Skip to main content

रफ अँड टफ


आज ट्रेन मधून बेलापूरपासून चेंबूर पर्यंत प्रवास करत होतो. दर गुरुवारी मंदिरात जाण्याची सवय खूप पूर्वीपासूनच आहे आणि तेही चेंबूरचच साईबाबा मंदिर. तसा मी नेहमी संध्याकाळीच जातो पण रक्षाबंधन असल्याने संध्याकाळी जायला जमणार नाही म्हणून दुपारीच निघालो. दुपारची वेळ आणि त्यात काही लोकांची सुट्टी त्यामुळे ट्रेनला एवढी गर्दी नव्हती. पण काही लग्न झालेल्या आणि काही कुमारी अशा बहिणी नटून आपल्या भावाकडे निघाल्या होत्या आणि त्यांचं कुटुंब सोबत असल्याने काय ती थोडी फार रोजपेक्षा जास्त गर्दी. दरवाज्याच्या बाजूला सीटला समांतर असणाऱ्या जाळीच्या बोर्डला टेकून मी उभा राहिलो होतो आणि आठ दहा माणसे त्या पॅसेज मध्ये उभी होती. सीवुड स्टेशन ला ट्रेन थांबली आणि एक 12-13 वर्षाची मुलगी व तिच्याबरोबर दीड दोन वर्षाची लहान मुलगी ट्रेनमध्ये चढले. मोठी मुलगी काटकुळी...सावळी... केस सोडलेले आणि विस्कटलेले...चेहरा पूर्ण मळकटलेला...मळकट पंजाबी जांभळ्या रंगाचा ड्रेस तोही काळ्या रंगाच्या जवळपास गेलेला. एकंदरीत तिचा अवतार बघून एखाद्याला दया यावी, त्यापेक्षा ही अधिक कीळसच यावी आणि तिने आपल्याला हात लावून आपले कपडे खराब करू नये या विचाराने तिला एखाद्या रुपयाची भीक द्यावी अशी अवस्था. अशीही जर ती टापटीप व्यवस्थित कपड्यात आली असती तर तिला भीक कोण देणार आणि या दयेच्या आणि किळसवाण्या नजरा कदाचित वासनेत बदलतील याची जाणीव तिला पूर्णपणे असेल आणि तेवढी काळजी ही तिने घेतलीच होती. छोटीही थोड्या फार फरकाने अशीच...सावळी... बारीक विस्कटलेले केस...चेहरा मळकट पण ही बऱ्यापैकी जाडजूड होती...नाक गळत होत. ट्रेनमध्ये शिरल्याबरोबर दोघी माझ्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या. छोटी कदाचित कसलातरी हट्ट करत होती आणि मोठी मुलगी (तात्पुरती तिची ताई) त्यांच्या भाषेत तिच्याशी काहीतरी बोलत होती. भाषा मराठी किंवा हिंदी नसल्याने काही कळत नव्हती पण कदाचित ताईने आपल्याला उचलून घ्यावं असा काहीतरी तो हट्ट असेल. आणि एकंदर ताईची शरीरयष्टी पाहता हिला उचलून घेऊन ती फिरू शकेल असं दिसत नव्हतं. ती काही वेळ तिची समजूत काढत होती पण हीच नाहीचा पाढा चालूच होतं. भाषा कळतं नसेल तरी तिची नकारार्थी हलणारी मान स्पष्ट दिसत होती. समजावण्याचा कार्यक्रम जास्त वेळ चालू शकत नव्हता कारण यांचे स्टेशनही ठरलेलेच असतात. चुकून दुसऱ्या भिकाऱ्यांच्या स्टेशन पर्यंत हे गेलेच तर आपल्या एरियात आलेल्या कुत्र्यावर जशी कुत्र्यांची टोळी तुटून पडते तसे तिकडची भिकारी मुलं आणि माणसं तयारच असतात. अशी भांडणसुद्धा पाहण्याचा योग ट्रेनच्या प्रवासामुळे आला. शेवटी प्रत्येकाचंच पोट आहे. अर्धा एक मिनिट झाल्यानंतर छोटी ऐकत नाही बघून ताईने तिच्या कमरेला लावलेल्या झोळीतून 3-4 केळ्याचे वेफर्स काढले व तिच्या छोट्याशा मुठीत ते ठेवले. पुढे काहीच न बोलता ती आतल्या बाजूला भीक मागण्यासाठी शिरली. आता ही छोटी माझ्या बाजूलाच कुठलाही आधार न घेता उभी होती. एका हातातल्या मुठीत केळ्याचे वेफर्स व दुसऱ्या हाताने त्यातला एक घेऊन तो तोंडात टाकायचा आणि चावत असताना इकडे तिकडे बघत राहायचं असा तिचा कार्यक्रम सुरु झाला. जसा ट्रेनचा वेग वाढायला लागला तसा ट्रेनचा डब्बा हलायला लागला आणि त्याबरोबर ही सुद्धा. पण ती खाण्यात एवढी गुंग होती की ती पडेल याचा तिला अंदाज नसावा. कदाचित पहिल्यांदाच ती असा काहीतरी प्रकार खात असेल किंवा तिला भूकही लागली असेल. ट्रेनला थोडा ब्रेक लागला आणि ती पडणार इतक्यात तिच्या डोक्याला हात लावून तिला मी सावरलं. पण तरीही तिच लक्ष तिकडे नव्हतं. ती पुन्हा खाण्यात बिझी झाली.

तिच्याकडे बघत विचार करताना बरेच प्रश्न समोर येत होते. ही नक्की कुठून आली असेल? ही मोठी मुलगी नक्की हिची कुणी असेल का? या एवढ्या कोवळ्या वयात या मुलांकडे एवढी मॅच्युरिटी येते कुठून? जस आपण आपल्या मुलांना लहानपणापासून वेगवेगळे आजाराचे डोस देतो तसे यांना कोण देत असेल? यांचे तर खाण्याचे पण प्रॉब्लेम मग महागाईतले डोस तर लांबच राहिले. सरकारी हॉस्पिटलमध्ये मिळत असतील कदाचित फुकट पण ते घ्यायला हे कशाला जातील आणि त्यात वेळ घालवला तर त्या दिवसाच्या जेवणाचं काय? सहजच मी त्यांच्या आयुष्याची तुलना आपल्या आसपासच्या लहान मुलांच्या आयुष्याबरोबर करायला लागलो. आपल्या घरी बाळाच्या डोळ्यातून थेंब आपण जमिनीवर पडू देत नाही एवढी त्यांची काळजी घेतो आणि इकडे यांना रडल्याशिवाय भीक मिळत नाही. भुकेच रडणं तर आपल्याकडे वेगळंच मग त्यात हायजेनिक फूडच पाहिजे, थंड पाणी प्यायचं नाही, फिल्टरचच पाणी...काही ठिकाणी फिल्टरमधलं पाणी सुद्धा परत गरम करताना पहिलंय. या छोटीला काय मिळत असेल? ती दूध पिण्याच्या वयातच वडापाव खायला शिकली, पाणी तर स्टेशनवरचंच आणि ते त्याच मळकट हाताची ओंजळ करून प्यायचं. शिक्षण तर नाहीच पण तरीसुद्धा व्यवहार तर या वयातच ही मुलं शिकतात. या मुलांना या वयात जे जगाचं ज्ञान मिळतं ते आपल्याला मिळायला कित्येक वर्षे निघून जातात. म्हणून ही मुलं बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतात. जगण्याचा संघर्ष लहानपणासुनच त्यांनी केलेला असतो. रडून रडून डोळ्यातलं पाणी सुकून जात आणि मग ते रडणंच विसरून जातात. आपल्या आयुष्यातला यातला बराचसा संघर्ष आपल कॉलेज लाईफ संपल्यावरच सुरु होतो. कारण आपल्या घरातल्यानी आपल्या बाजूला संरक्षणाचं एवढं कवच करून ठेवलेलं असतं की आपल्या पंखाचा वापर हा उडण्यासाठीच आहे याचा विसर आपल्याला पडावा. कॉलेज संपल्यावर मग हे पंख पसरायला सुरुवात होते आणि दुनियादारी समजायला लागते. विचार चालू असतानाच ती छोटी पडणार नाही याची पण मी काळजी घेत होतो. तेवढ्यात मागून तिची ताई आली आणि तिने माझं शर्ट हाताजवळ दोन वेळा ओढलं. मी मागे पाहिलं तर तिने चेहरा पाडून तोंडाजवळ घासासारखा एक हात घेऊन गेली आणि दुसरा तळवा माझ्यासमोर आडवा धरला. अशी मुलं दिसली की मला शाळेतल्या पळशीकर बाईंचे शब्द अजून आठवतात,"भिकारी मुलांना कधीच पैसे द्यायचे नाहीत. एक दोन रुपयाने त्यांचं पोट भरत नाही आणि जरी तुम्ही पैसे दिले तर कदाचित ती मुलं नशा तरी करतील किंवा ते पैसे त्यांच्याकडे राहणार नाहीत. त्यापेक्षा त्यांना काहीतरी खायला द्या ज्याने त्यांचं पोट भरेल." मला ते त्यावेळी पटलं होत आणि मी अजूनही तेच करतो. माझ्याकडे खाण्याची कोणती गोष्ट नव्हती म्हणून मी नकारार्थी मान हलवली. तिनेही मला विनंती करण्यात जास्त वेळ घालवला नाही ती तशीच पुढे गेली. छोटीचा वेफर्स कार्यक्रम अजूनही चालूच होता. तिला जगाचा पूर्ण विसर पडला होता. ताई माझ्या आजूबाजूच्या माणसांकडे फिरली आणि शेवटी पुन्हा छोटी जवळ आली. जुईनगर यायला 1 मिनिटाचा वेळ होता आणि तेवढा वेळ ती तिच्याबरोबरच घालवणार होती. तिने छोटीला जवळ घेतलं तिच्या हातातली चिल्लर दाखवली आणि पुन्हा त्यांच्या भाषेत काहीतरी बोलायला लागली. बऱ्याच वेळाने छोटीच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आलं आणि ती ताईच्या बोलण्याला प्रतिसाद द्यायला लागली. जुईनगर स्टेशन आलं. छोटीने तिचा हात घट्ट पकडला आणि त्या दोघी माणसांमधून वाट काढत ट्रेन मधून उतरल्या. त्या दोघींचं काय नातं असेल हे नक्की माहित नाही, दोघी किती दिवसांपासून एकमेकींना ओळखतात ते पण माहित नाही. पण त्यांच्या वागण्यामध्ये जी मॅच्युरिटी होती त्यात त्या दोघींनी आयुष्यातल्या तडजोडीतून मार्ग काढून एक सकारात्मक भावना जपण्याचा निर्णय नक्कीच केला असेल यात वाद नाही.

===============================================================================

त्याच्या हातात खेळणं
माझ्या हातात डफ
आपल्याला असं मुळमुळीत जगताच येत नाय 
आपली जिंदगी एकदम रफ अँड टफ 


दिवसभर मस्त गाणी गात फिरायचं
कधी या ट्रेनमध्ये...तर कधी त्या 
लोकांना आवडेल न आवडेल 
अपुन को क्या?
पैसा मिळाला आपण खुश...
रुपया एक हो या दो 
बस कूच न कूच दो 
आपण आयतं नाही....दिवसभर कमवून खातो 
एका वडापावसाठी अख्खा दिवस घसा फोडतो 
ट्रेन्स बऱ्याच बदलतो...पण हातातून सुटत नाही डफ 
आपल्याला असं मुळमुळीत जगताच येत नाय 
आपली जिंदगी एकदम रफ अँड टफ 


धावती ट्रेन पकडणं..आईच्या पोटात शिकून आलो 
आई कोण माहित नाही....बचपन मे ही पोरका झालो  
आम्ही साले एवढे महाग...कि बापाला पण नाय परवडलो
टाकला असेल आई बापाने....पण आम्ही नाय रडलो 
एकटाच दुनियेला नडणार....स्वता कमवून स्वता खाणार 
दुनिया आमची नाय फिकर करत आम्ही त्यांची का करणार?
आपल्याला फक्त पैसा कळतो...भावनांचा कोण करत बसणार जप 
आपल्याला असं मुळमुळीत जगताच येत नाय 
आपली जिंदगी एकदम रफ अँड टफ 


शाळेत जायची कुणाला गरज..
पैश्यांचा हिशोब तर आपण आतापासून ठेवतो 
तुम्ही फक्त वहीत आकडेमोड करा 
आपण रोज स्वता पैशे मोजतो 
टारगेटवर काम तर तुम्ही वीस वर्षानंतर करणार 
आपण आताच टार्गेट मोडले..इतकी वर्ष वाट कोण बघणार ?
तुम्ही बॉसच्या शिव्या खा..आपण पब्लिक च्या खाणार
कितीही बेसुरा गात असलो..तरी कायम गात राहणार 
दिवसभर तुमच्या प्रोडकटचा होत नाय...तेवढा आपल्या गाण्याचा होतो खप 
आपल्याला असं मुळमुळीत जगताच येत नाय 
आपली जिंदगी एकदम रफ अँड टफ 


कधी आजारी म्हणून नकली आईसमोर झोपलो 
कधी आंधळा म्हणून आख्खी ट्रेन फिरलो 
पकडापकडी मुलांशी नाही ट्रेनशी खेळलो
घाण वाटावी म्हणून अंघोळ न करता मातीत लोळलो 
पैसा कमानेका आईडिया बहोत है
त्यासाठी कोणत्या कोर्से ची गरज काय 
ट्रेनमध्ये आपल्या फंटर लोकांना कुणी त्रास दिला तर आपण है ना भाय  
मार्केटिंग आणि शिव्या तर आपण प्रॅक्टिकलच शिकलो 
म्हणून तर या फालतू दुनियामध्ये आतापर्यंत टिकलो 
पोट दिलाय ना त्याने मग भरणार पण तोच 
आपण फक्त गात राहायचा ना चुकता रोजच्या रोज 
दुनिया तो लय भारी है...कही ना कही तो है रब 
आपल्याला असं मुळमुळीत जगताच येत नाही
आपली जिंदगी एकदम रफ अँड टफ 


वाटतं कधी कधी तुमच्यासारखंच शाळेत जावं
शिकता शिकता नवीन काही आपल्या मित्रांबरोबर रमावं
सुटल्यावर शाळा घरी येऊन आईच्या मिठीत जावं
भूक लागली म्हणून जे काही मिळेल ते खावं
घरचा अभ्यास....शाळेचा युनिफॉर्म....पट्टी....पेन्सील....आणि शाळेची सुट्टी... 
वाटत अधून मधून व्हावी कधी कधी मधली सुट्टी 
पण आम्हाला कोण शिकवणार ?
जे आमच्या नावाने पैसे घेणार ते तर ते स्वता खाणार 
आई बाप तर माहित पण नाहीत..त्यांची मिठी तर दूरच राहिली 
भूक लागल्यावर फक्त वडापावच...जेवणाची प्लेट तर फक्त दुरूनच पाहिली 
युनिफॉर्म कसला..अंगावर कापड मिळताना मारामार 
आज नाही काम केलं तर संध्याकाळी काय खाणार ?
वो सब झूठ है यार...आपली लाईफच मस्त 
रोजच टेनशन  कोण घेणार..आपल चाललय सगळं जबरदस्त 
भेजा बोलतो..परिस्थितीशी नडून काय फायदा...आता आहेस तसाच जग 
आपल्याला असं मुळमुळीत जगताच येत नाय 
आपली जिंदगी एकदम रफ अँड टफ 
       
- सुबोध अनंत मेस्त्री
9221250656


#sahajsaral

Comments

  1. हे दाहक वास्तव आहे. रफ टफ जगणं आहेच. लोक यांना झिडकारतातही, आणि अपेक्षाही ठेवतात की यांनी शिव्या देऊ नयेत, व्यसनं करू नयेत. रात्रीच्या अंधारात यांच्यासाठी प्लॅटफॉर्म, स्टेशन्स एवढे सुरक्षित असतील? हे रफ टफ अंकुरही धुमसत असतीलच की एखाद्या अंधाऱ्या कोपऱ्यात. पण उद्रेक झाल्याशिवाय आपली झापडं उघडत नाहीत. तू एक हळवा कोपरा ह्या छत्रहीन लहानग्यांसाठी राखून आहेस हे पाहून बरं वाटलं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी