Skip to main content

उधार


"पप्पा, त्या डेअरीवाल्याचे दहा रुपये उधार राहिलेत. मी दूध आणलेलं ना मागे त्याचे", बाबांनी बिल्डिंगखालून अंडी आणायला पैसे दिले होते, त्यात दहाची नोट पाहून सार्थकला ते आठवलं असेल. "बाबू लेट होतंय...जा आधी खाली", बाबांचा मागून आवाज ऐकून तो तिथून लगेच निसटला. मीसुद्धा फारसं लक्ष दिलं नाही.

दुपारी शाळेची तयारी करताना त्याला पुन्हा एकदा आठवण झाली.

"माझ्याकडे तेव्हा ४० रुपये होते. मी त्याला बोललो आप उधार दो मै आपको लाके देता हू आणि विसरलो", तो शर्ट घालता घालता मला सांगत होता.

"उधार का घेतले तू? घरी येऊन परत घ्यायचे दहा रुपये आणि मग जायचं", उगाच उधारी वैगेरे प्रकार या वयात कसे मुलांना कळतात या भावनेने त्रासून बोललो.

"अरे मी त्याला ४० रुपये दिले होते दूध आणायला मग पन्नास कसे जातील?", बाबांचा किचनमधून आवाज आला.

"अहो पप्पा, मी म्हैशीच दूध आणलं. गायीचं नव्हतं. म्हणून पन्नास गेले", त्याची तयारी चालूच होती.

"कुणाकडून उधार घ्यायचं नाही. पैसे कमी पडले तर घरी येऊन घेऊन जायचं. डेअरी एवढी लांब आहे का? शाळेत जाताना बघूया", उगाच आता म्हैशीच दूध कशासाठी या विषयावर आई सुरू होईल म्हणून मीच बोलून मोकळा झालो.

त्याला शाळेत सोडायला मीच खाली आलो. स्कुल व्हॅन आली नव्हती. आम्ही दोघे त्या डेअरीसमोर रस्त्यावर उभे होतो. मी पुन्हा विसरलो होतो. पाचेक मिनिटांनी त्यानेच मला आठवण करुन दिली.

"पप्पा याच डेअरीतून घेतलेलं दूध", त्याने डेअरीकडे बोट दाखवत सांगितलं.

"तेच काका होते का डेअरीमध्ये?", त्या डेअरीसमोर माणूस उभा पाहून मी विचारलं.

"नाही. दुसरे होते", त्याने नकारार्थी मान हलवली.

"मग ते असतील तेव्हा देऊ", मी सांगितलं आणि इतक्यात डेअरीचा मालक डेअरीमध्ये शिरला.

"ते बघा पप्पा ते काका होते", सार्थक मालकाला बघून ओरडलाच. आम्ही रस्ता क्रॉस करणार इतक्यात उजव्या बाजून स्कुल व्हॅन येताना दिसली. मी त्याला घेऊन परत मागे फिरलो. इतक्यात काहीतरी विचाराने मी त्याला तिथेच थांबायला सांगितलं आणि मी रस्ता क्रॉस करून गेलो.

"उस बच्चे से आपको दस रुपया लेना था ना?", मी मागे हात करून डेअरीवाल्याला विचारलं. सार्थक व्हॅनच्या मागे असल्याने दिसला नाही पण त्याला काचेतून आम्ही दिसत होतो. तो अजून आत शिरला नव्हता. डेअरीवाल्याला समजलं नाही. मी सार्थकला खुणावून बाहेरच्या बाजूला यायला सांगितलं.

"अरे अंकल, उस दिन मैने आपसे वो भैस का दूध लिया था ना, दस रुपया बाकी था", त्याने व्हॅनसमोर येऊन रस्त्याच्या पलीकडूनच ओरडून सांगितलं.

"अरे सहाब छोडो ना दस रुपया", मालकाला कदाचित ते आठवलं असेल.

"अरे नही भैयाजी, माफ करना वो भूल गया था| उसने आज याद दिलाया|", असं बोलून मी पाकिटातून दहाची नोट त्याच्यासमोर धरली.

"अच्छे संस्कार हो तो ऐसे होता है| आप उसके पिताजी हो?", मालकाने हसत विचारलं.

"हा..उसके दादा दादी के संस्कार है", मी त्याला हसत बोललो.

व्हॅनच्या खिडकीच्या काचेतून सार्थक ते पाहत होता. पैसे दिले असं मी त्याला खुणावलं. त्यानेही हसत मला हात दाखवला. त्याच्या व्हॅन ने शाळेचा रस्ता धरला आणि मी ऑफिसचा.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

  1. हो अगदी, सोमवारी रात्रीची गोष्ट आहे त्याने म्हशीचे दूध आणलं आणि मला सांगितलेही, मम्मी त्या डेअरी वल्याना 10 रुपये द्याचे आहेत म्हणून. मीच म्हटलं सकाळी खाली गेलास की दे, पण पुढे मीच विसरून गेली त्याला आज आठवलं असेल बहुतेक.
    असंच आधी सुद्धा झालं होत आम्ही छोटा छोटा भरपूर खाऊ घेतला आणि तो प्रत्येक खाऊच बेरीज करत होता मनामध्ये, त्याने मला विचारलं बरोबर ना एवढे पैसे झाले ना? मी हो म्हटलं आणि सुटे न्हवते म्हणून 100 ची नोट दिली, पाठी आलेले पैसे मी घाईत वरच्या वर बघितले पण पैसे जास्त होते, पुन्हा मोजले तर खरचं 5 रुपये जास्त होते दुकानदाराला त्यानेच परत केले व म्हणाला काका हे जास्त पैसे जास्त आहेत, दुकानदार त्याला thank you बोलला मग हा त्यानां welcome बोलला आणि आम्ही हसत निघालो. शेवटी घाईत छोटे cake चे पॅकेट्स तिथे दुकानातच विसरलो ते पुढं गेल्यावर कळलं. मी म्हटलं तू जेव्हा जाशील तेव्हा घे.
    दोन चार दिवसांनी तो बाबांबरोबर दुकानात गेला होता तेव्हा त्याने बाबांना सांगितलं, मग त्याने बोलून दाखवलं त्या दुकानदार काकांना की त्या दिवशी आम्ही cake घेतले पण इथेच विसरलो, लगेच दुकानदाराने ते cake पॅकेट्स त्याला दिले. सार्थक खुश होऊन thank you बोलला.
    हे त्याने मी आल्या आल्या सांगितलं, अरे व्हा गुड बॉय अस बोलून मी माझ्या कामात रमले.
    पण हा लेख वाचून छान वाटलं आणि त्याचं कौतुक करायचं राहील हे लक्षात आलं, खरंच त्याच्यात चांगल्या गोष्टी रुजताहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...