Skip to main content

ये उडी उडी उडी*ये उडी उडी उडी*
- सुबोध अनंत मेस्त्री

================================================
"ए आयुष्यात कधी पतंग हातात तरी धरलेलीस का?" अजाने टोमणा मारलाच.
"हा तू मोठा शहाणा ना.  तुला येते का? मी उडवलीय लहानपणी", मी थोडा उखडलो होतो.
"सुबोध भावोजी चिडले", म्हणत पूनम चिडवायला लागली पण माझ लक्ष सध्या कणी बांधण्यात  आणि प्रसाद पासून फिरकी वाचवण्यात गुंतलं होत.  आम्ही ५ जण पतंग उडवणारे आणि फिरक्या फक्त तीनच.  त्यात दादा आणि सुनील दादा कणी बांधून पतंग उडवायला गेलेसुद्धा.  माझी आणि प्रसादची फिरकीवरून एकमेकांची फिरकी घेणं चालू होत. अजा कधी प्रसाद ची बाजू घ्यायचा कधी माझी.  मी फिरकी प्रतिभाकडे दिली आणि कणी  बांधायला सुरुवात केली.

खरं तर मी या आधी ना स्वतःहून कधी कणी बांधली होती ना पतंग उडवली होती.  लहानपणी आमच्या चाळीतला कुणी मोठा दादा पतंग उडवायचा आणि मी फिरकी धरायला उभा राहायचो.  मग एकदमच उंचावर पतंग जाऊन मूक(स्थिर) झाली कि माझ्या हातात फक्त मांजा धरायला द्यायचा.  हाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी.   बीचवर हवा जास्त असल्याकारणाने पतंग आपोआप उडेल या विचाराने आम्ही १५-२० पतंग घेऊन मालवणला गेलो होतो आणि आचरा बीचच्या सुरुच्या वनातला जेवणाचा प्लॅन झाला कि मग पतंग उडवायचा प्लॅन होता.

मी कणी बांधण्यात बिझी असतानाच प्रसाद ने हळूच येऊन प्रतिभाच्या हातातली फिरकी पळवली.  मी उगाच तिच्यावर वैतागलो.  माझी कणी  बांधून झाली आणि मग मी बीचवर जाऊन दादाची फिरकी घेतली कारण प्रसादच्या मागे धावून पुन्हा त्या अवाढव्य शरीराकडून फिरकी हिरावून घेणं माझ्यासारख्या सडपातळ माणसाला शक्य नव्हतं.  दादाची पतंग बऱ्यापैकी उंचावर गेली होती.  मी थोडासा जास्त मांजा दादासाठी राहील या हिशोबात तो तोडला आणि फिरकी घेतली. 'आता माझा नवरा पतंग उडवणार', अशा अविर्भावात प्रतिभासुद्धा कौतुकाने माझी फिरकी पकडायला आली.  पण माझी पतंग काही उडायला मागत नव्हती.  २-३ वेळा प्रतिभाने समोर जाऊन दोन्ही हातात पतंग धरून उडवली पण ती पुन्हा तशीच खाली यायची.  खूप वेळच्या प्रयत्नानंतर पतंग उडाली पण तो माझा आनंद काही फार काळ टिकला नाही.  थोडी उंच गेल्यावर ती पतंग गोल गोल फिरायला लागली आणि झाडात जाऊन अडकली.

"कणी तुटली असेल त्याची.  व्यवस्थित बांध", दादाने त्याची पतंग उडवत असतानाच लांबून सांगितलं.

मी पुन्हा एकदा नवीन पतंग घेतली आणि दादाकडून कणी बांधून घेतली.  पण ती इतक्या वेळा आपटली कि अर्धीअधिक फाटून गेली.  आता थोडा नवीन ट्राय करावा म्हणून पुढ्च्या वेळी सुनील दादाकडून बांधून घेतली.  पण ती पतंग सुद्धा काही उडेना.  प्रसादने दादाकडून पतंग उडवून घेतली आणि नंतर जशी काय त्याने स्वतःच ती बदवली आहे असा आव आणून चिडवू लागला.

"राहू दे रे सुब्या.  तुला जमणार नाही",  शरद त्याला मागून सपोर्ट  करत होता.

मी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हतो पण पतंग फाटण्याव्यतिरिक्त काही नवीनसुद्धा माझ्याकडून होत नव्हतं.  आता प्रतिभाचही कौतुक हळूहळू आटलं आणि दोन तीन वेळा माझा नको तो राग सहन केल्यावर ती पण दुसरीकडे खेळायला गेली.  शेवटी सगळे घरी जायला निघाले आणि मलाही पर्याय उरला नाही.  पण मुंबईत जाण्याआधी पतंग उडवायची हे माझ्या मनात मी पक्क केलं होत.  रात्री झोपताना सकाळी लवकर उठून बीचवर जाण्याचा विचार मी केला होता.  सकाळी बीचवर जास्त हवा नसते असं मला दोघांनी सांगितलं पण माझा पतंग उडवण्याचा निर्धार पक्का होता.

सकाळी उठल्यावर फक्त तोंड धुवून मी तसाच पतंग आणि फिरकी घेऊन नव्या जोशाने बीचवर निघालो.  पण पुन्हा माझे सगळे प्रयत्न फसले. उंचावरून पतंग उडेल या विचाराने बीचच्या बाजूलाच असणाऱ्या माचीवर जाऊन उडवण्याचा प्रयत्न केला. गुरफटलेला मांजा सरळ करण्यात आणि फिरकी खाली पडण्यापासून वाचवण्यात माझा वेळ वाया जात होता.  तोपर्यंत प्रसाद घरासमोरच्या आवारात येऊन "अरे जाऊ देना नाय जमत तर", म्हणून मला चिडवत होता.  त्याच्याबरोबर बाकीचे पण अधून मधून घरातून बाहेर येऊन माझी मजा बघत होते.  शेवटी कंटाळून  मी खाली उतरलो आणि  नाश्ता करायला गेलो.  नाश्ता केल्यावर कॅप घेतली आणि सरळ घराच्या गच्चीवर गेलो.  बाकी सगळे बीचवर खेळायला गेले होते.   मी पुन्हा नवीन पतंग घेतली आणि प्रयत्न चालू झाले.  पतंग सुरुवातीला काही अंतर वर जाण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या हिसक्यांच्या अंदाज इतक्या वेळा फेल्युअर आल्यानंतर आता मला चांगलाच आला होता.  काही वेळाने हा अंदाज कामी आला आणि माझी पतंग वर जायला लागली.  ती इतकी वर गेली का माझ्या फिरकीचा मांजा संपला.  मला हे ओरडून सगळ्यांना सांगायचं होत पण घरात कुणीच नव्हतं.  मी संपलेल्या फिरकीचा मांजा तोडला आणि तो दुसऱ्या फिरकीला बांधला.  आणि पतंग जाईल तितकी लांब जाऊ दिली.  आता पतंग खूप उंचावर जाऊन स्थिर झाली होती,  प्रतिभाने घराखालून जाताना माझी पतंग बघून मला कॉम्प्लिमेंट दिली.   अजा दादा वैगेरे बीचवर जाऊन परत आले होते.

"शेवटी उडाली तुझी पतंग ", अजाने माझ्या हातातून मांजा घेऊन स्वतः उडवायला लागला.

"उडणार तर होतीच", मी अभिमानाने म्हणालो.  असंही दादाने पहिल्या दिवशी पतंग उडवताना सांगितलंच होत.  "पतंग काही अंतरावर नेईपर्यँत त्रास असतो.  तिला हिसके द्यावे लागतात.  एकदा ती वर गेली कि मग आपोआप जातच राहते."

त्या उंच गेलेल्या इवल्याश्या पतंगाकडे पाहिल्यावर एका गोष्टीच समाधान होत, "याच्यासारखंच एका लेव्हलची उंची गाठण्यासाठी आयुष्यात स्ट्रगल आहे.  बरेच हिसके सहन करावे लागतील.  पण त्यानंतरची उंची आपोआप गाठली जाणार.  पण सुरुवातीला पतंग सारखा जमीन बघत असताना कितीवेळा प्रयत्न करायचा आणि तो उडल्यानंतर मांजा कुठपर्यंत सोडायचा हे फक्त आपल्याला ठरवायचं आहे".

================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656


#sahajsaral

Comments

  1. बंधू... खूप सुंदर, तुझं लिखाण आणि तुझी जिद्द अप्रतिम आहे..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…