इंडस्ट्री 4.0 ते 5.0 – तंत्रज्ञानाचा अद्भुत प्रवास
(लेखक: अच्युत गोडबोले)
आपल्या आजूबाजूला तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, बिग डेटा, इंटरनेट ऑफ थिंग्ज, 3D प्रिंटिंग, ब्लॉकचेन, 5G अशा अनेक संकल्पना गेल्या काही वर्षांत सर्वत्र ऐकायला मिळतात. पण या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष आपल्या जीवनावर, व्यवसायावर आणि समाजावर काय परिणाम होतो? भविष्यात या गोष्टी कोणत्या रूपात दिसतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे अत्यंत सोप्या, थेट आणि सखोल पद्धतीने करून देणारे अच्युत गोडबोले सरांचे पुस्तक म्हणजे “इंडस्ट्री 4.0 ते 5.0”.
एका नॉन टेक्नोसॅव्ही माणसाला सुद्धा सहज समजेल इतक्या सोप्या आणि रंजक भाषेत हे लिहीलं गेलंय. इंडस्ट्री 4.0 म्हणजे नेमके काय, त्याचा इतिहास आणि संकल्पना, AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, ChatGPT, तसेच AR/VR, IIoT, ब्लॉकचेन, 5G, 3D–4D प्रिंटिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानांचा परिचय, तंत्रज्ञानाचा केवळ औद्योगिक वापर न मांडता त्यामागील मानवी दृष्टीकोन आणि सामाजिक बदल, भविष्यातील इंडस्ट्री 5.0 यावर प्रकाश ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत.
हे पुस्तक केवळ तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी नाही. विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक किंवा टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट असलेला कोणताही वाचक या पुस्तकातून आपला दृष्टिकोन अजून विस्तारु शकतो.
आज आपण सर्व जण तंत्रज्ञानाच्या महासागरात जगत आहोत. या महासागराची दिशा समजून घेण्यासाठी हे पुस्तक एक चांगलं गाईड होऊ शकते. जर तुम्हाला तंत्रज्ञान व्यवस्थित समजून घ्यायचे असेल तर “इंडस्ट्री 4.0 ते 5.0” हे पुस्तक नक्की वाचा. हे पुस्तक तुम्हाला वर्तमान समजावून देईलच पण त्यासोबतच भविष्यात येणाऱ्या बदलांची कल्पनासुद्धा देईल.
- सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment