Skip to main content

लॉलिपॉप


"मी बिजनेस चालू करायचा विचार करतोय. आम्ही पाचजण तयार झालोय. सगळे शाळेतलेच मित्र. तू ओळखतोस सगळ्यांना. शाळेपासून आतापर्यंत काही ना काही निमित्ताने एकत्र भेटतोच आम्ही पण आता या निमित्ताने आयुष्यातला बराच वेळ एकत्र काढता येईल. आम्ही रायगडावर गेलो होतो तिथेच ठरवल आम्ही. कंपनीच नाव पण ठरलंय. स्वराज्य.", मी एकदम उत्साहात दादाला सांगत होतो आणि तोही तितक्याच उत्साहात मला प्रतिसाद देत होता. "अरे वा! मस्तच नाव ठरवलंय तुम्ही. महाराजांचा आदर्श समोर असेल तर काही चुकीच घडणार नाही आपल्या हातून. बिनधास्त कर. पैशांची गरज लागणार आहे का तुला?". दादाने विचारल्यावर मी नकारार्थी मान डोलावली. नंतर माझे स्वप्न आणि प्लॅन दादाला सांगण्यात बराच वेळ गेला आणि तोही ते ऐकत होता. प्रतिसाद देत होता.
मला त्यावेळी 3 वर्षाचा सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला अनुभव होता आणि कुणाच्या हाताखाली काम करण्याचा कंटाळा आल्याने स्वतःच स्वराज्य निर्माण करू अशी संकल्पना मी माझ्या मित्रांसमोर आमच्या रायगड ट्रिप मध्ये मांडली होती आणि माझ्या 4 मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. आयुष्यातली कोणतीही गोष्ट ठरवली की मी ती अगोदर दादाला सांगतो कारण त्याच्याकडून एक वेगळ्या प्रकारच मोटिवेशन मला मिळत असे. आमच्या घरात त्यावेळी तरी कमावणारे आम्ही दोघेच होतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा शून्यापासून चालू करण कितपत योग्य आहे हे मला कळण्याइतपत प्रॅक्टिकल मी नव्हतो. जो सोच लिया वो बस करना है या माझ्या स्वभावानेच मी माझी नोकरी सोडली व आम्ही पाच मित्रांनी मिळून सानपाडाला ऑफिस घेतलं आणि व्यवसाय चालू केला. कोणतेही झाड लगेच फळ देत नाही हाच नियम व्ययसायालाही लागू होतो. लवकरच मला पैशाची कमतरता भासायला लागली पण दादाला अजून त्रास द्यायचा नाही हे मी ठरवलं होत. बऱ्याचशा मित्रांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे माझं लाईफ तस व्यवस्थित चालू होत पण घराची पूर्ण जबाबदारी दादावर आली होती. "तू टेन्शन घेऊ नकोस. बिजनेस कर." एवढेच तो नेहमी बोलत असे. 3 महिन्यांनी दादाचं लग्न ठरलं आणि पैशाची जमवाजमव करण्यात दादा गुंतून गेला कारण लग्नाला लागणारा पुरेसा पैसा दादाकडे नव्हता. ही दादाची धावपळ मी स्वतः जवळून पाहत होतो आणि माझं मन मला एकाच गोष्टीसाठी खात होत, जर मी 3 महिने अजून जॉब केला असता तर एवढा त्रास झालाच नसता सगळं सुरळीत झालं असत. हे जर मला कळत होत मग दादाला ते त्यावेळी का नाही सुचलं. माझा स्वभाव दादाला माहित होता, मी लगेच उत्स्फूर्तपणे निर्णय घेतो. पण दादाने त्यावेळी ही गोष्ट मला पटवून दिली असती तर कदाचित मी बिजनेस थोडा उशिरा चालू केला असता. मी माझी हि नाराजी दादाकडे बोलून दाखवली. "तू त्यावेळी मला थांबवायला हवं होतस" दादा माझ्याकडे बघत होता. "चल बरेच दिवस चिकन लॉलिपॉप नाही खाल्लय." माझा चिकन लॉलिपॉप हा विक पॉईंट दादाला खूप चांगला माहित होता पण यावेळी मी त्याला भुलनार नव्हतो. मी माझा विषय लावून धरला. त्याने मला रिक्षात भरला आणि आमच्या आवडत्या हॉटेलसमोर रिक्षा थांबवली. आम्ही टेबल वर बसलो. दादाने ऑर्डर दिली. पण मला लॉलिपॉप मध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. मी अजूनहि माझ्या विषयावर अडून बसलो होतो.
"तू एवढं विचारतोस म्हणून सांगतो. तू 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे आलास आणि तुझ स्वप्न ध्येय सांगितलंस. तुझ्या डोळ्यात एक ठिणगी मी पहिली. खर तर त्यावेळी मला माझ्या लग्नाबद्दल माहित होत आणि पैशाचा हा त्रास होईल याची सुद्धा कल्पना मी केली होती आणि तशी तयारीही. लग्नाचं काय रे होईल कसही मॅनेज. पण जर माझ्या लग्नासाठी मी तुला तुझा बिजनेसचा प्लॅन पुढे ढकलायला सांगितलं असता तर कदाचित 3 महिन्यात तुझी ती ठिणगी विझली असती आणि ती एनर्जी कायम राहिली नसती. माझ्या स्वार्थासाठी माझ्या भावाच्या स्वप्नाचा जीव घेणं योग्य आहे? जास्त विचार करू नकोस. तू जी स्वप्न जगशील ती माझ्यासाठी काही वेगळी नाहीत." दादाने इतक सहजपणे सांगून समोरच्या प्लेटमधून चिकनचा एक पीस उचलला आणि मला भरवला. त्या घासाबरोबरच मी आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा घेत होतो.
- सुबोध अनंत मेस्त्री

#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

दूरदर्शन आणि मी

संध्याकाळी माझ्या एका कामानिमित्त बेलापूर स्टेशनजवळ गेलो होतो इतक्यात एका अनोळखी नंबरवरून फोन वाजला.  संध्याकाळी ७ किंवा ७.३० ची वेळ असेल.  आजूबाजूला बराच गोंधळ असल्याने मला नीट ऐकू येत नव्हतं.  मी थोड्या वेळात कॉल करतो सांगून व समोरून "ठीक आहे" असं पुसटस ऐकू आल्यावर फोन कट केला.  नेमका फोन कुठून आलाय हे मला कळालं नव्हतं. माझं काम झाल्यावर मी परतीच्या वाटेवर असताना पुन्हा त्याच नंबर वर कॉल लावला. 
"नमस्कार, थोड्या वेळापूर्वी आपला कॉल आला होता.  सॉरी तुमचा आवाज आला नाही म्हणून कट करावा लागला", मी फोन लागल्याबरोबर सांगण्यास सुरुवात केली. 
"नाही काहीच हरकत नाही.  मी निखिलेश चित्रे बोलतोय.  दूरदर्शनमधून", समोरून आवाज आला.  आता आवाज बऱ्यापैकी क्लीअर होता.
"नमस्कार निखिलेशजी बोला", मी त्यांच्या बोलण्यास दुजोरा दिला
"मी तुमचा ब्लॉग वाचला.  आम्हाला टेक्नॉलॉजी व सोशल मीडियासंदर्भात न्यूजमध्ये बोलण्यासाठी एका तज्ज्ञाची आवश्यकता होती.  तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये जे काही मांडलय ते तुम्ही न्यूज मध्ये सांगू शकाल का?", निखिलेशजींनी विचारलं
&quo…

आठवणीतला गारवा

आठवणीतला "गारवा" - सुबोध अनंत मेस्त्री
आमच्या घरातला दीड दिवसाचा गणपती निघायला तसा अजून तासभर वेळ बाकी होता.  घराच्या मोठ्या खिडकीला लागून प्लास्टिकच्या आराम खुर्चीवर मी बाहेरचा पाऊस पाहत रेलून बसलो होतो.  रात्रीच बऱ्याच वेळेचं जागरण असल्याने सगळे बेडरूममध्ये आराम करत होते.  आमच्या करंजाडेच्या  घराच्या खिडकीसमोरूनच डोंगर सुरू होतो. बिल्डिंग आणि डोंगरामध्ये फक्त एक छोटा  रस्ता.  डोंगर सुरू होतानाच पायथ्याशी एक झोपडी.  कदाचित बाजूला बिल्डिंगच काम चालू असणाऱ्या कामगाराची असेल.  गावाच्या घराला शोभेल अस विटांच घर.  घरासमोर बांधलेल्या बकऱ्या पावसात भिजत होत्या.  घराच्या मागे चढणीवर झुडपं साफ करून त्यांनी काही भाज्यांची लागवड केली आहे.  तिथून थोडं चढण गेल्यावर एक खड्डा आहे ज्यातून उरणवरून माल वाहून नेणाऱ्या मालगाडीचा ट्रॅक जातो. पुढे पुन्हा थोडा डोंगर नंतर पनवेल पासून उरण ला जाणारा एक्सप्रेसवे आणि तो रस्ता क्रॉस केल्यावर खऱ्या डोंगराची सुरुवात.  हे इतकं काही मध्ये आहे हे खिडकीतून जाणवतच नाही.  अस वाटत की खिडकीसमोरच्या रस्त्यासमोरूनच डोंगर सुरू होत असेल.  या डोंगराच्यामागे थोडा लांब …

चालता बोलता नकाशा

"पप्पा, पुढचं कुठलं स्टेशन येईल?", सार्थक 3 वर्षाचा असेल तेव्हा ट्रेनमधून प्रवास करताना त्याने विचारलेला प्रश्न अजून आठवतो.  ट्रेन हा त्याचा लहानपणापासूनचा खूप जिव्हाळ्याचा विषय.  तो दीड दोन वर्षाचा होईपर्यंत आम्ही मानसरोवरला राहायचो.  तेव्हा बेडरूमच्या  खिडकीतून मानसरोवर स्टेशन सहज दिसायचं.   येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेनना तो खिडकीत बसून बाय बाय करत असे.  पुढे बेलापूरला राहायला आल्यावर आणि त्याला समजायला लागल्यावरसुद्धा ज्या ट्रेन मधून आम्ही उतरायचो ती सुद्धा अगदी दिसेनाशी होईपर्यंत तिला तो बाय करत राहायचा.

प्रतिभाच माहेर चेंबूरला होत.  तेव्हा बेलापूर ते चेंबूर प्रवास करताना प्रत्येक स्टेशन नंतर तो "आता कोणतं स्टेशन येईल?" विचारायला लागला.  आम्ही त्याला स्टेशनची नाव सांगायचो. त्याला त्याच पाठांतर झालं व हळू हळू तो बेलापूर ते चेंबूर सगळे स्टेशन स्वतःहून सांगायला लागला.  मला त्याच कौतुक वाटायला लागलं.  पण तो चेंबूरपर्यंत थांबणार नाही हे मला समजलं होतं.  आपण जिथपर्यंत गेलोय त्याच्यापुढेही जग आहे हे समजण्याइतपत अक्कल त्याला आली होतीच.

"पप्पा, चेंबूरच्या पुढे कोणतं स्…