Skip to main content

बी. डी. डी. चाळ*बी. डी. डी. चाळ*
- सुबोध अनंत मेस्त्री

==========================================================

संजय दादा आणि अरुण सरांशी शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये  मिटिंग संपवून दादा आणि मी टॅक्सी मिळेल या हिशोबात शिवाजी पार्क समोरच्या शिवसेनाभवनाच्या रस्त्याला लागलो.  एक दोन टॅक्सीवाल्याना विचारलं पण नेहमीप्रमाणे नकारच मिळाला.  पलीकडच्या रस्त्यावरून एक टॅक्सी शिवाजी पार्ककडे चालली होती त्यांनी आम्हाला हातवाऱ्यानेच कुठे अस विचारलं.  मी लांबूनच "वडाळा  स्टेशन" अस मोठ्याने ओरडून सांगितलं.

"थांबा, वळवून आणतो", त्याने हात फिरवून सांगितलं.

"काका थोडे सिरीयस दिसतात या धंद्यामध्ये", मी मस्करीत दादाला म्हटलं.  टॅक्सी फिरून आमच्याकडे आली.

"बसा", त्यांनी मागचा दरवाजा उघडला.  आम्ही बसलो.

"मघाशी एवढं आभाळ आलं होत वाटलं पाऊस येईल.  आलाच नाही.   ढग आले तसे गायब झाले", गाडी सुरू झाल्या झाल्याच टॅक्सी ड्रायव्हर काकांनी गप्पा मारायला सुरुवात केली.

"पनवेलला पडला पाऊस दीड तास तरी.", दादाने सांगितलं.

"अरे वा तिकडे पडला का?  मग येईल इकडे पण हळू हळू.  गर्मी वाढलीय हो भरपूर.  चिडचिड होते", गाडी प्लाझा रस्त्याला लागली.

"काका रहायला कुठे तुम्ही", दादाने त्यांच्या वयाचा अंदाज घेऊन काका अशी हाक मारली असावी.

"आम्ही?  बी डी डी चाळ", त्यांनी सांगितलं.

"अरे वा बी डी डी", या चाळीत बराचसा मित्र परिवार राहून आलेला असल्याने आणि चाळ या शब्दाशी जुनं नात असल्याने तोंडातून "वा" तर आपसूकच निघतो.

"आमचं त्यात काही नाही हो.  आमच्या बाबानी घेतलेली.  आम्ही फक्त सांभाळतोय आता",  काकांनी सांगितलं.

"माझा कार्यक्रम झालेला तिकडे आणि जांभोरी मैदानात गुढीपाडव्याच्या एका कार्यक्रमात निवेदन केलं होतं मी.  स्मिता तळवलकर आल्या होत्या ना त्या कार्यक्रमाच.  मित्र पण आहेत तिकडे अजून आमचे.", दादाने बी डी डी चाळीच नात असल्याचे संदर्भ दिले.

"हो.  कार्यक्रम तर होतच असतात तिकडे.  संस्कृती जपून ठेवलीय चाळीने.  आता शंभर वर्षे पूर्ण होतायत चाळीला.  2024,  25 आणि 26 ला तीन चाळीना 100 वर्ष पूर्ण होतील.  ब्रिटिशांनी बांधल्या होत्या त्यावेळी.  पण खिळा जात नाही सहज अजून.  ड्रिल मशीन ने होल मारायचा म्हटल तरी 25 रुपये घेतात एका होलचे.  पाना तुटला तर दीडशे",  काका अभिमानाने सांगत होते.

"हो बघा ना.  जुनी बांधकाम किती मजबूत होती.  आताच्या बिल्डिंग कुठे अशा",  मी त्यांना दुजोरा दिला.

"मग मस्त बांधकाम.  त्यावेळी त्यांच्या सैनिकांना राहण्यासाठी बांधल्या होत्या.  मस्त दोन बिल्डिंगच्या मध्ये जागा त्यामुळे मुलांना खेळायला पण मिळत.  आम्ही पूर्वी पिक्चर लावायचो.  सफेद पडदा शिवून आणायचो मोठा 70 एम एम स्क्रीन.  हनुमान जयंती ला असायचाच.", काका नॉनस्टॉप चालू होते.

मी खूप लहान असताना मला आमच्या चाळीबाहेरच्या रस्त्यावर मोठ्या पडद्यावर लावलेला साईबाबांचा सिनेमा आठवला.  रस्त्याच्या एका बाजूला अर्धी लोक आणि दुसऱ्या बाजूला अर्धी आणि मध्ये पडदा.  ओपन थिएटर मध्ये मल्टिप्लेक्स ची मजा आम्ही तेव्हा घेतली होती.

"अजूनही असतात का चाळीत सण तसेच", मी काकांना कुतूहलाने विचारलं.

"हो मग.  अजूनही सगळे सण होतात.  साई भंडारा, हनुमान जयंती सगळे सण मिळून साजरे करतो आम्ही", काका एक्साइट झाले होते.

'आता पूर्वीसारखं कुठे राहिलय', या उत्तराची अपेक्षा असताना काकांच्या अनपेक्षित उत्तराने मला चाळीच कौतुक वाटलं.

"पण आता चाळ तोडण्याच चालू आहे.  टॉवर होतायत तिकडे", काकांच्या बोलण्यात थोडी नरमाई आली.  "मी म्हणतोय कशाला पाहिजेत टॉवर?  आताच्या रूम तशा आहेत लहान पण एवढा नाही होत प्रॉब्लेम.  चाळीबाहेरच्या ओट्यावर झोपलोय आम्ही किती वेळा.  माझ्याकडे तर पाहुणे आले तर मी सरळ गच्चीवर झाडू मारतो, चटया गोधड्या टाकतो आणि तिकडे जाऊन झोपतो त्यांना घेऊन.  वरळी चौपाटी बाजूलाच ना.  असला सो सो वारा येतो.  मस्त झोप लागते.  पाहुणे विचारतात मग एवढा सो सो वारा येतो कसा काय तुमच्याकडे?", त्यांच्या सो सो या शब्दाला एक वेगळीच टोन होती.

"आता अजून पण काय गरज पडली ना तर पैसे नसतील तरी चालतात.  दुकानात जाऊन सरळ सामान उचलून आणायचं.  कोण विचारत बसत नाही पैशाच.  काय पाहिजे नाही पाहिजे चाळीतले लोक काळजी घेतात.  टॉवर आल्यावर कोण बघणार ते?",  वडाळा स्टेशन येऊन आम्ही टॅक्सीतुन बाहेर आलो तरी काकाच्या गप्पा चालू होत्या.  उतरल्यावर त्यांचा चेहरा व्यवस्थित दिसला.  बारीक पण पांढरे केस, थोडा उतरलेला सावळा चेहरा.  टॅक्सी ड्रायव्हरचा खाकी युनिफॉर्म आणि वरच एक बटन उघड.  साधारण चाळीशी पन्नाशीतला माणूस.  दादा आणि मी त्यांना हात मिळवून निघालो.

काकांनी पुन्हा एकदा त्यांच्या गप्पांमधून चाळ फिरवून आणली होती.    लहानपणी उत्साहात साजरे केले जाणारे सण मग ती हनुमान जयंती असेल, दिवाळीतले कार्यक्रम असतील किंवा नवरात्रीचा गरबा असेल  सगळे डोळ्यासमोरून गेले.  चाळीतल्या माणसांची एकमेकांबद्दलची आत्मीयता आठवली.  भांडण असून सणवार एकत्र साजरं करण आठवलं.  चाळ कोणतीही असो पण चाळीतल ते मोकळं वातावरण आणि कुणाच्याही घरी केव्हाही बिनधास्त घुसता येण्याच स्वातंत्र्य फ्लॅटच्या बंद संस्कृतीत हरवून गेलंय.

==========================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656

#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…