Skip to main content

जिस चीज को सच्चे दिल से चाहो....



"पप्पा, मी  बनणार तर शिवाजी महाराजच बनणार.  नाहीतर काहीच नाही", अर्ध्या झोपेत सकाळी अंथरुणातच सार्थक मला सांगत होता.  

"अरे बाळा, नाही मिळाला कॉश्च्युम महाराजांचा तुझ्या साईझचा.  आता कसं करायचं मग?  अरे हा बघ ना हा कन्सेप्ट मस्त आहे. ", माझ्या मोबाईल वर डाउनलोड केलेली इमेज त्याला मी दाखवली.  त्यात मलमपट्टी केलेल्या एका मुलाचा फोटो होता आणि एक पाटी गळ्यात अडकवली होती, "आय अर्ग्युड विथ माय वाइफ".  मी फक्त तो मॅटर चेंज  करून मस्त एक कविता बनवली होती.  

"चालताना रस्त्यावर किंवा असाल जेव्हा गाडीवर 
बाजूला ठेवा मोबाईल आणि लक्ष ठेवा रस्त्यावर 

घरी वाट पाही कुणी जीव नसे हा स्वस्त 
मोबाईलच्या नादात हे आयुष्य होईल उध्वस्त"

या वेषभूषेसाठी घरात फर्स्ट एडच सगळं सामान पण तयार होत.  मी त्याला अंथरुणात त्याच्या बाजूला पडून फोटो दाखवता दाखवता ती कविता ऍक्टिंग करत ऐकून दाखवली.  मला वाटलं तो कन्व्हिन्स होईल पण तसं झालं नाही.  

"तुम्ही बाईंना फोन करून सांगा सार्थक भाग घेत नाही.  माझा नाव काढून टाका", तो अगदी ठाम होता.  तशी प्रतिभा थोडी चिडली.  "सार्थक, भाग घ्यायचा नाही असं कसं?  आपल्याला नाही मिळाला ड्रेस मग काय करणार?  हे पण मस्त आहे हे कर.  बाईंना सांगायला होईल", ती त्याला समजावत होती.  

"मी बाईंना काल सांगितलं आहे कि मी शिवाजी महाराज बनणार आहे.  बाई म्हणाल्या असं काही चालणार नाही.  डॉकटर पण चालल असतं हे नाही", तो तिला पुन्हा त्याच ठामपणाने सांगत होता. 

"अरे पण बाईंना कुठे माहितेय हा कन्सेप्ट.  मस्त आहे बघ.", तिची ऑफिसची घाई होती पण तरीही ती त्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होतीच. 

"नाही.  मी भाग पण नाही घेणार आणि शाळेत पण नाही जाणार", आता परिस्थिती थोडी चिघळली होती. 

"शाळेत नाही जाणार कस?  भाग नसेल घ्यायचा तर दुसरे नवीन कपडे घालून जा. शाळेचा खाडा नाही करायचा", पुढच्या एखाद्या वाक्यात सार्थकला फटके पडतील हि परिस्थिती ओळखून मी हस्तक्षेप केला.  

"मी करतो त्याला कन्व्हिन्स.  तू आवर तुझी कामं", मी प्रतिभाला समजावलं. 

तसं त्याने शनिवारी संध्याकाळीच आम्हाला वेशभूषेची कल्पना दिली होती.  पण त्याला शिवाजी महाराज बनायचं आहे हे मला माहित नव्हतं.  रविवारी संध्याकाळी त्याने ते सांगितलं.  मी रिहर्सलमुळे दमलो होतो त्यामुळे एवढं सिरिअसली घेतल नव्हतं.  

सोमवारी सकाळपासून 'एकतर त्याला शिवाजी महाराज बनवायचं किंवा मोबाईल' असं प्रतिभा मला रिमाइंड करत होती.  थर्माकोलच काम करायला तसा अण्णालाही वेळ नव्हता आणि मला ते जमत नाही.  सानपाड्याला एक वेशभूषेच दुकान आहे हे माहित होत.  अण्णाला येताना तिथे महाराजांचा कॉश्च्युम मिळतो का ते बघायला सांगितलं. कामाच्या गडबडीत माझा दिवस निघून गेला.  सोमवारी संध्याकाळी घरी आल्या आल्या सार्थकने मला सांगितलं,  "बाईंनी आज सगळ्यांना  विचारलं कोण काय बनणार ते?  मी शिवाजी महाराज बनणार सांगितलं आहे."

"बाकीचे काय करणार आहेत?", मी विचारलं. 

"२ मूलं संभाजी बनणार आहेत.  परी बनणार आहे. कृष्णपण बनणार आहे", त्याने सांगितलं आणि तो त्याच्या खेळण्यात रमला.  मीही ऐकून नंतर पुन्हा माझ्या कामात गुंतून गेलो.  कामावरून आल्यावर प्रतिभाने विचारलंच.  अण्णाला सांगितलं होत असं तिला सांगितलं पण त्यालाही  तिकडे जायला वेळ मिळाला नव्हता.  काय करायचं हा प्रश्न होताच.  मोबाईल बनवायचं म्हटलं तर ते कमी वेळात होणार नव्हतं.  मी दमलेलो म्हणून लगेच झोपून गेलो.  सकाळी उठल्यावर हि अपघाताची आयडिया शोधली होती पण सार्थक काय त्यासाठी तयार होत नव्हता.  

सहसा अंघोळ करताना तो माझ्याशी जास्त बोलतो किंवा त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी ती १० मिनिटे माझ्याकडे असतात.  मी मुद्दाम ती कविता त्याच्यासमोर सारखी बोलत होतो.  पण तो काही धजत नव्हता.  आदल्यावर्षी वेषभूषेमध्ये एकदा तो बॉम्ब झाला होता आणि त्याला फर्स्ट प्राईझ मिळालं होत.  त्याचा रेफरन्स मी त्याला दिला.  "अरे काहीतरी वेगळं केलं तर प्राईझ मिळणार.  आता तू शिवाजी महाराज बनणार आणि अजून २ मुलं संभाजी महाराज बनून येणार.  तुमच्यात फरक तरी कळेल का?  सगळ्यांना वाटेल तुम्ही तिघेही शिवाजी महाराज आहात", मी त्याला समजावलं. 

"मी बाईंना सांगितलं आहे.  मी तेच बनणार.  बाईंनी असं काही करायचं नाही असं सांगितलं आहे.  तुम्ही बाईंना फोन करा आणि सांगा सार्थक भाग नाही घेत", रिपीट पुन्हा तीच टेप.  "एक बार मैने कमिटमेंट करदी तो मै मेरी भी नही सुनता" हा सलमान खानचा डायलॉग मला आठवला.  

"अरे पुढच्या वर्षी करू.  तुझ्या साईझचे कपडे नाही मिळाले.  मी सोडायला येतो तुला शाळेत आणि बाईंना सांगतो", पुन्हा मी प्रयत्न केला. 

"नाही म्हणजे नाही.  मी भाग नाही घेणार", तो माझ प्रत्येक वाक्य परतवून लावत होता. 

"तू फायटर आहेस फायटर.  फायटर असे हार मानतात का?",  माझं एक जून अस्त्र वापरण्याचा प्रयत्न केला. 

"मी नाही फायटर आणि मी हरलो.  ठीके? मला नाही करायचं", असं त्याचं उत्तर घेऊन ते अस्त्रसुद्धा नाकाम ठरलं.   मी अजून काही पैतरे ट्राय केले पण सगळेच फेल.  मी ऐकत नाही बघून तो म्हणाला, "पप्पा ठीक आहे मी करतो ती वेशभूषा पण मला तुम्ही गल्ल्यात टाकायला १०० रुपये द्या".  असं मला कुणी ब्लॅकमेल केलं तर मी चिडतो हा माझा वीकपॉईंट त्याने हेरला होता आणि त्याला हवं तसंच झाल मी चिडलो. 

"हे माझ्यासाठी करतोय का मी?  तुलाच सगळे मस्त बोलतील.  तुला वार्षिक फंक्शन ला प्राईज मिळेल.  असं ब्लॅकमेल केलेल मला अजिबात आवडत नाही माहितेय ना?  नको करुस नसेल करायचं तर", असं त्याला बोलून मी शांत झालो.  तो हसायला लागला.  "मला माहीतच होत", असं बोलून तो बाथरूममधून बाहेर गेला.  बाहेर त्याला आई समजावण्याचा प्रयत्न करत होती पण तो एकदम ठाम होता.  ऑफिसमध्ये पोहचल्यावर प्रतिभाचा "काय करणार आहे?" विचारण्यासाठी मेसेज आला.   "त्याला नसेल करायचं तर नको जबरदस्ती उगाच.", मी रिप्लाय टाकला.  मी आता विषय सोडला होता. 

"आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही.  त्याने आजचा दिवस एन्जॉय केला असता", यावेळी खरंच थोडं दुर्लक्ष झाल होतच.  मी "सॉरी" म्हणून रिप्लाय टाकला.  तिला त्याची अपेक्षा नव्हती.  पण तिचा सार्थकपेक्षा जास्त हिरमोड झाला होता.  मी लॅपटॉपवर काम करायला बसलो.   मी नाराज असताना मला नॉर्मल कसं करायचं सार्थकला चांगल माहित आहे.   माझ्या मांडीवर डोकं ठेवून क्यूब सोडवत बसला.  १०.३० होऊन गेले होते.  आता जरी तो अपघाताच्या वेशभूषेला तयार झाला असता तरी सगळं लगेच आवरता आलं नसतं.   अण्णा मघाशीच कामाला निघून गेला होता.   त्याची मिटिंग पोस्पॉन झाली म्हणून त्याने मला फोन केला.  वेळ आहे तर सानपाडाला जाऊन कॉश्च्युम बघून येतो असं त्याने सांगितलं.  फोन ठेवल्याबरोबरच सार्थकने विचारलं, "कुणाचा फोन होता?"

त्याला मला हे सांगायचं नव्हतं कारण कदाचित जर तिकडे कपडे मिळाले नसते तर त्याचा पुन्हा हिरमोड झाला असता.  माझ्या मित्राचा होता.  "कपडे आणायला जातोय ना?", असं बोलून माझा रिप्लाय ऐकण्याआधीच तो बाहेर पळत गेला.  "हेssss, अजय काका  कपडे आणतोय.  मी शिवाजी महाराज बनणार", आणि तो नाचायला लागला.  त्याचं ऐकून आई बेडरूममध्ये आली. 

"होय काय रे?  मिळतायत कपडे?", आईने आशेने विचारलं.  आता हि सगळ्यांचीच ईच्छा झाली होती.  तिच्या मागून लगेच सार्थक आलेला बघून मी सांगितलं "दुसरा फोन होता.  चुकीचं ऐकलं त्याने".  

"चल बाबू.  नाही मिळालेत ना कपडे.  आपण पुढच्यावर्षी करू", आई त्याला सांगत बाहेर घेऊन गेली.  थोड्या वेळाने अन्नाचा फोन आला कि कपडे मिळाले.  यावेळी जास्त आनंद मलाच झाला होता.  सार्थक हॉलमध्ये अभ्यास करत होता.  मी त्याला हाक मारली तसा तो लगेच आला.  

"जा तयारी कर.  तू महाराज बनणार आज", हे माझं वाक्य ऐकून तो भलताच खुश झाला.  "लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे", हे वाक्य त्याने कुठून ऐकलं होत कुणास ठाऊक पण हातात तलवार असण्याच्या स्टाईलमध्ये ती नाचवत त्याने मला तो डायलॉग बोलून दाखवला.  बाहेर  सोफ्यावर उभा राहून सेम स्टाईलमध्ये आई आणि पप्पाना पण बोलून दाखवला.  आता त्याच तेच चालू होत.  हा डायलॉग शिवाजी महाराजांचा नाही हे मला सुद्धा ठाऊक होत पण आता कमी वेळात काय शिकवणार म्हणून मीसुद्धा तो विषय काढला नाही. फ्रेश होता होता "स्वराज्य व्हावे हि तर श्रींची ईच्छा" हा डायलॉग त्याला हातवाऱ्यांसकट शिकवला.  तो ते डायलॉग बोलताना खूप घाई करत होता.  पण ती त्याची एकसाईटमेन्ट होती.  इतक्या वेळात तो कितीवेळा आरशासमोर उभा राहून स्टाईलमध्ये बोलला असेल याचा त्यालाच पत्ता नसेल.  अण्णा आल्याबरोबर त्याची तयारी सुरु केली.  शाळेसाठी ३०-४० मिनिटंच बाकी होती.  त्याच्या कानातली एक रिंग खूप लूज होती.  त्याला रबर लावून आम्ही फिट करून घेतली.  तो १५ मिनिटातच तयार झाला.  कपाळावर अगोदर चंद्रकोरची टिकली लावली होती पण ती सारखी गळत होती म्हणून लिपस्टिक घेऊन माचीसच्या काडीने चंद्रकोर काढली.  आता तो एकदम महाराजांसारखाच वागण्याचा प्रयत्न करत होता.  त्याने महाराजांच्या सीरिअल्स पहिल्या आहेत.  त्याच्या डायलॉग्सचा व्हिडीओ शूट करून प्रतिभाला व्हाट्सअँपवर पाठवून दिला.  ती खुश झाली.  आई पप्पांच्या पाया पडतानासुद्धा तो महाराजांच्या स्टाईलने पाया पडत होता.  


"गळ्यातल्या माळा आणि ती टोपी (जिरेटोप) तिकडेच घाल.  पोराला नजर लागेल कुणाची",  आई भाबडेपणाने बोलली.   सार्थकच तिला नको नको  करत निघाला.  त्याला मोजडी मिळाले नाहीत मग सॅन्डलच घातले.  जिरेटोप तेवढा पिशवीत काढून ठेवला.  "त्याच झालं कि लगेच सगळं पिशवीत भरून आण तो हरवेल काहीतरी", आई जाताना मला सारखं तेच सांगत होती.  

आम्ही रिक्षाने शाळेजवळ पोहचलो. उतरल्या उतरल्या त्याने माझ्याकडे जिरेटोप मागून घेतला.  सकाळची शाळा अजून सुटत होती.  सगळे लोक वळून याच्याकडेच बघत होते.  तो लाजून मला बिलगत होता.  त्याच्या कपाळावरची चंद्रकोर अर्धी पुसली गेली. मी सोबत काही आणल पण नव्हत.  आम्ही समोरच्या दुकानात गेलो आणि चंद्रकोर टिकली आहे का विचारलं.  "आहे पण वरच्या रूममध्ये आहे.  जाऊन आणते थांबा", दुकानातल्या ताईंनी उत्तर दिलं. त्यांनी दुकानातली गर्दी सोडून वर जाऊन टिकल्यांचा बॉक्स आणला.  मी पैसे काढले होते.  त्यांनी एका पाकिटातून चंद्रकोर टिकली काढून माझ्या हातात दिली.  

"पूर्ण पाकीट दिलत तरी चालेल", मी म्हणालो. 

"नाही नको.  राहूद्या", त्यांनी हसत सांगितलं.   मी थँक्यू म्हणून शाळेत निघालो.  तसं पालकांना आत जाऊन देत नाहीत पण मी फीज भरण्याचं कारण सांगून आत गेलो.  त्याचा वर्ग फर्स्ट फ्लोरला आहे.  बरीचशी चिल्लीपिल्ली वेगवेगळ्या वेषभूषेमध्ये खालच्या मैदानावर फिरत होती.  आत शिरल्यावर त्याला तलवार हातात दिली.  त्याने ती हातात काठी पकडावी तशी पकडली होती.  मी त्याला ती कशी पकडावी हे जिन्यावर चालताना सांगत होतो.  ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोरच्या जिन्याच्या मधल्या पॅसेजमध्ये उभ्या असलेल्या बाई आम्हा दोघांकडे बघून हसत होत्या.  त्याच्या वर्गाकडे जाण्यासाठी वळसा मारून जावं लागणार होत.  मध्ये २-३ पहिली दुसरीचे वर्ग लागतात.  तिथली छोटी मूलं  वर्गाच्या बाहेर उभी होती.  सार्थकला पाहिल्याबरोबर "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी ती ओरडायला लागली.  तसं हा अजून लाजायला लागला आणि मला चिकटून चालायला लागला.  तिन्ही वर्गासमोरून तेच झालं.  जवळ जवळ पळतच आम्ही त्याच्या वर्गापर्यंत पोहचलो.   बाई अजून वर्गात आल्या नव्हत्या.  त्याला वर्गात बसवून मी ऑफिसमध्ये फी भरून पुन्हा वर्गात आलो.  बाई वर्गात मुलांची प्रॅक्टिस घेत होत्या.  या त्याच बाई होत्या ज्या आम्हाला जिन्यावर दिसल्या होत्या. 

"बाई,  आत येऊ का?", हे बोलताना शाळेचे दिवस आठवले.  बाईंनी होकारार्थी मान हलवल्यावर मी आत गेलो.  

"मी सार्थकच पप्पा.  त्याची कधीपर्यंत होईल स्पर्धा.  नाही तो हरवेल काही ना काही म्हणून?", मी विचारलं 

"सांगू शकत नाही.  पूर्ण दिवस शाळा आहे.  त्याचा नंबर आता येईल तसा", बाईंनी सांगितलं.  थांबण्यात अर्थ नाही हे मला समजलं होत.  "मी त्याच्याशी २ मिनिट बोलू का?", मी बाईंना विचारलं.  बाईंनी हो म्हटल्यावर मी त्याच्या बाकावर गेलो.  तो पहिल्याच बाकावर बसला होता.  त्याच्या चेहऱ्यावरची एकसाईटमेन्ट अजून तशीच होती.  त्याचा बाजूचा मित्र कृष्ण बनून आला होता.  

"ऐक शोन्या, तुझं झालं कि लगेच या माळा, कानातलं दप्तरात भरून ठेव आठवणीने.  आपल्या गोष्टीची काळजी आपणच घ्यायची.  मला निघावं लागेल",  मी त्याला हळूच सांगितलं.  त्यांचा  पिंटुकला कृष्ण मित्र ऐकत होताच.  सार्थकने होकारार्थी मान हलवली.  त्याला "ऑल द बेस्ट" देऊन मी निघालो.  खालच्या ग्राउंडमध्ये माईक आणि त्याच्या मागे मोठ्या अक्षरात "वेशभूषा स्पर्धा" असा बॅनर लावून ठेवला होता.  स्पर्धा इकडे होणार होती तर.  मला अगोदर वाटत होत कि  वर्गात होईल.  

त्याची यावर्षी इतक्या लोकांसमोर शिवाजी महाराज बनण्याची ईच्छा होती आणि ती पूर्ण झाल्याच समाधान त्याला आणि त्याच्यापेक्षा जास्त घरातल्या आम्हा सगळ्यांना होत. 

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
९२२१२५०६५६

#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी