Skip to main content

शिवी



*शिवी*
- सुबोध अनंत मेस्त्री
========================================================================
"सुबू, जरा सार्थककडे लक्ष दे. काल घरात शिवी दिली त्याने. म्हणजे सहज बोलता बोलता बोलला", प्रतिभा आणि मी ट्रेन मधून घरी येत होतो. दरवाजाच्या बाजूला असणाऱ्या पॅसेज मध्ये ती जाळीबाजूच्या पार्टिशनला टेकून उभी होती आणि मी तिच्या समोर. ट्रेनला एवढी गर्दी नव्हती.

"काय दिली शिवी?", मी प्रतिभाचा चेहरा बघून मुद्दाम विचारलं. तिला शिव्या पहिल्यापासूनच आवडत नाहीत.

"अरे ती बहिणीवरून देतात ना ती. मला अगोदर समजलं नाही. मी पुन्हा अण्णांना ऐकायला सांगितलं. तर शिवीच होती ती", ती त्रासिकपणे सांगत होती.

"बरं मग", मी विचारलं.

"बर काय? तू समजाव त्याला. मी विचारलं कुठून शिकला तर सांगत होता की बाहेरून एक मुलगा येतो सोसायटीमध्ये. तो शिव्या देतो. तू घरी असशील तेव्हा बघ कोण आहे तो मुलगा आणि समज दे त्याला. बिल्डिंगमध्ये येऊ नको सांग", जशी एका आईची चीडचीड व्हावी तशी स्वाभाविकच तिची होत होती.

"त्याने काय होईल. सार्थक पुन्हा शिवी नाही देणार का?", मी विचारलं.

"अरे तस नाही पण पुढच्या तरी शिकणार नाही", मी एवढा लाईटली का घेतोय याच तिला नवल वाटलं असावं.

"आज मी त्या मुलाला बाहेर काढेन. यापुढे 24 तास आपण त्याच्या बरोबर असणार आहोत का? शाळेतल्या कोणत्या मुलाकडून शिवी शिकला तर? त्याला त्या शिविचा अर्थ माहीत नसेल. त्याने फक्त तो शब्द ऐकला आणि वेगळा वाटला म्हणून बोलला. त्याला ते चुकीचं आहे हे समजलं पाहिजे. उगाच त्याच्या समोर ओव्हररिऍक्ट झालो तर त्याच्या लेखी त्या गोष्टीला महत्व येईल. लक्ष देऊ नकोस. मी बघतो", मी तिला समजावत होतो.

"पण तरीही बघ जरा त्या मुलाकडे आणि सार्थकशीही बोल", मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. प्रतिभानेही विषय टाळला.

मी घरी येऊन त्याच्याशी बोलेन अशी तिची अपेक्षा होती पण मी तस करणार नव्हतो. 10-15 दिवस असेच गेले पण पुन्हा माझ्या कानावर तो शब्द त्याच्याकडून आला नाही.

एक दिवस आम्ही तिघे शॉपिंगसाठी मॉल मध्ये गेलो. प्रतिभा एका बाजूला सामान घेत असताना मी आणि सार्थक शॉपिंग कार्ट घेऊन पॅसेजमध्ये उभे होतो आणि नेमका फोनवर बोलताना एक माणूस आमच्या बाजूने "आयचा घो" अस बोलून गेला.

सार्थकचे कान टवकारले, "पप्पा घो म्हणजे काय ?", त्याची उत्सुकता स्वाभाविकच होती.

"शिवी आहे बाळा. चुकीचा शब्द आहे. लक्ष नको देऊ", आता तो मुद्द्यावर येणार हा त्याचा चेहराच सांगत होता.

"मग पप्पा भें*द ही पण शिवीच आहे ना?", तो एवढ्या मोठया आवाजात बोलला की आजूबाजूचे लोक आमच्याकडे बघायला लागले.

मी थोडा खाकरलो. ही योग्य वेळ होती. पण त्या गोष्टीत काही विशेष नाही असं दाखवून मी त्याला विचारलं, "हो शिवीच आहे आणि खूप वाईट शब्द आहे. तू कुठून ऐकला?"

"तो शिवम येतो ना तो बोलतो सारखा", सार्थकने सांगितलं.

या नावाचा मुलगा बिल्डिंगमध्ये नाही हे मला माहित होतं. तरीही मी त्याला मुद्दाम विचारलं, "कोणत्या फ्लोअरला राहतो शिवम?"

"पप्पा. तो आपल्या बिल्डिंगमधला नाही. बाहेरून येतो. विहानदादाला पण मारतो तो. बॅड बॉय आहे एकदम", अशा गोष्टी सांगताना त्याचे विशिष्ट हातवारे असतात आणि मला ते खूप आवडतात. विहान हा आमच्या बिल्डिंगमधल्या लहान मुलांचा लीडर. तो चौथीला आहे. आता त्याला मारतो म्हटल्यावर यांच्यावर थोडा प्रभाव असणारच.

"हम्म. असे शब्द बॅड बॉयच वापरतात. तुझ्या दीदीला कुणी वाईट बोललेलं चालेल का तुला?", मी विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली.

"मग ही शिवी म्हणजे आपण दुसऱ्याच्या दीदीला वाईट बोलतो. मला कधी ऐकलस हा शब्द बोलताना?", मी विचारलं

"नाही. कारण आपण दोघेपण गुड बॉय आहोत", हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर चमक होती.

"येस", मी त्याला हाईवफाईव्ह देण्यासाठी हात समोर केला आणि त्याने जोरात त्यावर टाळी मारली.

या गोष्टीला आता जवळपास दोन महिने उलटून गेले. सार्थककडून हा शब्द परत कुणाच्याही कानावर आला नाही. आज मी मुद्दाम त्याच्याजवळ शिवमचा विषय काढला, "सार्थक अरे तो शिवम येतो का बिल्डिंगमध्ये?",

"नाही येत. घाबरतो. देवराडी अंकलने (सेक्रेटरीे) बाहेरच्या मुलांना यायला मनाई केलीय", तो त्याच्या पोकेमॉन कार्डमध्ये बिझी असल्यामुळे माझ्याकडे न बघताच उत्तर दिलं.

========================================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656

#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

दादास पत्र

दादास पत्र - सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== तस तर तुमच्यातले बरेच जण विनोदला पर्सनली ओळखता.  तो व्यक्ति म्हणून कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.  अस म्हणतात की देवाला प्रत्येक माणसावर लक्ष देता येणार नाही म्हणून त्याने आई बनवली.  माझ्यासाठी देव बर्‍याच व्यक्तिच्या रूपाने माझ्याबरोबर असतो आणि त्यातलाच माझा दादा आहे.  माझ्या आयुष्यात माझ्या भावाच जे योगदान आहे त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय.   आभार ही खूप छोटी संकल्पना आहे त्यांच्यासाठी ज्यांनी तुमचं आयुष्य घडवलय पण या गोष्टी जगासमोर सुद्धा यायला हव्यात.  या पत्रातून मी काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. ==================================================== प्रिय दादू, वाढदिवस हा फक्त निमित्त आहे या सगळ्या गोष्टी कागदावर उतरवण्यासाठी. पण आज जी प्रत्येक गोष्ट मी मांडेन ती मी खूप वेळा आणि खूप लोकांसमोर बोललो आहे. हल्ली स्मरणशक्ती एवढी कमजोर झाली आहे की कालच कुणाला आठवत नाही. पण आठवणी कागदावर उतरल्या की त्या चिरतरुण राहतात. भाऊ नक्की कसा असावा याच जिवंत उदाहरण

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल