Skip to main content

सही "दुबई"


माझी दुबई ट्रिप महेश चव्हाण आणि मनोज माळवे या माझ्या दोन मित्रांमुळे घडली. मागच्या वर्षी मलेशिया सिंगापूर केल्यानंतर यावर्षी काहितरी नवं शिकायला मिळेल हा विचार होताच पण त्याचबरोबर मला ओळखणारे सोडून महाराष्ट्रातले २०-२२ उद्योजक आहेत हे ऐकल्यावर मी जास्त आढेवेढे घेतले नाहीत.  दुबई प्रवास एक लर्निंग एक्सपिरियन्स होणार यात शंका नव्हती आणि तसंच झालं.

दुबईचं नाव खरंतर (दु बई - दो भाई) असं आहे.  सुरुवातीला बिजनेस पार्टनर म्हणून एक भारतीय व्यक्ती व एक इराणी व्यक्ती असे दोघेजण पुढे आले होते.  त्यावरुन हे नाव ठेवलं गेलं.  दुबई खरं तर एक देश नाही तर एक राज्य आहे.  या देशाचं नाव युनायटेड अरब एमिरेट्स (UAE).  एमिरेट्सचा अर्थ होतो श्रीमंत असे बरेच राजे.  म्हणजेच हे श्रीमंत अशा अरब राजांचं राष्ट्र आहे आणि ते खरंसुद्धा आहे.  इथे एकूण सात राज्य आहेत ज्यांना एमिरेट्स म्हटलं जातं.  त्यातलं एक दुबई जे कमर्शिअल स्टेट आहे.  अबू धाबी हि या देशाची राजधानी आहे व पूर्ण तेल याच राज्यातून काढलं जातं. जर आज अबू धाबीमध्ये तेल सापडणं बंद झालं तरीही पुढची १०० वर्ष पुरु शकेल एवढा तेलाचा साठा त्यांच्याकडे आहे.  शारजाह या राज्याचा बराचसा भाग वाळवंटात आहे.  याव्यतिरिक्त अजमान, उम अल कैवान, रास अल खैमाह, फुजराह अशी इथली काही छोटी राज्य आहेत.  इथली खरी नागरिक संख्या ही पूर्ण यु.ए.ई. लोकसंख्येच्या १७% आहे जी जवळपास ९ लाख ५४ हजार आहे व फक्त दुबईतील नागरिकांची संख्या ४८,५०० एवढी जाते. इथे भारतीयांची संख्या सर्वात जास्त म्हणजेच २७% आहे.  दुबईतली मूळ नागरिकांची संख्या कमी असूनही यांच्याकडे काम करणाऱ्या जगातल्या सर्व देशांच्या नागरिकांना यांनी नियमाच्या जोरावर पूर्णपणे स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवलं आहे.



इथे लोकशाही पद्धत चालत नाही तर अजूनही राजेशाही पद्धत आहे.  मलेशियामध्येसुद्धा राजेशाही पद्धत आहे पण सरकार व राजा असे हातात हात घालून कारभार सांभाळतात.  पण इथे मात्र सगळं राजाच्याच हातात असतं.  राजाचा राजवाडा बाहेरून पाहण्याचा योग आला.  राजाबरोबरच त्यांच्या राण्यांसाठी, मुला-मुलींसाठी, नातवंडांसाठी वेगवेगळे राजवाडे आहेत.  इथे श्रीमंत लोकांची गाडी कशी ओळखायची हा प्रश्न आमच्या गाईडने आम्हाला विचारला.  कुणाला उत्तर जमत नाही हे पाहून त्यानेच उत्तर दिलं.  दुबईत गाड्यांच्या नंबरप्लेट ५ किंवा ४ अंकांच्या असतात.  पण जर ३ नंबरची प्लेट घ्यायची असेल तर जवळपास ५ लाख दिरहाम्स (भारतीय १ करोड रुपये) खर्च करावे लागतात.  जर दोन नंबरची प्लेट घ्यायची असेल तर १५ लाख दिरहाम्स (भारतीय ३ करोड रुपये) खर्च करावे लागतात.  आणि जर फक्त एका नम्बर नंबरची प्लेट हवी असेल तर जवळपास ५ करोड दिरहाम्स (भारतीय १०० करोड रुपये) खर्च करावे लागतात आणि एका नंबरची प्लेट फक्त किंग फॅमिलीकडेच असते.
  
इथे पेट्रोलची किंमत २५ रुपये लिटर आहे तर पाण्याची किंमत कमीत कमी ४० रुपये लिटर आहे.  इथे टॉयलेट व इतर साफसफाईच्या कामासाठी समुद्रातील पाणी शुद्ध करून वापरलं जातं व पिण्यासाठी यांच्या एका वेगळ्या राज्यातून पाणी आणलं जातं.  बीचवर पाण्याचा रेट ३० दिरहाम्स (भारतीय ६०० रुपये) प्रत्येक लिटरमागे घेतला जातो.  पण पेट्रोलचा रेट पूर्ण यु.ए.ई. मध्ये सारखाच आहे.  इथे खजूर सोडून स्वतःचं असं काही पिकत नाही.  खाण्याच्या पूर्ण गोष्टी भारत व पाकिस्तानमधून इम्पोर्ट केल्या जातात.  या देशात फक्त दोनच ऋतू चालतात. उन्हाळा आणि हिवाळा.  पाऊस जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये एकदोन वेळा पडतो आणि तोही एक दोन मिनिट. जर इथे भारतासारखा सलग पाऊस पडला तर इथल्या सगळ्या बिल्डींग्स कोसळून जातील कारण इथे पाणी वाहून नेण्याची सिस्टम अजिबात नाही.  पण इथल्या लोकांचा अल्लाहवर विश्वास आहे.  "अगर अल्लाहने हमें इतना भर भर के दिया हैं तो वो ऐसा नहीं करेगा" असं ते मानतात. उन्हाळ्यात इथे तापमान ५६ डिग्रीच्या वर निघून जातं.  जर २० मिनिट कुणी या उन्हात थांबलं तर तो करपून जाईल.

राजाबद्दलच्या काही चांगल्या गोष्टी आमच्या गाईडकडून आम्हाला कळाल्या.  त्याने आम्हाला प्रश्न विचारला की, "इथली श्रींमंत माणसं कशी ओळखायची?".  एकाने उत्तर दिलं की, "जर त्यांच्याकडे फरारी असेल तर".  त्यावर त्याने दिलेलं उत्तर इथली समृद्धी दर्शवते.  "यहा पे जो आदमी बोेलेगा की मैं गरीब हू, उसके घर के बाहर कम से कम २ गाडीया तो खडी होगी.  उसमे से एक फेरारी है और दुसरी लंबोरगिनी".  यांच्याकडे एवढा पैसा कसा येतो याचं उत्तर आम्हाला आधीच मिळालं होतं.  इथे शिकलेल्या नागरिकांना गव्हर्नमेंट पोस्टवर भरघोस पगारात नोकरी मिळते व जे शिकत नाहीत त्यांना वेगळा इन्कम सोर्स दिला जातो.  जर बाहेरच्या देशातल्या एखाद्या व्यक्तीला यु. ए. ई. मध्ये व्यवसाय चालू करायचा असेल तर त्याला इथल्या एखाद्या नागरिकाला सक्तीने पार्टनर म्हणून घ्यावं लागतं आणि तेही भागीदारी (४९%-५१%) अशी होते ज्यामध्ये ५१% भाग दुबईच्या नागरिकाचा असतो.  पण दुबईतल्या नागरिकांना त्या बिजनेसमध्ये इंटरेस्ट नसतो.  ते एक ठरलेली अमाऊंट दर वर्षाला त्या व्यवसायिकाकडून घेतात.  त्यामुळे न शिकलेल्या नागरिकांनाही भरगच्च पैसे मिळतात.  इथे बाहेरच्या देशातले लोक फक्त काम करण्यासाठीच येऊ शकतात.  आर्थिक व्यवस्थेवरचा भार कमी व्हावा म्हणून वयाच्या साठ वर्षानंतर इथे कोणताही बाहेरच्या देशातला माणूस राहून दिला जात नाही.  यासाठीच इथे काम करणाऱ्या बाहेरच्या देशातल्या लोकांना दर दोन वर्षांनी वर्क परमिट रिनिव्ह करून घ्यावं लागतं.  दुबईमधले नागरिक जर ओळखायचे असतील तर एकदम सोप्पी पद्धत म्हणजे त्यांच्या डोक्यावर असणारी काळी रिंग.  ती रिंग घालण्याचा अधिकार फक्त तिथल्या लोकल नागरिकांनाच आहे. जर तिथे काम करणाऱ्या दुसऱ्या देशातल्या कुणीही ते केलं की त्याला मोठ्या रकमेची भरपाई करावी लागते.


इथल्या राजाची दुसरी चांगली गोष्ट म्हणजे, आपलं राज्य व्यवस्थित चालू आहे का हे पाहण्यासाठी राजा केव्हाही मेट्रोनेसुद्धा प्रवास करतो.  तो कधी कोणत्या मॉलमध्ये फिरतो.  स्वतःची गाडी स्वतः चालवत रात्री १ वाजता बाहेर निघतो.  कधी राजा कुठे असा कोणत्या टुरिस्टला बाहेर भेटला आणि टुरिस्टने फोटोची रिक्वेस्ट केली तर राजा कोणतेही आढेवेढे न घेता त्यांच्याबरोबर फोटो सुद्धा काढतो.  राजाच्या याचं कर्तव्यतत्परतेबद्दल आमच्या गाईडने आम्हाला किस्सा सांगितला.  एकदा वाळवंटात काही टुरिस्ट रस्ता चुकले व त्यांची गाडीही वाळूमध्ये अडकली.  त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं.  दूरपर्यंत कोणी दिसत ही नव्हतं.  काही वेळात एक गाडी तिथे आली आणि त्यातल्या अरब माणसाने आपुलकीने यांची चौकशी केली.  प्रॉब्लेम समजल्यानंतर त्याने त्यांना गाडी बाहेर काढण्यासाठी मदत केली आणि वाळवंटातून बाहेर पडण्यासाठीही मदत केली.  बाहेर आल्यावर या टुरिस्ट व्यक्ती धन्यवाद बोलण्यासाठी अरब माणसाकडे गेल्या.  "आप इतने अच्छे हो तो आपका राजा कितना अच्छा होगा", असं म्हटल्यावर तो अरब माणूस हसला व त्याने स्वतःच कार्ड बाहेर काढलं, "मै ही राजा हु|  कभी कभी सब ठीक है ना ये देखने के लिये रेगीस्तान के भी चक्कर लगा लेता हु|".  

इथली राजेशाही ठरवून कुणाला मिळत नाही.  ती खाणदानी पद्धत आहे.  जो एक राजा आहे तो मरेपर्यंत राजा राहतो.  मग तो आजाराच्या ट्रीटमेंटसाठी देशाबाहेर जरी असेल तरी तो राजा असतो व त्याच्यानंतर त्याचा मुलगा पूर्ण कार्यभार सांभाळतो.  "अपनी सोच ज्यादा से ज्यादा जितना पैसा कमाने की होती है वहा से तो ये पैसा खर्च करने की शुरुवात करते है|   अबुधाबी के किंग के बेटी का शादी था|  उसमे उसने ३०० करोड का सिर्फ फर्निचर ही खरीदा था|", आमच्या गाईडने आम्हाला माहिती दिली.  रईस शब्दाचा नेमका अर्थ त्यावेळी उलगडला.  इथल्या प्रत्येक सरकारी कामासाठी इथल्या भूमीपुत्रांनाच प्राधान्य दिलं जातं.  जर या देशातल्या कोणत्याही मुलीने याच देशातल्या मुलाशी लग्न केलं तर सरकारी यंत्रणा प्रत्येकी ७० हजार दीरहाम्स (भारतीय १४ लाख) रुपये फक्त हनिमून पॅकेजसाठी देतो.  म्हणजेच दोघांना मिळून २८ लाख रुपये फक्त हनिमूनसाठी मिळतात.  जर इथल्या मुलीने बाहेरच्या देशातल्या मुलाशी लग्न केलं तर तिचं नागरिकत्व रद्द होतं.  जर इथल्या मुलाने बाहेरच्या देशातल्या मुलीशी लग्न केलं तर त्या मुलीला पहिली दहा वर्ष इथलं नागरिकत्व मिळत नाही आणि त्यानंतरही मिळेलच असं नाही.  हे करण्यामागचं त्यांचं एकच कारण की यांच्या स्थानिक लोकांचा अधिकार कायम राहावा.  स्पेन हा अगोदर मुस्लिम देश होता पण नंतर तिथे ख्रिश्चन लोकांना नागरिकत्व मिळत गेलं व त्यामुळे हळूहळू मुस्लिम तिथे मायनॉरिटी मध्ये गेले व तो ख्रिश्चन देश झाला.  त्यामुळे तुम्ही यु.ए.ई. मध्ये कितीही वर्ष काम केलंत तरीही तुम्हाला तिथलं नागरिकत्व मिळत नाही.  इथल्या मुलांना जर बाहेरच्या देशात शिकायला जायचं असेल तर त्यांचा निघण्याच्या फ्लाईट पासून, त्यांच्या तिकडच्या शिक्षणाचा, राहण्याचा व परत येण्याचा खर्च इथली सरकारी यंत्रणा करते.  जर इथल्या नागरिकांनी "आमचं घर आमच्या घरातल्या सदस्यांच्या मानाने लहान होतंय" अशी शिफारस दिली तर त्यांच्या घराची पडताळणी केली जाते व त्याबदल्यात त्यांना महिनाभरात मोठ्या घराची चावी मिळते.  इथे कोणताही टॅक्स नाही पण कुठेही वस्तू विकत घेताना ५% वॅट घेतला जातो.  इथल्या नागरिकांना बिनव्याजी कर्ज सहज उपलब्ध आहे.

यु.ए.ई. मध्ये जमीन कधी कोणा बाहेरच्या माणसाला विकली जात नाही तर ती खूप वर्षासाठी भाडे तत्वावर दिली जाते.  म्हणजे जर एखादी जमीन  ५० वर्ष भाड्यावर दिली तर तिथे भाडोत्री स्वतःची बिल्डिंग उभी करू शकतो.  पण त्याची ५० वर्ष संपली तर ती बिल्डिंग पाडली जाते व ती जागा पूर्ण  सपाट केली जाते आणि मग ती दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा भाडे तत्वावर दिली जाते.

इथे सगळेच कायदे अतिशय सक्त आहेत.  "पोलिसिंग विदाऊट पोलीस" तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल.  एकही पोलीस तुम्हाला कुठेच दिसणार नाही पण कुठेही गरज असेल तेव्हा पहिल्या पाच मिनिटात पोलीस हजर होतात.  इथे दंड आणि शिक्षाच इतकी भयंकर आहे की लोक गुन्हा करायला धजावत नाहीत.  प्रत्येक चौकात प्रत्येक सिग्नलवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावले आहेत.  त्यामुळे कोणताही गुन्हा लगेच ट्रॅक होतो.  इथे क्राईम रेट शून्य टक्के आहे.  रात्री कितीही वाजता कुणीही इथे बिनधास्त फिरू शकतो.  इथे तुम्हाला लोक झेब्रा क्रॉसिंगवरूनच रस्ते पार करताना दिसतील आणि तेही क्रॉसिंग सिग्नल ग्रीन झाल्यावर.  जर चालण्याचा सिग्नल चालू नसेल आणि सिग्नल क्रॉस केला तर १०० दिरहाम्स (भारतीय २००० रुपये), जर गाडीने सिग्नल तोडला की लगेच २३०० दिरहाम्सचा (भारतीय ४६००० रुपये) फाईन लागतो, गाडी एक महिना पोलिस स्टेशनला बंद राहते आणि नंतर गाडी सोडवायला गेल्यावर ७५० दिरहाम्स (भारतीय १५००० रुपये) पार्किंगचा फाईन घेतला जातो.    सगळ्या गाड्या सिगलच्या अलीकडे असणाऱ्या सफेद पट्टीच्या मागेच उभ्या राहतात.   रस्त्यावर कचरा फेकताना पकडल्यावर ५२० दिरहाम्स (भारतीय २०,८०० रुपये),जर एखादया सोने विक्रेत्याने २४ कॅरेट सांगून २२ कॅरेटच जरी सोन दिलं व पकडला गेला तर त्याला १ लाख दिरहाम्स (भारतीय २० लाख रुपये) इतका दंड भरावा लागतो, त्यांचं दुकान सील केलं जातं व त्याला पुन्हा व्यापार करण्याची परवानगी दिली जात नाही.  इथे भ्रष्टाचार अजिबात चालत नाही.  जर कुणी पोलीसांना लाच देण्याचा प्रयत्न केला तर ६ महिने जेल आणि दंड भरावा लागतो. 


इथे दोन प्रकारच्या ड्राइव्हरलेस मेट्रो चालतात.  त्यातली एक आहे ग्रीन लाईन मेट्रो जी अंडरग्राउंड चालते व शहराच्या आत चालते.  दुसरी असते रेड लाईन जी शहराच्या बाहेर चालते आणि हायवेवर ट्रॅक असतो.  दुबई मेट्रोच वैशिष्ट्य म्हणजे याचं उदघाटन ९/९/२००९ ०९:०९:०९ असं झालं होतं.  दुबईच्या काही भागांमध्ये अजूनही ट्रामसुद्धा  चालते.  इथे ऑटोमेटेड टोल सिस्टम आहे.  गाडीच्या काचेवर स्टिकर लावलेला असतो ज्यावर एक चिप असते.  याला रिचार्ज मारावा लागतो. जर बॅलेन्स २० दिरहाम्सपेक्षा कमी असेल तेव्हा मालकाच्या मोबाइलवर एस. एम.एस. येतो.  जेव्हा गाडी टोल गेटच्या खालून जाते तेव्हा ऑटोमॅटिक यातून चार दिरहाम्स कट होतात.  जर गाडी टोलगेट खालून गेली व अकाऊंटमध्ये बॅलेन्स नसेल तर पुढच्या चार तासात रिचार्ज करावा लागतो नाहीतर २५० दिरहाम्स (भारतीय ५००० रुपये) एवढा दंड भरावा लागतो.

जगातला सर्वात उंच टॉवर बुर्ज खलिफा दुबईत आहे ज्यामध्ये जगातल्या बऱ्याच सेलेब्रिटींचं घर आहे. या टॉवरमध्ये १६३ माळे आहेत.  यामध्ये असणारी लिफ्ट फक्त ५५ सेकंदात १२४ माळ्यावर पोहचते.  या माळ्यावरून दुबईचं दर्शन घडतं.  बुर्ज खलिफा टॉवरच्या बेसमेंटला "दुबई मॉल" आहे जो मिडल ईस्टचा सगळ्यात मोठा मॉल आहे.  यामध्ये  १४००० गाडयांच्या पार्किंगची सोय आहे व १२०० हुन अधिक शॉप्स आहेत.  कुणालाही मोहून टाकावं असं पाल्म आयलंड ११ किलोमीटर समुद्राच पाणी रोखून समुद्रात बनवलं आहे. या आयलंडच काम 
२००१ मध्ये सुरु झालं व २००८ मध्ये संपलं.  पुढच्या  ७२ तासात या आयलंडवरचे सगळे व्हिला विकले गेले होते.  



जगातलं एकमेव पाण्यातलं सेव्हन स्टार हॉटेल बुर्ज-अल-अरबची २४ तासांची रूमसाठी सगळ्यात कमी किंमत ९००० दिरहाम्स (भारतीय एक लाख ऐंशी हजार रुपये) एवढी आहे व सगळ्यात  महाग रूम  १७ लाखापर्यंत जाते.  या हॉटेलच्या गेस्टना घेण्यासाठी एअरपोर्टवर हेलिकॉप्टर येतं.  या हॉटेलचा एक बार पूर्ण समुद्राच्या पाण्याखाली आहे.  इथे समुद्रदृश्याचा आनंद घेत चहा प्यायला जरी जायचं असेल तरी दोन दिवस आधी बुकिंग करावी लागते ज्याची किंमत भारतीय ७ हजार रुपयांच्यावर  जाते.

यु. ए. ई. मधील लोक फक्त उंटाची शर्यत आणि घोड्याची शर्यत अशा दोनच खेळामध्ये इंटरेस्ट दाखवतात.  दरवर्षी मार्च मध्ये इथे घोड्यांच्या शर्यतीचा वर्ल्ड कप भरतो आणि पहिलं येणाऱ्या घोड्याला ७१ करोड १७  लाख एवढी रक्कम बक्षीस म्हणून मिळते. जगातलं सर्वात उंच हॉटेलसुद्धा दुबईत आहे.

१९७१ आधी वाळवंटात असणाऱ्या या देशाने बघता बघता काही वर्षात पूर्ण कायापालट करून टाकला.  बऱ्याचशा जगातल्या एकमेव गोष्टी दुबईमध्ये आहेत.  या देशाने इथल्या भूमिपुत्रांना कायम न्याय दिला व त्यांच्या ग्रोथसाठी कायम काम केलं.  राष्ट्रहितासाठी नियम कडक असतील व त्याची अंबलबजावणी प्रामाणिकपणे होत असेल तर कायदा सुव्यवस्थेवरचा भार खूप कमी होतो याचं उदाहरण इथे दिसून येतं.  तंत्रज्ञानाने गोष्टी सोप्या व अचूक होतात हे इथे प्रत्येक ठिकाणी दिसून येतं.  बऱ्याच ठिकाणी अजून कन्स्ट्रक्शन चालू आहेत आणि जगातले बरेचसे रेकॉर्ड त्यातून तोडले जातील.  आम्ही फक्त तीन राज्य फिरलो ज्यात दुबई, अबुधाबी व शारजा होतं.  समृद्धी व शिस्त खऱ्या अर्थाने काय असते हे सिंगापूरनंतर इथे पाहायला मिळालं.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

  1. स्वप्निल बने10 February 2019 at 10:26

    खूप छान सुबोध , अप्रतिम वर्णन

    ReplyDelete
  2. फार छान !
    दुबई ची संपूर्ण माहिती ती पण एका परिपूर्ण ब्लॉग मध्ये
    too good sir.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...