सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचालकांशी संपर्क साधून भाडे ठरवून त्यांचा वेळ आणि पैसा वाचवावा आणि त्यासोबतच रिक्षालासुद्धा जास्तीत जास्त भाडी मिळावीत. सिंधुदुर्गमधल्या कोणत्याही रेल्वे स्टेशन पासून ते मालवण किंवा कोणत्याही गावात प्रवास करण्यात जास्त मदत होईल कारण आता प्रवासी ट्रेनमध्ये असतानाच ऑटो बुक करून ठेवू शकतील.
गेले २ दिवस मालवण मध्ये नितीन सरांच्या आणि रिक्षाचालक संदीप गावकर भाऊ यांच्या मदतीने आम्ही मालवणचे जवळपास सगळे रिक्षास्टँड पालथे घातले आणि जमतील तितक्या रिक्षांना येताववर रजिस्टर करून घेतले. फक्त वर वर काम न करता आम्ही ग्राउंडवर वर जाऊन त्यांना ऍप वापरताना काय अडचणी येऊ शकतात त्याचा अंदाज घेतला. काही जणांनी या संकल्पनेचं स्वागत केलं तर काही जणांनी त्यावर अविश्वास दाखवला. "आमका कोणार जबरदस्ती करूची नांय हां,बाकिच्यांका भांडी गावाक् लागली आणि तेंचे रिक्षा फिरतंना दिसले काय सगळेच जण तयार होतंलेत", नितीन सरांनी आम्हाला वेळोवेळी दिलासा दिला. हा योगायोग असावा की स्वामींची कृपा, पण ज्या रिक्षा चालकाने पहिल्यांदा आमचं मनापासून ऐकून घेतलं आणि स्वतःच्या रिक्षात स्टिकर लावला त्या रिक्षात स्वामींचा फोटो होता. याव्यतिरिक्त जितक्या रिक्षावाल्यांनी आम्हाला सहकार्य केले किंवा जागोजागी सोडले त्यांच्या रिक्षात सुद्धा स्वामींचे स्टिकर्स किंवा मुर्त्या होत्या. सगळं स्वामींच्या इच्छेनेच चालू आहे या श्रद्धेने आम्ही २ दिवस येताववर जोरदार काम केले.
मालवणचे पोलीस इन्स्पेक्टर श्री. प्रमोद कोल्हे साहेब, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्री. उमेश नेरुरकर, श्री. नितीन वाळके सर आणि इतर व्यापारी संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत येतावच्या केक कटिंगने ६ एप्रिलला रामनवमीच्या निमित्ताने आपल्या येताव ऍपच लोकार्पण झाले. वायरल झालेल्या मॅसेजमुळे २ दिवसात ऍपचे १००० हून अधिक डाउनलोड झाले यातूनच या संकल्पनेची सध्या कोकणात किती गरज आहे हे लक्षात येते. मालवण नंतर आता लगेच ९ तारखेला देवगडसाठीसुद्धा या ऍपचे लॉंच करण्यात येणार आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात सिंधुदुर्गच्या संपूर्ण ८ जिल्ह्यात येताव पोहचणार आहे.
नितीन वाळके सर व सुरेखा वाळके ताई यांची या प्रवासात खूप मदत झाली. खर तर हा प्रवास आता सुरू झाला आहे. स्वामींची ईच्छा असेल तर लवकरच कोकणात सगळ्या ठिकाणी आपले "येताव" बहुतेक कोकणवासीयांच्या आयुष्याचा भाग झालेले असेल. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम आमच्या सोबत राहू दे 

धन्यवाद
सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment