Skip to main content

गोविंदा रे गोपाळा



"पप्पा, मी दीदीकडेच राहणार आहे.  परवा सुट्टी आहे मला", सार्थकने विचारलं नव्हतं तर मला डायरेक्ट सांगितलं होतं. 

"राहू दे त्याला.   परवा इथे लहान मुलांची हंडी करायचा प्लॅन केला आहे.  खाली बेसला एकच मुलगा आहे आणि बाकी तीन मुलीच आहेत. हा असेल तर बरं पडेल", दादाने दुजोरा दिल्यावर मी पण आढेवेढे घेतले नाहीत.  ते असेही नसते घेतले कारण त्याला दिदीची आणि मोठे पप्पाची कम्पनी किती आवडते हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे.    मी त्या चिमुरड्यांची दहीहंडी कशी असेल याची कल्पना करायला लागलो आणि त्याचबरोबर आमची दहीहंडी लहानपणी कशी होती त्या आठवणींवरची धूळसुद्धा आपसूकच उडायला लागली.

चाळ म्हटलं की प्रत्येक सणवार जोरदारच व्हायचा.  आमच्या चाळीत  जवळपास आमच्याच वयाची बरीच मुलं आणि तेवढेच आमच्यावर हक्क गाजवणारी दादा वयाची मुलं त्यामुळे प्रत्येक गोष्ट बॅलन्स होऊन जायची.  जेवढं घर लहान आणि माणसं जास्त तेवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क येण्याचं प्रमाण वाढतं आणि जेवढं घर मोठं आणि माणसं कमी तेवढाच त्यांचा आपापसातील संवाद कमी होऊन दुरावा वाढतो.  चाळ आणि फ्लॅट मधलं हे समीकरण इतक्या वर्षात चांगलंच लक्षात आलंय. 

चाळीत कोणत्याही सणाच्याआधी २-३ दिवस लोकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली असायची आणि तयारीसुद्धा जोरदार चालू असायची.  आमच्या चाळीबाहेरच एक डांबरी छोटा रस्ता होता.  तिथे छोटी छोटी दुकानं.  आमच्या चाळीची हंडी तिथेच लागायची.  ४ ते ५ थरांची.   जेव्हा मी खूप लहान होतो तेव्हा मला त्या हंडीच्या कार्यक्रमात घेत नव्हते कारण छोटी मुलं खाली बेसला राहू शकत नव्हती आणि वर जाण्याइतकी माझी हिम्मत नसायची.  पण हंडी फोडायचीच आहे हा हट्ट त्यामुळे माझ्यासाठी आमच्या घरात हंडी बांधली जायची.  आमचं घर म्हणजे आत चोकोनी आणि बाहेर दरवाजापर्यंत छोटा आयत.  त्या आयतामध्येच दरवाजा आणि शिडीला धागा बांधून एक फुगा पप्पा मधोमध बांधायचे.  आजूबाजूला एखादं दोन फळं.  मग दादा अण्णा मिठी मारून बेस तयार करायचे.  पप्पा त्यावर मला उचलूनच धरायचे.  आणि मग पिन लावून बर्थडेला फोडतात तसा फुगा फोडायचा की फुटली हंडी.  मग थोडा वेळ मोठ्याने ओरडत उड्या मारायच्या.  ही अशी हंडी मी कित्येक वर्ष खेळलो असेन.

नंतर नंतर जेव्हा समजायला लागलं तेव्हा मला दुसऱ्या तिसऱ्या थरावर घ्यायला लागले आणि मग माझी हंडी बाहेर रस्त्यावर व्हायला लागली.  बाहेरची हंडी म्हणजे फुल ऑन धिंगाणा.  स्पीकर सकाळी दहा पासून लागायचा आणी जी नाचायला सुरुवात व्हायची ती दुपारी एक दोन पर्यंत.  त्यातही दरवर्षी मोजकीच गाणी जी अजूनही हिट आहेत.  त्यातल्या त्यात "गोविंदा रे गोपाळा...खिडकीतल्या ताई अक्का वाकू नका...दोन पैसे देतो मला भिजवून टाका.." हे माझं कायम फेव्हरिट राहिलं.  रस्त्यावर एक छोटासा खड्डा असायचाच आणि त्यात चिखलाच पाणी.  मग जो कुणी नवा येईल त्याला त्या पाण्यात लोळवायच. हंडी फोडताना बरीच माणसं जमा व्हायची.  मग त्यात चाळीतल्या आणि चाळीबाहेरच्या पोरी पण.  अशावेळी इम्प्रेशन मारायला सगळीच पोर पुढे असायची.  बजेट फक्त २ हंड्याचं असायचं त्यामुळे हंडी लवकर कुणी फुटू द्यायचं नाही.  एकावर एक थर चढले की खाली बेसला असलेली पोर एकमेकांना लाथा मारायची मग आपसूकच वरचा ढिगारा खाली कोसळायचा.  जर प्यायलेली २-४ माणसं खाली आली तर मग अशी मस्ती करायची पण गरज पडत नव्हती.  ते असेच आपोआप हलायचे.  कधी चारही बाजूनी पाणी मारलं जायचं  मग मनभरून नाचून होईपर्यंत हंडी फुटायची नाही.  दुसरी हंडी फुटली की रश्शी खाली यायची आणि त्यावरची फळ आणि पैसे लुटायला एकच झुंबड उडायची.  त्यात जास्त करून मोठी मुलंच बाजी मारून न्यायची.  पण त्यांना ते मिळूनसुद्धा ते कधी आम्हा लहानग्यांच्या हातात आलं नाही असं झालं नाही.  सगळं वाटून खाल्लं जायचं.  मग त्यात रस्त्यावर पडलेलं असेल,  हात न धुता कापलेल किंवा तोडलेल असेल,  उस्टवून दिलेल असेल प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी हायजेनिकच होती.  आमची हंडी फोडून झाली की आजूबाजूच्या चाळीच्या हंडीला सलामी द्यायलासुद्धा आम्ही जायचो.

नंतर या हंडीचं स्पर्धेमध्ये रूपांतर झाल आणि आमच्या चाळीतली मुलं त्याकडे वळली.  अशाच एका स्पर्धेत माझ्या मामाचा मुलगा छातीवर पडून काही दिवसात वारला आणि यासारख्या अशा बऱ्याच बातम्या दहीहंडीच्या एक दोन दिवसात कानावर अजूनही येतातच. यात थ्रिल तर नक्कीच असतं पण त्या जीवावर बेतनाऱ्या नसाव्यात असं नेहमी वाटत राहतं. स्पर्धेपेक्षा चाळीतल्या हंड्याची मजा औरच होती. त्यादरम्यान आम्हीपण चाळ सोडून कामोठ्याला शिफ्ट झालो होतो.  बरेच वर्ष गोपाळकाळाच्या दिवशी चाळीत पुन्हा झालं नाही.  आज सकाळी मोठमोठ्या रकमेच्या हंड्याची बातमी टीव्हीवर पाहिली तेव्हा कुठेतरी पुन्हा हळहळलो.  उद्या नव्याने बातम्या नकोत असं कुठेतरी वाटून गेलं आणि  यात त्या जिंकणाऱ्या गोपालांच्या हातात नक्की किती रक्कम पडत असेल ही शंका पूर्वीसारखी कायम मनात तशीच.  ऑफिसला निघताना रस्त्यात ठिकठिकाणी छोट्या दहीहंडी लागल्यात का ते पाहत होतो पण एकाच ठिकाणी ती दिसली.  त्या बालगोपालांमध्ये मी स्वतःला काही वेळ शोधलं आणि पुन्हा ऑफिसच्या मार्गाला लागलो. पूर्वी चाळीत दिवसातले दोन तास पाणी येत होतं तरी आम्हाला भिजवणारे हात थकत नव्हते.  आता २४ तास पाणी आहे पण भिजवण्यासाठी बालगोपाल आसपास राहिले नाहीत.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
9221250656

Comments

  1. कडक, जबरदस्त, भूतकाळात रमवलंस!

    ReplyDelete
  2. Mast subodh da kharach aaj nahi ti Maja masti to khodkar pana asa kahich nahi Aata jitke jast thar titake Paise hach funda aahe
    So da but mast aahe...........

    I miss my Chawl dahi handi

    ReplyDelete

  3. सुबोध अगदी मनातलं लिहिलं आहेस. खरचं चाळीतली दहिहंडी एकदम भार्री होती. मला आठवतंय आमची चाळ मोठी होती बाहेर भरपूर जागा असल्यामुळे सगळे सणवार साजरे व्हयचे. सकाळी लवकर उठून वर्गणी काढून,तयारी करायचो. खाली डोळे बांधून हातात काठी देऊन गोल गोल फिरवून हंडी फोडायला तयार. गोल गोल फिरवल्याने मुलं हंडी च्या वेगळ्या दिशेनेच जायची आणि एकदा तो ती हंडी फोडायचा. मग वरची हंडी थर लावून फोडायची पण त्या आधी सर्वांच्या घरी जाऊन भिजून यायचा नाचायचा, मज्जा करायची.
    आताच्या दहीहंडी चे रूप बदललं आहे. राजकारण चालतं कोणाची हंडी किती उंच आणि किती पैसेवाली, त्यात हे बिचारे किती बाळगोपाळ जखमी होत असतील आणि किती मृत्यूच्या तोंडाशी. खरंच पहिल्यासारखे सणावाराचे दिवस पुन्हा येतील का हा प्रश्नच आहे.
    तुझ्या लेखामुळे पुन्हा बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. खूप मस्त लिहिलं आहेस, लेख वाचताना सगळं डोळयांसमोर उभं राहतं आणि त्यात गोंडस, नटखट दादा-अण्णा च्या खांद्यावर चढून फुगा फोडतो भारी एकदम.
    मज्जा आली..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी