Skip to main content

४९ रुपयांचं कर्ज


*४९ रुपयांचं कर्ज*
- सुबोध अनंत मेस्त्री

========================================================================
शाळा सोडून आता 16 वर्ष झाली. शाळेतल्या शिक्षकांनी खूप चांगल्या सवयी आमच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या एक होत्या चौधरी बाई. माझ्या आईनंतर ज्यांनी मला आईसारखी माया लावली असेल त्या चौधरी बाई होत्या. अजूनही बाईंना भेटलो आणि वाकून नमस्कार केला की "खूप मोठा हो", असा आशीर्वाद मिळतो आणि काहीतरी करण्याची जिद्द. उद्या चौधरी बाई शाळेतून रिटायर्ड होत आहेत. त्यांच्या एका आठवणीचा हा लेख.
========================================================================

सातवीची नऊमाई परीक्षा होऊन गेली होती. गणिताची भीती मला असायचीच आणि त्यात नापासही झालो होतो. मला त्यावेळी क्लास लावण्याची भारी क्रेझ होती पण घरची परिस्थिती पप्पांच्या बेताच्या कामामुळे तशी चांगली नव्हती.

"दादा अण्णा झाले पास क्लास न लावता. तुला कशाला पाहिजे क्लास. तू हुशार आहेस", अस बोलून आई नेहमीच माझी क्रेझ उतरवायची. मला आता वार्षिकच टेन्शन होत. पुढच्यावर्षी याच वर्गात राहावं लागतंय की काय इथपर्यन्त.

एक दिवस आमच्या क्लासटीचर चौधरी बाई गैरहजर होत्या. आम्ही टीचर रूम मध्ये जाऊन चौकशी केली आणि बाई आजारी असल्याचं समजलं. बाईनी वर्षभरात सर्व मुलांना चांगली माया लावली होती. त्या आजारी आहेत असं ऐकल्यावर आम्हाला थोडं अस्वस्थ वाटलं. अजून एक लेक्चर ऑफ मिळाल्यावर मी, निनाद आणि किरण शिक्षकांची परवानगी घेऊन त्यांच्या घरी निघालो. शाळेच्या समोरच रस्त्याच्या पलीकडल्या बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर डाव्या हाताला बाईंची रूम होती. निनादला बाईंना वर्गातले अपडेट पण द्यायचे होते आणि त्या निमित्ताने बाईना भेटून पण येणार होतो.

रस्ता क्रॉस करून आम्ही बिल्डिंगच्या पॅसेज मध्ये आलो. सुभाषनगरमधल्या बऱ्याचशा बिल्डिंग या अशाच "U" शेपच्या होत्या. त्यामुळे बिल्डिंगच्या पॅसेजमध्ये खेळायला खूप जागा असे. आम्ही सुभाषनगरच्या मोठ्या मैदानात खेळायला यायचो तेव्हा अशा बिल्डिंगच्या पॅसेजमध्ये बरीच मुले खेळताना बघून हेवा वाटायचा. ती त्यांच्या हक्काची जागा होती. आम्ही सुभाषनगरच्या मैदानात खेळताना चांगला पिच असेल तर मध्येच मोठी मुलं येऊन तिथून आम्हाला हुसकून लावायची आणि ऐन खेळ रंगात आलेला असताना बोरियाबिस्तर घेऊन आम्हाला आमचं पिच चेंज करावं लागायचं. तसे आमच्या चाळीबाहेरचे रस्तेही रिक्षा जाईल एवढे मोठे होते पण तिथेही क्रिकेट खेळण्याची सोय नव्हती. दुकानात बॉल गेला किंवा त्यांच्या बरण्या फुटल्या तर पंचाईत व्हायची. म्हणून त्या रस्त्यावर आम्ही गोट्या किंवा भवरेच खेळायचो.

आम्ही बाईंच्या बिल्डिंगमध्ये शिरलो. अशा बिल्डिंगमध्ये शिडीजवळच पाळलेले कुत्रे असतात असं ऐकून होतो म्हणून मी या दोघांच्या मागूनच चालत होतो. जेणेकरून भुंकण्याचा आवाज आला की मागच्या मागे पळता येईल. पण तशी गरज भासली नाही. वर्गाच्या दारावरून जस "बाई आत येऊ?" अस आम्ही विचारायचो तसच बाईंच्या घराच्या दरवाज्यावरूनसुद्धा विचारलं. बाई खुर्चीवर बसून टेबलवर काहीतरी लिहिण्याचं काम करत होत्या.

"या. तुम्ही कसे काय इकडे?", बाईनी कौतुकाने विचारलं.

आम्ही तिघे बाईंच्या खुर्चीसमोर गुढघ्यावर बसलो.

"तुमची तब्येत ठीक नाही सांगितलं शाळेत म्हणून तुम्हाला भेटायला आलो", निनादने सांगितलं.

"वा वा. थांबा काहीतरी खायला देते तुम्हाला", बाईंनी किचन मध्ये जाऊन फरसाण खायला घेऊन आल्या आणि सोबत पाणीही होतच.

पाणी नक्की तोंड लावून प्यायचं की वरून प्यायचं या भ्रमात मी आणि किरण असताना निनादने तोंडाला ग्लास लावून पाणी एका घोटात प्यायलासुद्धा आणि त्याने त्याचे अपडेट चालू केले. मी आणि किरण त्याला दुजोरा देत होतो. वर्गात कुठे काय शिजतंय याची तंतोतंत माहिती निनादकडे असायची. निनादच बोलणं बाईंनी शांतपणे ऐकून घेतलं.

"कुठे राहता तुम्ही?", त्याचं सांगून संपलय समजल्यावर बाई आमच्याकडे वळल्या.

"मी बाई कर्नाटक शाळेच्या बाजूला", किरणने सांगितलं.

"मी खारदेव नगर. भाजी मार्केट आहे ना तिथे आतल्या चाळीत राहतो", मी सांगितलं.

"नऊमाईच्या रिजल्टच काय?", बाईंनी विचारलं.

या प्रश्नावर काय उत्तर द्यावं हा प्रश्न आम्हाला पडला. कारण किरणची ही दांडी गुल होती. आम्ही शांत आहे बघून बाईंनीच विचारलं, "क्लास ला जाता का कुठे?"

आम्ही नकारार्थी मान हलवली.

"आई जाऊन देत नाही. दहावीला क्लास लाव बोलते. पैसे नाहीत आणि उगाच खर्च कुठून काढायचा अस बोलते. चाळीत नाही होत अभ्यास. सारख कुणी ना कुणी येत राहत नाहीतर काही ना काही आवाज असतो.", मी माझं नेहमीच कारण पुढे केलं.

"कोणता विषय गेला?", बाईंनी विचारलं.

"गणित", दोघांनीही एकत्र सांगितलं.

"बरं. गणित तसा आहेच कठीण यावर्षीचा. तुम्ही माझ्याकडे या क्लासला. संध्याकाळी 3-4 मूल असतात अजून सातवीची. तुम्ही पण या", बाईंनी सांगितलं.

मी आणि किरण ने एकमेकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.

"फी नको रे. मी नाही घेत फी कुणाकडून. मला आवडत शिकवायला. या तुम्ही आज संध्याकाळपासून", बाईचं हे वाक्य ऐकून जीव भांड्यात पडला.

आम्ही आनंदातच निघालो. बाईंचा मुलगा चेतन त्यावेळी सातवीलाच आमच्या शाळेत पण बाजूच्या वर्गात होता. संध्याकाळी "ड" वर्गातले 3-4 जण, चेतन, मी आणि किरण असे सगळे बाईंकडे एकत्र अभ्यासाला बसायचो. बाई त्यांचं घरातलं सगळं काम उरकून आम्हाला शिकवायला यायच्या. आणि त्यातही फक्त गणित नाही तर सगळे विषय बाईंनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली. गणिताच्या तासाला सरांनी प्रश्न केल्यावर बाकात तोंड घालणारे आम्ही आता उत्साहाने उत्तर द्यायला लागलो. साहजिकच वर्गातल्या हुशार मुलांना आमच्यात एवढा बदल कसा झाला याचा प्रश्न पडला असणार.

वार्षिक परीक्षा चालू होईपर्यंत बाईचं सगळं शिकवून झालं होत आणि उजळणीही झाली होती. पेपर चांगले गेले. रिजल्ट पाहिला तर मी वर्गात सातवा आलो होतो. सगळ्या विषयात चांगले मार्क होते. मी जबरदस्त खुश झालो कारण त्यावेळी वर्गात पहिल्या दहा मध्ये येण तस प्रतिष्ठेचं होत. आईने सांगितल्याप्रमाणे मी आणि किरण पेढे घेऊन बाईंना देऊन आलो व त्यांचा आशीर्वाद घेतला.

"आठवीचं इंग्रजी कठीण आहे रे. सुरुवातीपासूनच अभ्यास करा.", बाईंनी सांगितलं.

जून मध्ये माझ्या बर्थ-डे च्या दिवशी मला शुभेच्छा देण्यासाठी बाईंचा फोन आला. "उद्या येऊन भेटून जा. तुझ्यासाठी छानसं गिफ्ट घ्यायचं आहे", बाईंच्या या वाक्याने मी हुरळून गेलो. एकतर बर्थडे ला शुभेच्छा हा प्रकार माझ्यासाठी नवीन होता कारण लहानपणी एक-दोन वेळा माझ्या काकीमुळे माझा बर्थडे सेलिब्रेट झाला आणि त्यानंतर फक्त आई जवळ घेऊन मुका घ्यायची तेवढंच काय ते बर्थ-डे सेलिब्रेशन.

दुसऱ्या दिवशी मी मस्त हाफ शर्ट, हाफ पँट मध्ये इन करून पावडर वैगेरे लावून बाईंना भेटायला गेलो. बाई तिथून मला चेंबूर स्टेशनच्या नंदू बुक डेपो मध्ये घेऊन गेल्या आणि इंग्रजीच गाईड घेऊन दिल.

"वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. अभ्यास कर. इंग्रजी कठीण आहे पण याची मदत होईल तुला. खूप मोठा हो.", बाईंनी माझ्याकडे हसत बघून सांगितलं.

त्यावेळी थॅंक यु किंवा सॉरी हा शब्द तोंडातून येत नसायचा. फक्त एक्सप्रेशन्स. लाजेमुळे असेल किंवा नक्की कोणत्या भावना माहीत नाही पण हे शब्द बोलाण्याचा प्रयत्न केला की ओठावर येऊन थांबत.

"मी पुढे जाते. काम आहे माझं. तू जाशील ना इथून व्यवस्थित घरी?", बाईंनी विचारलं.

मी फक्त होकारार्थी मान हलवली. बाई निघाल्या. मी सवयीप्रमाणे किंमत बघण्यासाठी गाईडच पहिलं पान उघडलं. त्यावर "रुपये ४९ फक्त" अस लिहिलं होतं. मी पाठमोऱ्या जाणाऱ्या बाईंकडे पुन्हा एकदा पाहिलं व मनातल्या मनात "थॅंक यु" म्हटलं. त्या ४९ रुपयाचं कर्ज आयुष्यभरासाठी माझ्या खांद्यावर आहे.

========================================================== ==============
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656
#sahajsaral

Comments

  1. " थॅंक यु किंवा सॉरी हा शब्द तोंडातून येत नसायचा. फक्त एक्सप्रेशन्स. लाजेमुळे असेल किंवा नक्की कोणत्या भावना माहीत नाही पण हे शब्द बोलाण्याचा प्रयत्न केला की ओठावर येऊन थांबत. .. " छानच
    खरतर सॉरी आणि थॅंक यु हे शब्द ज्यांनी शिकवलेले असतात ना त्यांनाच जेव्हा ते म्हणावे लागतात तेव्हा जड हे जातच. आणि म्ह्णूनच कदाचित एक्सप्रेशन्स तेव्हा हि आणि आत्ताही जास्त बोलून जातात (शिक्षकांसमोर तरी.)

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"उद्योजकतेची दिवाळी"

  "पप्पा, मी यावर्षी पण कंदीलाचा बिजनेस करणार आहे", सार्थक मोठ्या उत्साहात परवा मला सांगायला आला. "कस्टमर कोण? अजय काका?", मी गमतीने विचारले.  गेल्यावर्षी बिजनेसच्या पहिल्या वर्षात अजय काका हा एकच कस्टमर होता. सार्थकला प्रोत्साहन म्हणून त्याने कंदील घेतले आणि पेमेंट म्हणून काही शेअर्स त्याला गिफ्ट म्हणून पाठवले. "यावर्षी अजय काकाला आम्ही पार्टनर म्हणून घेणार. प्रत्येक कंदीलामागे कमिशन देणार", सॉफ्टवेअरमध्ये बिजनेस डेव्हलपमेंटच काम बघणारा अजा, कंदील विकताना कसा दिसेल या कल्पनेने हसू आलं.  अजय काका सार्थकचा हक्काचा माणूस आहे.  आणि अजय काकाला पण सार्थकचं भारी कौतुकही आहे. "परीक्षा संपल्यावर सगळं", मी सार्थकला सांगितलं. आज परीक्षा संपवून घरी आला आणि अण्णासोबत जाऊन त्याने कंदीलाच सामान आणलं. अण्णाकडून मदतीच प्रॉमिस घेतलंच होतं. पार्टनरशिपची ऑफर टाकण्यासाठी अजय काकाला फोन करा म्हणून माझ्या मागे लागला होता. पण हे सगळं त्यानेच करावं हे त्याला मी सांगितलं. फोन लावून त्याच्याकडे दिला पण लाजत असल्याने तो धावत मम्मीकडे गेला. मम्मीनेही माझं बोलणं ऐकलं असल्याम