"चांगली कर्म करशील तर स्वर्गात जाशील नाहीतर नरकात जाशील", अशी वाक्य सहजासहजी लहानपणापासून आपल्या कानावर पडत आली असतील. "मेल्यानंतर कुणी बघितलंय रे...जे आहे ते सगळं इकडेच", हे वाक्य सुद्धा अगदी कॉमन. पण पृथ्वीवर फक्त आपण आपल्या आत्म्याचा विकास करण्यासाठी आलोय अशा अनुषंगाने "जीवात्मा जगाचे कायदे - लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड" हे खोरशेद भावनगरी यांचे पुस्तक आपल्याला मार्गदर्शन करते.
खोरशेद भावनगरी यांची दोन मुले अगदी तरुण वयात मोटार अपघातात दगावली. उतार वयात हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्यांना ही घटना मान्य होत नव्हती. अशा काही व्यक्ती आहेत ज्या जीवात्मा जगाशी आपल्याला संपर्क करून देतात हे त्यांना कुणीतरी सुचवले. व त्यांच्या मदतीने खोरशेद यांनी स्वतःच्या दोन्ही मुलांच्या आत्म्याशी संपर्क सुरू केला. त्यांच्या मुलांनी मृत्यूनंतरच्या आयुष्यावर सांगितलेल्या गोष्टींवर हे पूर्ण पुस्तक आधारित आहे.
बऱ्याच गोष्टी मानन्या न मानन्यावर आहेत पण शिकण्यासारखं या पुस्तकातून बरच काही आहे. जसं की, एखाद्याला मदत केल्यावर तो विचारसुद्धा तुमच्या मनाला पुन्हा शिवला नाही पाहिजे एवढी ती निस्वार्थी मदत हवी, अहंकार कसा निर्माण होतो आणि त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर कसे होतात, कर्म आपल्या अध्यात्मिक प्रगतीवर कसे परिणाम करतात, कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करण्याचा विचारही का करू नये, अपयश का महत्त्वाचे आहे आणि यासारखं अजून बरच काही. ज्या व्यक्ती आपल्याला सोडून या जगातून निघून जातात त्या आपल्याला मार्गदर्शन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतात पण आपण भौतिक मनामध्ये इतके गुंतलो आहोत की अर्धजागृत मनाकडून ते संदेश घेण्याचा आपल्याकडून प्रयत्न होत नाही. ज्यांच्याकडे अर्धजागृत मनाला सचेतन ठेवण्याची ताकद आहे तेच त्यांच्याशी संपर्क साधू शकतात.
खरं तर या पृथ्वीवरून व्यक्ती निघून गेली तर ती या भौतिक जाळामधून पूर्णपणे मुक्त झालेली असते आणि तिच्या कर्माचा हिशोब होऊन ती नक्की १ ते ७ पैकी कोणत्या लोकामध्ये जाईल हे ठरते. खऱ्या अर्थाने आपल्याला सोडून गेलेली व्यक्ती ही आपल्यासोबत कायम असते. पृथ्वीवर आहोत तर जास्तीत जास्त लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक योगदान करून आपण आपल्या आत्म्याचा विकास करून घेतला पाहिजे हेच या पुस्तकातून मांडलं आहे.
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment