Skip to main content

जया अंगी मोठेपण....

 




स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम करावे लागे. आई काही महिन्यात बरी झाली व मुलांना परत आपल्या भाड्याच्या घरी घेऊन गेली.


परिस्थिती बदलत नव्हतीच. या काळात शाळेत एका प्रहसनात चार्लीला घेतलं नाही म्हणून चार्लीने एक विनोदी प्रहसन तयार केलं आणि शाळेच्या मधल्या सुट्टीत एका मुलाला करून दाखवत असताना शिक्षकांची नजर गेली. त्यामुळे त्याने ते शाळेतल्या सगळ्या वर्गात करून दाखवलं आणि चार्लीला सगळ्यांची शाबासकी मिळाली. नवव्या वर्षी त्याला एका ट्रुपसोबत दौरे करण्याची संधी मिळाली पण आजारपणामुळे त्याला ते काम सोडावे लागले. त्यात वडिलांचं निधन झालं आणि पोटगी म्हणून येणारे पैसे पूर्णपणे थांबले. आईचे शिवणकाम चालू होतेच. मोठा भाऊ सिडने याला बालवयातच बोटीवर काम करायला जावं लागलं. तिथून काही पैसे यायला लागले पण एकावेळेस त्याला तिथून आजारपणामुळे परत यायला उशीर झाला व त्याची माहिती घरापर्यंत न पोहचल्यामुळे आईला पुन्हा वेडाचा झटका आला आणि चार्ली पूर्णपणे एकटा पडला. सिडने बोटीवरून परत आल्यावर तो पुन्हा कामावर गेला नाही.

सिडने याने फ्रेड कार्नो यांच्या कार्नो कंपनीमध्ये अभिनयाचं काम मिळालं आणि तिथेच त्याने चार्लीची शिफारस करून त्यालाही काम लावून दिलं. तिथून चार्लीचे अमेरिकाचे दौरे व्हायला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने चार्लीचे आयुष्य सुरु झाले. इथेच त्याचं “हेटी केली” च्या स्वरूपात पहिलं प्रेम झालं पण ते फारकाळ टिकू शकलं नाही. आता प्रयोगांमुळे चार्लीच नाव लंडन आणि अमेरिकेत प्रसिद्ध झालं होतं. यामुळे चार्लीला किस्टोन कंपनीमध्ये चित्रपटात काम करायची संधी मिळाली आणि चोवीसाव्या वर्षी चार्लीचा सुवर्णकाळ चालू झाला. इथेच चार्लीचे फेमस कॅरॅक्टर ट्रॅम्प त्याला सापडलं आणि त्याने अख्ख्या जगाला अक्षरशः वेड लावलं. चार्ली स्क्रिनवर जितका बावळट किंवा धांदरट वावरायचा तितकाच खऱ्या आयुष्यात तो प्रचंड सिरीयस आणि कामाच्या प्रती अत्यंत डेडिकेटेड होता. त्या काळात त्याची प्रसिद्धी एवढी होती की तो नुसता कुठे बाहेर जाणार असेल तर त्याच्या प्रवासाचे अपडेट्स रोजच्या रोज वर्तमानपत्रांमध्ये येत होते. प्रत्येक स्टेशन्सवर त्याला बघण्यासाठी प्रचंड गर्दी उसळायची. पोलीस बंदोबस्त लागायचा. त्यात एकच गोष्ट चांगली होती की त्याला सगळे ट्रॅम्पच्या पोषाखातच ओळखायचे. एकदा एका कार्यक्रमाला चार्लीला बोलावलं गेलं तेव्हा माईकवर बोलताना चार्लीला कुणी ओळखलं नाही. शेवटी जेव्हा त्याने स्टेजच्या मध्यभागी येऊन ट्रॅम्पसारखं चालून आणि अॅक्टींग करून दाखवली तेव्हा लोकांनी थिएटर डोक्यावर घेतलं. ज्या काळात बोलपट चालत होते त्याकाळातसुद्धा चार्लीचे मूकपट जगप्रसिद्ध व्हायचे.

या काळात चार्लीचे ३ घटस्फोट झाले. त्यात त्याला दुसऱ्या पत्नीपासून झालेली २ मुले चार्ल्स व सिडने त्याच्यासोबतच होते. पहिल्या पत्नीच्या घटस्फोटावेळी चार्लीला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. त्याचं नाव जगासमोर खराब करण्याचे बरेच प्रयत्न त्या काळात केले गेले. मधल्या काळात आई बरी होऊन त्यांच्यासोबत राहायला आली होती. आईसाठी एक वेगळं प्रशस्त घर त्याने घेतलं होतं. पण नुसतं स्वतः स्वार्थी जगण्यात काही अर्थ नाही. हे काम सोडून चार्लीने येशूचा शांतीसंदेश जगभरात पोहचवला पाहिजे ही त्याच्या आईची अपेक्षा होती. हीच गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी चार्लीने घेतली आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी “द ग्रेट डिक्टेटर” हा हिटलर वर आधारित चित्रपट काढला. तो चित्रपट प्रचंड चालला. त्यावेळी त्याला रशियाच्या वतीने भाषण देण्यासाठी निमंत्रण आली आणि त्याने ती स्वीकारली. ती भाषणेसुद्धा खूप प्रसिद्ध झाली. पण त्यामुळे काही शत्रुवर्ग त्याने स्वतःकडे ओढवून घेतला. जॉन बेरी नावाच्या स्त्रीच्या माध्यमातून सगळ्यांनी चार्लीचं आयुष्य उध्वस्त करण्याचा विचार केला. तसे खटले त्याच्यावर टाकले. जर चार्ली ते खटले हरला असता तर २३ वर्ष कैद आणि २६ हजर डॉलर्स चा दंड त्याला भरावा लागला असता. पण चार्लीच्या सुदैवाने आणि हुशार वकिलांमुळे तो निर्दोष सुटू शकला. त्यानंतर अमेरिकेच्या सरकारकडून आणि पत्रकारांकडून चार्लीला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. कारण चार्लीने अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं नव्हतं. त्या वेळी अमेरिकन कॅथॉलिक लीजनंन चार्लीच्या विरुद्ध मोठं षडयंत्र रचलं होतं. चार्लीचा नवा मूव्ही “मिस्यू वर्दो” ज्यावर त्याने खूप मोठी इन्वेस्टमेंट केली होती हा चित्रपट थिएटर मध्ये दाखवला गेला तर त्या थिएटरवर वर्षभर बहिष्कार टाकल जाईल अशी धमकी त्यांनी वितरकांना दिली होती. त्यामुळे चार्लीच्या “युनायटेड आर्टिस्ट” या कंपनीला प्रचंड तोटा सहन करावा लागला होता व ती विकावी लागली होती. इतकं चांगलं काम करत असूनही आणि एवढा टॅक्स भरत असूनही होणाऱ्या त्रासामुळे चार्लीच्या मनात अमेरिकेबद्दल आकस निर्माण झाला आणि पुन्हा आपल्या मायभूमीत लंडनला परत जाण्याचा विचार त्याने केला. त्या प्रोसेसमध्येही त्याला बराच मनस्ताप सहन करावा लागला.

पुढे लंडनहून स्वित्झर्लण्डमध्ये चार्लीचं कुटुंब स्थिरावलं आणि उर्वरित आयुष्य त्याने तिकडेच आपल्या कुटुंबासोबत घालवलं. मधल्या काळात त्याला ऑस्करसाठी पुन्हा एकदा सन्मानाने अमेरिकेत बोलावलं गेलं आणि ज्या देशात आपण वयाची चाळीसहुन अधिक वर्ष घालवली तिथे झालेल्या अवहेलनेमुळे दुखावला गेलेला चार्ली या सर्व सन्मानाने पुन्हा एकदा सुखावला. अत्यंत कठीण परिस्थितीत बालपण घालवलेल्या चार्लीने यशाचं उत्तुंग शिखर पाहिलं व त्यासोबतच अनेक कठीण प्रसंगांना त्याला सामोरं जावं लागलं पण आपली पत्नी ऊना हिच्या सपोर्टमुळे तो ते करू शकला. उतरत्या वयात आपल्या आईसाठी येशूचा आणि आपल्या बाबासारख्या दिसणाऱ्या नेपोलियनवर चित्रपट करणं ही त्याची ईच्छा होती. पण खालावलेल्या तब्येतीमुळे आणि वयामुळे ते शक्य झालं नाही आणि १९७७ साली व्हायच्या ८८ व्या वर्षी चार्लीची प्राणज्योत मालवली.

- सुबोध अनंत मेस्त्री


Comments

Popular posts from this blog

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...