प्रिय काकी,
आज तुझ्या सेवानिवृत्ती समारंभात येऊन छान वाटलं. दादाने आमच्यावतीने थोडक्यात पण उत्तमरित्या तुझ्या जीवनप्रवासाचं वर्णन केलं. बोलण्यासारखं माझ्याकडेही बरंच होतं पण तिथे बऱ्याच जणांना बोलायचं होतं आणि असंही जवळच्या व्यक्तींबद्दल बोलताना माझ्या भावना अनावर होतात म्हणून मी तिथे बोलणं टाळलं. त्यासाठीच हा पत्रप्रपंच.
बालपणातला बराच काळ मी तुम्हा दोघांसोबत घालवला. तुमच्या लग्नाच्या वेळी मी तिसरी चौथीला असेन. त्या काळात मुलांचे बर्थडे सेलिब्रेट करण्याचं एवढं काही फॅड नव्हतं पण चाळीत दोन तीन सुखवस्तू घरातले बर्थडे बघून माझ्या बालमनात ती ईच्छा निर्माण झाली होती. मी आतापर्यंत कधीच वाढदिवस साजरा केला नाही हे तुला समजल्यावर तू आणि नयना मावशी मिळून घरी येऊन माझा वाढदिवस सेलिब्रेट केलात तो प्रसंग आजही माझ्या मनात ताजा आहे. आता कदाचित वाढदिवस साजरा करणं ही खूप कॉमन गोष्ट आहे पण तीसेक वर्षापूर्वी ती नक्कीच नव्हती. त्यानंतर तुझ्यासोबत पाहिलेला जुरासिक पार्क सिनेमासुद्धा एक वेगळा आणि धमाल अनुभव होता.
तुम्हा दोघांच्या लग्नातला मी टोकणा. लग्नात बरेच फोटो काढायला मिळतील या अपेक्षेवरच झालो होतो. पण रिसेप्शन मध्ये त्या गर्दीत मी हरवून गेलो. मी तिथे दिसत नाही आणि एका कोपऱ्यात नाराज मुद्रेत पाहून तू मला समोर घेतलंस. त्यानंतरच्या लग्नातल्या जवळपास प्रत्येक फोटोत मी आहे. या छोट्या छोट्या प्रसंगातून तू मला माझी वाटायला लागलीस आणि मग त्यानंतर मी तुझ्यासोबत जास्त वेळ रहायला लागलो. कुर्ल्याच्या घराने सुद्धा मला आपलंस करून घेतलं. मला सख्खी मावशी नव्हती पण ती कमतरता कुर्ल्याला चारही मावश्यांनी भरून काढली. हेमंत मामा तर कायम आमचा मित्रच राहिला. आजी आणि बाकी सगळ्यांकडून तेव्हा झालेले माझे लाड आणि तिथे घालवलेले दिवस मला अजून लख्ख आठवतात. तुमचं आमचं न करता प्रत्येक गोष्ट आपली बोलावी ही सवय सुद्धा तूच मला लावलीस जी माझ्या इतकी अंगळवणी पडली की ते मी अजून फॉलो करतो.
कुर्ल्याला, आर. सी. एफ ला, त्यानंतर ऐरोली ला पुढची कित्येक वर्ष हक्काने सुट्टीत तुमच्याकडे येत राहिलो. तुझ्याकडून खाण्यापिण्याचे, फिरण्याचे लाड करून घेत राहिलो. स्वप्न कशी बघावी, ती प्रत्यक्षात कशी उतरवावी हे तुम्हा दोघांकडून शिकत राहिलो. तेव्हाचा तुमचा स्ट्रगल तुम्ही आता कधी बोलण्यातून आम्हाला सांगता पण त्यावेळी तो तुम्ही आमच्यापर्यंत कधी पोहचू दिला नाही. "जावे त्याच्या वंशा, तेव्हा त्याची कळे" हे वाक्य इथे तंतोतंत जुळतं. तेव्हा सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करताना तुमची काय दमछाक झाली असेल हे आता आम्हाला समजतंय. तुझं एवढं मोठं ऑपरेशन आणि त्यानंतर स्वतः जिद्दीने उभं राहून आपली स्वप्न पूर्णत्वाला आणणं हे आमच्यासाठी कायम प्रेरणादायी उदाहरण आहे. जिथे ही गोष्ट कुणासाठी एक्सक्युज बनू शकली असती तिथे सकारात्मक विचारशक्ती मजबूत ठेवून तू तुझ्या आजारपणावर मात करू शकलीस. स्वतःसोबत तुम्ही दुसऱ्यांसाठीही तेवढेच हळवे राहिलात आणि वेळोवेळी त्यांना मदत केली आणि त्याचंच फळ देवाने तुम्हाला दिलं. साऊ लहान असताना तिला डॉक्टर करायचं हे तू मला सांगितलं होतंस आणि ते जेव्हा प्रत्यक्षात घडलं तेव्हा स्वप्न पाहिली की ती प्रत्यक्षात उतरू शकतात हेसुद्धा तुम्हा दोघांकडे बघून आम्हाला समजलं. आपल्या घरात कुणी डॉक्टर होऊ शकेल हे स्वप्न याआधी कुणी पाहिलं नसेल. आता स्वप्नदीपच्या रूपाने जरी तुझा जावई आला असेल तरी आमच्यासाठी छोटा भाऊच आला आहे अशी जबरदस्त फिलिंग यावी इतकी बाँडिंग खूप कमी वेळात आमच्यात झाली आहे. स्वप्नदीपचे आईबाबा आमचे होऊन गेले आहेत.
तुला पाहिल्यावर वाटतं की तुला काय जमत नाही ? उत्तम सुगरण, लेखिका, कवयित्री, निवेदिका, नृत्यांगना... सगळंच काही. ना तुझं वय वाढलं, ना तुझी एनर्जी कमी झाली. सगळे कार्यक्रम या वयात सुद्धा तू गाजवतेस म्हणजे नक्कीच तुझ्यावर सरस्वतीची कृपा आहे. आज तुझं कौतुक सगळ्यांकडून ऐकताना ऊर अभिमानाने भरून येत होता. तू शिक्षण क्षेत्रात केलेली कामगिरी खरंच अभिमानास्पद आहे. प्रामाणिकपणे सांगतो वयानुसार जर निवृत्ती नसती तर अजून कित्येक वर्ष तू तुझी अविरत सेवा शाळेसाठी चालू ठेवली असतीस. शेवटी प्रत्येक गोष्ट घडवण्यामागे परमेश्वराची काही ना काही योजना असते. आता कदाचित तुला स्वतःसाठी जास्त वेळ मिळेल. तुझे सगळे छंद, लिखाण यांना उभारी येईल. सायली आज म्हणाली तशी तू जास्तीत जास्त लिहित रहा. तुझे विचार तुझ्या लेखणीतून लोकांपर्यंत पोहचू दे. आयुष्यभर दोघांनीही इतकी मेहनत घेतलीत आता फक्त स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी वेळ काढा आणि जग एक्सप्लोर करा. आतापर्यंत तुम्ही गुगल मॅप सारखं दिशादर्शक म्हणून आमच्यासाठी काम करत राहिलात तसंच रिटायरमेंटनंतर आयुष्य कसं असावं याचाही मार्ग तुम्हीच आमच्यासाठी आखून द्या. आज फक्त एका गोष्टीचा आनंद होता की तू आणि आप्पा सगळ्या व्यापातून बाहेर आल्यामुळे आमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी आता केव्हाही अवेलेबल राहू शकता.
तुम्ही दोघेही कायम आमच्यासाठी प्रेरणा राहिलात आणि यापुढेही ही अविरत प्रेरणा आमच्या आयुष्यात येत राहील. माईकवर हे सगळं मांडताना भावना अनावर होऊ नयेत म्हणून लिखाणातून तुझ्यासमोर व्यक्त झालो. तुझं खरं आयुष्य आता सुरू झालंय आणि ते नक्कीच बहारदार असेल.
खुश रहा आणि कायम आहेस तशीच चिरतरुण रहा !
तुझाच,
सुबोध

Comments
Post a Comment