Skip to main content

शिवी



*शिवी*
- सुबोध अनंत मेस्त्री
========================================================================
"सुबू, जरा सार्थककडे लक्ष दे. काल घरात शिवी दिली त्याने. म्हणजे सहज बोलता बोलता बोलला", प्रतिभा आणि मी ट्रेन मधून घरी येत होतो. दरवाजाच्या बाजूला असणाऱ्या पॅसेज मध्ये ती जाळीबाजूच्या पार्टिशनला टेकून उभी होती आणि मी तिच्या समोर. ट्रेनला एवढी गर्दी नव्हती.

"काय दिली शिवी?", मी प्रतिभाचा चेहरा बघून मुद्दाम विचारलं. तिला शिव्या पहिल्यापासूनच आवडत नाहीत.

"अरे ती बहिणीवरून देतात ना ती. मला अगोदर समजलं नाही. मी पुन्हा अण्णांना ऐकायला सांगितलं. तर शिवीच होती ती", ती त्रासिकपणे सांगत होती.

"बरं मग", मी विचारलं.

"बर काय? तू समजाव त्याला. मी विचारलं कुठून शिकला तर सांगत होता की बाहेरून एक मुलगा येतो सोसायटीमध्ये. तो शिव्या देतो. तू घरी असशील तेव्हा बघ कोण आहे तो मुलगा आणि समज दे त्याला. बिल्डिंगमध्ये येऊ नको सांग", जशी एका आईची चीडचीड व्हावी तशी स्वाभाविकच तिची होत होती.

"त्याने काय होईल. सार्थक पुन्हा शिवी नाही देणार का?", मी विचारलं.

"अरे तस नाही पण पुढच्या तरी शिकणार नाही", मी एवढा लाईटली का घेतोय याच तिला नवल वाटलं असावं.

"आज मी त्या मुलाला बाहेर काढेन. यापुढे 24 तास आपण त्याच्या बरोबर असणार आहोत का? शाळेतल्या कोणत्या मुलाकडून शिवी शिकला तर? त्याला त्या शिविचा अर्थ माहीत नसेल. त्याने फक्त तो शब्द ऐकला आणि वेगळा वाटला म्हणून बोलला. त्याला ते चुकीचं आहे हे समजलं पाहिजे. उगाच त्याच्या समोर ओव्हररिऍक्ट झालो तर त्याच्या लेखी त्या गोष्टीला महत्व येईल. लक्ष देऊ नकोस. मी बघतो", मी तिला समजावत होतो.

"पण तरीही बघ जरा त्या मुलाकडे आणि सार्थकशीही बोल", मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. प्रतिभानेही विषय टाळला.

मी घरी येऊन त्याच्याशी बोलेन अशी तिची अपेक्षा होती पण मी तस करणार नव्हतो. 10-15 दिवस असेच गेले पण पुन्हा माझ्या कानावर तो शब्द त्याच्याकडून आला नाही.

एक दिवस आम्ही तिघे शॉपिंगसाठी मॉल मध्ये गेलो. प्रतिभा एका बाजूला सामान घेत असताना मी आणि सार्थक शॉपिंग कार्ट घेऊन पॅसेजमध्ये उभे होतो आणि नेमका फोनवर बोलताना एक माणूस आमच्या बाजूने "आयचा घो" अस बोलून गेला.

सार्थकचे कान टवकारले, "पप्पा घो म्हणजे काय ?", त्याची उत्सुकता स्वाभाविकच होती.

"शिवी आहे बाळा. चुकीचा शब्द आहे. लक्ष नको देऊ", आता तो मुद्द्यावर येणार हा त्याचा चेहराच सांगत होता.

"मग पप्पा भें*द ही पण शिवीच आहे ना?", तो एवढ्या मोठया आवाजात बोलला की आजूबाजूचे लोक आमच्याकडे बघायला लागले.

मी थोडा खाकरलो. ही योग्य वेळ होती. पण त्या गोष्टीत काही विशेष नाही असं दाखवून मी त्याला विचारलं, "हो शिवीच आहे आणि खूप वाईट शब्द आहे. तू कुठून ऐकला?"

"तो शिवम येतो ना तो बोलतो सारखा", सार्थकने सांगितलं.

या नावाचा मुलगा बिल्डिंगमध्ये नाही हे मला माहित होतं. तरीही मी त्याला मुद्दाम विचारलं, "कोणत्या फ्लोअरला राहतो शिवम?"

"पप्पा. तो आपल्या बिल्डिंगमधला नाही. बाहेरून येतो. विहानदादाला पण मारतो तो. बॅड बॉय आहे एकदम", अशा गोष्टी सांगताना त्याचे विशिष्ट हातवारे असतात आणि मला ते खूप आवडतात. विहान हा आमच्या बिल्डिंगमधल्या लहान मुलांचा लीडर. तो चौथीला आहे. आता त्याला मारतो म्हटल्यावर यांच्यावर थोडा प्रभाव असणारच.

"हम्म. असे शब्द बॅड बॉयच वापरतात. तुझ्या दीदीला कुणी वाईट बोललेलं चालेल का तुला?", मी विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली.

"मग ही शिवी म्हणजे आपण दुसऱ्याच्या दीदीला वाईट बोलतो. मला कधी ऐकलस हा शब्द बोलताना?", मी विचारलं

"नाही. कारण आपण दोघेपण गुड बॉय आहोत", हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर चमक होती.

"येस", मी त्याला हाईवफाईव्ह देण्यासाठी हात समोर केला आणि त्याने जोरात त्यावर टाळी मारली.

या गोष्टीला आता जवळपास दोन महिने उलटून गेले. सार्थककडून हा शब्द परत कुणाच्याही कानावर आला नाही. आज मी मुद्दाम त्याच्याजवळ शिवमचा विषय काढला, "सार्थक अरे तो शिवम येतो का बिल्डिंगमध्ये?",

"नाही येत. घाबरतो. देवराडी अंकलने (सेक्रेटरीे) बाहेरच्या मुलांना यायला मनाई केलीय", तो त्याच्या पोकेमॉन कार्डमध्ये बिझी असल्यामुळे माझ्याकडे न बघताच उत्तर दिलं.

========================================================================
*- सुबोध अनंत मेस्त्री*
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656

#sahajsaral

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...