Skip to main content

आभार - ०९ जून २०१८

*!!! आभार !!!*

९ जून १९८५.  मध्यरात्री २ च्या सुमारास शताब्दी हॉस्पिटल चेंबूर इथे माझा जन्म झाला. शौच नलिकेत त्रास असल्याने माझं ऑपरेशन करणं गरजेचं होतं.  पण ऑपरेशन नंतर बाळाला ठेवण्यासाठी जी काचेची पेटी लागते ती शताब्दी हॉस्पिटलमध्ये नव्हती.  त्यामुळे ताबडतोब के.ई.एम हॉस्पिटलला हलवाव लागेल नाहीतर जीवाला धोका आहे असा ईशारा डॉक्टरने दिला. आमचे शेजारचे खोत भाई त्यावेळी शताब्दीमध्ये कामाला असल्याने त्यांच्या ओळखीवर लगेच अँबुलन्स मिळाली व मला ताबडतोब के. इ. एम ला हलवलं.  तिकडे उपचार करून पुढचे ९ दिवस मी काचेच्या पेटीतच होतो.  माझ्यासोबत अजून अशी पाच सहा मुलं तशाच पेटीत होती आणि त्यातला मी बचावलो अस आई सांगते.  देवाने नक्कीच काहीतरी घडवून आणण्यासाठी मला मागे ठेवला असं मला कायम वाटत राहीलं.  पण नेमकं ते काय हे अजून गवसायचं बाकी आहे.

त्यावर्षी तुफान पाऊस होता.  बेडची व्यवस्था नसल्याने बाळंतपणातच आईला जमिनीवरच चादर टाकून झोपावं लागायचं.  त्यात अधूनमधून सारखी ती उठून त्या पेटीजवळ जाऊन मला बघत राहायची.  तिच्या किती प्रार्थना देवाकडे गेल्या असतील याचा हिशोब नाही.  इतक्या तुफान पावसात पप्पा कामावरून घरी येऊन सगळं जेवण बनवून चेंबूरपासून रोज के. ई. एम ला घेऊन जायचे.  दादा अण्णा तेव्हा खूप लहान होते.  शेजाऱ्यांच्या किंवा घरी राहत असणाऱ्या काकांच्या जीवावर त्या दोघांना टाकून पप्पांना हे करावं लागत होतं.  काचेच्या पेटीत मुलाला अशा अवस्थेत बघताना दोघांच्या जीवाची काय घालमेल होत असेल त्याचा विचार आजही अंगावर काटा आणतो.

मी घरात लहान असल्याने माझे लहानपणापासून खूप लाड झाले.  जी खेळणी दादा अण्णांला कधी मिळाली नाहीत ती मला मिळाली.  माझे बरेचसे हट्ट पुरवले गेले.  माझं बालपण आईचा पदर पकडूनच गेलं.  आमची खाण्यापिण्याचीे आबाळ झाली किंवा खूप गरीबीत आम्ही वाढलो असं कधी घडलं नाही.  पप्पांच सुतारकाम आणि हातावर पोट असूनसुद्धा आई पप्पांनी आमच्यावर ती वेळ येऊ दिली नाही.  संस्कारात कुठे कमी पडू दिली नाही.  घरात येणाऱ्या कोलगेटची ट्यूब संपायला आल्यावर ती भिंतीच्या टोकावर घासून, नंतर चमच्याने घासून, अगदी शेवटी शेवटी पुढच्या बाजूला ट्यूब थोडी कापून त्यातून पेस्ट बाहेर काढणं आणि नंतर ती ट्यूब व तीच झाकण जपून ठेवून, अशी बरीच झाकण जमा झाली की चाळीत येणाऱ्या फेरीवाल्याकडून खारी टोस्ट विकत घेणं हा आमच्या आईचा व्यवहारिक स्वभाव.  मग तो सगळ्याच बाबतीत.  "आहे तर एकदाच खाऊ नका आणि एकटेच खाऊ नका" ही तिची शिकवण.  रात्री कुणीही अचानक जेवणाच्यावेळी आला की तो कधी उपाशी जायचा नाही.  एक दोन व्यक्तींचं जेवण कायम जास्तीच असायचंच. व्यवहारज्ञान पूर्ण तिच्याकडूनच शिकलो.  अगदी आजही शिकतो.  मन मारून आयुष्यभर जगली.  आता कुठे काही चांगलं होईल असं वाटतंय तेव्हा बाहेर फिरू शकत नाही इतकं आजारपण.  तिच्यासाठी खूप काही करावंसं वाटत पण तिला ते शक्य होत नाही.  त्यावेळी काचेच्या पेटीत मला बघताना ती जितकी हतबल झाली असेल तितकाच आज तिला बघताना मी रोज होत असतो.  आई बाबांनी आपल्याला वाढवलं, योग्य संस्कार शिक्षण दिलं हे त्यांचं कर्तव्य नाही तर आपल्यावरचे उपकारच. 

आई बाबांसारखीच खूप माणसं मला देवाने आजूबाजूला दिली.  अगदी नावं घेतली तर लिस्ट संपायची नाही.  कधी कधी मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मी अशा व्यक्तींमध्ये राहतो ज्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे,  माझ्या प्रत्येक यशावर ते माझ्यापेक्षा जास्त हुरळून जातात,  माझं कौतुक प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या करायला ते कधीच मागेपुढे करत नाही, चुकलो की तोंडावर बोलून दाखवतात.  काही जणांना व्यक्त होणं जमत नाही पण त्यांच्या वागण्यातून आणि नजरेतून कळतंच. या व्यक्ती फक्त माझ्या घरात नाहीत तर आजूबाजूला सगळीकडे आहेत. मी रोज त्यांच्यामध्ये जगतो, आयुष्य एन्जॉय करतो आणि त्यामुळेच कायम चार्ज राहतो.  मी आज जो कुणी आहे त्यात सगळा हातभार या व्यक्तींचा आहे. 

गेल्या वर्षभरात माझ्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.  "टेक आय टी इजिअर" चालू होणं असेल किंवा दूरदर्शनवर दोन वेळा लाईव्ह न्यूजवर येणं असेल किंवा "महाराष्ट्र बिजनेस क्लब" नव्याने सुरू करणं असेल किंवा आमची ग्रुप आणि फॅमिलीसोबत झालेली पहिली फॉरेन टूर असेल किंवा आमच्या एका नव्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना असेल किंवा गेले काही वर्ष डोक्यात असणारा  पण आता प्रत्यक्षात उतरलेला "टेक आय टी इजिअर" चा युट्युब चॅनेल असेल (ज्याला फक्त 9 दिवसात जवळपास 650 सबस्क्राइबर मिळाले) किंवा "लाईफ रिचार्ज" सारख्या संजय गोविलकर दादांच्या कल्पनेतून जन्मलेल्या जीवनरंगच्या उपक्रमाचा मी स्वतः एक भाग होणं असेल.  खूप काही नवीन आणि उत्साह देणारं.  निगेटिव्ह गोष्टींना तर आम्ही असेही डोक्यावर घेत नाही कारण त्यांना महत्व दिल्यानेच त्यांची पॉवर वाढते. 

पण मी जे काही घडतोय किंवा जे काही चांगलं माझ्या आयुष्यात घडतं ते फक्त आणि फक्त आई बाबांच्या पुण्याईने, देवाच्या कृपेने आणि तुमच्यासारखी खरोखरच जीव लावणारी आणि नेहमी उत्स्फूर्त करणारी माणसं आहेत म्हणूनच.  आम्ही पैशात यश कधीच मोजलं नाही पण माणसात नक्कीच मोजतो.  मी दरवर्षी  माणसांनी श्रीमंत होतोय हे तर नक्की.  एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल आयुष्यावर असणारं एवढं मोठं आर्टिकल आपण का वाचावं? असा प्रश्न असतानासुद्धा तुम्ही ते पूर्ण वाचताय यातच तुमचं माझ्यावरच प्रेम आलं.

माझ्या वाढदिवशी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो.  माझं अस्तित्व फक्त तुमच्यामुळे आहे.  तुम्ही कायम माझ्या पाठीशी राहिलात आणि यापुढेही राहाल अशी आशा करतो.

असंच प्रेम कायम असू द्या 😊🙏🏻

तुमचाच,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…