Skip to main content

आठवणीतला गारवाआठवणीतला "गारवा"
- सुबोध अनंत मेस्त्री

आमच्या घरातला दीड दिवसाचा गणपती निघायला तसा अजून तासभर वेळ बाकी होता.  घराच्या मोठ्या खिडकीला लागून प्लास्टिकच्या आराम खुर्चीवर मी बाहेरचा पाऊस पाहत रेलून बसलो होतो.  रात्रीच बऱ्याच वेळेचं जागरण असल्याने सगळे बेडरूममध्ये आराम करत होते.  आमच्या करंजाडेच्या  घराच्या खिडकीसमोरूनच डोंगर सुरू होतो. बिल्डिंग आणि डोंगरामध्ये फक्त एक छोटा  रस्ता.  डोंगर सुरू होतानाच पायथ्याशी एक झोपडी.  कदाचित बाजूला बिल्डिंगच काम चालू असणाऱ्या कामगाराची असेल.  गावाच्या घराला शोभेल अस विटांच घर.  घरासमोर बांधलेल्या बकऱ्या पावसात भिजत होत्या.  घराच्या मागे चढणीवर झुडपं साफ करून त्यांनी काही भाज्यांची लागवड केली आहे.  तिथून थोडं चढण गेल्यावर एक खड्डा आहे ज्यातून उरणवरून माल वाहून नेणाऱ्या मालगाडीचा ट्रॅक जातो. पुढे पुन्हा थोडा डोंगर नंतर पनवेल पासून उरण ला जाणारा एक्सप्रेसवे आणि तो रस्ता क्रॉस केल्यावर खऱ्या डोंगराची सुरुवात.  हे इतकं काही मध्ये आहे हे खिडकीतून जाणवतच नाही.  अस वाटत की खिडकीसमोरच्या रस्त्यासमोरूनच डोंगर सुरू होत असेल.  या डोंगराच्यामागे थोडा लांब एक मोठा डोंगर आहे.  पलीकडे दिसणारा तो डोंगर पावसामुळे एवढा झाकोळला होता की मागे पूर्ण सफेद पांढरा कापड आणि त्यासमोर एकदम ठळक उठून दिसणार एक नारळाचं झाड असच काहीस भासत होत.  रस्त्याच्या पलीकडे उजव्या बाजूला बिल्डिंगचा पाया खणण्याची जबाबदारी एवढ्या मुसळधार पावसात एका जेसीबीवर येऊन ठेपली होती आणि ए-के फोरटी सेवन गन मधून फायर झाल्यावर होणाऱ्या आवाजासारखाच आवाज करत त्याच्या टोकेरी ड्रीलिंग मशीनचा जसा त्या दगडावर आघात होत होता तसा त्या दगडाचे तुकडे होऊन बाजूला पडत होते.  पुन्हा त्याच मशीनने हाताच्या पंजाने साफ करावे तसे ते झालेले तुकडे बाजूला सारीत पुन्हा एकदा अजून खोलवर खणण्यास ती मशीन पूढे सरसावत होती.

माझ्या विचारांचं ही तसच झालं होत.  तो मुसळधार पाऊस आणि  जेसीबीचा सातत्याने होणाऱ्या नादाने माझ्याही विचारांची तंद्री लागली आणि कुठेतरी खोलवर भूतकाळात माझं मन जुन्या गोष्टींचा शोध घेण्यात रमून गेलं.  गारवामधली गाणी आठवली तसे ओठ पुन्हा पुटपुटायला लागले.  आता पूर्वीसारखी कॅसेट किंवा सीडी शोधावी लागली नाही.  सरळ मोबाईलमध्ये युट्युबवर जाऊन गारवा सर्च केलं आणि गारवाची सर्व गाणी असणारी प्लेलिस्ट ब्लुटूथ स्पीकरवर चालू केली.  पुन्हा एकदा बाहेरचा पाऊस पाहत खुर्चीवर रेलून बसलो. 
मन १७ वर्ष मागे जाऊन आमच्या चाळीत पुन्हा एकदा घराबाहेरच्या नळावर पाणी भरायला लागलं.  दोन घरामध्ये एक नळ असल्याने आता 20 मिनिटांच्या नंबरऐवजी दोन तासात केव्हाही पाणी भरता येत होतं त्यामुळे गोष्टी थोड्या सोयीस्कर होत्या.  नाहीतर पूर्वी 20 मिनिटात मोठा ड्रम, घरातल्या बादल्या, टाकी, टोप, टब, आणि एका रांगेत एकावर एक अशी हंड्याची दहीहंडी करून त्यावर कळशीचा कळस चढवावा लागायचा.  त्यातही नळ घरात नव्हता.  7 लोकांमध्ये मिळून एक कॉमन हापशी.  मग ते हापसायला एक जण, पाणी घेऊन यायला एक जण, दारातून घरात पाणी घ्यायला एक जण आणि घरात पाणी ओतायला आई अश्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या  होत्या.  हंड्यात चाळीतल्या घरांच्या पत्र्यावरून ओघळणाऱ्या  पागोळ्यांचं पाणी पडू नये म्हणून त्यावर एक ताट ठेवायचं हेच काय ते आमचं हायजेनिक पाणी.  घड्याळ्यातल्या काट्यावर सगळं चालायचं.  चाळीतल्या बायका नंबर मिनिटभरही मागे पुढे सरकू द्यायच्या नाहीत.  आणि त्यात जर पाण्याचा प्रेशर स्लो असेल तर बायकांचं आपापसात धुसफूसन सहज दिसायचं.  पण जे असेल ते तेवढ्यापुरतीच.  संध्याकाळच्या जेवणातल्या भाज्या घराघरात एक्सचेंज व्हायच्याच.  आता नळ दारात असल्याने थोडं सोयीनं सावकाश पाणी भरता येत होतं. 

दादा आणि अण्णा कामावर असल्याने आणि माझा दहावीचा क्लास संध्याकाळी असल्याने पाणी भरण्याची जबाबदारी माझी होती.  दादाने दहावीच्या सुरुवातीस मे महिन्यातच गारवाची कॅसेट आणली होती आणि ती आम्हा तिघा भावांना खूपच भावली होती.  अर्ध्या तासात पाणी भरत असताना मोठया आवाजात कॅसेट चालू केली की ती अगदी क्लासला निघेपर्यंत चालूच असायची.  वर्षभरात किमान दोन ते तीन हजार वेळा ती ऐकली असेल पण मोह आवरत नव्हता.  ए साईड संपली की पुन्हा बी साईड आणि ती संपली की पुन्हा ए.  मलातर त्या प्रत्येक गाण्यामधली म्युजीक कितीवेळ वाजते हे सुद्धा पाठ झालं होतं.  आणि स्वाभाविकच कॅसेटचा मोठा आवाज आणि त्यात जबरदस्तीने माझा, ऐकून पूर्ण चाळीमध्येही या अलबमची गाणी सर्वाना पाठ झाली होती.  सुर्यवंशम मुव्हीमध्ये जसा अमिताभ "दिल मेरे तू दिवाना है" गायला लागला की लहान पोरांची झोपण्याची वेळ असायची तसा आमच्या चाळीत "गारवा" लागलं की मेस्त्रीची पाणी भरण्याची सुरुवात झाली हे चाळीतल्या लोकांना कळायचं.  पूर्ण दहावी मी फक्त त्याच गारवा कॅसेटवरच काढली.  पुढे जाऊन कॅसेटचा सीडी प्लेअर झाला आणि गाणी "गारवा" वरून "गारवा" अधिक "सांजगारवा" वर सरकली.  पण मजा तीच होती.  माझ्याबरोबर माझ्या मित्रांनाही ही गाणी ऐकण्याची जबरदस्ती होतीच.  किरणलाही ती कॅसेट ऐकायला दिली होती.  एकदा किरणच्या घरी गेल्यावर किरणची आई म्हणाली, "कसली गाणी ऐकतोस रे उगाच.  'माझी आठवण येते का' कशाला पाहिजे?", मी आणि किरण फक्त हसलो.  किशोरवयात आलेली आणि नुकतीच प्रेमात पडायला लागलेली पोर अशी रोमँटिक गाणी ऐकताना 'आपल्यालाही एखादी गर्लफ्रेंड असावी' असणारी ही फिलिंग आता या आईला कशी एक्सप्लेन करणार?

सीडी प्लेअरही जाऊन आता त्याची जागा स्मार्टफोनने घेतली.  सध्या गाणी रिवाईंड करण्यासाठी रिव्हर्सच बटन दाबाव लागत नाही किंवा कॅसेट अडकली म्हणून कॅसेट दुरुस्त करायला पेन घेऊन बसावं लागत नाही.  आता गाणी अडकतात स्मार्टफोन स्लो असेल तर किंवा नेट स्लो असेल तर.  गारवाची गाणी मोबाईल मध्ये नव्हती पण युट्युबवर सहज सापडली.  पूर्वी कॅसेट असण्याशिवाय पर्याय नव्हता.  मग ती घेण्यासाठी मित्राच्या घरी जाणं आलंच.  आता  बऱ्याच गोष्टी सहज शक्य झाल्यात पण त्या मिळवण्यासाठी जो पूर्वीचा थ्रिल होता तो गमावून बसल्यासारखं वाटतं. 

मोठी खिडकी, समोर हिरवागार डोंगर, मुसळधार पाऊस, हवेत बाय डिफॉल्ट असणारा गारवा.  "गावच्या घरातल्या खिडकीत बसून, गारवाची गाणी ऐकत, चहाचा घोट घेत बाहेर हिरवागार वातावरण बघत राहायला मस्त  मजा येईल", दादाचा त्यावेळचा डायलॉग आठवला आणि पुढच्याच क्षणाला प्रतिभा माझ्यासमोर गरम चहा घेऊन उभी होती.

#sahajsaral

Comments

  1. सुबोध अगदी अप्रतिम लिहिलंयस! आपल्या घटल्यातल्या आठवणी जाग्या झाल्या. लंब यू ब्रो!

    ReplyDelete
  2. Awesome... As each and every "Sahaj Saral"

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…