Skip to main content

वाघ रस्त्यावर...
=================================================================================

हे शीर्षक वाचून मला वाघ दिसला असा तुमचा समज झाला असेल तर तसं नाही. नुकतंच अनिल अवचट यांचं "दिसले ते" पुस्तक वाचलं. त्यात याच शीर्षकाचा एक लेख होता. वाघ लोकांच्या वस्तीत फिरू लागले की लोकांनी जायचं कुठे? याउलट जर आपण त्यांच्या वस्तीवर आक्रमण करतोय तर त्यांनी जायचं कुठे? हा प्रश्न त्यांच्या अनुभवांसकट त्यांनी खूप मस्त शब्दात मांडला होता. तो लेख वाचताना काही माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या या लेखाद्वारे तुमच्यासमाेर मांडतोय.

=================================================================================

माझं लग्न झालं आणि त्यावर्षी गणपतीत आम्ही गावी गेलो होतो. श्रावणातलं कोकण म्हणजे स्वर्गाचं आपल्या मनी रेखाटलेल चित्र अगदी तसाच. सगळीकडे फक्त हिरवंगार वातावरण. वाहणारे ओढे आणि नद्या आणि त्यांचा होणार नादयुक्त एकलयी आवाज. सगळं वातावरण एकदम प्रसन्नच असत. आम्ही नवं जोडपं असल्याने पप्पा आम्हाला आमच्या बऱ्याच नातेवाईकांची गाव फिरवणार होते त्यामुळे मी मोठी सुट्टी टाकून गावाला गेलो होतो. त्यातलं एक गाव होतं रोहिले. माझ्या आत्येची (आम्ही तिला माई म्हणतो) मुलगी शैलाताई तिकडे राहते हे मला माहित होतं. भावोजी बऱ्याच वेळेला काही ना काही निमित्ताने मुंबईत येऊन गेले होते पण ताईला मी खूप लहान असताना पाहिलं होतं. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी आम्ही भेटणार होतो. तीच गाव समुद्राच्या किनाऱ्यालाच आहे आणि गावाला जाणारा रस्ता समुद्राला वळसा घालून जातो असं पप्पानी सांगितलं होतं त्यामुळे माझी उत्सुकता अजून वाढली होती.

आदल्या दिवशी मूर्तवडेला माईच्या घरी आलो व तिथून अबलोलीमार्गे रोहिल्यात जायचं होतं. मूर्तवडे ते अबलोली प्रवास एस. टी. ने सहज झाला. माई आणि तिचा मुलगा विकास दादापण आमच्यासोबत आले होते. एस. टी. तून जाताना विकास दादाने दोन मोठ्या उधाणलेल्या नद्यांचा संगम आम्हाला दाखवला. नुकताच मुसळधार पाऊस पडून गेला असल्याने नद्यांच पाणी पूर्ण गढूळ झालं होत. दोन बहिणी बऱ्याच वर्षांनी एकमेकांना पाहिल्यावर जशा धावत येऊन एकमेकींंच्या मिठीत विलीन होऊन जातील तसंच त्या उधाणलेल्या नद्यांचे प्रवाह दोन्ही बाजूनी एकत्र येऊन एकमेकांवर आदळून विलीन होऊन पुढे जात होते. तो फोर्स एवढा जास्त होता की त्यात चुकून मोठा हत्ती जरी पडला तरी तो पुढच्या क्षणाला दिसेनासा झाला असता. थोडं पुढे गेल्यावर एक मोठी नदी आणि सागराचा संगम पण दिसत होता. या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी आणि प्रतिभासाठी खूप नवीन होत्या. अबलोलीच्या पुढे जाण्यासाठी गाड्या कमी होत्या. पुढच अंतर आम्हाला प्रायव्हेट रिक्षाने गाठाव लागलं. ती रिक्षा जेव्हा समुद्राला वळसा घालत होती तेव्हा तो चमचमणारा समुद्र, मध्ये लागलेलं सुरुच्या झाडांचं बन आणि पुढे चकचकीत वाळूचा लागलेला मोठाच्या मोठा बीच हे सगळं मनामध्ये एका चित्रासारखं कोरल गेलं.

पुढे एक छोटा पूल क्रॉस करून रिक्षा थांबली. पुलाखालून मोठी नदी वाहत होती. नदीच्या उजव्या बाजूला काही नारळाची झाड आणि काही घरं दिसत होती. डाव्या बाजूला नदीच्या किनाऱ्यापासूनच झाडी आणि डोंगर सुरू होत होता. मला ती घरं पाहून तिकडे जायचय अस वाटलं होतं पण उलट झालं. दादा त्या रस्त्याला लागून जंगलाकडे जाणाऱ्या पायवटेला घुसला. त्याच्या मागून आम्ही बॅग घेऊन निघालो. थोडं अंतर चालल्यावर वाटेत एक खूप जुनाट कौलारू घर लागलं. कोकणात अस एकदम कोकणी थाटातलं घर मी खूप वर्षांनी पाहिलं. पुढे आंगण, तिथून दोन पायऱ्या चढलो की आडवी मोठी पडवी, त्याच्या वर ओटा आणि मग दरवाजा. घर पूर्ण मातीच होत. विकास दादाने सांगितलं ते 300 वर्ष जून घर होतं. आमच्या आवाजाने तिथे घरी असणाऱ्या एक पंचेचाळीशितल्या काकू बाहेर आल्या. त्या विकास दादाला ओळखत होत्या. त्यांनी विचारपूस केल्यावर आम्ही पुढे निघालो. पुढे दोन तीन मिनिट चालल्यावर एक फाडीच घर लागलं. घरापुढे छोटं मोकळं आंगण होत आणि पुढे पुन्हा जंगल चालू होतं होत. वातावरण एकदम मस्त होत. आम्ही सगळेच खुश झालो होतो. भावोजी आणि ताई आमची वाट बघत होतेच. घरी जाऊन फ्रेश झालो नाश्ता करून मी, प्रतिभा, विकास दादा आणि शैलाताईचा मुलगा जो त्यावेळी दहा बारा वर्षांचा असेल असे आम्ही नदीकिनारी गेलो. निघताना जास्त जंगलात जाऊ नका असं शैला ताईने सांगितलंच होत. नदी लांबच्या लांब पसरली होती. मला वाटलं होतं की ही दोन घरं सोडून आजूबाजूला पुढे अजून घरं असतील पण पुढे फक्त जंगलच होतं.

फिरून घरी आल्यावर शैलताईचा मुलगा बाजूच्या मुलांबरोबर खेळायला गेला आणि थोड्या वेळाने धावत "आये आये" ओरडत घरी आला. आमच्या घरी गप्पा चालू होत्या.

"आये, वरती नदीच्या काठावर दगडावर रानातला बसलाय. त्याला बघून सगले पलाले", कोकणातल्या माणसांची "ळ" आणि "ल" मध्ये गडबड असतेच. मला रानातला म्हटल्यावर समजलं नाही म्हणून मी ताईला विचारलं तेव्हा समजलं की तो वाघाबद्दल बोलत होता. ते ऐकून आम्हाला धडकीच भरली. प्राणीसंग्रहालयामध्ये पिंजऱ्यात फिरणारा वाघ बघतानाच दहशत वाटते आणि इथे हा जंगलात मोकळा फिरणारा वाघ आणि तोही फक्त काही अंतरावरच होता हे ऐकुन पोटात गोळा आला.

"वाघ आहेत इथे?", प्रतिभाच्या तोंडून भीती आणि आश्चर्य एकत्रित करून प्रश्न आला.

"होय घरात येत नाय. घाबरू नको", ताई हसत सांगायला लागली.

"आपल्या घराच्या बाजूनं पण फिरतो रात्री बऱ्याच वेळा. मी बघितलाय स्वतः. आयेने पन बघितलाय", शैला ताईच्या या वाक्याला माईनी होकारार्थी मान हलवत दुजोरा दिला. ती एका बाजूला अडकित्यावर सुपारी कातरत होती. वाघाबद्दल सांगताना शैला ताई तीच काम सोडून वाघाची बसण्याची, इकडे तिकडे बघण्याची अँकटींग करून दाखवत होती. ते बघताना गम्मत वाटली. पण तो रात्रीचा घराच्या बाजूला येतो ऐकून भीतीसुद्धा वाटत होती.

"माणसाला नाय ओढलान अजून. फक्त कुत्री नेतो दिसली की. बाजूच्या घरातली नेलान. म्हणून जाळीत लावून ठेवतात ती आता. रात्री तो आला की एवढ्या जोरजोरान केकटतात की गाव जागवतील. त्यांच्या ओट्यात लय वेळा गेलाय. त्यांनी दरवाजाच्या फटीतन जवळून बघितलाय त्याला", ताईच्या कोकणी स्टाईलमध्ये हे सगळं ऐकताना भारी वाटत होतं. तिने तिचा एक किस्सा सांगायला सुरुवात केली ज्यात तिने जंगलात वाघाला पाच दहा फुटवरून पाहिलं होतं.

"पोर शालत गेलेली आनी मी बाजाराला गेलेलं. येताना एव्हड्या लांबन कशाला यायचं म्हणून मी जंगलाच्या एका शॉर्टकटन आलेय. आणि घराच्या वरच्या बाजूला उतरणीला असताना बघतेय तर हा माझ्यासमोर पाठमोरा उभा. माझं पाय लागलं लटपटायला. डोक्यावर पिशवी. पलालो तर पकडंल म्हणून मी जागेवरच राहीले. पण चप्पल थोडी निसाटली. त्यानं फक्त मान फिरवून माग बघितलान. मला वाटलं आता मुडदा पाडतोय माझा. पण काय नाय तसाच पुढं निघून गेला आपल्या वाटेनं. तो गेल्यावर पिशवी टाकून मी अशी पळालय सांगतंय की डायरेक घरात. मला खाऊन काय त्याला हाडच मिलाली असती अशी पन", एवढा गंभीर प्रसंग सांगून पण तीने शेवटी आपल्या काटक प्रकृतीवरून जोक केलाच. तिच्या जागी आपण असतो तर काय अवस्था झाली असती याची कल्पना करतानाही भीती वाटत होती. जंगल म्हटल्यावर साप विंचू तर यांना एकदम कॉमन होते. त्यांची पोरं लहान असताना विचू ओटीवर आला की खेकडा म्हणून नाचायची असं ती सांगत होती. शैला ताईंची मोठी मुलगी रुचा तिथून चार पाच मैल चालत शाळेत जायची. एवढ्या वाटेत लहान मुलाना वाघाची भीती नाही वाटत का? याच मला नवल वाटलं. पण घाबरून घरी बसल्यावर सगळंच ठप्प होईल म्हणून बिनधास्तपणा त्यांच्या अंगात आला होता. संध्याकाळी भावोजी समुद्रावर घेऊन गेले. काही वर्षांपूर्वी तिथे त्या किनाऱ्यावर देव मासा आला होता व तिथेच त्याने जीव सोडला. तरी तो किनाऱ्यावर आल्यापासून पुढचे सात दिवस जिवंत होता. त्याच्या हाडांचे अवशेष पण त्यांनी दाखवले. हे सगळं बघताना भारी वाटत होतं.

ताईच्या घरी लाईट होती. पण तिचा प्रकाश फक्त दरवाजापर्यंत. रात्री काळोखात दरवाजपर्यंतच जग आहे असं वाटत होतं. आणि पुढे फक्त मिट्ट काळोखच होता. प्रतिभा वाघाच्या भीतीने रात्रभर झोपलीच नाही. एकंदरीत वाघाचं प्रकरण सोडलं तर रोहिले आम्हाला खूप आवडल होत.

वाघांनी माणसावर केलेले हल्ले हे मी डिस्कवरीत पाहिले होते. संजय गांधी नॅशनल पार्कच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्त्यांमध्ये शिरलेल्या बिबट्याच्या बातम्याही खूप वेळा वाचनात आल्या. हा जंगलातला वाघ रोहिल्यात वस्तीत फिरत असताना एवढ्या व्यक्ती आजूबाजूला असताना का हल्ला करत नाही हा प्रश्न माझ्यासमोर होता. "वाघ म्हातारा झाला की तो माणसावर हल्ला करतो. कारण माणसासारखी सोपी शिकार दुसरी नाही.", एकदा दादाने मला सांगितलं होतं. ते खरं असेलही. पण जेव्हा माणूस वाघाच्या राज्यात घुसखोरी करतो तेव्हा तिथली त्याची शिकार माणूस नकळतपणे हुसकावून लावत असतो. शेवटी भुकेपोटी हा माणसावर हात टाकणारच. कोणत्याही प्राण्याला मग तो माणूस असो किंवा जंगली वाघ जेव्हा सोप्या पद्धतीने पोट भरण्याच ऑप्शन मिळत तेव्हा तो तिकडेच जातो. मग ते पाळीव कुत्रे असतील, गायी म्हशी असतील किंवा मग शेवटी माणूस. जनावरं बिथरली की हल्ला करणारच.

हल्ली आमच्या गावात आणि मामाच्या गावात रात्रीचे बिबटे वाडीत येतात असं ऐकलं आहे. आमच्या वाडीतली कुत्री त्यांनी नेली. एकदोन वासरंही नेली. माझ्या मामीच्या घराच्या मागच्या बाजूला असणारा प्लास्टिक पेपर जो दरवाजाऐवजी ऑप्शन म्हणून लावला होता तो बिबट्याने फाडला. आरडाओरडा झाला म्हणून तो तिकडून पळून गेला. आमच्याकडच्या गावातल्या जंगलात एका मोठ्या फॅक्टरीच मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे असं ऐकलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड व डोंगरफोडी चालू आहे. जंगल सोडून वस्त्यांमध्ये शिरण्याच या प्राण्यांचं कारण म्हणजे सोप्या पद्धतीने मिळणारी शिकार आणि माणसाने त्यांच्या घरात केलेलं अतिक्रमण. विकासाच्या नावाखाली त्यांचा बराचसा एरिया माणसाने काबीज केला आहे. मग आता त्यांच्याच घरातून त्यांना काढून वाघ रस्त्यावर आल्यावर अजून कुठे जाणार? तो तुमच्या घरी येणारच!

धन्यवाद
सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६


#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…