल्या तिची विचारपूस सुरु केली. तिला दोन जुवळी मुलं आणि एक मुलगी. अजा विजा आणि कविता. अजा विजाच्या पप्पाना आम्ही भाई म्हणत असू. त्यांचा घरामध्ये एक वेगळाच दरारा होता आणि त्यांचं व्यक्तिमत्व पण तसच होत. 10-12 वर्षांपूर्वी आजाराने ते गेले. अजा विजा माझ्यासाठी लहानपणापासूनच हिरो होते. मुलगी पटवण्यापासून क्रिकेट खेळेपर्यंत दोघेही सराईत होते. मला त्यांच्यासारखं होण्याची खूप ईच्छा होई पण जमत नव्हतं. ती चहा करण्यासाठी उठून गॅस चालू करायला लागली आम्ही तिला नको म्हणून सांगितलं.
"अजा विजा कुठे आहेत?", काहीतरी सुरुवात करावी म्हणून मी फॉर्मली विचारलं.
"अजा बायका पोरांना घेऊन फिरायला गेलाय कुठ. ईजा पण बाहेरच गेलाय. बाकी आई पप्पा बरे असतात ना. पप्पा येतात कधी कधी चाळीत इकडे." तिच्या बोलण्यातला कोकणी अंदाज तसाच आहे अजून.

पप्पाना या चाळीची ओढ कमी नाही. मुंबईतलं पहिलं पत्र्याच घर त्यांनी इथं घेतलं. पूर्वी जमीन चोपून झोपावं लागायचं त्यांना रोज रात्री. आई बरोबर लग्न केल्यावर हळू हळू घराची काम करून पक्क करुन घेतलं घर.

आम्ही गप्पा मारेपर्यंत मामा बाहेर जाऊन कोल्ड्रिंक घेऊन सुध्दा आला. चहाला नको बोलल्यावर तो लगेच बाहेर पडला असेल कदाचित. आपल्या माणसांचा पाहुणचार नेहमी जवळचा वाटतो आणि चाळीतल्या घरांमध्ये तो आवर्जून मिळतोच. कोल्ड्रिंक पिऊन आम्ही दोघे निघालो. दरवाजात निरोप घेताना ती म्हणाली, "तुम्ही बरे एकत्र हाव रे अजून. आमचे अजा ईजा बघ येगळे झाले." ती सहज बोलून गेली पण तिच्या बोलण्यात कमालीची उदासीनता होती. तिच्या थकलेल्या चेहऱ्यामागचं कदाचित हेच एक कारण असेल. या चार भिंतीच्या आत इतक्या वर्षात काय घडलं असेल हे सांगण्यासाठी ती दोन वाक्य पुरेशी होती. आम्ही येतो म्हणून तिथून निघालो.

आता सरळ रांगेतच आम्हाला जावं लागणार होत कारण आम्ही धरून बाकी 2-3 लोकांनीच चाळ सोडली होती बाकी सगळी जुनी माणसं तिथेच होती. पोपट दादाच्या घरी चहा घेतला. त्याच्या बाजूचीच आमची रूम. माझी खूप ईच्छा होत होती घर पुन्हा एकदा बघण्याची पण हा नवीन मालक घरी नव्हता. आम्ही विकल्यापासून हे घर पुन्हा 3 वेळा विकलं गेलं होतं. "भिंतीमध्ये काय असत रे? घर माणसांनी बनत. आणि असही आतलं पूर्ण स्ट्रक्चर बदललं आहे", दादाने सांगितलं. मग मीही तो विचार सोडला. कुठूनही बाहेरून आल्यावर दरवाजाबाहेरच कट्ट्यावर ठेवलेल्या ड्रम मधलं पाणी भांड्याने पायावर घेऊन बारदानाला पाय पुसून घरात शिरण्याची सवय खूप वर्षाची होती. बाहेर ड्रम तसाच होता. आताही एक क्षण सवयीप्रमाणे तसंच करावंसं वाटलं पण दरवाजा बंद होता आणि असंही त्या घरात माझं कुणीच नव्हतं. ना तो ड्रम आमचा राहिला होता ना ते घर. पण चाळीतली माणसं तशीच होती

पुढे घराबाहेरच्या ओट्यावर मंगेश दादा आणि विजू मामा कॅरम खेळताना दिसले. कॅरम गरम होण्यासाठी त्यावर पिवळा ब्लब यावा यासाठी घराच्या आतून ओट्यापर्यंत लाईटच कनेक्शन आणलं होत. अशी इलेक्ट्रिकची काम करायला कोणत्या इलेक्ट्रिशन ची गरज आमच्या चाळीतल्या मुलांना कधीच भासली नाही. आम्ही ते लहानपणापासून करत होतो. आम्हाला पाहिल्याबरोबर मंगेश दादा खुश झाला आणि कॅरम सोडून आम्हाला घरात घेऊन गेला. त्याचा आणि त्याच्या पप्पांचा आमच्या चाळीत एक वेगळा दरारा होता. त्याच्या पप्पाना तर मी खूप घाबरायचो. तसे ते सडपातळ होते पण त्यांच्या आवाजामध्ये कडकपणा होता. मंगेश दादा पण दिसायला हॅण्डसम होता. पण आता त्याच्या चेहऱ्यावरचं तेज बऱ्यापैकी कमी झालं होतं. घरात औपचारिक गप्पा झाल्यावर आम्ही बाहेर निघालो. मंगेश दादाने "तुझ्याशी जरा पर्सनली बोलायचंय", म्हणून दादाला बाजूला घेतलं. त्या दोघांच बोलून होईपर्यंत मी मामाबरोबर एक कॅरमचा डाव खेळून पाहिला. चाळीमधला वीस वर्षांपूर्वीचा मी कॅरम चॅम्पियन होतो पण आता एक सोंगटी निघत नव्हती. वरवर सोप्या दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात सरावाशिवाय जमत नाहीत. तिथून निघाल्यावर मंगेश दादा काय विचारत होता हे दादाला विचारलं. पैशाची वैगेरे मागणी केली असेल असं उगाच वाटून गेलं होतं. "अरे त्याच्या मुलासाठी कौन्सेलिंग पाहिजे सांगत होता. ऐकत नाही त्याच तो".

त्याच्या समोरच वाघ ताईच घर होत. तिच्या घरात वाकून पाहिलं तर ती बेडवर झोपली होती.

"येऊ काय?", दादाने हाक दिल्यावर "कोण आहे?" बोलत हळू हळू आधार घेत ती उठली. पूर्वी चाळीमधल्या खणखणीत आवाजासाठी ती प्रसिद्ध होती. पण आता आवाजात तो जोर राहिला नव्हता. तिने आम्हाला ओळ्खल्याबरोबर ती आमच्या जवळ हळूहळू चालत आली. "पायाने हल्ली चालायला होत नाही रे. गुडघे दुखतात", ती सांगत होती. आम्ही घरातल्यांची चौकशी केली आणि निघालो पण बाहेर विसावे ताई आम्ही आलोय समजल्यावर आल्या होत्या. घोगऱ्या आवाज ही विसावे ताईंची खासियत. विसावे बाबा बायपास होऊन 7-8 वर्षांपूर्वी गेले. त्यानंतर ही कधी मुंबई कधी गावाला येऊन जाऊन असायची. तिच्याशी बोलताना वाघ ताई पण हळूहळू चालत तिथे आली. लहानपणी वरवर खडूस वाटणारी माणसं बऱ्याच वर्षांनी भेटल्यानंतर त्यांच्यातला मायेचा ओलावा त्यांच्या बोलण्यातुन जाणवत होता.

अजून दोन तीन घर घेतल्यावर चाळीच्या शेवटापर्यंत गेलो. बरेच मित्र भेटले नाहीत. गजाच्या घराबाहेर त्याची आई ड्रमाचा एका हाताने आधार घेऊन उभी होती. गजाचे वडील वीस एक वर्षांपूर्वी वारले. त्याला 3 बहिणी आणि हा एकुलता एक. दोन तीन वर्षांपूर्वीच त्याचा घटस्फोट झाल्याची बातमी कळाली होती. तीने आम्हाला पाहिल्यावर वरवरची स्माईल दिली. तसही चाळीत असताना मी तिच्याबरोबर जास्त कधी बोललो नव्हतो आणि दादाही बोलला असेल असं वाटत नाही. आमच्या बोलण्यातला आवाज ऐकून आजूबाजूचे पण बाहेर आले. त्यांच्यासमोर चाळीत धावणारी पोरं घर सोडून गेल्यानंतर इतक्या वर्षांनी अशी अचानक पुन्हा येऊन भेटल्यामुळे त्यांना बरं वाटलं असेल. निघता निघता गजाची आई बोलली, "तुम्ही आपले गेलाव चाळ सोडून. आमची पोरा इथंच राहिली". काही वाक्य अगदी सहजपणे बोलली जातात पण त्यांची धार जबरदस्त असते. आणि अशी काही वाक्य आपल्याला निरुत्तर करतात. आमचंही असंच काहीसं झालं. आम्ही थोडं आवरत घेऊन चाळीच्या मागच्या बाजूने बाहेर पडलो.

जाताना बरेच विचार मनात होते. चाळीतल्या ज्या बायकांना आज भेटलो त्या सगळ्याजणी बऱ्यापैकी थकल्यासारख्या किंवा असहाय्य वाटत होत्या. एकेकाळी यांच्या आवाजाने चाळ दणाणून निघायची. संध्याकाळी बाहेरच्या नळावर पाणी भरायच्या वेळी तर आवर्जून किलबिलाट असायचाच. मग त्या मन भरून एकमेकींशी भांडायच्या आणि महिना महिना बोलत नसायच्या. पण पापड फेणी मात्र एकत्र लाटायच्या. हळदी कुंकू त्यांच्या पद्धतीने एन्जॉय करायच्या. पण तो चाळीतला आवाज आता पूर्णपणे विरला होता आणि ती शांतताच बरच काही सांगण्याचा प्रयत्न करत होती. माणसाची वय उतरली की त्यांना आधाराची गरज भासते किंवा मन मोकळं करण्यासाठी समोर कुणीतरी हवं असत. तो आधार त्यांना काही काळापूरता आमच्यात सापडला याचं समाधान मनाला सुखवणारं होत.

=================================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656


#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"उद्योजकतेची दिवाळी"

  "पप्पा, मी यावर्षी पण कंदीलाचा बिजनेस करणार आहे", सार्थक मोठ्या उत्साहात परवा मला सांगायला आला. "कस्टमर कोण? अजय काका?", मी गमतीने विचारले.  गेल्यावर्षी बिजनेसच्या पहिल्या वर्षात अजय काका हा एकच कस्टमर होता. सार्थकला प्रोत्साहन म्हणून त्याने कंदील घेतले आणि पेमेंट म्हणून काही शेअर्स त्याला गिफ्ट म्हणून पाठवले. "यावर्षी अजय काकाला आम्ही पार्टनर म्हणून घेणार. प्रत्येक कंदीलामागे कमिशन देणार", सॉफ्टवेअरमध्ये बिजनेस डेव्हलपमेंटच काम बघणारा अजा, कंदील विकताना कसा दिसेल या कल्पनेने हसू आलं.  अजय काका सार्थकचा हक्काचा माणूस आहे.  आणि अजय काकाला पण सार्थकचं भारी कौतुकही आहे. "परीक्षा संपल्यावर सगळं", मी सार्थकला सांगितलं. आज परीक्षा संपवून घरी आला आणि अण्णासोबत जाऊन त्याने कंदीलाच सामान आणलं. अण्णाकडून मदतीच प्रॉमिस घेतलंच होतं. पार्टनरशिपची ऑफर टाकण्यासाठी अजय काकाला फोन करा म्हणून माझ्या मागे लागला होता. पण हे सगळं त्यानेच करावं हे त्याला मी सांगितलं. फोन लावून त्याच्याकडे दिला पण लाजत असल्याने तो धावत मम्मीकडे गेला. मम्मीनेही माझं बोलणं ऐकलं असल्याम