काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं.
वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम्ही ग्राउंड फ्लोअरला प्रवेश केला. तिथे शुज घालून वर ऑफिसमध्ये जाता येणार नव्हतं. शुज काढून लिफ्ट मध्ये प्रवेश केल्यावर पुन्हा "वेलकम तो राजेश इंडिया" असा प्री रेकॉर्ड साउंड प्ले होऊन जुन्या काळातील इंस्ट्रुमेंटल म्युजिक वाजायला सुरुवात झाली. अकाउंट हेड आम्हाला पहिल्या फ्लोअरवर एका प्रशस्त रूम मध्ये घेऊन आले. एखाद्या एम. एन. सी. मध्ये असावा अशा क्वालिटीचा तो डिस्कशन रूम होता. आम्ही नुकताच बाहेर चहा घेऊन आलो होतो पण त्यांच्या आग्रहाने पुन्हा सांगितला. तिथे काम करणारे एक वयस्कर मामा एका ट्रे मधून पाणी बॉटल्स घेऊन आले आणि आत येतानाच "गुड मॉर्निंग सर" असं म्हणून आमचं अभिवादन केलं. प्रत्येक जण एकदम टापटीप आणि प्रॉपर कंपनीच्या ड्रेस कोड मध्ये होते. शुज अलाऊड नसल्यामुळे वॉशरूम बाहेर बऱ्याच स्लिपर्स ठेवल्या होत्या. म्हणजे एकाच वेळी बऱ्याच लोकांना वॉशरूम युज करता येण्यासारखं होता.
अकाउंट हेड सोबत गप्पा मारताना समजलं की ते राजारामजींच्या गावातले होते आणि जवळपास ६०% स्टाफ हा त्यांच्या गावाकडचाच होता. त्यांच्यासाठी स्वतंत्र राहण्याच्या ए. सी ल. रूम्स कंपीमध्येच होते. प्रत्येकासाठी स्वतंत्र बेड होते. नाश्त्याची जेवणाची व्यवस्था कंपनीकडूनच होती. त्यांच्याशी गप्पा मारत असतानाच चहासोबत प्रत्येकासाठी सेपरेट कुकीज ट्रे मधून मावशी घेऊन आल्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल आणि आपुलकीची भावना. मी मुद्दाम अकाउंट हेडना विचारलं की तुमच्याकडे कसं वागावं यासाठी काही सॉफ्टस्किल ट्रेनिंग होतात का?". "नाही सर. सकाळी पहिल्यांदा आम्ही ऑफिसमधले कुणीही एकमेकांना भेटतो तेव्हा हसून गुड मॉर्निंग बोलायची सवय आहे. आणि हे सगळेच करतात". काहीच वेळात सेल्स डिपार्टमेंट मधून राजेश जी आणि गणेशजी असे दोघे जण प्लेट्स घेऊन आले ज्यात श्रीफळ आणि शाल होत्या. "सर हे आमचे रिच्युअलस आहेत. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्हिजीटरचा आम्ही असा सन्मान करतो. गेस्ट आमच्यासाठी देवासारखे आहेत", राजेश जी म्हणाले. त्यांनी आमच्या कपाळावर टिक्का लावला आणि शाल श्रीफळ देऊन आमचा सन्मान केला. इतकी मोठी कंपनी सांभाळताना आपल्या परंपरा सांभाळल्या जात आहेत याचं विशेष कौतुक वाटलं. अमित देशमुख यांनी स्वतः बऱ्याच एम. एन. सी. सोबत काम केलं आहे आणि त्यांचे इव्हेंट सुद्धा अटेंड केले आहेत पण इथला अनुभव वेगळा असल्याची प्रशंसा त्यांनी राजेश आणि गणेश जी समोर केली. त्या दोघांशी बराच वेळ गप्पा झाल्या. "सर आता आमचे सेल्स डिपार्टमेंटचे हेड येतील आणि तुम्हाला आपल्या फॅक्टरीची पूर्ण टूर करतील", अस सांगून ते दोघे निघाले आणि काहीच वेळात विशालजी आणि अतुलजी आले.
प्रत्येकाच्या वागण्या बोलण्यात कमालीचे साम्य होते. त्या दोघांसोबत आम्ही निघालो. ग्राउंड फ्लोअरला फॅक्टरी मध्ये आलो. तिथे गोल्ड सिल्वर तसेच विविध प्रेशियस मेटल रिफायनरी मशीन्स बनतात. १,२ किलो पासून हजार किलो गोल्ड पर्यंतच्या रिफायनरी मशीन्स तिथे बनतात. "आम्ही आताच १००० किलोची गोल्ड रिफायनरी मशीन साऊथ आफ्रिका मध्ये इन्स्टॉल केली", विशाल जी आम्हाला सांगत होते. १००० किलो सोनं ऐकून मी मनातल्या मनात तेवढं सोनं कितीला मिळत असेल याचं कॅलक्युलेशन करायला लागलो. त्यांना लागणारे बऱ्यापैकी रॉ मटेरियल तिथेच बनतात. फॅक्टरी मध्ये शांत आवाजात ९० च्या दशकातली गाणी वाजत होती. कामगारांसाठी कुलर्स लावले होते. प्रत्येक कामगार व्यवस्थित ड्रेस कोड मध्ये होता आणि मुळात सगळीकडे स्वच्छता होती. सध्याच्या काही मशीन्सवर मटेरियल तयार करताना छोटे मोठे एरर्स येतात व काम वाढतं म्हणून बऱ्याच इंपोर्टेड मशीन्स मागवल्या होत्या ज्या ज़ीरो एरर वर काम करतात. रॉ मटेरियल स्टोर रूम, रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग युनिट, रिफायनरी मशीन्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, डेमो रूम सगळीकडे फिरत असताना बॅकग्राउंड ला तीच गाणी वाजत होती त्यामुळे वातावरण प्रसन्न होतं. "सर जपान मध्ये एक पद्धत आहे. जेवल्यावर ते पॉवर नॅप घ्यायला देतात. आपल्याकडेही तशीच एक रेस्टरूम आहे" असं म्हणून त्यांनी आम्हाला एका रूममध्ये नेलं. जसे डेंटिस्ट कडे असतात तशा शेप मध्ये तिकडे बरेच बेड होते. ऑफिस स्टाफ आणि वर्कर्स अशा तिकडे दोन वेगवेगळ्या रूम्स होत्या. "लंच ब्रेक एक तास असतो. १५ मिनिट जेवल्यावर एकतास इथे येऊन लोक रेस्ट घेऊ शकतात. इथे मोबाईल अलाऊड नाही. कुणी मोबाईल सोबत सापडला तर त्याला मोठा फाईन आहे. म्हणून तसं कुणी करत नाही", अतुलजींनी सांगितलं. "मोठ मोठ्या फॅक्टरीज पाहिल्या. पैसे कमावून एम्प्लॉयिज किंवा वर्कर्सचा विचारही कुणी करत नाही. स्वतः एसीमध्ये बसून कामगाराना फक्त गरमीमध्ये राबवून घेतलं जातं. इथे वर्कर्स आणि एम्प्लॉयिज यांची प्रत्येक गोष्टीत बारकाईने काळजी घेतलेली दिसते", अमित पूर्ण मॅनेजमेंटचं कौतुक करत होता. त्यांनी नुकतीच एक नवी फॅक्टरी समोरच घेतली आहे जीच काम चालू होतं. तिथेही आम्ही जाऊन आलो.
नंतर आम्ही राजेश इंडिया कँपनीच्या ऑडिटोरियम मध्ये आलो. २००-३०० कॅपसिटीचा तो एक मोठा हॉल होता. पुढे एक स्टेज आणि त्यावर एक मोठी थिएटर साईजची प्रोजक्टर स्क्रीन. आमचे बरेच इव्हेट्स इथे होतात सर. आम्ही इथे दर शनिवारी मूव्ही सुद्धा बघतो सगळे. असं सांगून त्यांनी आम्हाला पुढच्या रो मधल्या सोफ्यावर बसायला सांगितलं. कंपनीच्या इंट्रोडक्शनची क्लिप आणि नंतर त्यांच्या ऍन्युअल इव्हेंटची, कंपनीतल्या १५ ऑगस्टच्या इव्हेंट क्लिप आम्हाला दाखवली. त्यात सगळ्यात मोठं सरप्राईज हे होतं की राजाराम फुलेजी बऱ्याचश्या परफॉर्मन्स मध्ये स्वतः वेगवेगळ्या पोषाखात स्टाफ सोबत नाचत किंवा गात होते. बॉस इव्हेंटला समोर बसण्याऐवजी स्वतः परफॉर्मन्स मध्ये आहे म्हटल्यावर स्टाफ सोबत त्यांची बाँडिंग चांगली असणारच. त्या इव्हेंटमध्ये घरात लागणाऱ्या मिक्सर, फॅन, रेफ्रिजरेटर पासून बाईक कार पर्यंतचे बरेच गिफ्टस परफॉर्मर साठी होते. तिथून पुन्हा आम्ही सुरुवातीच्या डिस्कशन रूममध्ये आलो. तेव्हा मला समजलं की अतुलजी हे राजाराम जींचे बंधू. मला कौतुक वाटलं की भाऊ एकत्र येऊन एकच बिझनेस करत आहेत पण नंतरची गोष्ट माझ्यासाठी अजून शॉकिंग होती. त्या कंपनीत त्या एकाच फॅमिली मधले ३०-४० लोक कार्यरत आहेत.
"सर आता आमचे दुसरे डायरेक्टर अमोल जी तुम्हाला भेटतील" असं सांगून विशालजी अमोलजींना बोलवायला गेले. अमोलजी आल्यावरसुद्धा त्यांच्याशी खूप चांगल्या गप्पा झाल्या. नात्यावरून विषय निघाल्यावर समजलं की अमोल जी राजारामजींचे मेहुणे. "सर माझा मेहुणाही इथे कमाला आहे", अमोलजीनी हसून सांगितलं. घरातली माणसं असतील तर आपल्याला जास्त बघावं लागत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. "आम्ही सगळे एकाच सोसायटीमध्ये राहतो वसईला. घरात काही इव्हेंट असला तर बाहेरच्या माणसांची गरज नाही पडत एवढे सगळे घरातलेच असतात", अमोलजी सांगत होते. बऱ्यापैकी सगळे डिपार्टमेंट अमोलजी सांभाळतात आणि आतापर्यंत ३१ देशात ते स्वतः या कामनिमित्त गेले आहेत. "१००० किलोची मशीन आम्ही इन्स्टॉल केली पण एक सॉकेटसुद्धा कमी पडणार नाही एवढी तयारी असते आमची. प्रॉडक्ट तिथे पोहचल्यापासून ते पूर्ण इन्स्टॉल होऊन जोपर्यंत त्याचा पहिला ट्रायल सक्सेस होत नाही तोपर्यंत तिथून निघत नाही मी. गरज पडली तर स्क्रू फिटिंग लाही पाना घेऊन उभा राहतो मी. जेव्हा क्लायंटच गोल्ड पूर्ण रिफायनरी मशीन मधून प्रोसेस होऊन बाहेर पडतं तेव्हाच मी तिथून निघतो. साऊथ आफ्रिकेला या प्रोसेसला १ महिना १० दिवस लागले होते. जगात ४ कंपनी आमच्या इंडस्ट्रीमधल्या टॉप मध्ये काउंट केल्या जातात आणि त्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त मेटल रीक्व्हेरी रेट आम्ही देतो. म्हणजे आपल्या मशीन मध्ये प्रॉडक्ट टाकल्यावर ते रिफाइन होऊन मॅक्सिमम रिकव्हर होतं. भारतात सगळ्यात जास्त मशीन आपल्याच लागल्या आहेत. फक्त शो ऑफ करायचं म्हणून क्लायंट इंपोर्टेड मशीन घेतात सुद्धा पण ती मशीन बाजूला बंद ठेवून आपल्या मशीनवर काम करतात कारण लॉस करायचा नसतो", अमोल जींचा बोलण्यातून त्यांच्या कामातला आत्मविश्वास दिसत होता. "इंजिनिअरिंग कुठून केलं सर तुम्ही?", एवढं टेक्निकल ऐकून अमित ने सहज प्रश्न केला. त्यांनी एम कॉम केलंय हे ऐकून आम्हाला धक्का बसला. "पागलपण लागतं सर मग आपण काहीही शिकू शकतो. आता बऱ्याच नव्या गोष्टींवर आमची आर अँड डी चालू आहे. बऱ्याच कॉम्पिटीटर कंपन्यांनी मला अप्रोच केला करोडोचे पॅकेज देऊन त्यांच्यासाठी काम करायला पण पैसे कितीही दिले तरी शेवटी मी तिकडे राहणार गुलामच ना? त्यापेक्षा इथे मी स्वतःसाठी काम करेन, माझ्या पद्धतीने करेन. आज पेरतोय, कधीतरी उगवेलच की", एकदम साधं राहणीमान असणाऱ्या अमोलजींचे प्रगल्भ विचार ऐकून मस्त वाटलं.
जवळपास आम्ही येऊन ४-४.३० तास उलटून तेले होते अजून राजाराम सर भेटले नव्हते. "सर काही वेळात येतील तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या", असं सांगून आमची अतुलजींनी आम्हाला जेवणाच्या रूममध्ये नेलं. तिथे आमच्या जेवणच्या प्लेट्स मावशीनी व्यवस्थित तयार करून ठेवल्या होत्या. "तुम्ही जेवून घ्या आम्ही टीमसोबत जेवण करतो रोज" असं बोलून अतुलजी नी आणि अमोलजींनी आमचा निरोप घेतला. जेवून एक १५-२० मिनिटात आम्ही बाहेर पडलो असू तर अतुलजी आमची बाहेर वाटच बघत होते. ते आमच्यासाठी पटापट जेवण आवरून आमच्या आधी येऊन थांबले होते. त्या सगळ्या पाहुणचाराने आम्ही तिघेही भारावून गेलो होतो.
१०-१५ मिनिटे डिस्कशन रूममध्ये थोडा आराम केल्यावर आम्ही राजारामजींना भेटायला गेलो. त्यांनीही आमचं अत्यंत प्रेमाने स्वागत केलं. त्यांच्यापर्यंत पोहचण्याआधी त्यांचं एक वलय आधीच निर्माण झालं होतं. आम्ही अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही त्यांची प्रशंसा केली. "आमच्याकडे येणारा कुणीही व्यक्ती हा आमच्यासाठी स्पेशल असतो सर. सगळ्यांना सेम ट्रिटमेंटच दिली जाते. क्लायंट असेल तर तो प्रोडक्ट घेईल की नाही यावर आमचा फोकस नसतो. आम्ही फक्त आमचं प्रोडक्ट अजून स्ट्राँग करत जातो. पैसा माझ्यासाठी तितका महत्वाचा नाही. हे काम करायला मला वेगळीच मजा येते. गरज पडली तर सकाळी ४.३०-५ ला पण मी टीमसोबत हजर राहिलो आहे. मी माणसामधला प्रामाणिकपणा पाहतो कारण तोच सध्या महत्वाचा आहे. असा माणूस मला सापडला की त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. सध्या आपल्याकडे अनस्किल्ड लेबर पण ओव्हरटाईम पकडून महिन्याला ७५००० पगार घेतो. मी यांच्यामध्ये यांच्यासारखाच राहतो", असं बरंच काही राजारामजींच्या बोलण्यात आलं आणि त्या प्रत्येक वाक्यागणिक काहीतरी वेगळं शिकण्याचा अनुभव आम्हाला मिळाला.
लहानपणी गावागावात जाऊन सायकलवर आईस्क्रीम विकणारे राजारामजी काहीच पैसा नसताना मुंबईमध्ये आले. मेटल रिफायनरी मशीन्स बनवण्याच्या कंपनीमध्ये वर्कर म्हणून काम करून सगळं शिकून घेतलं आणि २००७ साली १०x१० च्या खोलीपासून राजेश एंटरप्रायझेस ची सुरुवात झाली. तिथून आज २ मोठ्या फॅक्टरीज, २०० हून अधिकचा स्टाफ, ४१ देशांमध्ये मशीन्सचा एक्सपोर्ट आणि आता १०० देशांचा टारगेट आणि मुळात एवढी उंची गाठत असताना आपली संस्कृती जपत राहणे, आपल्या घरातल्या, गावातल्या लोकांना एका उंचीवर घेऊन जाणे आणि स्वतः इतकं यश कमावलेलं असूनसुद्धा इतरांमध्ये इतरांसारखंच राहणं या सगळ्याबद्दल मला राजारामजींचा प्रचंड अभिमान आणि कौतुक वाटलं.
- सुबोध अनंत मेस्त्री
एका मराठी तरुणाने अशा पद्धतीची कंपनी चालवणे आणि तिला येवढ्या मोठ्या उंचीवर घेऊन जाणे ही किती अभिमानाची गोष्ट आहे. सुबोध सर तुम्ही किती बारकाईने पाहणी केली कंपनीची आणि सर्व गोष्टही वाचका पर्यंत पोहोचवल्या.. धन्यवाद
ReplyDeleteवाह
ReplyDelete