Skip to main content

ट्राय ट्राय


-सुबोध अनंत मेस्त्री

==========================================================================
नमस्कार, बऱ्याच दिवसांनी लेख घेऊन आलो आहे. सहज सरळच्या माध्यमातून मी आजूबाजूच्या घटनांचा अभ्यास करत असतो. ही सुद्धा अशीच एक साधी सरळ घटना. लहान मुलांना त्यांचे पालक प्रत्येक गोष्टीत कमी लेखत असतात किंवा त्याला एखादी गोष्ट जमणार नाही हे त्याच्या मनावर बिंबवत असतात आणि त्याने त्या मुलाचा आत्मविश्वास खालावत जातो. अशा बऱ्याच घटना मी लहानपणापासून अनुभवत आलोय आणि ते माझ्या मुलाच्या बाबतीत होऊ द्यायचं नाही याची जमेल तितकी काळजी घेतो. मुलांना त्यांच्या चुकांची जाणीव अप्रत्यक्षपणे करून देणं व चांगल्या कामासाठी त्याची पाठ थोपटण हे पालकांचं कर्तव्य आहे.

==============================================================

आज सकाळी नाश्त्याला ऑम्लेट खायचं म्हणून मी फ्रिजचा दरवाजा उघडला आणि अंड्यांचा कप्पा रिकामा?

"आई...अंडी संपली का सगळी?", कालच 4-5 पहिली असल्याने मी जवळपास कुतूहलाने विचारलं.  

"हो, तुझ्या पोरालाच लागतात सारखी.  सकाळ संध्याकाळ अंड्याची पोळी पाहिजे त्याला",  आईच निर्विकार उत्तर.

आता मला नाश्त्याला ऑम्लेट मिळणार नाही आणि सार्थकला पोळी आधीच मिळाली आणि तो खातोय म्हणून माझ्याकडे बघून तो मोठमोठ्याने "पप्पाला पोळी नाही" म्हणून चिडवून हसायला लागला.  मी  खिशातून पैसे काढले.  आमच्या बिल्डिंगच्या गेटच्या बाजूलाच छोटं भाजीचं दुकान आहे तिथे अंडी मिळतात म्हणून तिथून सार्थकला आणायला सांगितली.  "तो लहान आहे. त्याला आणायला जमायची नाहीत", म्हणून आई मला ओरडायला लागली.  बाबानीही तिला दुजोरा दिला.  त्याने या अगोदर कधी दुकानातून अंडी आणली नव्हती हे खरं होत पण 6 वर्षाचा तो लहान आहे या गोष्टीवर माझा आक्षेप होता.  त्याने प्रयत्न करावा ही माझी ईच्छा होती.   मी थोडा जास्त फोर्स करतोय बघून मग आई बाबा काही बोलले नाहीत.  मी आधी एक डजन बोलत होतो पण आईने अर्धा डजन वर मांडवली केली.

"पिशवी हलवत आणू नकोस रे.  उरलेले पैसे बरोबर घेऊन ये" आईच्या सूचना घेऊन तो खाली गेला.  

हे काम त्याला सांगणं म्हणजे माझ्यासाठी थोडी रिस्क होतीच कारण त्याने काही गडबड केली तर सगळं बिल माझ्या नावावरच होत.  दहा मिनिटांनी तो वर आला.  त्याच्या हातात पिशवी आणि सगळी अंडी फुटून त्यातला गर त्या पिशवीतून खाली ओघळत होता.  म्हणजे हा 3 फ्लोअर असाच ओघळ सांडत आला असेल याची मला कल्पना आली.  तो थोडा घाबरला होता.  

"आईssss, सगळी अंडी फुटली", त्याने सरळ त्याच्या स्टाइलचा हेल काढून आईलाच सांगितलं कारण ती त्याची वकील आहे.  तो जवळपास रडवेला झाला होता.  मी किंवा बाबा त्याला ओरडतील याची भीती त्याला वाटत होती.  पण आईच त्याला ओरडायला लागली आणि पर्यायाने मला.  मी आईला बाबांना हात दाखवून काही बोलू नका अस सांगितलं.  मी त्याला जवळ घेतलं आणि विचारलं, "नो प्रॉब्लेम शोना.  तू ट्राय केलंस आणि मला तर मस्त वाटलं.  फुटली म्हणून काय झालं आपण दुसरी आणू.  पुढच्या वेळी आणताना व्यवस्थित घेऊन ये.  पण कशी पडली सगळी अंडी?"

सगळेच शांत आहेत आणि कुणी काही बोलत नाही पाहून तो थोडा रिलॅक्स झाला.

"येताना मी सोहमच्या घराजवळ आलो आणि पिशवीतून एक अंड हातात घेऊन बघताना ते पडलं.  ते उचलताना सगळीच पडली."  त्याने निरागसपणे हातवारे करत सगळं सांगून टाकलं.  

"अरे पण गरज काय होत अंड काढून बघायची...पिशवीत उड्या मारत होत का ते?", आई पुन्हा चालु होणार होती पण मी तिला हातानेच नको सांगितलं.

"तू तयारी कर...शाळेला उशीर होतोय.", असं सांगून मी स्वतः जाऊन अंडी घेऊन आलो.  जातानाच पाहिलं तर खरच फर्स्ट फ्लोअर पासून हा ओघळ सांडत आला होता.  मी अंडी आणेपर्यंत पप्पांनी तिसऱ्या फ्लोअरचा जिना साफ केला होता.  उरलेलं मी साफ करतो सांगून मी कपडा त्यांच्याकडुन घेतला.  मी जाऊन जिन्यावर झालेली घाण साफ करून आलो.  सार्थकही शाळेची तयारी करत होता.  मी ऑफिसला निघत होतो.  तयारी केली.  

त्याने मला मोठ्याने ओरडून सांगितलं, "पप्पा नेक्स्ट टाइम नाही फुटणार माझ्याकडून.  मी आणेन बरोबर".  

"कशामुळे फुटली समजल का तुला?" मी त्याला जवळ घेऊन विचारलं.

"हो...पिशवी उघडली नसती तर नसती फुटली", त्याने माझ्या मानेभोवती दोन्ही हात टाकून उत्तर दिलं.  

मीही त्याला स्माईल दिली आणि म्हटलं, "नो प्रॉब्लेम.  ट्राय करत राहायचं"

===========================================================================
- सुबोध अनंत मेस्त्री
स्वराज्य इंफोटेक / जीवनरंग
9221250656



#sahajsaral

Comments

  1. वास्तविक जीवनातल्या लहान सहान गोष्टीतुन कितितरी चागंल्या गोष्टी आपण शिकू आणि शिकवु शकतो .... हे खुप सुदंररित्या माडंल आहेस तु.... लिखते रहो...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

दादास पत्र

दादास पत्र - सुबोध अनंत मेस्त्री ===================================================== तस तर तुमच्यातले बरेच जण विनोदला पर्सनली ओळखता.  तो व्यक्ति म्हणून कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे.  अस म्हणतात की देवाला प्रत्येक माणसावर लक्ष देता येणार नाही म्हणून त्याने आई बनवली.  माझ्यासाठी देव बर्‍याच व्यक्तिच्या रूपाने माझ्याबरोबर असतो आणि त्यातलाच माझा दादा आहे.  माझ्या आयुष्यात माझ्या भावाच जे योगदान आहे त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलोय.   आभार ही खूप छोटी संकल्पना आहे त्यांच्यासाठी ज्यांनी तुमचं आयुष्य घडवलय पण या गोष्टी जगासमोर सुद्धा यायला हव्यात.  या पत्रातून मी काही जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. ==================================================== प्रिय दादू, वाढदिवस हा फक्त निमित्त आहे या सगळ्या गोष्टी कागदावर उतरवण्यासाठी. पण आज जी प्रत्येक गोष्ट मी मांडेन ती मी खूप वेळा आणि खूप लोकांसमोर बोललो आहे. हल्ली स्मरणशक्ती एवढी कमजोर झाली आहे की कालच कुणाला आठवत नाही. पण आठवणी कागदावर उतरल्या की त्या चिरतरुण राहतात. भाऊ नक्की कसा असावा याच जिवंत उदाहरण

आयत्या बिळात नागोबा!!!

=======================================================================  हा छोटासा लेख मला आलेल्या बँक फ्रॉड कॉल्सपैकी एक अनुभव आहे.  नक्की वाचा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. =======================================================================  कालच मला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरची व्यक्ती ती बँकेतून बोलत आहे अशी मला भासवत होती.  माझा आधार कार्ड बँकेला लिंक नसल्याने माझं  ATM कार्ड ब्लॉक झालं आहे असे थातूर मातूर कारण सांगून त्या व्यक्तीने माझ्याकडून बँकेच्या कार्ड आणि पिन बद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  मीही मला काहीच समजत नाही आणि कार्ड ब्लॉक झाल्यामुळे घाबरलो आहे असं दाखवून त्याला सगळी खोटी माहिती दिली.  नंतर त्याने बँकेची माहिती अपडेट होण्यासाठी तुम्हाला तासभर मोबाईल बंद ठेवावा लागेल असं सांगून फोन ठेवून दिला.  माझी ती खोटी माहिती वापरताना चूकीची आहे समजल्यावर त्याने मला शिव्या जरूर घातल्या असतील पण हे सामान्य माणसाला कसे फसवतात व काय सांगतात हे मला जाणून घ्यायचे होते.  ही केस तुमच्याबरोबर सुद्धा होऊ शकते.  आपण फेसबुक, ट्विटर अशा बऱ्याच ठिकाणी आपल