Skip to main content

देवाला जागा नाही...


नेहमीप्रमाणे रस्ता क्रॉस करून मी मैत्रीपार्क बस स्टँडच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या साईबाबा मंदिराच्या बाहेर पोहचलो.  सहाचा क्लासमध्ये लेक्चर आहे तर आता परत जाताना घाई करावी लागेल या विचारात असतानाच समोर पाहिलं तर नेहमी मंदिराबाहेर रस्त्यावर दिसणाऱ्या हारवाल्या मावशी दिसल्या नाहीत.  तिथे काही म्हातारे आजी आजोबा पण काही मिळेल या आशेने बसलेले असायचे ते पण दिसत नव्हते.  डावीकडे मंदिरात जायला वळालो तर मंदिराच्या गेटवर कापड टाकलं होतं.  त्यामुळे आतलं काही दिसत नव्हतं.  गेटबाहेच्या दोन शिड्या तोडल्या होत्या.  मागच्या बाजूने मंदीरात शिरण्याचा रस्ता मला माहीत होता.  काहीतरी काम चालू असेल या विचाराने मी आत शिरलो.  आत एक वयस्कर बाई मांडी घालून गाभाऱ्यात पाहत बसल्या होत्या.  आत शिरल्यावर गाभारा पाहिला आणि अंगावर काटा आला.  गाभाऱ्यात दिमाखात असणारी साईबाबांची ती उंच मूर्ती तिथे नव्हती.  आजूबाजूच्या सगळ्याच मुर्त्या नव्हत्या.  तिथे तोडफोड झालेली दिसत होती.  मला काहीच कळेना.  तरीही नमस्कार करून बाहेर पडलो आणि गेटजवळच उभा राहिलो.  तिथे नेहमी काम करणारी कुणी ना कुणी माणसं असायची पण आज कुणीच नव्हतं.





"रिनोवेशनच काम चालू असेल का? पण चालू असेल तर मूर्ती का काढतील? मंदिर बंद झालंय?", मी माझ्याच विचारात तिथेच थांबलो होतो.  कुणाला विचारू आणि काय करू सुचत नव्हतं.  मागच्या गुरुवारीच मी तिथे येऊन गेलो होतो आणि सगळं व्यवस्थित होत.  आता त्या मंदिराची लया पूर्ण गेली होती.  मी विचार करत असतानाच दोन वयस्कर माणसे आणि एक तरुण मुलगा तिथे आला.  त्यांनी गेटवर कापड टाकलेलं पाहिलं.

"मंदिर बंद है क्या?", त्यातल्या एकाने विचारलं.

"पता नही.  मुझे भी समझ नही आ रहा.  अंदर मूर्ती भी नही है.", मी हतबल असल्यासारखा उत्तरलो.

"जा बेटा अंदर जाके पुछ", एकाने त्या मुलाला सांगितलं.  तो मुलगा मागच्या बाजूने आत गेला.  बाजूच्या बिल्डिंगचे सेक्युरिटीची काही माणसं बाहेर खुर्च्या टाकून बसली होती.  आमच्यातला एक जण त्या सेक्युरिटी गार्डकडे जाऊन विचारू लागला तेव्हा मी ही पुढे गेलो.

"टूट जायेगा मंदिर साब.  टॉवर बननेका है इधर.  केस चालू था बहोत टाइम.  ये लोग हार गया", त्या गार्डला पण या गोष्टीच वाईट वाटलं होतं.

"फिर वो मूर्ती किधर है?", मी अधीरपणे विचारलं.

"घर पे लेके गये वो लोग.  अब उनके घर पे ही स्थापन करेंगे", त्याने सांगितलं.  एक क्षण खूप विचित्र फिलिंग मनामध्ये येऊन गेली.  म्हणजे पुढच्या गुरुवारपासून इकडे येणं होणार नाही हा विचारच कुठेतरी विचित्र वाटला.

मी दहावीला असताना आमच्या क्लासमधला मित्र मयूर आमच्या पूर्ण ग्रुपला एका गुरुवारी संध्याकाळी क्लास सुटल्यावर या मंदिरात घेऊन आला होता.  तिथे टेस्टी समोसा मिळतो, चांगला प्रसाद खायला मिळतो हे ऐकून आम्ही सगळे तिकडे गेलो होतो.  मंदिराबाहेर रस्त्यावर मोठी लाईन बघून विचार बदलला होता पण नंतर सगळ्यांनी थांबण्याची तयारी दाखवली म्हणून मीही थांबलो. जेव्हा पाहिल्यांदा बाबांची ती संगमरवरी मूर्ती पाहिली तेव्हा तिच्याशी आपोआप एक नात जोडलं गेलं.  मंदिरात मूर्तीच्या खालीच एक पाटी होती ज्यावर तिच्या स्थापनेची तारीख १९८५ सालची दिली होती.  माझ्या जन्मवर्षातलच ते मंदिर होत.  मंदिराच्या आतच एक झाड होत ज्याच्या बाजूने कठडा बांधला होता.  तिथल्या शेवबुंदीची चवही खूपच वेगळी होती. हळूहळू बाबांबरोबरच नात इतकं घट्ट झालं की  माझ्याबरोबर येणाऱ्या ग्रुपमधले मित्र काही वर्षात त्यांच्या इतर कमिटमेंटमुळे एक एक करून गळून पडले पण मी गेली १८ वर्ष दर गुरुवारी सलग त्या मंदिरात येत राहिलो.  पाऊस असेल, रात्री लेट झालं किंवा काहीही असेल, मी मुंबईत असलो तर आवर्जून जायचो.  ते मंदिर ज्यांनी बांधलं होतं त्यांची अख्खी फॅमिली नेहमी तिकडे असायची.  नावाने ओळख नसेल तरी तोंडओळख तर खूप चांगली झाली होती.  संध्याकाळी लवकर गेलो की कधी तिथे म्हाताऱ्या बायका मिळून भजन करत असायच्या नाहीतर कधी फक्त ध्यानस्थ बसलेल्या.  रात्री लेट झालं की पुन्हा तशीच मोठी लाईन. मंदिरात यायला मिळावं म्हणून मुद्दाम माझा लेक्चर पण मी गुरुवारी संध्याकाळीच गोवंडीच्या क्लासवर लावायचो.  गोवंडीपासून मंदिरात जाताना माझं बालपण ज्या घाटल्यात गेलं तिथूनच रस्ता जात असल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा.  कधीतरी कुणी ओळखीचं भेटायचं.  कधी लेट झालं तर ठरवून कामावरून आलेल्या एखाद्या मित्राबरोबर जायचो आणि त्यानिमित्ताने गप्पा व्हायच्या.

"तू एवढ्या लांब मैत्रिपार्कला का जातो? एवढी मंदिरं असतात प्रत्येक एरियामध्ये.  इकडच्या साईबाबांमध्ये पॉवर नाय का?", कितीतरी मित्रांनी मला मस्करीत हे विचारलं असेल.  मी फक्त हसायचो. होय, मैत्रीपार्कच्या मंदिरामध्ये, तिथे जाणाऱ्या रस्त्यामध्ये , आजूबाजूच्या वातावरणात मला दर आठवड्याला चार्ज करण्याची पॉवर होती.  कारण प्रत्येक ठिकाणी माझ्या इतक्या वर्षाच्या जुन्या आठवणी दडल्या होत्या.  त्या बाबांच्या मूर्तीला इतकी वर्षे पहायची भेटायची सवय लागली होती.  पण आता इकडे मुद्दाम येण्याचं निमित्त संपलं होतं.

"त्या हारवाल्या मावशींचा धंदा तर बंद होईल आता", एकवेळ उगाच वाटून गेलं.  पण मंदिरांची आपल्याकडे कमी नाही.  त्या दुसरं मंदिर शोधून कुठे ना कुठे बसतीलच.  मंदिराबाहेर खाण्यापिण्यासाठी काहीतरी मिळेल म्हणून  नेहमी जे आजी आजोबा बसायचे तेसुद्धा आता पर्यायी जागा शोधतील.  शिवाय मीसुद्धा आता चेंबूरच्या दुसऱ्या मंदिरात जाण्याचा विचार केलाच होता.  ज्या बाबांकडे नेहमी एवढी लोक काही न काही अपेक्षा घेऊन भक्तिभावाने यायचे, बाबा त्यांची ईच्छा पूर्ण करतील या अपेक्षेवर राहायचे, त्या बाबांना स्वतःची जागाही वाचवता आली नव्हती.  त्या निर्जीव पण बोलक्या मूर्तीबद्दलही वाईट वाटून गेलं.  हे मंदिर आता माणसाच्या हव्यासापोटी जमीनदोस्त होईल आणि पुन्हा पाहायला मिळणार नाही म्हणून मी निघताना मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो काढून घेतले.  आयुष्यात काहीतरी गमावून बसल्यासारखा क्लासच्या मार्गाला लागलो.  मध्येच मोठा रस्ता खोदुन नवा रस्ता टाकण्याचं काम जोरदार चालू होतं.  बऱ्याच गोष्टी आता नव्याने सुरु होणार होत्या.

सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी