ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसातच सुरु झाला.
स्वतःचा उद्योग सिस्टम सेट करून कशा कराव्यात हे पुंडलिकने मला शिकवलं. त्याच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम ट्रेडिशनल पद्धतीने चालायचं पण सिस्टिम अशा सेट होत्या कि चुकांना जागा उरत नव्हती. त्यात अनस्किल्ड लेबरसोबत काम करताना लागते ती सगळी हुशारी त्याच्याकडे आहे. व्यवसाय करता करता सामाजिक जाणीव जपणं ही पुंडलिकची खासियत. “माणुसकीची भिंत” चा कन्सेप्ट दरवर्षी राबवून तो हजारो गरजूंना सायकल्स, कपडे आणि इतर वस्तू मिळवून देण्यासाठी मदत करतो. स्वतः जातीने तिथे हजार राहून प्रत्येक गोष्टीची पडताळणी करतो. साऊथ मुंबई न्यूज सारखे चॅनेल चालू करून तो खूप चांगली माहिती लोकांसमोर आणतो आहे. यात त्याचं पूर्ण कुटुंब त्याची साथ देतेय हे वाखाणण्याजोगे आहे. बेटर हाल्फ चांगली असेल तर आयुष्याच्या कितीही अडथळ्यांवर आपण मात देऊ शकतो हे रागिणी वहिनींकडे बघून समजतं. त्यांनी घरही चांगलं जपलं आणि पुंडलिकाच्या आयुष्यातली माणसंही! दोनेक वर्षांपूर्वीच पुंडलिकच्या आयुष्यावर मोठा आघात झाला पण रागिणी वाहिनीनमुळे त्याची झळ कदाचित पुंडलिकला जाणवली नसेल. दोघांची नावेही देवांची आणि दोघे आहेत ही देवासारखेच !
वेळोवेळी मला जेव्हा मार्गदर्शन लागलं तेव्हा मी त्याला हक्काने साद घातली, सुरुवातीच्या काळात जी मदत लागेल मग ती आर्थिक / मानसिक असेल त्या त्या वेळी तो उभा राहिला. त्यामुळेच इतक्या वर्षात पंधरा दिवसातून एकदा असं आमचं बोलणं व्हायचंच. MBC च्या घोडदौडीबद्दल ऐकून त्याला कायम अभिमान वाटायचा. मी कुठे चुकत असेन तर मोठ्या भावासारखे माझे कानही पिळले. त्याचे मार्गदर्शन कायम राहावे म्हणून MBC च्या सल्लागार समितीमध्ये तो स्वखुशीने आला आणि आता मला भेटण्यासाठी बोलण्यासाठी अजून एक निमित्त मिळालं. त्याच्यासोबत मी असे मुमेंट्स जगलोय जे आयुष्यभर विसरणं कठीण आहे. २०१२ मध्ये त्याच्यासोबत सहगायक म्हणून गाणं गायची संधी मिळालेली आणि त्यानंतर अजूनही आम्ही ती संधी शोधतोय पण कधीतरी नक्कीच येईल. वय वाढण्यासोबत जवान होत जाणं आणि आयुष्य खऱ्या अर्थाने जगणं हे पुंडलिककडून शिकावं. माझ्या चांगल्या वाईटात माझ्या सोबत असणाऱ्या, माझ्या प्रत्येक कलाकृतीवर / कामावर मनापासून प्रेम करून त्याची दखल घेणाऱ्या, गरजेला दोन खडे बोल सुनावून माझी चूक दाखवून देणाऱ्या आणि सख्ख्या भावासारखंच कायम साथ निभावणाऱ्या माझ्या पुंडलिक दादाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !
- सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment