Skip to main content

अडोलसन्स

 


अडोलसन्स
एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते.
मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्या आभासी जगात भरकटत जातात आणि बऱ्याच वेळेला सायबर बुलिंगचा शिकार होतात. त्यातून मग स्वतःला कमी लेखणे किंवा चिडचिड चालू होते. काही मुले या प्रोसेसमध्ये शांत होऊन जातात तर काही आयुष्य संपवण्याच्या मार्गाचा विचार करू शकतात. पालक म्हणून आपली जबाबदारी मुलांना हवं ते देऊन संपत नाही. पण एक मित्र म्हणून ते कुठे वाहवत जात असतील तर त्यांचं ऐकून घेऊन त्यांच्यामध्ये परिस्थितीची जाणीव कशी निर्माण होईल ही आपली खरी जबाबदारी आहे.
जेव्हा मोबाईल - सोशल मीडिया नव्हता आणि कुणाशी समोरासमोर भांडण जरी झालं तरी त्या व्यक्तीच्या एक्सप्रेशन्स वरून त्याला काय वाटलं असेल याची जाणीव आपल्याला व्हायची. त्याच्या फीलिंग्स आपण समजून घेऊ शकत होतो. पण या आभासी जगात एखाद्याला ट्रोल करताना किंवा वाईटसाईट कमेंट करताना त्याचा चेहरा आपल्यासमोर नसतो. त्यामुळे त्या एका कृतीने त्याची काय मानसिक अवस्था होऊ शकते याचा अंदाज आपल्याला येत नाही. एखादा विषय घेऊन तो कितीतरी वेळ ताणून धरणं आणि एखाद्याला कॉर्नर करत त्याच्याबद्दल कंमेंट्स करून मानसिकरीत्या खच्चीकरण करणे हा प्रकार आता सर्रासरित्या आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतो. त्यात काही लोकांना असुरी आनंद मिळतो तर ज्याला टार्गेट केलं जातं, बऱ्याच वेळेला त्या व्यक्तीचं आयुष्य पणाला लागतं. मोठ्या माणसांमध्ये कदाचित हे सगळं पचवण्याची ताकद असते पण कोवळ्या वयातल्या मुलांना मात्र हे झेपत नाही. हाच विषय अडोलसन्स मध्ये अत्यंत उत्कृष्टरित्या मांडला आहे.
सगळेच करतात म्हणून एखादी गोष्ट बरोबर होत नाही तसेच आज आपल्या पाल्याच्या मित्रांच्या हातात स्मार्टफोन्स आहेत म्हणून बालवयात आपल्या पाल्याच्या हातात तो असावा हा अट्टाहास नसेल तरी चालतं. जर संपर्क करण्यासाठी द्यायची गरज पडलीच तर नॉर्मल कीपॅड वाले मोबाईल देऊ शकतो आणि अगदीच स्मार्टफोनचं द्यायचा असेल तर पॅरेंटल कंट्रोल ऑन करून त्यांच्या ऍक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे गरजेचं आहे. आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससुद्धा बूम मध्ये आलेलं आहे. त्यामुळे या आभासी जगात पालक म्हणून आपल्या मुलांना प्रोटेक्ट करणं अत्यंत महत्वाचे आहे. प्रिव्हेन्शन इज अल्वेज बेटर दॅन क्युअर.
धन्यवाद
सुबोध अनंत मेस्त्री


Comments

Popular posts from this blog

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...