Skip to main content

टारगेट नाईन्टी प्लस-सुबोध अनंत मेस्त्री

=========================================
 नमस्कार.  ही घटना मी नुकत्याच केलेल्या एका कोर्सदारम्यानची आहे.  मुलांवर कोणत्याही गोष्टीची जबरदस्ती  करताना त्यांच्या मनावर आपण काय परिणाम करतोय याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.  वरवर शांत दिसणारी मुलं मनात विचारांचं वादळ घेऊन फिरत असतात याच जिवंत उदाहरण देणार हे आर्टिकल.

=========================================

मी नुकताच एक लाईफ ट्रान्सफॉर्र्मेशन चा कोर्स केला.  पहिल्याच दिवशी तुम्ही हा कोर्स का लावला याबद्दल ट्रेनर तिथल्या पार्टीसिपेंटना माहिती विचारत होता.  हॉलच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन स्टँडिंग माईक लोकांना बोलण्यासाठी ठेवण्यात आले होते.  बरेच लोक माईकवर येऊन स्वतःबद्दलचे प्रॉब्लेम्स शेअर करत होते.  काही लोकांना तिकडे जबरदस्ती कुणी ना कुणी पाठवलंय हे सुद्धा त्यांनी सगळ्यांसमोर कबूल केलं.  त्यात एक 16-17 वर्षाचा मुलगा माईकवर बोलण्यासाठी रांगेत उभा राहिला होता.  चष्मा लावलेला, सावळा वर्ण, स्पाईक कट...थोडा स्टाइलीश पण तितकाच चेहऱ्यावरून स्कॉलर सुद्धा वाटत होता.  त्याची वेळ आली.  हा एवढ्या लहान वयात या कोर्स मध्ये काहीतरी शिकण्यासाठी आलाय म्हणून त्याच कौतुक झालं.

"तू इथे का आलास?", ट्रेनर ने विचारलं.

"माझ्या मम्मीने जबरदस्ती इथे पाठवलं आहे.  माझ्या मम्मीने हा कोर्स केलाय पण तिच्यात काही फरक पडलाय अस वाटत नाही.  तिला माझ्यामध्ये फरक हवाय", त्याने सगळं सांगून टाकलं.  हॉलमध्ये हशा पिकला.

"तुला असं का वाटत कि तुझ्या मम्मीमध्ये फरक नाही?", ट्रेनर चा पुढचा प्रश्न आला.

सहसा त्याला असं कुणी विचारत नाही अशा अविर्भावात तो सांगायला लागला.  "माझे मम्मी पप्पा सेपरेट आहेत.  मी मम्मीबरोबर असतो.  माझी मम्मी मला इतर स्कॉलर मुलांशी कॅम्पेअर करत असते.  तिला वाटत कि मी सारखा अभ्यास करावा.  पण माझा इंटरेस्ट त्यात नाही.  मला आर्टस् मध्ये इंटरेस्ट आहे.".

"आता कितवीला आहेस?", ट्रेनर ने मध्येच विचारलं.

"बारावी", त्याने सांगितलं.

"दहावीला किती पर्सनटेज होते?", ट्रेनरचा पुढचा प्रश्न.

"65", त्याने सांगितलं

"मग, आता मम्मी किती एक्सपेक्ट करते?", ट्रेनर ने विचारलं

"90 प्लस", मुलाच्या या उत्तरावर पुन्हा एकदा हशा पिकला.  पण मुलाचं लक्ष सहसा पब्लिककडे जात नव्हतं.  तिथे फक्त ट्रेनर आणि तोच आहे असं तो वागत होता.

"ओके.  मूव्ह ऑन", ट्रेनर त्याला पुढे सांगायला सांगितलं.

"मम्मी मला बाकी काही करून देत नाही.  सारखी अभ्यासासाठी मागे असते.  आणि माझा मोबाईल पण चेक करत असते.  मुलींशी बोललो कि तिला वाटत कि हि गर्लफ्रेंडच आहे", हॉलमधले बाकी सगळे त्याची स्टोरी एन्जॉय करत होते.

"नक्की फ्रेंड का?  तुला अजून गर्लफ्रेंड नाही?",  ट्रेनर ने थोडं खोचकपणे विचारलं.

"नाही.", तो थोडा ओशाळला.

"मग तुला या कोर्स मधून काय अपेक्षा आहे?  गर्लफ्रेंड कशी मिळवायची ते?", ट्रेनर त्याची फिरकी घेत होता.

तो थोडा हसला.  "नाही.  ते मी कसही मॅनेज करेन.  माझी मम्मी मला आवडते.  पण ती अशी वागते तेव्हा मला त्रास होतो.  आणि तिच्या अपेक्षा माझ्याकडून पूर्ण करू शकत नाही म्हणून मला वाईट वाटत.  पण मला 90 टक्के मिळवायचे आहेत आणि म्हणून मी इथे आहे", त्याच्या या वाक्यावर त्याला टाळ्या मिळाल्या.  ट्रेनरने त्याची अपेक्षा पूर्ण होईल असं सांगून त्याला बसायला सांगितलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा शेअरींग चा सेशन सुरु होता.  त्यात स्वतःबद्दलची अशी गुपित गोष्ट शेअर करण्याचा एक भाग होता जी स्वतःला सोडून आपण कुणाला सांगितली नाही आणि ट्रेनर लोकांना प्रेशर करून करून शेअर करण्यास भाग पाडत होता.  बऱ्याच लोकांनी आपापल्या गोष्टी शेअर केल्या.  पुन्हा तो मुलगा येऊन उभा राहिला.  आता काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल म्हणून सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली.

त्याने माईकवर सांगायला सुरुवात केली, "मम्मी मला सारखा प्रेशर करते आणि मनासारखं वागून देत नाही म्हणून मी एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता". हॉलमध्ये शांतता पसरली.

"मी रोजसारखीच सकाळी उठून शाळेची तयारी करत होतो.  मम्मी बेडरूममध्ये झोपली होती.  मला टेस्ट एक्झामला चांगले मार्क्स नव्हते आणि मम्मीला मी ते सांगितलं नव्हतं. तिला सांगितल्यावर परत ती चिडचिड करेल हे मला माहित होतं.  त्या टेन्शनमध्ये मी किचन मध्ये गेलो आणि चाकू घेऊन मी माझ्या हाताची नस कापण्याचा विचार केला होता.  पण माझी हिम्मत झाली नाही."  तो सांगायचा थांबला.  त्याच्या आईचा हॉलमध्ये बऱ्याच लोकांना राग आला असेल.  मुलांना एवढं प्रेशर करावं कि त्याने हि लेव्हल गाठावी?  तो मुलगा एवढं सांगून जागेवर बसला.

सेशन आता बऱ्यापैकी रंगला होता.  आम्ही बऱ्याच लोकांचे बरेच अनुभव ऐकले होते.  पण ट्रेनरच्या मते लोक अजून पूर्ण खरे बोलत नव्हते.  संध्याकाळच्या वेळी लोक व्यवस्थित रिस्पॉन्स देत नाहीत पाहून ट्रेनर वैतागला व सेशन अर्धवट सोडण्याच्या वार्ता करू लागला.  मग हळूहळू एक एक जण उठून त्यांचे सगळ्यात महत्वाचे सिक्रेट शेअर करू लागले आणि हा मुलगा आता पून्हा उठला होता.  आता हा अजून काय सांगेल यावर सगळ्यांचे कान लागले होते.

"मी अजून तुम्हाला पूर्ण खरं सांगितलं नाही.  पण एवढे लोक खऱ्या गोष्टी बिनधास्त शेअर करतायत बघून आता मला सांगायला हरकत नाही.  मी सकाळी तुम्हाला माझ्या आत्महत्येच्या प्रयत्नाबद्दल बोललो होतो.  मी तो केला होता.  पण तो करताना मी विचार केला की मी का मरावं?  त्रास तर मम्मीमुळे होतोय.  चूक तिची आहे.  म्हणून...",  त्याने थोडा पॉज घेतला.  आमची उत्सुकता पुन्हा ताणली गेली.

"घाबरू नकोस सांग", ट्रेनर ने सांगितलं.

"मी तो चाकू घेऊन बेडरूम मध्ये गेलो होतो.  मम्मीला मारायला".  ऐकताना अंगावर काटा उभा राहिला.  हा एवढा साधा सरळ दिसणारा मुलगा असं काहीतरी करेल हे थोडं अपेक्षेबाहेरच होत.

त्याने पुढे सांगायला सुरुवात केली, "मी बेडरूम मध्ये गेलो.  मम्मी झोपली होती.  मी बराच वेळ तसाच हात मागे घेऊन आणि चाकू हातात घेऊन उभा होतो.  मारण्याचा विचार तर होता पण माझी हिम्मत होत नव्हती.  मम्मी थोड्या वेळात उठली.  तीला चाकू दिसणार नाही अशा पद्धतीने तो पुढे धरून मी पटकन बाहेर निघालो".  त्यांचं सांगून झाल आणि तो जागेवर जाऊन बसला.  हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली होती.  मुलांवर त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टींची जबरदस्ती करून आपण त्यांच्या मनात काय भावना तयार करतोय याच उत्तर तिथे बसलेल्या बऱ्याच पालकांना मिळालं होतं

=========================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग

9221250656

Comments

Popular posts from this blog

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…

सिंगापूराण

फायनली आमचं फ्लाईट सिंगापूरमध्ये लँड झालं.  बरीच वर्षे चांगी एअरपोर्टबद्दल ऐकून होतो आता पाहायला मिळेल याची एकसाईटमेंट होती.  अपेक्षेप्रमाणेच चांगी अवाढव्य आणि एकदम प्लिजंट होत.  ठिकठिकाणी शोसाठी निरनिराळे रंगेबिरंगी आकार आणि त्यासमोर हमखास फोटो काढणारे कुणी ना कुणी फॉरनर हे चित्र जाता जाता सगळीकडे दिसलं.  इथले एस्केलेटर्स आपल्या  इकडच्या  मॉलमधल्या एस्केलेटर्सच्या कमीत कमी दुप्पट उंचीचे होते म्हणजे त्या फ्लोअर्स मधल्या उंचीचा अंदाज आला असेल.  आम्हाला इमिग्रेशन काउंटरला पोहचायला बराच वेळ लागला.  तशी लाईन बरीच होती पण काउंटरसुद्धा खूप सारे होते.  इथले ऑफिसर्स बऱ्यापैकी प्रोफेशनल वाटत होते आणि सगळ्यांचा काळ्या रंगाचा एकच युनिफॉर्म होता. 

माझा नंबर आला तसा ऑफिसरने मला हसत वेलकम केलं.  "शुबथ मेस्त्री", त्याने माझा पासपोर्ट पाहून विचारलं.  "येस", मी म्हटलं. त्याने अर्ध्या नावाची काशी केलीच होती पण कमीत कमी आडनाव व्यवस्थित घेतलं होतं.  तरीही त्याच कौतुक वाटलं.  "दिस इज द फर्स्ट टाइम समवन हॅव प्रोनौऊन्स्ड माय नेम करेक्टली", मी असं म्हटल्यावर तो हसायला लागला.  त…

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता.

"कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता.

"तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं

"नाही"

"मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं.

"बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता.

"जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही.

"तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल.

"नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं.

"बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  आपण घाबरायचं नाही.  घा…