Skip to main content


ही दोस्ती तुटायची नाय !!!
- सुबोध अनंत मेस्त्री
=====================================================
आज माझ्या मित्राचा वाढदिवस. हे पत्र खर तर मी त्याला पर्सनली पाठवायला हव होत पण मैत्री काय असते याच जीवंत उदाहरण हा माझा मित्र अजय आहे. या माझ्या पत्रातून मैत्री म्हणून एखाद्याच्या आयुष्यात आपला सहभाग कसा असावा व अजय व्यक्ति म्हणून कसा आहे हे जगापर्यंत पोहचाव म्हणून मी फेसबुक ल पोस्ट करत आहे. या पत्रातून अजय मुळे मी पुढे कसा येत गेलो हे मांडण्याचा हा प्रयत्न.
====================================================
प्रिय अजा,
खर तर पत्र वैगेरे ही निव्वळ फॉर्मलिटी आहे आणि आपल्यात ती कधीच नसते. पण माणूस जगात नसेल तेव्हा त्याच लिखाण मागे राहत आणि भावना तोंडापेक्षा लिखाणातून चांगल्या बाहेर येतात म्हणूनच आज हे पत्र लिहितोय आणि असही आपण तोंडावर बोलताना शिव्यांशिवाय बोलत नाही. स्तुती तर खूपच लांब राहिली. आज थोडसं फॉर्मल बोलेन कारण आज इथे हे गरजेचं आहे.
आयुष्यातल्या काही आठवणींची उजळणी करताना अख्खं आयुष्य डोळ्यासमोरून तरळून जातं. काही माणसं आयुष्यात येऊन निघून जातात. त्यांचा रोल आपल्या आयुष्यात एवढाच होता समजून आपण तो विषय सोडून देतो किवा सहसा कामाच्या गडबडीत आपला संपर्क कमी होतो आणि मग हळूहळू ती व्यक्ती दूर निघून जाते. काही व्यक्ती आयुष्यात येतात आणि मग त्या अश्या काही घर करून राहतात की त्यांचा जाण्याचं संबंध येत नाही किवा आपण त्यांना जाऊ देतच नाही. आपल्या आयुष्यात लीड रोल प्ले करण्याचं काम ते करतात. तसाच तू आलास आणि तसाच तू कायम झालास.

आपण दहावीला एकत्र भेटलो. तेव्हा आपली खास मैत्री वैगेरे होती असं मला आठवत नाही. पण 2-3 वर्ग एकत्र करून दहावी-क हा वर्ग बनला आणि त्या वर्गात तू आमच्या 7 मित्रांच्या ग्रुप मध्ये सामील झालास. पण मुळात तुझा स्वभाव मस्तीखोर असल्याने आपण एकत्र मस्ती केली पण खास मैत्री वैगेरे झाली नव्हती॰ नंतर तू डिप्लोमा ला अॅडमिशन घेतलस आणि मी अकरावी सायन्स. त्यामुळे आपला संपर्क जास्त होण्याचा संबंध कधीच नव्हता. पण काही ना काही निमित्ताने आपला संपर्क तू घडवून आणत होतास. माझी बारावी झाली आणि तू तुझा डिप्लोमा संपवून जॉबला लागलास. मी बीएससी आयटी ला अॅडमिशन घेतल आणि माझा घरातला पहिला कम्प्युटर घेतल्यानंतर तुला त्यातली माहिती असल्याने तू येऊन सगळ चेक वैगेरे केल होतस. त्यानंतर मग आपला संपर्क पुन्हा वाढला. तू कमावत होतास आणि मी कॉलेज च विद्यार्थी. त्यामुळे रोज संध्याकाळी पाणीपुरी खायची, फालूदा खायची सवय आपल्याला लागली. पैसे तू भरणे हा नियम होता कारण माझ्याकडे ते नसायचेच. तू कधीच काही बोलला नाहीस आणि एकट्याने कधी माझ्याशिवाय पाणीपुरी खाल्ली सुद्धा नाहीस. ही आपल्या मैत्रीची खरी सुरुवात होती. मग तुझा मोबाइल आला आणि तुझा मोबाइल मी पी.सी.ओ म्हणून वापरायला लागलो. प्रतिभाला सगळे कॉल्स मी तुझ्या मोबाइलवरूनच करायचो. तेव्हा सुद्धा तू कधी काही बोलला नाहीस. आपण महिन्याला एक नाटक अशी सतत नाटक बघत राहिलो आणि टिकिट हे तुझ्याच पैशात. तू सहसा अडवांस बूकिंग करून टिकिट आणायचास आणि आपण दोघेच त्या नाटकाला जायचो. मला तुझ्याकडून कोणतीही गोष्ट मागताना कधीच लाज ही वाटली नाही.
तू पार्टटाइम आयटी-इंजीनीरिंग ला अॅडमिशन घेतलस आणि तुला मॅथ्स थोड कठीण व्हायला लागलं. मग तू, तुझा मित्र नितिन आणि यशवंत तिघांनी माझ्याकडे मॅथ्स शिकण्यासाठी पर्सनल कोचिंग लावली. ही तू मला दिलेली पहिली बीजनेस ऑपर्चुनिटी होती. रोज रात्री तुम्ही जॉबवरून आल्यावर मी तुम्हाला मॅथ्स शिकवायला लागलो. तुझे गणितात टुटोरियल्सचे मार्क कमी पडले म्हणून एका टेस्टला मी तुझा प्रॉक्सिसुद्धा बसलो. त्या पेपरला तुझ्या एकही मित्राने माझ्या सप्लिमेंटस पेपर संपण्याचा वेळ होईपर्यंत मला परत दिल्या नव्हत्या आणि मी प्रॉक्सि बसण्यापूर्वी तस ठरलं ही होत. त्या पेपरला तुझ्या स्ट्रीम ला नसणारे ऑप्शनल प्रश्न सुद्धा मी सोडवलेले आणि तुला टेंशन आल होत. कारण मागच्या टुटोरियल मध्ये 30 पैकी 2 मार्क मिळवणारा मुलगा एका महिन्यात एवढा हुशार कसा झाला असे तुझे शिक्षक विचार करतील अस तुला वाटत राहिल. त्या परीक्षेत तुला 30 पैकी 28 मार्क मिळाले आणि तुझा विषय वाचला.
तुझ्या आयुष्यात येणार्याष मुलींबद्दल तू मला बिनधास्त प्रत्येक गोष्ट शेअर करत राहिलास आणि मीही ते एंजॉय करत राहिलो. त्यामुळे तुझ्यासमोर कोणती गोष्ट शेअर करताना मला कधीच काही वाटलं नाही. तू ओपन होतास मग मीही तितकाच राहत गेलो. त्यातल्या एकीला मी वहिनी बोललो आणि सुरू होता होता तुझं प्रेम प्रकरण संपल. पण तुझ्यासाठी त्या पोरी कधी इम्पॉर्टंट नव्हत्या. तू मला त्यावर काहीच बोलला नाहीस. बारावी झाल्यानंतर मला नाटकात काम करण्याची आवड आहे हे माहीत होत म्हणून एका प्रॉफेशनल नाटकाच्या ग्रुप ला भेटवणारासुद्धा तूच होतास. एस.वाय. ला असताना मी एक एकांकिका लिहिली होती. ती तुला खूप आवडली आणि आपण ती स्पर्धेला उतरवू अस तुझ्या मनात होत. त्यावेळी सुद्धा पैशाची मारामारी होती पण पुन्हा निर्माता म्हणून तूच पुढे आलास. खर्च खर तर दीड हजारच होता पण त्यावेळी ती रक्कम मिळण ही सुद्धा मोठी गोष्ट होती. तू नेहमीच तुझ्या क्षमतेच्या बाहेर जाऊन मी लोकांसमोर याव म्हणून मला मदत करत राहिलास. मोटीवेट करत राहिलास. ती स्पर्धा आपण फायनल पर्यन्त नेली पण त्यात झालेली तुझी मदत कशी विसरता येईल.
कॉलेज संपलं आणि मी जॉबला लागलो. आपल नाटक बघण वैगेरे चालूच होत. मग माझ्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आला. प्रतिभाच्या घरून लग्नाला नकार आणि तिच्या लग्नाची दुसरीकडे बोलणी सुरूसुद्धा झाली होती. तेव्हा मी फक्त साडे एकवीस वर्षाचा होतो. पगार फक्त 5000. पुन्हा तू आणि दादा माझ्या पाठीशी ठाम उभे राहिलात. गरज पडली तर रजिस्टर मॅरेज करू या मतावर एकमत झाल्यावर तू पुन्हा आर्थिक मदत देऊ केलीस. रजिस्टर मॅरेज मध्ये बरीच रिस्क असते तरीसुद्धा त्यावेळी मित्रांमध्ये तू पुढे होतास. लग्नाला आलास सुद्धा आणि पोलिस कम्पलेंट वैगेरे होईपर्यंत थांबलास सुद्धा. सैराट मध्ये सगळ्यात जास्त स्तुती झाली ती परश्या, लंगड्या आणि सल्याच्या मैत्रीची. माझ्या आयुष्यात तू त्यांच्यापेक्षा कुठे कमी आहेस?
तू आयसर्कस मध्ये कामाला लागलास आणि तिकडची पार्टटाइम काम आपण एकत्र करायला लागलो. रात्र रात्र जागून आपण तिकडे काम करायला लागलो. तुझ्यामुळे पहिल्यांदा अॅम्बी व्हॅली बघण्याची संधी मला मिळाली. मी रात्रभर काम करत असताना तू काहीच काम नसताना सुद्धा माझ्या बाजूला बसून राहायचास. मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करायचास. त्यावेळी बरीचशी चॅलेंजिंग काम मी तुझ्यामुळे पूर्ण करू शकलो. आताही ऑफिसमध्ये काही नवीन गोष्ट जेव्हा मी करत असेन तेव्हा तू नेहमी माझ्या सोबत असतोस.
मी 2009 मध्ये रायगडावर पिकनिकला गेलो असताना सगळ्यांसमोर बिझनेसच प्रपोजल टाकलं आणि तेव्हाही तू पुढे आलास. नंतर काही कारणाने तुला जोंबसाठी मलेशियाला जाव लागलं त्यावेळी तुला पार्टनरशीप मधून रिटायरमेंट घ्यावी लागली. तू काहीच आढेवेढे न घेता माझ्या सांगण्यावरून पार्टनरशीप मधून बाहेर गेलास. कारण पैसा तुझ्यासाठी कधीच महत्वाचा नव्हता. मीसुद्धा चांगल्या पगारची नोकरी सोडून बिझनेस मध्ये उतरलो होतो. पैशांचा बॅकग्राऊंड नव्हता. हळूहळू टंचाई भासायला लागली कारण त्याच दरम्यान सार्थक ही झाला होता. तू तिकडून मला नेहमी फोन करत असायचास. मी तुझ्याकडे पैसे मागायला लागलो आणि तूही कोणतही कारण न सांगता मला द्यायला लागलास. त्यावेळी मी बिझनेस मध्ये राहावं म्हणून तू मला खूप सावरून धरलं होतस. त्यावेळेचीच एक गोष्ट मला आवर्जून आठवते. त्यावेळी मोजून खिशात 10-20 रुपयेच असायचे कारण पगारच बर्याळच वेळेला निघत नव्हता. एकदा तू भारतात आला होतास. काही कामानिमित्त नवी मुंबईच्या ऑफिसला गेला होतास आणि निघताना मला कॉल केलास. मी तुला बाईकवरून कामोठे स्टेशन ते घर असं सोडायला आलो होतो. तुला नुकतेच कुठल्या तरी कामाचे 2000 मिळाले होते. तेव्हा त्यातले एक हजार काढून तू माझ्या खिशात टाकले होतेस. मी मागितले नसताना माझी परिस्थिति जाणून अशी मदत तू मला बर्या्च वेळेला केली आहेस. तू मलेशियामध्ये असताना आम्ही तिकडे एकदा तरी याव म्हणून तुझा प्रयत्न चालू होता. पण तिकीट परवडणार नाही म्हणून आम्ही नेहमी टाळाटाळ करत होतो. एअरएशियाची तिकीट वर ऑफर निघाली आणि तू लगेच मला ते फोन करून सांगीतलस. तुझ्यामुळे मला आणि संदीपला, जेवढ्या पैशात महाराष्ट्र फिरून व्हायचा नाही तेवढ्या पैशात मलेशिया फिरता आलं. मी आजही सगळ्यांना सांगतो की फक्त 12000 मध्ये आम्ही 7 दिवस मलेशियात राहून, फिरून रिटर्न आलोय. आणि तुझ्यामुळेच एमबीसी मधल्या जवळजवळ 40 लोकांची मलेशिया ट्रीप झाली.
तुझा जॉब चालू होता आणि इकडे स्वराज्य मध्ये आमचा बिजनेस. पण भारतात परत आल्यावर तूझ मन तिकडे लागत नव्हतं. तू तुझ्या चांगल्या पगारची नोकरी सोडून खूप कमी पगारमध्ये स्वराज्य मध्ये जॉइन झालास. लोकांसाठी हा डिसीजन वेडेपणाचा असेल. खर तर टेक्निकल इंजीनियरपासून मार्केटिंग मध्ये येण ही खूप कठीण गोष्ट आहे. पूर्ण ट्रॅकच चेंज झाला तरीही स्वराज्यासाठी काम करण हा तुझं हेतु होता. तो पूर्ण पगार तर तुझ्या घराच्या हफत्यामध्येच जायचा तरीही तू प्रयत्न करत राहिलास. त्याच दरम्यान तुझं लग्नही झाल होत आणि पूनम सारखी समजूतदार मुलगी तुझ्या आयुष्यात आली. तिनेही तुला साथ दिली. तू सगळ्या गोष्टी शिकलास आणि मला अभिमान वाटतो की स्वराज्य ला तू तुझ्या मेहनतीने आणि प्रयत्नांनी एका उंचीवर नेऊन ठेवलस. प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही सुधार करण्याचा प्रयत्न करत राहिलास आणि ते केलेस सुद्धा. आज एखादा क्लायंट मला समोरून सांगतो की, “तुम्ही मीटिंग ला येण्यापेक्षा अजय ला पाठवा. तुम्ही आता असं माणूस आम्हाला दिला आहे की आम्हाला तुमची गरज भासत नाही.”. यातून अभिमान वाटल्याखेरीज राहत नाही. जेव्हा गोष्टी चांगल्या होत नाहीत तेव्हा तू चिडतोस सगळ्यांवर पण तेवढ्या पुरताच. पुन्हा तू सगळ्यांसाठी मित्रच होतोस.
मी स्वता जेव्हा जेव्हा बिजनेस मध्ये खचलो तू मला नेहमी साथ देत राहिलास. जेव्हा मी कुणीच नव्हतो तेव्हापासून तू माझ्यावर विश्वास दाखवतो आहेस. मी कुणीतरी वेगळा आहे हे तुझ्यामुळे मला समजत राहिल. मी कुठेही काहीही करत असताना तुझ्या डोळ्यात माझ्याबद्दलचा अभिमान स्पष्ट मला दिसतो. माझ्याबद्दल माझ्यापेक्षा ही जास्त कॉन्फिडंस तुझ्यात आहे. त्यामुळे माझ्या संबंधी कामाची कमिटमेंट तू आधीच समोरच्याला देऊन मोकळा होतोस कारण तुझं कॉन्फिडंस असतो की मी ती गोष्ट करेन. आणि कदाचित याच कॉन्फिडंसमुळे माझ्याकडून ती गोष्ट होते सुद्धा. “सुब्या, तू ब्लॉग लिहायला सुरुवात कर. आर्टिकल चांगले आहेत तूझे.”, “सुब्या, तू आतापासुनच तुझ्या आयुष्यावर पुस्तक लिहिण्याची सुरुवात कर. कारण जेव्हा उद्या खूप मोठा बिजनेसमन होशील तुला वेळ मिळणार नाही”, “तू कमर्शियल नाटकात ट्राय करायला हवं होतस. काळा असलास म्हणून काय झाल, छावा आहेस तू.”, “सुब्या, जेव्हा एखादा क्लायंट मला विचारतो ना एखादी गोष्ट होईल का म्हणून तेव्हा मी त्याला बिनधास्त हो म्हणून सांगून टाकतो. मला महितेय तू ते करणार. तू परश्या आहेस आपला”. तुझं माझ्याबद्दलच प्रत्येक स्टेटमेंट माझ्याबद्दलचा आत्मविश्वास दाखवत आणि मला ती गोष्ट करायला भाग पाडत. मी जेव्हा जेव्हा स्टेजवर परफॉर्म करतो तेव्हा समोरच्या साऊंड बॉक्स मध्ये तू बसलेला असतोस. मी चूक करतोय की बरोबर हे तुझ्याकडे बघून मला समजत. मग ते एम.बी.सी फंकशन असेल किवा आपल्या क्लासचा कार्यक्रम.
माझ्या पर्सनल आयुष्यात बर्याकच गोष्टी अशा आल्या की ज्या मी कधीच कुणालाच शेअर करू शकत नव्हतो. त्या मी तुला नेहमीच बिनधास्त शेअर केल्या. माझ्या चुका असतील किवा काही अचीवमेंट असेल मी तुला सांगितली. कारण माझी अचीवमेंट तू नेहमी उचलून धरलीस आणि चुका पोटात दाबून ठेवल्यास. चुकांमध्येही मला साथ दिलीस आणि मी कुठेच चुकीचा नाही हे जाणवून सुद्धा दिलस. माझ्यानंतर जर मी कुणाला माहीत असेन तर तो फक्त तू आहेस. तुझ्या माझ्यात ना तू कधी कोणता हिशोब ठेवलास ना मी कधी ठेवला. आता तू बर्या च वेळेला माझ्याकडून घेतलेल्या पैशाचा हिशोब ठेवण्याचा प्रयत्न करतोस, पण जर हिशोब केला तर मी तुझा बर्याूच गोष्टीमध्ये देणी लागतो. त्यामुळे तू त्या फंद्यात पडाव हे मला अजिबात आवडत नाही. तू मला त्या प्रत्येक वेळी सावरल आहेस जेव्हा सुबोध संपला होता. मी माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी काहीही करेन ते त्या त्या वेळी कमीच आहे. कारण तुझ्याबरोबर असताना मी ओरिजिनल सुबोध असतो.

तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल लिहायला गेलो तर एक अख्खं पुस्तक बनेल एवढ्या गोष्टी आहेत. माझ्या आयुष्यातल्या अति महत्वाच्या व्यक्तिमध्ये तू एक आहेस. तू असा व्यक्ती आहेस ज्याच्यावर मी किवा कुणीही डोळे झाकून विश्वास ठेवावा. म्हणूनच तू आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात खूप स्पेशल आहेस. आज मी जों कुणी आहे किवा बनण्याचा प्रयत्न करीत आहे त्यात तुझादेखील महत्वाचा वाटा आहे. तू जिकडे जातोस तिकडचा होतोस. कारण तू पूर्ण साफ आहेस. ज्याला मी हक्काने कोणतही काम कधीही सांगू शकतो आणि नाही झाल तर चार शिव्या घालू शकतो असा फक्त तूच आहेस. तुझी जागा माझ्या आयुष्यात दुसर कुणीही कधीच भरून काढणार नाही. आज इथेच थांबतो. आज तुझं वाढदिवस आहे म्हणून हे सगळ चांगलं लिहितोय असं नाही तर तू मुळात तसा आहेस. पत्र लांबल असेल पण या सगळ्या लिहिता लिहिता उमटत गेलेल्या भावना आहेत. माझ्या आयुष्यावर जेव्हा कधी पुस्तक लिहिणं होईल त्यातल्या लीडरोल मध्ये नक्की तूच असशील.
तुझाच,
सुब्या


#sahajsaral

Comments

  1. खरंच अजय खूप गुणी मुलगा आहे. मुख्य म्हणजे त्याला सतत हसतमुख पाहिलंय. त्याचा आठ्या पडलेला, कुरकुरणारा चेहरा मला कल्पना करून सुद्धा दिसत नाही. बघितलीस लिखाणाची गोडी. स्वतःच्याच आयुष्याकडे याशिवाय त्रयस्थासारखं पाहणं होतं कुठे. सतत प्रवाही राहणं म्हणजे प्रगतीचं लक्षण असं गणित झालंय खरं. पण कधी कधी काही क्षण आत्मचिंतनाचेही असावेत, मग निवांत मन घुसळलं कि हे आठवणींचं लोणी गवसतं.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी