Skip to main content

दोंत वरी



"आपल्याला आज घरीच थांबावं लागेल.  आज जर बाहेर पडलो तर पुढची पूर्ण पिकनिकची वाट लागेल", एकंदरीत प्रतिभाची अवस्था पाहून मी तिला सांगितलं.  तीसुद्धा काही ऑब्जेक्शन घेणार नव्हती कारण तिलाही फिरण्याची ताकद नव्हतीच.  तापामुळे तिचा अवतारच झाला होता. आमचं मुंबईतून निघाल्यापासून जवळपास तीसेक तास फिरणच चालू होतं.  त्यात सलग तीन फ्लाईट्स, एअरपोर्टवर जे स्नॅक्स आयटम मिळतील ते खाणं आणि मलेशियामध्ये आल्यानंतर आम्ही बुक केलेला बंगला (व्हीला) लंगकावीच्या एकदम वेगळ्या टोकाला असल्यामुळे आम्ही दिवसभर फिरून नंतर तिकडे जाण्याचा घेतलेला डिसीजन या सगळ्यामध्ये सगळ्यांची दमछाक झाली होतीच.  पण प्रतिभाच्या शरीराला ही धावपळ आणि ते जेवण मानवलं नाही.  रात्री तापाची गोळी घेतली होती पण तिचा ताप काही उतरला नव्हता.  आज बोटीने प्रवास करण्याचा प्लॅन होता त्यात तिचा ताप अजूनच फोफावला असता याचा अंदाज होता म्हणून ईच्छा नसतानाही हे डिसीजन.

बाहेर डायनींग टेबलवर सकाळी सगळ्यांना तो निर्णय सांगितला.  डॉक्टरकडे जाऊन येण्याचा सल्ला सगळ्यांनी दिला. मलाही तेच वाटत होतं.  आतापर्यंत या बंगल्याच्या मालकाशी अजयने को-ओर्डीनेशन केलं होत.  लंकावी स्टेच्या दोन दिवसासाठी आम्ही हा बंगला बुक केला होता. आमच्या बंगल्याच्या बाजूलाच मालकाचा बंगला होता.  ज्याच्याशी आम्ही नेहमी बोलायचो तो मालक तिथे राहत नव्हता पण त्याचे आई बाबा तिकडे राहत होते.  त्याच्या बाबांना काल संध्याकाळी आम्ही आलो तेव्हा पाहिलं होतं.  सफेद शर्ट, लुंगी आणि डोक्यावर मुसलमानी टोपी.  साठीच्या आसपास असतील.  आम्ही येण्याअगोदर त्यांनी बंगल्यामध्ये मच्छरांसाठी फॉगिंग करून घेतलं होतं.  आम्ही पोहचल्यावर बंगल्यात अजूनही धूर होता म्हणून खूप वेळा "सॉरी, फॉर फॉग" म्हटलं देखील होतं.


मालकाला अजयने कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन उचलला नाही.  आता सरळ बाजूच्या बंगल्यात जाण्याशिवाय पर्याय नव्हता.  दोन्ही बंगले मेन रोडला लागूनच होते.  आम्ही आमच्या गेटमधून बाहेर पडलो.  दोघेही शॉर्टसवरच होतो.  त्यांच्या बंगल्याच्या बाहेर एक छोटी मारुती 800 सारखी दिसणारी कार पार्क केलेली होती.  तिकडच्या कार कम्पन्या बऱ्यापैकी वेगळ्या आहेत.  आम्ही दरवाजावर बेल शोधली पण सापडली नाही.  हाक तरी काय मारायची?  दरवाजा ठोकण्याचा प्रयत्न केला.  एवढ्यात घराच्या बाजूच्या रस्त्यावरुन जाणारा एक बाईकस्वार आमच्याकडे संशयाने बघत थांबला.  तो इथेच आसपास राहणारा असावा.  आम्ही काही संशयापद हालचाली करतोय अस त्याला वाटलं असावं.  दरवाजा उघडत नाही बघून आम्ही दोघे परत निघालो तेवढ्यात मालकाचा कॉल आला.  त्याला परिस्थिती इंग्रजीमध्ये समजावली.  त्याला इंग्रजी चांगलं येत होतं.  पण त्याच्या बाबांना एक एक शब्द सांगावा लागायचा आणि तो ते पकडून अर्थ समजायचे.  त्याने लगेच घरी फोन केला असावा.  आम्ही आमच्या गेटवर येईपर्यंत बाजूच्या भिंतीवरून त्याच्या बाबांची हाक ऐकू आली.

"एनी डॉक्टर हिअर?", अजयने विचारलं.

"डॉक्टर?  या या.  हॉस्पितल हिअर. तू किलोमीतर", त्यांनी सांगितलं.  इथल्या इंग्लिश बोलण्याची टोन बऱ्यापैकी चायनीजसारखीच असते.

"नो. वि नीड डॉक्टर.  नॉट हॉस्पिटल", माझ्या या वाक्यावर डॉक्टर आणि हॉस्पिटलचा संबंध नसावा का? असा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर उमटला.  "क्लिनिक", मी अजून एक बाण मारून बघितला.

"या या क्लिनिक.  देअर", त्यांनी सांगितलं.

आम्ही टॅक्सी करून जाण्याचा प्लॅन करत होतो.  पण नक्की अड्रेस त्यांनाही सांगता आला नसता कदाचित कारण ते अजून हॉस्पिटलवरच होते.  "दोंत वरी...माय कार", त्यांनी खानाखुणांनी मी घेऊन जातो असं सांगितलं.

"हाऊ मच डॉक्टर चार्ज?", आपल्यासारखे त्यांच्याकडेही व्हिजिटिंग चार्जेस असतील या अंदाजाने मी विचारलं.

"ओहह...हॉस्पितल...हंद्रेड रिंगीट", त्यांनी अंदाज सांगितला.

हॉस्पिटल 100 रिंगीट (भारतीय जवळपास दोन हजार) घेत असतील तर प्रायव्हेट डॉक्टर त्यापेक्षा कमी घेईल या अंदाजाने मी 70 रिंगीट अरेंज केले आणि काही इंडियन रुपीज बरोबर घेतले होते.  मी आणि प्रतिभा तयार होऊन बाहेर येईपर्यंत ते कारजवळ चावी घेऊन उभे होते.  "कम कम.  सीट",  त्यांनी दरवाजा उघडून दिला.  मी पुढे त्यांच्याबरोबर बसलो आणि प्रतिभा मागे.

गाडीतून जाताना पुन्हा तोडक्या मोडक्या भाषेत संवाद सुरू झाला.  तिथे या अगोदर दोघातिघांशी बोलताना मुंबईमधून आलोय हे सांगितल्यावर त्यांच्या जशा एक्सप्रेशन होत्या तशाच यांच्याही होत्या.  मुंबई भारताबाहेर खूप फेमस आहे हे इथून समजलं.  त्यांनी आम्हाला क्लिनिकसमोर सोडलं व गाडी पार्क करायला पुढे निघून गेले.  मलेशियामध्ये इंग्रजी शब्दात सी ऐवजी के लावण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी पाहिली होती.  "KLINIK DR. NAGA" बाहेर मोठी पाटी लावली होती.  आत समोरच आपल्याकडे असत तस एक मोठं कम्पाउंडर केबिन आणि त्याला लागून डॉक्टरची केबीन.  बाहेर पेंशटला बसण्यासाठी मोठं स्टोरेज कम टेबल.  मी अपॉइंटमेंटसाठी त्या अर्धगोलाकार कम्पाउंडर काउंटरपाशी आलो.  त्यांच्या मुस्लिम लोकल  पोशाखातली पूर्ण चेहऱ्यावर कापड गुंडाळलेली कम्पाउंडर स्माईल देऊन त्यांच्या भाषेत काहीतरी बोलली.  मी "आय डोन्ट अंडरस्टँड युअर लँग्वेज" असं म्हणालो.

"ओके, युअर पासपोर्ट प्लिज", तिने मागणी केली.  इकडे ही गोष्ट आवर्जून पाहिली की त्यांची लोकल भाषा येत नसेल तर ते लगेच पासपोर्ट विचारतात.  मी लागेल ती माहिती देऊन अपॉइंटमेंट बुक केली.  मी बसेपर्यंत बाबा गाडी लावून आले होते.

नंबर आल्यावर आत आलो.  हा डॉक्टर भारतातलाच वाटत होता.  एकदम साऊथ इंडियन लूक विथ सफेद टीका.  साईबाबांचे भक्त आहेत हे त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या मूर्तीवरून लगेच समजत होत. मी त्यांच्याशी तसा संवाद साधला तेव्हा समजलं की त्यांचे आजोबा भारतातून तिकडे स्थायिक झाले होते.  त्यांनी तपासणी करून घेतली.  भाताची पेज द्या हे त्यांनी मला समजावताना आणि मला ते समजताना बरीच कसरत करावी लागली.  त्यांना धन्यवाद देऊन पुन्हा काउंटरला आलो तेव्हा तिथल्या लेडी कम्पाउंडरने सगळी औषध कशी घ्यायची हे समजावून सांगितलं.  यांची प्रिस्क्रिप्शन पद्धतही खूप वेगळी आणि मस्त होती.



"हंद्रेड रिंगीट", तिने माझ्याकडे पाहून स्माईल देत सांगितलं.

"हंड्रेड?", माझ्याकडून झटकन रिऍक्शन गेली.  कारण मी तेवढे एक्सपेक्ट केले नव्हते आणि आणलेही नव्हते.

"या वि जनरली चार्ज फॉरेनर मोर.  बट नॉट फ्रॉम यु", तिने पुन्हा हसतमुखाने सांगितलं.  माझ्याकडे तेवढे रिंगीट नव्हते.  कन्व्हर्ट करावे लागणार होते.  तिने मला समोरच असलेलं ते करन्सी एक्स्चेंजच शॉप दाखवलं.  मी जाऊन पैसे कन्व्हर्ट करून आणले.  तिथून निघालो.  इतका वेळ बाबांना वाट पाहावी लागली होती.

"वेत हिअर.  कार", ते कारच्या दिशेने गेले.

"सॉरी.  वि मेक यु वेट फॉर लॉंग",  कार आल्यानंतर आत बसतानाच मी थोडा कृतज्ञतापूर्वक म्हणालो.

"नो. नो.  दोंत थिंक.  यु माय गेस्ट", त्यांनी माझ्या गुडघ्यावर आपुलकीने दाबलं आणि हसत म्हणाले.  तांदूळ घ्यावे लागतील हे जमेल तसं मी त्यांना समजावलं.  "राईस" हा शब्द त्यांनी पकडला.  एखादं किराणा शॉप टाईप दिसतंय का ते पहात होतो पण ते एका मॉलजवळ घेऊन आले.  सुटे तांदूळ मिळतील का इथे? हे त्यांना कसं विचारू हेच कळत नव्हत कारण अर्धा किलोपेक्षा जास्त आम्हाला लागणार नव्हते.

"हिअर हाऊ मच क्वांटीटी? वि नीड हाफ किलो", मी पण आता त्यांची इंग्रजी बोलायला लागलो होतो.

"हिअर 5 केजी मिनिमम", ते जागेवर थांबले.

"नो लूज राईस?  डोन्ट रिकवायर फाईव्ह केजी", मी सांगितल.

"टेक फ्रॉम माय होम.  कम कम", त्यांनी माझ्या खांद्यावर हात टाकला आणि पुन्हा कारच्या दिशेने चालायला लागले.  त्यांना आधीच खूप त्रास दिला होता अजून कुठे म्हणून मी टाळत होतो.  पण त्यांनी माझं ऐकलं नाही.

"यु माय गेस्ट.  आय गिव", असं म्हणत त्यांनी मला गाडीपर्यंत आणला.  गाडीतून जाताना पुन्हा गप्पा सुरु होत्या.  लंगकावीची लोकसंख्या काही हजारावर आहे पण इथे दरवर्षी जवळपास 50 मिलियन (५ करोड) टुरिस्ट येतात अस त्यांनी सांगितलं.  हे बेट होत पण त्याच क्वालिटीचं.  बंगळ्याजवळ गाडी लावल्यावर ते मला आत घेऊन गेले आणि एका प्लास्टिक बाउलमध्ये बासमती तांदूळ आणून दिले.   अशावेळी त्यांना पैसे विचारणं हा त्यांच्या प्रेमळपणाचा अपमान झाला असता म्हणून टाळलं.

"आय होम.  एनी रिकवायरमेन्ट, कॉल मी.  टेक केअर प्रतिभा", त्यांनी पुन्हा माझ्या पाठीवर थोपटून सांगितलं.  आमच्या बंगल्याच्या किचनमध्ये बाकी सगळं सामान होतच.  मी त्यांना बऱ्याच वेळा मनापासून धन्यवाद देऊन निघालो.

दुसऱ्या दिवशी सकाळी आमची ८.५० ची सिंगापूर फ्लाईट होती.  आम्हाला सहाला घर सोडावं लागणार होतं.  आता प्रतिभाही बरी झाली होती.  मला निघताना पुन्हा बाबांना भेटायचं होतं आणि त्यांना ते सांगायचं होत पण त्यांचा दरवाजा उघडा नव्हता.  अजयने मालकाला फोन केले पण तोही फोन उचलत नव्हता.  पहिल्या आलेल्या टॅक्सीने आम्ही चौघे निघालो.  अजय नंतरच्या टॅक्सीने येणार होता त्यामुळे त्याला बाबा भेटले आणि त्यांनी प्रतिभाची चौकशीही केली.   

आमच्या विमानाने लंगकावी बेट सोडून सिंगापूरला जाण्यासाठी आकाशात भरारी घेतली होती.  माणुसकीला भाषेची गरज नसते हेच खरं.  ते बाबा आणि त्यांचं "दोंत वरी" मनात घर करून गेलं.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

#sahajsaral

Comments

  1. सुबू खूपच हृदयस्पर्शी लिखाण. त्यादिवशी तुझ्यासोबत थांबता आलं नाही. संपूर्ण दिवस तुमच्याकडे लक्ष लागून होतं. डॉक्टरने काय सांगितलं असेल, तुम्ही काय खाल्लं असेल असे अनेक प्रश्न. तुझ्या या लेखातून आम्ही न पाहू शकलेला दिवस तू जगवलास...हॅट्स ऑफ टू बाबा...त्यांचा बंगला आणि तिथला स्टे विसरता येण्याजोगे नाही.
    लब यू बाबू!👌

    ReplyDelete
  2. जर त्या दिवशी डॉक्टर कडे गेलो नसतो तर नक्किच आपली पुढची सिंगापूर पिकनिक नसती झाली. माझ्या मनातल्या गोष्टी तुला समजतात आणि डॉक्टर कडे नेल्यामुळे मला बरं वाटलं. खूप छान पिकनिक झाली आपली थँक्स असाच माझ्यासोबत रहा..☺😊

    ReplyDelete
  3. बंधू.. अप्रतिम लिखाण आणि घटनेला मिळालेला त्यांचा प्रतिसाद तर उल्लेखनियच.

    ReplyDelete
  4. दादा, तुझ्या वर्णनातून मी देखील मलेशियाचा फेरफटका मारला फारच अप्रतिम

    ReplyDelete
  5. Vry nyc...dada....😊😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"उद्योजकतेची दिवाळी"

  "पप्पा, मी यावर्षी पण कंदीलाचा बिजनेस करणार आहे", सार्थक मोठ्या उत्साहात परवा मला सांगायला आला. "कस्टमर कोण? अजय काका?", मी गमतीने विचारले.  गेल्यावर्षी बिजनेसच्या पहिल्या वर्षात अजय काका हा एकच कस्टमर होता. सार्थकला प्रोत्साहन म्हणून त्याने कंदील घेतले आणि पेमेंट म्हणून काही शेअर्स त्याला गिफ्ट म्हणून पाठवले. "यावर्षी अजय काकाला आम्ही पार्टनर म्हणून घेणार. प्रत्येक कंदीलामागे कमिशन देणार", सॉफ्टवेअरमध्ये बिजनेस डेव्हलपमेंटच काम बघणारा अजा, कंदील विकताना कसा दिसेल या कल्पनेने हसू आलं.  अजय काका सार्थकचा हक्काचा माणूस आहे.  आणि अजय काकाला पण सार्थकचं भारी कौतुकही आहे. "परीक्षा संपल्यावर सगळं", मी सार्थकला सांगितलं. आज परीक्षा संपवून घरी आला आणि अण्णासोबत जाऊन त्याने कंदीलाच सामान आणलं. अण्णाकडून मदतीच प्रॉमिस घेतलंच होतं. पार्टनरशिपची ऑफर टाकण्यासाठी अजय काकाला फोन करा म्हणून माझ्या मागे लागला होता. पण हे सगळं त्यानेच करावं हे त्याला मी सांगितलं. फोन लावून त्याच्याकडे दिला पण लाजत असल्याने तो धावत मम्मीकडे गेला. मम्मीनेही माझं बोलणं ऐकलं असल्याम