Skip to main content

पत्त्यांचं घर"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला.

"हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला.

मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली.

"अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं.

"आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला.

"सात माळ्याचं", मी टारगेट दिलं.

"पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आश्चर्याने ओरडत प्रत्येक शब्दावर जोर देत कमरेवर हात ठेवून बोलत होता.

"का नाही? चार माळ्याचं बनवू शकतो मग तू सात माळ्याचं का नाही बनवू शकत?", माझे नेहमीचे मोटिव्हेशनचे डोस.

"तसं नाही पप्पा. मी बनवू शकतो.  पण एवढे पत्ते पुरणार आहेत का?", त्याची अगोदरची रिऍक्शन टारगेट वर नव्हती आणि कॅल्क्युलेशन पण बरोबर होतं.  "मला बाबांचे पत्ते घ्यावे लागतील अजून", त्याने मला आयडिया दिली.  अगोदर हा जुना पत्त्यांचा कॅट घर  बनवायला वापरत होता.  बाबांकडून मागायचे म्हणजे दिव्य.  पण त्याने विचारल्यावर बाबांनीही आढेवेढे घेतले नाहीत.

दुसऱ्या दिवशीच सकाळी अकरा वाजता तो घर बनवायला बसला.  गरम होत असताना बेडरूममध्ये फॅन न लावता तो बसला होता.  मध्येच असह्य झालं की बाहेर हॉलमध्ये यायचा आणि फॅन खाली थोडा वेळ बसून पुन्हा आत जायचा.  कित्येक वेळा बेडरूम मधून "शीट शीट शीट....ओह नो", असे त्याचे मोठमोठ्याने आवाज यायचे.  त्यावेळी घर कोसळतंय हे काही वेगळं सांगायला नको होतं. एकदा त्याने पाचव्या माळ्यापर्यंत घर बांधलं आणि मला बेडरूममध्ये बोलावलं.  हे घरसुद्धा त्याने भिंतीचा सपोर्ट न घेताच उभं केलेलं.  सहावा आणि सातवा माळा बांधताना मी तिथेच थांबावं अशी त्याची ईच्छा होती.  मी त्याचे फोटो काढले.  व्हिडीओ रेकॉर्डिंग ऑन केलं.

"पप्पा शेवटी पत्ते लावताना भीती वाटते", त्याने निरागसपणे सांगितलं.

"घाबरतोस म्हणून पडतं.  घाबरायचं नाही.  बिनधास्त लाव", मी त्याला धीर दिला.

"आणि पडलं तरी परत लावायचं", त्याने उत्तर दिलं.  सातवा माळा बांधताना पुन्हा डोलारा कोसळला.  तो अपसेट व्हायचा पण तेवढयापुरताच.   पुन्हा सुरु करायचा.   असं तीन चार वेळा झालं.   आणि शेवटी त्याने सात माळ्याच घर बांधलंच.  मला दाखवताना पुन्हा एकदा तो खुश झाला.  "आता किती?", त्याचा लगेच प्रश्न.

"दहा", त्याने माझं चॅलेंज स्वीकारलं.  त्या दिवशी तो रात्री साडे दहा पर्यंत तेच करत होता.  पण दहा माळ्याच घर काही बनलं नाही.  त्यानंतर तो बरेच दिवस प्रयत्न करत होता पण त्याचं घर काही बनत नव्हतं.  एकदा नऊवा माळा बांधताना सगळं घर कोसळलं.

"पप्पा मला वाटतंय दहा माळ्याच घर बनणार नाही", त्याने एका संध्याकाळी मला सांगितलं.

"पत्ते कमी पडतायत?", त्याने हार मानली नसावी या अंदाजात विचारलं.

"हो.  नवीन पत्ते आणावेच लागतील.", त्याचे नेहमीचे हातवारे आणि ऍकटींग.  मी त्याला पैसे देऊन दोन नवे कॅट आणायला सांगितले.  नवे पत्ते घर उभारताना टाईल्सवर सरकायला लागले.  पण त्याचा प्रॉब्लेम मी त्याच्यावर सोडला होता.   मध्येमध्ये त्याने प्रयत्न सोडला असं वाटलं की मी सहज विचारायचो.  "होईल ओ पप्पा", हे त्याचं उत्तर.

परवा संध्याकाळी ऑफिसमध्ये आमच्या व्हिडीओ चॅनेलच शूटिंग चालू असताना प्रतिभाचा मेसेज आमच्या फॅमिली व्हाट्सअँप ग्रुपवर आलेला पाहिला. त्यात काही फोटोज आणि व्हिडीओ होता.  त्याने दहा माळ्याच घर बांधलं होतं आणि मागे पोज देऊन उभा होता.  यावेळी मी स्वतः खूप खुश झालो.  सगळ्यांना आवर्जून कौतुकाने फोटो दाखवले.  व्हिडीओमध्ये तो आनंदाने नाचत होता.  यावेळी हॉलमध्ये घर बांधत असल्याने त्याने हॉलचे सगळे पंखे बंद केले होते.  आई बाबा हॉलमध्ये टीव्ही बघत असल्याने त्यांना गरमीतच बसावं लागलं होतं.   व्हिडीओ मध्ये एक वाक्य जो तो आनंदात बोलला आणि ते  माझ्या मनाला भावलं, "सगळ्यांना थँक यू बोलतो एवढ्या गरमीत राहण्यासाठी".  यश मिळाल्यानंतर समोरच्या व्यक्तींनी केलेला त्याग कळावा एवढा तो अजून मोठा नाही पण कधीकधी ही मुलं असं काही वागून जातात की जशी ती आपल्यालाच काहीतरी शिकवत आहेत.


आता सार्थक पंधरा माळ्याचं घर बांधायचं म्हणतोय 😊

(वरच्या व्हिडीओ मध्ये टिपलेले काही क्षण आहेत)

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…